Saturday 29 August 2020

महाराष्ट्रातील सहा खेळाडुंना अर्जुन पुरस्कार प्रदान राज्याला एकूण १४ राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार




नवी दिल्ली, 29  : घोडेस्वार सुभेदार अजय सावंत, नौकानयनपटू दत्तू भोकनाळ, कुस्तीपटू राहूल आवारे, पॅरा स्वीमर सुयश जाधव            , खोखोपटू सारिका काळे आणि टेबलटेनिसपटू मधुरिका पाटकर यांना क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून  अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आले.

महाराष्ट्रातील 14 व्यक्ती व संस्थाना आज वर्ष 2020 चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात सहा अर्जुन पुरस्कार , तीन ध्यानचंद पुरस्कार, एक द्रोणाचार्य पुरस्कार, एक तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी  पुरस्कार आणि तीन संस्थाना राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात आले.  

         केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त कोवीड19 च्या पार्श्वभूमीवर दूरदृष्य प्रणालीद्वारे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार- 2020’ चे वितरण करण्यात आले.  या कार्यक्रमास राष्ट्रपती भवनातून राष्ट्रपती तर  विज्ञान भवनातून केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) किरेन रिजीजू आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते.

यावेळी देशाच्या विविध भागातून सहभागी क्रीडापटू ,क्रीडा प्रशिक्षक आणि संस्थाना गौरविण्यात आले  महाराष्ट्रातील 14 व्यक्ती  व संस्थाना यावेळी गौरविण्यात आले .

                                राज्यातील सहा खेळाडुंचा अर्जुन पुरस्काराने सन्मान

 सुभेदार अजय अनंत सावंत यांना घोडेस्वारीतील योगदानासाठी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुभेदार सावंत यांनी 2016 मध्ये इजिप्त येथे आयोजित टेंट पिगींग, सोर्ड पिगींग आणि लान्स टेंट पिंगींग या घोडेस्वारी प्रकारात भारत देशाला सुवर्ण पद‍क मिळवून दिले. तसेच, अबुधाबी येथे 2018 मध्ये आयोजित विश्व चषक स्पर्धेत टेंट पिगींग मध्ये रजत पदक पटकावून त्यांनी देशाचा गौरव वाढविला आहे .  

नौकानयनपटू दत्तू बबन भोकनाळ यांना उत्कृष्ट योगदानासाठी अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले. 2016 मध्ये आयोजित रियो ऑलम्पिक स्पर्धेत एकल नौकानयन प्रकारात त्यांनी 13 वे स्थान प्राप्त केले होते, हा किर्तीमान करणारे श्री भोकनाळ हे पहिले भारतीय ठरले . एशियन गेम 2018 आणि एशियन चँम्पियनशिप 2015 मध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. 

कुस्तीपटू राहूल आवारे यांना कुस्तीतील उल्लेखनीय योगदानासाठी अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशातील उत्कृष्ट पहेलवानांमध्ये समावेश असलेल्या राहूल आवारे यांनी 2018 मध्ये आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकाविले.  2019 मध्ये आयोजित जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कास्य पदक ,सिनीयर एशियन चँम्पियनशिप 2019 आणि 2020 मध्ये कास्य पदक मिळवून देशाचा बहुमान वाढविला आहे. 

पॅरा स्वीमर सुयश नारायाण जाधव यांना जलतरणातील उत्कृष्ट योगदानासाठी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2018 मध्ये आयोजित एशियन पॅरा क्रीडा स्पर्धेत  बटर फ्लाय (50 मिटर)प्रकारात सुवर्ण पदक, फ्रिस्टाईल (50 मिटर) प्रकारात कांस्य पदक आणि इंडिव्हिज्वल मेडले (200 मिटर) प्रकारात कांस्य पदक पटकाविले.

खोखोपटू सारिका काळे यांना उल्लेखनीय योगदानासाठी अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले.  2016 मध्ये आयोजित दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत आणि 2018 मध्ये इंग्लड येथे आयोजित जागतिक खोखो स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक पटकाविले आहे. 52 व्या सिनीयर नॅशनल चँम्पियनशिप स्पर्धेमध्येही त्यांनी  सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे.

टेबलटेनिसपटू मधुरिका सुहास पाटकर यांना उत्कृष्ट योगदानासाठी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2018 मध्ये आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सांघिक खेळात सुवर्ण पदक . 2019 मध्ये आयोजित राष्ट्रकुल चँम्पियनशिप स्पर्धेत सांघिक खेळात सुवर्ण पदक आणि एकल स्पर्धेत रजत पदक पटकावून भारत देशाला बहुमान मिळवून दिला आहे.

      प्रदीप गंधे, तृप्ती मुरगुंडे आणि सत्यप्रकाश तिवारी यांचा ध्यानचंद पुरस्काराने गौरव

 प्रदीप गंधे यांना उल्लेखनीय योगदानासाठी  ध्यानचंद पुरस्काराने गौरविण्यात आले .1982 मध्ये आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धेत दुहेरी आणि एकेरी स्पर्धेत कांस्य पदक पटकाविली. आस्ट्रेलियन ओपन आणि जागतिक  बॅडमिंटन चँम्पियनशिप तसेच नॅशन बॅडमिंटन चँम्पियनशिप मध्येही जेतेपदाचा मान मिळविला  आहे. बॅडमिंटनमधून निवृत्ती घेतल्यानंतर श्री गंधे यांनी अनेक बॅडमिंटनपटूंना प्रशिक्षण दिले आहे.

तृप्ती  मुरगुंडे यांना उत्कृष्ट कार्यासाठी ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2006मध्ये  आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक पटकाविले. 2002 आणि 2006 तसेच 2010 मध्ये आयोजित सॅप गेममध्ये त्यांनी एकूण 5 सुवर्ण पदकांवर नाव कोरले.  2018 मध्ये आयोजित थॉमस उबेर चषक मध्ये भारतीय संघाच्या प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यांनी देशाला मिळवून दिलेला गौरव  आणि बॅडमिंटन खेळाच्या प्रसारासातील योगदानासाठी त्यांना  या पुरस्काराने गौरविण्यात आले.

प्रसिध्द पॅरा बॅडमिंटनपटू सत्यप्रकाश तिवारी यांना क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ध्यानचंद पुरस्काराने गौरविण्यात आले. पॅसिफीक गेम, विश्व चषक बॅडमिंटन स्पर्धा, आयडब्ल्युएएस जागतिक स्पर्धा आणि आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत त्यांनी पदक मिळविली आहेत. निवृत्ती नंतर श्री तिवारी हे युवा खेळाडुंना प्रशिक्षण देत आहेत.

                              विजय बी मुनिश्वर यांना द्रोणाचार्य पुरस्कार

 पॅरा पावर लिफ्टींग प्रशिक्षक विजय मुनिश्वर यांना क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री मुनिश्वर यांनी अनेक पॅरा खेडाळूंना प्रशिक्षीत केले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या खेळाडुंनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला गौरव मिळवून दिला.त्यांच्या शिष्यांमध्ये राजेंद्रसिंह रहेलु, फर्मान बाशा , सचिन चौधरी आदींचा समावेश आहे. नागपूर येथील श्री मुनिश्वर यांना क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आणि दादोजी कोंडदेव पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

                      गिर्यारोहक केवल कक्का ला भूसाहसासाठी तेनसिंग नॉर्गे पुरस्कार  

        जगातील सर्वात उंच असे एव्हरेस्ट आणि लाओत्से शिखर केवळ सहा दिवसात सर करण्याची किमया करत हा बहुमान मिळविणारा पहिला भारतीय ठरण्याचा बहुमान मिळविणा-या मुंबई येथील गिर्यारोहक केवल हिरेन कक्का याला भूसाहस क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी तेनसिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.           

                           राज्यातील तीन संस्थाना राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार

            पुणे येथील आर्मी स्पोर्ट इन्स्टिटयूटला क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात आला, कर्नल राकेश यादव यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मिशन ऑलम्पिक कार्यक्रमांतर्गत 2001 मध्ये स्थापन झालेली ही  संस्था  देशात आपल्या क्षेत्रातील नामांकित संस्था आहे. या संस्थेत प्रशिक्षण घेतलेल्या अनेक खेळाडुंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. यात तरूणदीप राय (धनुर्विदया)  आणि  ॲथलेटिक्समध्ये निरज चोपडा,अरोक्य राजीव , जीनसन जॉन्सन यांचा समावेश आहे. 

            पुणे येथीलच लक्ष्य इन्स्टिटयूट ला क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात आाला, संस्थेचे अध्यक्ष विशाल चौरडिया यांनी हा पुरस्कार स्वीकारला. लक्ष्य इन्स्टिटयूचे खेळांच्या संरक्षण आणि संवर्धनात मोलाचे योगदान राहीले आहे. या संस्थेने पुणे येथील गन फॉर ग्लोरी या शुटींग अकादमी आणि भिवानी येथील हवासिंग बॉक्सिंग अकादमीच्या स्थापनेसाठी आरंभीक आर्थिक मदतीसह वेळोवेळी  मदत केली आहे. या उभय संस्थांतील खेळाडुंनी ऑलम्पिक स्पर्धेत भारत देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे. राही सरनोबत, अश्विनी पुनप्पा, ज्वाला गुट्टा, री दि ज्यू या खेळाडूंचा यात समावेश आहे.

  मुंबई येथील इंटरनॅशनल स्कुल ऑफ स्पोर्ट मॅनेजमेंट (आयआयएसएम)ला क्रीडा  क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्काराने गौरविण्यात आले, संस्थेचे संस्थापक  संचालक निलेश कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. क्रीडा क्षेत्रात संशोधन करणारी ही देशातील पहीली व्यावसायिक व्यवस्थापन संस्था आहे. या संस्थेने 1500 हून अधिक व्यावसायिक लोकांना प्रशिक्षत  केले असून ते देशाच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका वठवित आहेत. मुंबई विदयापीठाच्या सहकार्याने ही संस्था पदवी आणि पदवीका शिक्षणही देत आहे.

              या कार्यक्रमास दिल्ली, मुंबई,पुणे, बेंग्लुरू, कोलकोत्ता, चंदिगढ, सोनिपत, इटानगर, भोपाल, लखनऊ आणि हैद्राबाद येथून दूरदृष्य प्रणालीद्वारे  क्रीडापटू , क्रीडा प्रशिक्षक आणि संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.                            

Thursday 20 August 2020

‘स्वच्छ सर्वेक्षण’ मध्ये महाराष्ट्राची मोहोर

 




महाराष्ट्राला बेस्ट परफॉर्मिंग स्टेटचा दुस-या क्रमांकाचा पुरस्कार

नवी दिल्ली दि. 20 : ‘स्वच्छ सर्वेक्षण-2020’ मध्ये महाराष्ट्राने बेस्ट परफॉर्मिंग स्टेटचा दुस-या क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला आहे. मोठया शहरांच्या श्रेणीत नवी मुंबई देशातील तिस-या क्रमांकाचे शहर ठरले तर लहान शहरांच्या श्रेणीत कराड, सासवड आणि लोणावळा शहराने देशातील पहिले तिनही क्रमांक पटकाविले आहेत. आज राज्याने एकूण 17 पुरस्कार मिळविले आहेत.

 सलग तिसऱ्या वर्षी देशातील सर्वाधिक महाराष्ट्राला मिळाले आहेत. महाराष्ट्र स्वच्छता अभियानांतर्गत (नागरी)  सन 2018, 2019 आणि 2020 सलग तीनही वर्षी देशात सर्वाधिक पुरस्कार राज्याला मिळाले आहेत. राष्ट्रीय पातळीवर राज्याचे कौतुक होत आहे. 

अमृत शहरांच्या स्वच्छ श्रेणीमध्ये राष्ट्रीयस्तरावरील 100 अव्वल अमृत शहरांपैकी महाराष्ट्रातील ४3 पैकी 31 शहरांचा समावेश आहे. राज्यातील 75 टक्के अमृत शहरे पहिल्या 100 शहरांमध्ये आली आहेत. 25 नॉन अमृत शहरांपैकी 20 महाराष्ट्रातील आहेत. कचरामुक्त राष्ट्रीय तारांकित 141 शहरांमध्ये महाराष्ट्रातील 77 शहरांचा समावेश आहे. संपूर्ण राज्य हागणदारी मुक्त असून राज्यातील 216 शहरे ओडीएफ प्लस तर 116 शहरे ओडीएफ प्लस प्लस झाली आहेत          

2018 मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यामध्ये महाराष्ट्राने दुसरा क्रमांक मिळविला होता. त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवरील 46 पुरस्कारांपैकी सर्वाधिक 10 पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले होते. पहिल्या 100 अमृत शहरांमध्ये राज्यातील 27 अमृत शहरांचा सहभाग होता.

 

          स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये देखील राज्याने सर्वोत्तम कामगिरीचा तृतीय क्रमांक मिळविला होता. त्याचबरोबर देशात सर्वाधिक 46 पुरस्कार राज्याने मिळविले होते. पहिल्या 100 अमृत शहरांमध्ये यावर्षी राज्यातील 29 अमृत शहरांचा सहभाग होता. कचरामुक्त शहरांच्या तारांकित मानांकनामध्ये देशपातळीवर 53 शहरांना तीन स्टार मानांकन प्राप्त झाले होते त्यातील निम्म्याहून अधिक म्हणजे 27 शहरं महाराष्ट्रातील होती. याचवर्षी देशातील 500 शहरांनी ओडीएफ प्लस आणि ओडीएफ प्लस प्लस दर्जा प्राप्त केला यात महाराष्ट्रातील 154 शहरांचा समावेश होता

            केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास  हरदीपसिंग पुरी  यांच्या उपस्थितीत व्हर्च्युअल पध्दतीने आज स्वच्छ सर्व्हेक्षण-2020’ चे निकाल घोषित करण्यात आले. यावेळी विविध श्रेणींमध्ये एकूण 129  पुरस्कार व्हर्च्युअल पध्दतीने प्रदान करण्यात आले महाराष्ट्राला यात एकूण 17 पुरस्कार मिळाले. केंद्रीय शहरी विकास विभागाचे सचिव दुर्गा प्रसाद मिश्रा आणि महाराष्ट्राच्यावतीने नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री प्रसाद तनपुरे, नगर विकास विभागाच्या तत्कालिन प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, प्रधान सचिव महेश पाठक आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी श्री पुरी यांनी श्री शिंदे यांचे  अभिनंदन केले.

महाराष्ट्राला बेस्ट परफॉर्मिंग स्टेटचा दुस-या क्रमांकाचा मान

100 नागरी स्थानिक स्वराज संस्थांपेक्षा जास्त संख्या असलेल्या राज्यांच्या श्रेणीत महाराष्ट्राने 2895.29 गुण मिळवून देशात दुसरा क्रमांक मिळविला. एकूण 11 राज्य या श्रेणीत निवडण्यात आली. मागील वर्षी या श्रेणीत महाराष्ट्र तिस-या स्थानावर होता.                                                             

नवी मुंबईला  पंचताराकिंत  शहराचा दर्जा

देशभरातील घनकचरा मुक्त शहरांच्या पंचताराकिंत वर्गवारीत देशभरातील एकूण 6 शहरांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबईचा समावेश आहे. याव्यतीरिक्त इंदारे,  अंबिकापूर, सुरत, राजकोट, मैसुर ही शहरे आहेत.  86  शहरे 3 स्टार, आणि 64  शहरे 1 स्टार आहेत.

एक लाख पेक्षा जास्त लोकसंख्येच्या स्वच्छ शहरांमध्ये राज्यातील 4 शहर

          एक लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशातील  टॉप 25 स्वच्छ शहर निवडण्यात आली असून राज्यातील 4 शहरांचा यात समावेश आहे. या श्रेणीमधील पहिल्या तीन शहारांमध्ये नवी मुंबईने देशात तिसरा क्रमांक पटकाविला आहे. या श्रेणीत चंद्रपूर (9),  धुळे (18)  आणि नाशिक (25) या शहारांचा समावेश आहे.

एक लाख पेक्षा कमी लोकसंख्येच्या स्वच्छ शहरांमध्ये पहिले तीन पुरस्कार महाराष्ट्राला

पहिल्या 25 शहरांमध्ये राज्यातील 20 शहरं


          राज्याने एक लाख पेक्षा कमी लोकसंख्येच्या स्वच्छ शहरांमध्ये राष्ट्रीय पातळीवरील एकूण रँकींगमध्ये बाजी मारली असून या श्रेणीत देशात पहिले तिनही पुरस्कार महाराष्ट्राने पटकाविले आहेत. यामध्ये कराड शहराने  पहिला, सासवड शहराने दुसरा तर लोणावळा शहराने  तिस-या क्रमांकाचा पुरस्कार मिळविला.

        या तीन शहरांसह या श्रेणीत देशातील पहिल्या टॉप 25 शहरांमध्ये राज्यातील 17 शहरांचा समावेश आहे.    यात पन्हाळा(5), जेजुरी(6), शिर्डी(7),मौदा(8),कागल(9),रत्नागिरी(10), ब्रह्मपुरी(11), वडगाव (12), गडहिंगलज(13), इंदापूर(14), देवळाली प्रवरा(15), राजापूर (16) ,वीटा (17),मुरगुड(18), नरखेड(23), माथेरान(24) आणि मलकापूर (25) या शहारांचा समावेश आहे.   

                                     देहूरोड कँटॉनमेंट ठरले सर्वोत्तम 

       देशातील एकूण 8 स्वच्‍छ कँटॉनमेंट बोर्डांना आज पुरस्कार देण्यात आला यात महाराष्ट्रातून देहूरोड कँटॉनमेंटने पहिला क्रमांक पटकाविला आहे. 6 कँटॉनमेंट बोर्डांना पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार विभागून मिळाला आहे. देशातील एकूण 62 कँटाँनमेंट बोर्डना स्वच्छता रँकींग देण्यात आली असून महाराष्ट्रातील 6 कँटॉनमेंट बोर्डचा यात समावेश  आहे. यात देहूरोड  कँट(8), अहमदनगर (12), खडकी (15), पुणे(25), औरंगाबाद(29) आणि देवळाली (52) असा क्रम आहे.

पश्चिम विभागात राज्यातील 11 शहारांनी मारली बाजी

         देशातील पश्चिम विभागातील राज्यांमधील लोकसंख्या निहाय तीन श्रेणींमध्ये 15 शहारांना सन्मानित करण्यात आले असून यात राज्यातील सर्वाधिक 11 शहरांचा समावेश आहे.

          पश्चिम विभागातील राज्यांमधील 50 हजार ते एक लाख लोकसंख्येच्या स्वच्छ शहरांमधून 5 शहरांना सन्मानित करण्यात आले असून यात राज्यातील 4 शहरांनी वेगवेगळया श्रेणीत पहिला क्रमांक पटकाविला आहे . यात हिंगोली , बल्लारपूर, रत्नागिरी आणि शेगाव नगर परिषदांचा समावेश आहे.

           याच विभागातील राज्यांमधील 25 ते 50 हजार लोकसंख्येच्या स्वच्छ शहरांमधून 5 शहरांना सन्मानित करण्यात आले असून यात राज्यातील 4 शहरांना वेगवेगळया श्रेणीत प्रथम क्रमांकांच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . यात वीटा , इंदापूर, शिर्डी आणि वरोरा नगर परिषदांचा समावेश आहे.

      पश्चिम विभागातील राज्यांमधील 25 हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या स्वच्छ शहरांमधून 5 शहरांना सन्मानित करण्यात आले असून यात राज्यातील 3 शहरांनी वेगवेगळया श्रेणीत पहिला क्रमांक पटकाविला आहे . यात अकोले , जेजुरी आणि पन्हाळा नगर परिषदांचा समावेश आहे.

                                               

00000

Tuesday 4 August 2020

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर : महाराष्ट्रातील 90 हून अधिक उमेदवार यशस्वी







नवी दिल्लीा, 4 :केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातील एकूण 829 यशस्वी उमेदवारांपैकी महाराष्ट्रातील 90 हून अधिक उमदेवारांनी यश संपादन केले आहे. राज्यातून अभिषेक सराफ हा प्रथम तर नेहा भोसले दूसऱ्या क्रमांकावर आहे. देशभरातील गुणानूक्रमानुसार हे दोघे 8 आणि 15 व्या स्थानावर आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष 2019 च्या परिक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला. या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमधे महाराष्ट्रातील 5 उमेदवारांचा समावेश आहे. यात गुणानूक्रमे 8 व्या स्थानावर अभिषेक सराफ, नेहा भोसले 15 व्या स्थानावर,मंदार पत्की 22 व्या स्थानावर, आशुतोष कुलकर्णी 44 व्या स्थानावर, योगेश पाटील 63 व्या स्थानावर, विशाल नरवाडे 91 व्या स्थानावर, आहेत. दिव्यांगामधून राज्यातील जयंत मंकले हे 143 व्या स्थानावर आहेत.

जयंत मंकलेंची अंधत्वावर मात : केंद्रीय लोकसेवा आयोगात 143 क्रमांक

पुण्याचा जयंत मंकले या दिव्यांग उमेदवाराने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वर्ष 2019 च्या परीक्षेत 143 क्रमांक मिळविला आहे. या आधी जयंत ने 2018 मध्ये ही लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली होती, त्यावेळी त्याचा क्रमांक 937 होता. यावेळी पुन्हा प्रयत्न करित 143 वा क्रमांक मिळविला.

महाराष्ट्रातील महिला उमेदवारांनीही मारली बाजी

यंदाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालात महाराष्ट्रातील 12 महिला उमेदवारांनी बाजी मारली आहे. या मध्ये नेहा भोसले यांना देशभरातील गुणांनुक्रमानुसार 15 वे स्थान मिळाले आहे तर महाराष्ट्रातून त्या पहिल्या ठरल्या आहेत. याशिवाय नेहा दिवाकर देसाई (137), अश्विनी तानाजी वाकडे (200), गौरी पुजारी (275), नेहा किरडक (383), डॉ.प्रणोती संजय संकपाल (501), अंकिता अरविंद वाकेकर (547), पुनम प्रकाशराव ठाकरे (641), प्रियंका कांबळे (670), प्रज्ञा खंडारे (719), अनन्या किर्ती (736).
एक नजर निकालावर

केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी 2019 मध्ये परीक्षा घेण्यात आली. कोरोनाच्या प्रार्दूभावामुळे मुलाखती घेण्यास यावर्षी उशीरा झाला. लेखी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यावर्षीच्या फेब्रुवारी ते जुलै या महिन्यात मुलाखत घेण्यात आली. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण 829 उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सामान्य (ओपन) गटातून –304, आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस)78, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून(ओबीसी) – 251, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) – 129, अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 67 उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये 60 शारीरीकरित्या दिव्यांग उमेदवारांचा समावेश आहे. लोकसेवा आयोगाने 182 उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List) तयार केली आहे. यामध्ये सामान्य गट- 91, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)-09, इतर मागास वर्ग -71, अनुसूचित जाती- 08, अनुसूचित जमाती - 03 उमेदवारांचा समावेश आहे.
या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू
भारतीय प्रशासन सेवा (आय.ए.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण -180 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (जनरल) – 72, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 18 इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) –52, अनुसूचित जाती (एस.सी.) –25, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 13 जागा रिक्त आहेत. गुणाणूक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
भारतीय विदेश सेवा (आय.एफ.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण – 24 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – 12, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 02, इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) – 06, अनुसूचित जाती (एस.सी.) – ०3, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 01 जागा रिक्त आहेत.
भारतीय पोलिस सेवा (आय.पी.एस.) या सेवेमध्ये एकूण – 150 जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 60, उमेदवार आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 15, इतर मागास प्रवर्गातून - 42, अनुसूचित जाती प्रवर्गातून - 23, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 10 उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.
केंद्रीय सेवा गट अ - या सेवेमध्ये एकूण - 438 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) - 196 उमेदवार, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 34, इतर मागास प्रवर्गातून - 109, अनुसूचित जाती प्रवर्गातून - 64 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 35 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.
केंद्रीय सेवा गट ब - या सेवेमध्ये एकूण – 135 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) -57, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 14 उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून - 42, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 14 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 08 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

या परिक्षेत यश मिळविणा-या महाराष्ट्रातील उमेदवारांमध्ये यांचा समावेश आहे. अभिषेक सराफ (8), नेहा प्रकाश भोसले (15), मंदार जयवंतराव पत्की (22), आशुतोष कुलकर्णी (44), दिपक करवा (48), योगेश अशोकराव पाटील (63), विशाल तेजराव नरवडे (91), मयुर खंडेलवाल (106), राहूल लक्ष्मण चव्हाण (109), विनोद पाटील (132), कुलदिप जंगम (135), नेहा दिवाकर देसाई (137), जयवंत किशोर मनकाळे (143), अभयसिंह बाळासाहेब देशमुख (151), शेख मोहमद झेब झाकीर (153), अश्विनी तानाजी वाकडे (200), सागर भारत मिसाळ (204), माधव विठ्ठलराव गित्ते (210), कुणाल मोतीराम चव्हाण (211), सचिन हिरेमठ (213), सुमित महाजन (214), श्रेणिक लोढा (221), अविनाश शिंदे (226), शंकर गिरी (230), श्रीकांत खांडेकर (231), योगेश कापसे (249), आयुष खरे (267), गौरी पुजारी (275), गजराज बच्छावत (277), शंतनु अत्रे (281), प्रसाद शिंदे (287), रजनिश पाटिदार (307), आकाश अग्ले (313), मंदार देशपांडे (334), रजत उभयकर (378), आदित्य काकडे (382), नेहा किरडक (383), निमिश पाटील (389), महेश गिते (399), अभिषेक शिवहरे (414), कांतीलाल सुभाष पाटील (418), अमित कुमावत (423), अविनाश जगधवर (433), परमानंद प्रविण दराडे (439), स्वप्नील पवार (448), ऋषिकेश जयसिंग देसाई (481), नकुल राजेंद्र देशमुख (489), शुभ्रमण्य भालचंद्र केळकर (497), डॉ.प्रणोती संजय संकपाल (501), सुमित कैलास जगताप (507), दिपक धनखेर (520), प्रसन्न लोढा (524), नवनाथ शिवाजी माने (527), प्रफुल्ल देसाई (532), वैभव हिरवे (541), अंकिता अरविंद वाकेकर (547), विजयसिंहराव साहेबराव गिते (550), समिर प्रकाश खोडे (551), सुरेश कैलासराव शिंदे (574), अभिनव प्रविण इंगोळे (624), अजय गणपती कुंभार (630), स्वप्नील जगन्नाथ पवार (635), अभिषेक दिलीप दुधाळ (637), पुनम प्रकाशराव ठाकरे (641), अशित कांबळे (651), करूण गरड (656), प्रियंका कांबळे (670), ऋषिकेश देशमुख (688), सौरभ व्हटकर (695), अक्षय भोसले (704), अभिजीत सरकटे (710), प्रज्ञा खंडारे (719), साकेत धवने (727), निखिल दुबे (733), राजीव मेश्राम (735), अनन्या किर्ती (736), शशांक माने (743), निखील कांबळे (744), सुमित रामटेके (748), शुभम भैसारे (749), निलेश गायकवाड (752), कुणाल उत्तम शिरोटे (765), वैभव वाघमारे (771), अश्विन गोलपकर (773), विधित्या नायक (780), किशोर सुत्रधार (784), सरगम शिंदे (785), सर्वेश सोनवाणी (787), अजिंक्य विद्यागर (789), सत्यजित यादव (801), समिर महाजन (810), सुनिल शिंदे (812), हेमंत नंदनवार (822), स्वरूप दिक्षित (827).
यापैकी यशस्वी झालेल्या 66 उमेदवारांची निवड तात्पुरती आहे.

अधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नांवे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.
00000

टिप : राज्यनिहाय यादी जाहीर होत नसल्यामुळे काही नावे सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.