नवी
दिल्ली, दि. १२ : राष्ट्रपती
प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते आज पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
महाराष्ट्रातील ७ मान्यवरांचा यात समावेश आहे.
राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित शानदार
कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणा-या देशातील ५६ मान्यवरांना पद्म
पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून ३ मान्यवरांना पद्मभूषण तर ४
मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यावेळी उपराष्ट्रपती हमीद
अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्षा सुमीत्रा महाजन, केंद्रीय
गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पद्म पुरस्कारांचे वितरण दोन टप्प्यात करण्यात येते. आज दुस-या टप्प्यात ५६ मान्यवरांना
हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी एकूण ११ पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात
आले, यापैकी महाराष्ट्रातील ३ मान्यवरांचा यात समावेश आहे. कला क्षेत्र व
पार्श्वगायनात मोलाचे योगदान देणारे प्रसिध्द गायक उदीत नारायण , साहित्य व शिक्षण
क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी प्रा.एन.एस.रामानुज टाटाचार्य तर अध्यात्मिक
क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी स्वामी तेजोमयानंद यांना सन्मानीत करण्यात आले.
या समारंभात एकूण ४० पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात
आले पैकी महाराष्ट्रातील ४ मान्यवरांचा यात समावेश आहे. सार्वजनिक क्षेत्रात
उल्लेखनीय कार्यासाठी सरकारी वकील उज्ज्चल
निकम यांना तर कला व चित्रपट क्षेत्रातील
उत्तम योगदानासाठी सिनेअभिनेत्री प्रियंका
चोपडा यांना सन्मानीत करण्यात आले. समाज
सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी सुधाकर ओलवे यांना तर व्यापार व उद्योग क्षेत्रातील
उल्लेखनीय योगदानासाठी डॉ.केकी होरमुसजी घरडा यांना सन्मानीत करण्यात आले.
गणतंत्र दिनाच्या पूर्व संध्येला यावर्षी देशातील पद्म
पुरस्कार प्राप्त ११२ मान्यवरांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यात महाराष्ट्रातील
एकूण १६ मान्यवरांचा समावेश आहे, पैकी एक मरणोत्तर पद्मविभूषण, ५ मान्यवरांना पद्मभूषण
तर १० मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले. २८ मार्च रोजी पद्म पुरस्कार
वितरणाच्या पहिल्या टप्प्यात यातील ९ मान्यवरांना तर आज दुस-या टप्प्यात ७ मान्यवरांना सन्मानीत
करण्यात आले.
00000000
No comments:
Post a Comment