Saturday 23 March 2024

निवासी आयुक्त रूपिंदरसिंग यांच्या हस्ते लोकसभा पूर्वपीठिका-2024 चे प्रकाशन




 











महाराष्ट्रातील लोकसभा मतदार संघातील वर्ष 1977 ते 2019 महत्वपूर्ण माहितीचा समावेश


नवी दिल्ली, 23: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने तयार करण्यात आलेली महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघांच्या माहितीवर आधारित पूर्वपीठिकेचे प्रकाशन, महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त रूपिंदरसिंग यांच्या हस्ते आज करण्यात आले.


निवासी आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पूर्वपिठिकेचे प्रकाशन झाले. सहायक निवासी आयुक्त डॉ राजेश आडपावार व श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा व कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होते.


लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पूर्वपीठिकेच्या माध्यमातून महत्वपूर्ण संदर्भ उपलब्ध झाले आहेत. ही संदर्भ पुस्तिका सर्वांसाठीच उपयुक्त ठरणारी आहे. माहिती व जनसंपर्क विभागाने घेतलेल्या पुढाकाराबद्दल समाधान व्यक्त करताना निवासी आयुक्त रूपिंदरसिंग म्हणाले की, माध्यम प्रतिनिधी तसेच निवडणुकीशी संबंधित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना ही पुस्तिका तात्काळ संदर्भासाठी उपयुक्त ठरणार आहे. ही संदर्भ पुस्तिका अल्पावधीत व परिपूर्ण माहितीसह सुबक पद्धतीने तयार केल्याबद्दल त्यांनी माहिती विभागाचे कौतुक केले.


राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाअंतर्गत कार्य करणाऱ्या महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापने पासूनच राष्ट्रीय प्रसार माध्यमे आणि दिल्लीस्थित महाराष्ट्रातील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना लोकसभा मतदारसंघाविषयी साद्यंत माहिती देणारी पूर्वपिठीका प्रकाशित करण्यात येते. यावर्षीही 18व्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्वपिठीका प्रका‍शित करण्यात आली आहे. माध्यम प्रतिनिधी व लोकसभा निवडणुकीतील विविध अधिकाऱ्यांना ही पुस्तिका संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी पडेल.


लोकसभा निवडणूक पूर्वपिठीकेत वर्ष 1977 पासून 2019 पर्यंत राज्यात पारपडलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल, मतदारसंघ निहाय विजेते आणि उपविजेते ठरलेल्या उमेदवरांच्या मतांची माहिती व टक्केवारी देण्यात आली आहे. तसेच 1977 पासून राज्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील विजयी उमेदवारांचे मतदारसंघ निहाय नावेही देण्यात आली आहेत. याखेरीज मुख्य राज्य निवडणूक अधिकारी, राज्यातील सर्व जिल्हयांचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस निरिक्षक व सर्व जिल्हा माहिती अधिकारी यांचे दूरध्वनी व फॅक्स क्रमांकांची माहिती देण्यात आली आहे. पूर्वपिठीकेतील या एकत्र माहितीचा प्रसार माध्यमातील प्रतिनिधींना महाराष्ट्रात पाच टप्प्यात होवू घातलेल्या निवडणुकांचे वार्तांकन करताना मोलाची मदत होणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘महासंवाद’ या संकेतस्थळाच्या स्कॅनकोडचा समावेश करण्यात आला आहे, ज्याद्वारे स्कॅनकोडचा उपयोग करून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे प्रकाशित करण्यात येणारी अद्यावत माहिती पाहता येणे सहज शक्य होणार आहे.


यासोबतच निवडणूक आयोगाकडून निर्गमित महत्तवाच्या एप्स, पूर्वपीठिका 2024 मध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणूक कार्यक्रम, लोकसभा मतदारसंघातंर्गत विधानसभा मतदार संघ, मतदार व मतदान केंद्रांबाबत माहिती, देशभरात होणाऱ्या निवडणूकीचा सात टप्प्यांचा नकाशा, राज्यात होणाऱ्या निवडणूकीचा पाच टप्प्यांचा नकाशा, वर्ष 2024 मधील मतदारांची एकूण लोकसंख्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच, केंद्रीय निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी, निवडणूक आचारसंहिता, मार्गदर्शक तत्वे, राजकीय पक्ष व उमेदवार यांच्या मार्गदर्शनासाठी आदर्श आचार संहिता, वृत्तपत्रांसाठी पेड न्युज, सोशल मिडिया, निवडणूक विषयक नियमांतील ठळक बाबी आणि निवडणूक आयोगाने खास निवडणूकी साठी तयार केलेले ‘चुनाव का पर्व’ या चिन्हांचा समावेश आहे.

00000000000000

आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र. 49, दि.23.03.2024

राजधानीत शहीदांना अभिवादन








नवी दिल्ली, 23 : भारतीय स्वातंत्र्य लढयात अमूल्य  योगदान देणारे शहीद भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना शहीद दिनानिमित्त महाराष्ट्र सदन येथे आज अभिवादन करण्यात आले.

 

कॉपर्निकसमार्ग मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त ‍ श्री रूपिंदरसिंग यांनी  शहीद भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार व श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह  महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी शहीदांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

 

यावेळी महाराष्ट्र  सदनचे अधिकारी व  कर्मचाऱ्यांनी  तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

 

*****************

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.48 / दिनांक 23.03.2024

 

 

 

 

 




 

Saturday 16 March 2024

लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर : देशभरात सात टप्प्यात होणार मतदान महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदान देशात आजपासून आदर्श आचार संहिता लागू




 


नवी दिल्ली, 16 मार्च :  देशात 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये दिनांक 19 एप्रिल ते 1 जून 2024 या कालावधित एकूण सात टप्यांमध्ये मतदान पार पडणार असून 4 जून 2024 रोजी निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात १९ एप्रिल ते २० मे दरम्यान पहिल्या ५ टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्यात येणार आहेत. तसेच विधानसभेच्या अकोला पश्चिम मतदार संघासाठी लोकसभेच्या निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने येथील विज्ञान भवनात आज पत्रकार परिषद घेवून 18 व्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि डॉ.सुखबीर सिंह संधू यावेळी उपस्थित होते.  निवडणूक कार्यक्रमांच्या या  घोषणेमुळे  देशात आजपासून आदर्श आचार संहिता लागू  झाली आहे.

महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदान

             महाराष्ट्रातील ४८ लोकसभा जागांसाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. १९ एप्रिल रोजी पहिल्या  टप्प्यात राज्यातील एकूण  ५ लोकसभा मतदार संघांसाठी निवडणुका पार पडणार आहेत. दुस-या टप्प्यात २६ एप्रिल रोजी राज्यातील ८ मतदार संघांसाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. ७ मे रोजी तिस-या टप्प्यात राज्यातील एकूण ११ मतदार संघांसाठी, १३ मे  रोजी चौथ्या टप्प्यात तर २० मे रोजी  राज्यातील उर्वरित १३ मतदार संघांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.

            लोकसभा निवडणुकांबरोबरच देशातील विधानसभांच्या २६ जागांसाठी पोट निवडणुका होत असून यात महाराष्ट्रातील अकोला पश्चिम मतदार संघासाठी लोकसभेच्या निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. 

 

देशात सात टप्प्यात मतदान

देशात 19 एप्रिल रोजी  पहिल्या  टप्प्यात 21 राज्य व  केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 102 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी 20 मार्च रोजी अधिसूचना जारी होणार आहे. 27 मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल तर 28 मार्च रोजी  उमेदवारी  अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. तर 30 मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

देशात 26 एप्रिल रोजी  दुस-या  टप्प्यात 13 राज्य व  केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 89 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी 28 मार्च रोजी अधिसूचना जारी होणार आहे. 4 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल तर 5 एप्रिल रोजी  उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. तर 8 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

 

देशात 7 मे रोजी  तिस-या  टप्प्यात 12 राज्य व  केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 94 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी  १२ एप्रिल रोजी अधिसूचना जारी होणार आहे.

 

देशात 13 मे रोजी चौथ्या  टप्प्यात 10 राज्य व  केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 96 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान  घेण्यात येणार आहे. यासाठी  १८ एप्रिल रोजी अधिसूचना जारी होणार आहे.

 

देशात 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात 8 राज्य व  केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 49 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान  घेण्यात येणार आहे. यासाठी  ३ मे  रोजी अधिसूचना जारी होणार आहे.

 

देशात 25 मे रोजी सहाव्या टप्प्यात 7 राज्य व  केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 57 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान  घेण्यात येणार आहे. यासाठी  २९  एप्रिल रोजी अधिसूचना जारी होणार आहे.

 

देशात 1 जून रोजी सातव्या टप्प्यात 8 राज्य व  केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 57 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान  घेण्यात येणार आहे. यासाठी  ७ मे  रोजी अधिसूचना जारी होणार आहे.

 

ठळक मुद्दे

Ø  1 कोटी 84 लाख मतदार (वयाची 18 वर्षे पूर्ण झालेले ) देशात प्रथमच मतदाते

Ø  18 ते 29 वर्ष वयोगटातील 21 कोटी 50 लाख मतदार

Ø  देशात 85 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील 82 लाख मतदार

Ø  100 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील 2 लाख मतदार

Ø  85 वर्षावरील व 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांगता असणाऱ्या व्यक्तींसाठी देशात प्रथमच घर जावून मतदान

Ø  12 राज्यात महिला मतदारांचे प्रमाण प्रति 1 हजार पुरुषांच्या तुलनेत 1 हजारापेक्षा जास्त. देशात 1 हजार पुरुषांमागे सरासरी 948 महिला मतदार

 

निवडणूक यंत्रणेसमोर ही चार आव्हाण

आदर्श आचार संहितेचे उल्लंघन करण्याबाबत

बळाचा प्रयोग(मसल पावर), पैशांचा वापर (मनी पावर), चुकीची माहिती (मिस इन्फॉर्मेशन) आणि माध्यम समन्वय समितीच्या नियमांचे उल्लंघन ही निवडणूक यंत्रणेसमोरील महत्वाची आव्हाण असून यावर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले. 

*****************

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.47 / दिनांक 16.03.2024


Wednesday 13 March 2024

महिला चित्रकार मनाली बोंडे यांचे वसुधैव कुटुंबकम चित्र प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद









नवी दिल्ली, 13: ­­­‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या विदर्भातली मनाली अनिल बोंडे यांच्या चित्र प्रदर्शनीचे मंगळवारी थाटात उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

राजधानीतील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र येथे हा उद्घाटन सोहळा पार पडला. ह्या कार्यक्रमाला भारतीय नौदलाचे सेवानिवृत्त व्हाईस ॲडमिरल सतीशकुमार घोरमाडे, खासदार डॉ अनिल बोंडे, डॉ वसुधा बोंडे, मराठी प्रतिष्ठानचे विष्णु पाटील यांसोबत अनेक उद्योजकांची उपस्थिती होती. हे प्रदर्शन 12 व 13 मार्च या कालावधी दरम्यान भरण्यात आले आहे.

साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण, औद्योगिक, प्रशासन यांसह चित्रांची आवड असलेल्या प्रत्येकासाठी हे प्रदर्शन एक नवी पर्वणी ठरणार असल्याचा सुर उद्घाटनाप्रसंगी मान्यवरांकडून उमटल्याचे पहायला मिळाले. यावेळी सर्व मान्यवरांनी प्रदर्शनी परिसरात लावण्यात आलेल्या सर्व अप्रतिम कलाकृतींची पाहणी केली व मनालीचे तोंड भरून कौतूकही केले.

या प्रदर्शनीच्या शेवटच्या दिवशी केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री, श्री नितीन गडकरी यांनी या प्रदर्शनीला आज भेट दिली. सर्जक कलाकृतींचा कौतुक करत त्यांनी मनाली बोंडे यांना शुभेच्छा दिल्या.      

विविध देशांच्या संस्कृती आणि कथांवर आधारित छायाचित्र प्रदर्शन प्रथमच राजधानीत भरवण्यात येणार आहे. जागतिक महिला दिन सप्ताहानिमित्त इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, नवी दिल्ली आणि त्रिवेणी चॅरिटेबल फाऊंडेशन अमरावती, यांच्या वतीने अमरावती येथील प्रसिद्ध युवती चित्रकार मनाली अनिल बोंडे यांच्या ‘वसुधैव कुटुंबकम’ या विषयावरील चित्रांचे प्रदर्शन 12 आणि 13 मार्च 2024 रोजी इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र येथे भरविण्यात आला आहे.

                                                                  चित्रकार मनाली अनित बोंडे विषयी

चित्रकार मनाली बोंडे यांनी त्यांच्या वयाच्या 12व्या वर्षापासून चित्रकलेची सुरूवात केली आहे. मागील 15 वर्षांपासून त्या चित्रकला क्षेत्रात पूर्णवेळ कार्यरत आहेत. मनालीने एमबीए पदवी मिळवली आहे. राज्यसभाखासदार डॉ अनिल बोंडे यांच्या त्या कन्या आहेत.

कंबोडिया, लाओस, इटली, जर्मनी, इस्रायल, इंडोनेशिया अशा परदेशातील अनेक देशांना भेटी दिल्यानंतर मनालीने त्या- त्या देशाचे विचार आणि जीवनावर आधारित चित्रे या प्रदर्शनात ठेवली आहेत. भारताचे वैचारिक योगदान - वसुधैव कुटुंबकम यांनी या विचारसरणीचे आपल्या चित्र आणि प्रदर्शनातून कौतूक केले आहे. हे छायाचित्र प्रदर्शन 12 आणि 13 मार्च 2024 रोजी इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स, दिल्लीच्या दर्शना- 2 हॉलमध्ये सादर केले.

*****************

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

                                             अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.46 / दिनांक 13.03.2024


 

Tuesday 12 March 2024

कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ या मराठी कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान 70 वर्ष पूर्ण झाल्याने अकादमीकडून 11-16 मार्च दरम्यान साहित्य महोत्सव

 





 

 नवी दिल्ली, 12: नामवंत लेखक व कादंबरीकार कृष्णात खोत  यांना रिंगाण कादंबरीसाठी मराठी भाषेकरिता  साहित्य अकादमी पुरस्कार आज प्रदान करण्यात आला.

कमानी सभागृहात संपन्न झालेल्या सोहळ्यात साहित्य अकादमी पुरस्कार 2023 चा सादरीकरण सोहळा हे महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले. ओडिसा राज्याच्या प्रख्यात साहित्यिक व प्रमुख पाहुण्या प्रतिभा राय यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

             कमानी ऑडिटोरियम येथे संपन्न झालेल्या सोहळ्यात अध्यक्ष माधव कौशिक, उपाध्यक्ष श्रीमती कुसुम शर्मा तसेच सचिव, के. श्रीनिवासराव मंचावर उपस्थित होते. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नाव लौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने, येथील कॉपर्निकसमार्ग स्थित साहित्य अकादमीच्या वर्ष 2023 साठी साहित्य पुरस्कार सोहळा पार पडला. अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील 24 प्रादेशिक भाषांसाठी  साहित्य अकादमी साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.

         कृष्णात खोत यांच्या लेखन कार्याविषयी 

श्री कृष्णात खोत यांना मराठी कादंबरी ‘रिंगाण’ करिता साहित्य अकादमीतर्फे गौरविण्यात आले. त्यांना प्रतिभा राय यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. साहित्य अकादमी पुरस्काराचे स्वरूप ताम्रपत्र, शाल आणि रुपये एक लाख रोख रक्कम आणि ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

मूळचे कोल्हापूर येथील कृष्णात खोत हे पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथील रहिवाशी आहेत. पन्हाळा विद्यामंदिर येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. सध्या ते कळे येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिकवितात.

कृष्णात खोत हे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रदेश समूहनिष्ठ कादंबरी लेखनाने ‘कादंबरीकार कृष्णात खोत’ म्हणून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या शतकारंभी श्री. खोत यांनी त्यांच्या लेखन कार्याला सुरूवात केली आणि मराठीत लक्षणीय ठराव्यात अशा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. ‘गावठाण’ (२००५), ‘रौंदाळा’ (२००८), ‘झड-झिंबड’ (२०१२), ‘धूळमाती’ (२०१४), ‘रिंगाण’ (२०१८) या त्यांच्या प्रकाशित कादंबऱ्या असून, या कादंबऱ्यांमधून बदलत्या ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण केले आहे. याशिवाय 'नांगरल्याविन भुई' हे त्यांनी लिहिलेले ललित व्यक्तिचित्रण प्रकाशित झाले आहेत. गावसंस्कृती आणि बदलते खेड्यातील जीवनसंघर्ष त्यांच्या लिखाणाचा विषय आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी आणि सन्मानांनी नावाजले गेले आहे. यशवंतराव चव्हाण राज्य साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका) पुरस्कार, वि. . खांडेकर पुरस्कार, बाबुराव बागुल शब्द पुरस्कार, भैरूरतन दमानी साहित्य पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 

रिंगाण या कादंबरी विषयी

'रिंगाण' या कादंबरीला मराठी भाषा करिता साहित्य अकादमी पुरस्कार 2023 साठी आज श्री खोत यांना पुरस्कार प्रधान झाला. 'रिंगाण' ही एक थक्क करणारी कादंबरी आहे. जिच्यात जंगलात राहणाऱ्या समुदायाच्या विस्थापित आयुष्याचे चित्रण आहे आणि या समुदायाला धरण बांधण्याच्या कामासाठी एका प्रतिकूल समुदायामध्ये पुनर्स्थापित करण्यात आलेले आहे. मानव आणि निसर्गातील नातेसंबंधांच्या इतिहासाचे हे निवेदन असून, स्वरक्षणासाठी मानवाने निसर्गाशी केलेल्या संघर्षाचा हा वास्तववादी इतिहास आहे. या कादंबरीतील नायक, देवप्पाचा वेदनादायी शोध मानवाच्या निसर्गाशी असलेल्या नात्यातील दृढता आणि संघर्ष रेखाटतो. मानवाच्या उद्धटपणामुळे आणि ताकदीमुळे कशी पर्यावरणीय आणि सामाजिक हानी झालेली आहे याचे अत्यंत महत्वपूर्ण विधान या कादंबरीत करण्यात आलेले आहे. भारतीय कादंबरी प्रकाराला मराठीतील 'रिंगाण' हे महत्वपूर्ण योगदान आहे. माणूस आणि पाळीव प्राणी यांच्यातील संबंधांचा एक अनोखा अनुबंध या कादंबरीतून अनुभवायला मिळतो.

कोंकणी भाषेतील ‘वर्सल’या लघुकथा संग्रहासाठी प्रकाश एस पर्येंकर यांना पुरस्कार

प्रख्यात कोंकणी लेखक, कवी, अनुवादक तथा पटकथा लेखक, प्रकाश एस पर्येंकर यांना ‘वर्सल’ या लघुकथा संग्रहासाठी प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले.

70 वर्षे पूर्ण झाल्याने साहित्य अकादमीकडून 11-16 मार्च दरम्यान साहित्य महोत्सव आयोजित

            नॅशनल अकादमी ऑफ लेटर्स, इंडिया या साहित्य अकादमीला यावर्षी ७० वर्षे पूर्ण होत असल्याने, सहा दिवसांचा भव्य सोहळा अकादमीकडून आयोजित करण्यात आला आहे. अकादमीतर्फे दरवर्षी साजरा केला जाणारा 'साहित्योत्सव' या वेळी जगातील सर्वात मोठा साहित्य महोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवासराव यांनी माहिती दिली की, 190 हून अधिक सत्रांमध्ये 1100 हून अधिक नामवंत लेखक आणि अभ्यासक सहभागी होत असून, देशातील 175 हून अधिक भाषांचेही त्यात प्रतिनिधित्व केले गेले आहे.

प्रसिद्ध उर्दू लेखक आणि गीतकार गुलजार यांचे प्रतिष्ठित संवत्सर व्याख्यान 13 मार्च रोजी मेघदूत खुले नाट्यगृहात सायंकाळी 6.30 वाजता होणार.

11 मार्च रोजी साहित्य अकादमी फेलोचाही सत्कार करण्यात आले. बहुभाषिक काव्यवाचन आणि लघुकथा वाचन, युवा साहित्य, अस्मिता, पूर्वोत्तरी, भारतातील भक्ति साहित्य, भारतातील बालसाहित्य, भारताची कल्पना, मातृभाषेचे महत्त्व, आदिवासी कवी आणि लेखक संमेलन या विषयावर पॅनेल चर्चा, या नियमित कार्यक्रमां व्यतिरिक्त, भविष्यातील कादंबरी, सांस्कृतिक अभिव्यक्ती म्हणून रंगभूमी, भारताचा सांस्कृतिक वारसा, भारतीय भाषांमधील विज्ञान कथा, नीतिशास्त्र आणि साहित्य, भारतीय भाषांमधील चरित्रे, साहित्य आणि सामाजिक चळवळी, परदेशातील भारतीय साहित्य अशा विविध विषयांवर पॅनेल चर्चा आणि परिसंवादही होतील. या सहा दिवसीय महोत्सवात सहभागी होणारे हिंदी आणि विविध भारतीय भाषांमधील काही नामवंत लेखक आणि अभ्यासक असतील- एस.एल. भायराप्पा, चंद्रशेखर कंबार, पॉल जकारिया, आबिद सुर्ती, के. सच्चिदानंदन, चित्रा मुदगल, मृदुला गर्ग, के. एनोक, ममंग दाई, एच.एस. शिवप्रकाश, सचिन केतकर, नमिता गोखले, कुल सैकिया, वाय.डी. थोंगची, मालश्री लाल, कपिल कपूर, अरुंधती सुब्रमण्यम, रक्षंदा जलील, राणा नायर, वर्षा दास, सुधा शेषयान, उदय नारायण सिंग, अरुण खोपकर, शीन काफ निजाम आदी सहभागी होतील.

तीन राज्यांचे राज्यपाल - आरिफ मोहम्मद खान (केरळ), श्री विश्वभूषण हरिचंदन (छत्तीसगड), आणि श्री सी.व्ही. आनंद बोस (पश्चिम बंगाल) हे देखील महोत्सवात सहभागी होण्याबाबतची माहिती अकादमी सचिवांनी दिली.

*****************

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.45 / दिनांक 12.03.2024


राजधानीत यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी

 






नवी दिल्ली, 12: संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जयंती आज  दोन्ही महाराष्ट्र सदनात साजरी  करण्यात आली.    

            कॉपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त रूपिंदरसिंग यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस तसेच, कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. प्रतिमा गेडाम व श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 

महाराष्ट्र परिचय केंद्रात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

नवमहाराष्ट्राचे शिल्पकार, यशवंतराव चव्हाण यांची जयंती महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली. परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहीली. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. 

*****************

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.44 / दिनांक 12.03.2024