Tuesday 28 July 2020

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांमधील वाघांच्या संख्येत वाढ




2006 मध्ये 103 तर 2018-19 मध्ये 312
चौथा सविस्तर अहवाल प्रकाशित
नवी दिल्ली, 28 : देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये एकूण वाघांची संख्या 2 हजार 967 इतकी असून  महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये 312 वाघांची संख्या आहे. चौथ्या अखिल भारतीय वाघ जनगणच्या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे.
जागतिक टायगर दिनाच्या पुर्वसंध्येला केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावेडकर यांनी देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये असणा-या वाघांच्या जनगणनविषयीचा सविस्तर अहवाल आज येथील राष्ट्रीय मिडीया सेंटर येथे प्रकाशित केला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वाघ हा जंगलाचा राजा असून निसर्गाचे समतोल राखण्यासाठी जंगलाचा महत्वाचा घटक समजला जातो. वाघांची वाढती संख्या पर्यावरणात समतोल असल्याचे दर्शविते. वाघ आणि इतर प्राण्यांची वाढती संख्या हे भारताला जागतिक पटलावर महत्वपुर्ण स्थान मिळवून देण्यात भुमिका निभावू शकतात. भारतामध्ये जैवविविधतेचे आठ टक्के प्रमाण आहे. वृक्ष, निसर्ग, वन्यजीवन वाचवण्याची आणि जतन करण्याची  भारतीय संस्कृती आहे. भारतात, जगातील वाघांच्या संख्येच्या 70 टक्के वाघ आहेत. हे एक प्रशंसनिय बाब, असल्याचे श्री जावडेकर यावेळी म्हणाले.
मानव आणि प्राण्यांचा संघर्ष टाळण्यासाठी जंगलांमध्ये पाणी व चारा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यासाठी प्रथमच लिडर सेंसरचा वापर केला जाईल, अशी माहिती श्री जावडेकर यांनी यावेळी दिली.
चौथ्या अखिल भारतीय व्याघ्र अनुमानाचा तपशीलातील महत्वाचे मुद्दे
·        इतर प्राणी आणि प्रजातींच्या विपुलता निर्देशांक दर्शविण्यात आला आहे.
·        सर्व कॅमेरा ट्रॅप साइटमधून प्रथमच सर्व वाघांचे लिंग प्रमाण केले गेले.
·        मानववंशविषयक तपशीलांचा वापर वाघांची लोकसंख्या मोजण्यासाठी  करण्यात आला.
·        व्याघ्र प्रकल्पातील रचनेत वाघांचे असणारे प्रमाण काढण्यात आले.
भारतात वाघांची संख्या आता 2967 आहे. जी जगातील वाघाच्या लोकसंख्येच्या तुलनेत 70 टक्के आहे. झालेल्या सर्वेक्षणामध्ये सर्वाधिक कॅमेराचे जाळे पसरवून सर्वेक्षण करण्यामध्ये भारताने जागतिक विक्रम नोंदविला केला आहे. 
राज्यातील व्याघ्र प्रकल्पांमधील वाढती वाघांची संख्या
 आज प्रकाशित झालेल्या अहवालामध्ये महाराष्ट्रात असणा-या 6 व्याघ्र प्रकल्पांमध्ये एकूण 312 वाघांची संख्या नोंदविण्यात आली आहे. यापुर्वीच्या प्रसिद्ध अहवालामध्ये 2006 मध्ये ही संख्या 103, 2010 मध्ये 168, 2014 मध्ये 190 आणि आता 2018-19 च्या सर्वेक्षणामध्ये हा आकडा वाढून 312 झाला असल्याचे नोंदविण्यात आले आहे. यामुळे भविष्यात  व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन क्षेत्रात वाढ होईल.

Wednesday 22 July 2020

राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी













महाराष्ट्रातून 6 सदस्यांनी घेतली शपथ
नवी दिल्ली, 22 : राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज राज्यसभेत पार पडला. महाराष्ट्रातून 6 सदस्यांनी राज्यसभा सदस्य पदाची शपथ घेतली. उपराष्ट्रपती तसेच राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडु यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली.
संसदेतील वरिष्ठ सभागृह राज्यसभेत आज नवनिर्वाचित सदस्यांचा शपथ विधी झाला. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष तसेच माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे राजीव सातव, भारतीय जनता पक्षाचे डॉ. भागवत कराड, उदयनराजे भोसले, शिवसेना पक्षाच्या प्रियंका चतुर्वेदी अशा एकूण 6 सदस्यांनी आज राज्यसभेच्या सदस्य पदाची शपथ घेतली. श्री पवार आणि श्री आठवले यांनी दूस-यांदा राज्यसभा सदस्य पदाची शपथ घेतली.    
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नवनिर्वाचित सदस्यांनी सामाजिक अंतर पाळून शपथ घेतली. या सदस्यांना आपल्या सोबत  केवळ एक अतिथी आणण्याची परवानगी मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ सदस्या फैजिया खान यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्या शपथविधीस उपस्थित राहू शकल्या नाहीत. ज्या सदस्यांचा शपथविधी आज होऊ शकला नाही त्यांचा शपथविधी पुढील संसद अधिवेशन काळात होईल.
महाराष्ट्रातील सहा सदस्यांसह देशभरातील अन्य नवनिर्वाचित राज्यसभा सदस्यांनीही शपथ घेतली यामध्ये राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सदस्य मल्लिकार्जुन खर्गे, दिग्विजय सिंह, झारखंड मुक्ती मोर्च्याचे अध्यक्ष तसेच माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन आणि  भारतीय जनता पक्षाचे ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही शपथ आज  घेतली. राज्यसभेच्या 19 जागांसाठी जूनमध्ये निवडणुका घेण्यात आल्या होत्या.