Monday 31 January 2022

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार : 2021 साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन


 

15 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

नवी दिल्ली, दि. 31 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2021 ते 31 डिसेंबर, 2021 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2022 अशी होती. आता 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे, तरी अधिकाअधिक पत्रकारांनी प्रवेशिका पाठवाव्यात असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आलेले आहेत.

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2021 चे माहितीपत्रक/अर्जाचे नमुने शासनाच्या www.maharashtra.gov.in आणि महासंचालनालयाच्या dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच राज्यातील विविध भागातील स्पर्धकांना संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांना, तसेच दिल्ली येथील पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका थेट किंवा महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत मुख्यालयात माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेता येईल.
राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारामध्ये 11 राज्यस्तरीय तर, 8 विभागीय स्तरावरील पुरस्कार असे एकूण 19 पुरस्कार प्रदान करण्यात येतात. त्याची माहिती पुढीलप्रमाणे आहेत
पुरस्कारांची माहिती
अ.क्र पुरस्काराचे नाव पारितोषिक
1 बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2 अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
3 बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
4 मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर) 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
5 यशवंतराव चव्हाण पुरस्कार
शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर) 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
6 पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार(राज्यस्तर) 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
7 तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
8 केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर) 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
9 समाज माध्यम पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
10 स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
11 पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
विभागीय पुरस्कार
12 दादासाहेब पोतनीस पुरस्कार,
नाशिक विभाग
51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र,
या व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)
13 अनंतराव भालेराव पुरस्कार,
औरंगाबाद आणि लातूर विभाग 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
14 आचार्य अत्रे पुरस्कार,
मुंबई विभाग 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
15
नानासाहेब परूळेकर पुरस्कार,
पुणे विभाग 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
16 शि.म.परांजपे पुरस्कार,
कोकण विभाग 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
17 ग.गो.जाधव पुरस्कार,
कोल्हापूर विभाग 51 हजाररुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
18 लोकनायक बापूजी अणे पुरस्कार,
अमरावती विभाग 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
19 ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार,
नागपूर विभाग 51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)




या पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्यासाठीच्या नियम व अटी खालीलप्रमाणे आहेत
नियम व अटी
राज्य / विभागीय पुरस्कार
पुरस्कारांसाठी पत्रकारांची मागील पाच वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकासविषयक प्रसिद्धीसाठी, जनतेमधील विकासविषयक जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल. मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेतील राज्य/विभागीय पुरस्कारांसाठी पत्रकारांची निवड याच पद्धतीने केली जाईल. या स्पर्धेत फक्त मराठी भाषेसाठी व राज्य व विभागीयस्तर आहेत. इंग्रजी, हिंदी, उर्दू या भाषेतील पुरस्कार तसेच समाज माध्यम पुरस्कार आणि स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार हे केवळ राज्यस्तरीय आहेत. पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्वीकारण्याची तयारी असल्याचे संबंधित पत्रकाराचे संमती पत्र प्रवेशिके सोबत जोडणे आवश्यक आहे.

उत्कृष्ट लेखन पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ लेखनाचे कात्रण त्याच्या दोन प्रतीसह पाठवावे. मूळ लेखनाच्या वृत्तपत्रीय कात्रणांसोबत त्याच्या दोन प्रती नसल्यास प्रवेशिका रद्द होईल. मूळ लेखनावर लेखकाचे नाव नसल्यास ज्या नियतकालिकात हा लेख प्रसिद्ध झाला असेल त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला जोडलेल्या प्रवेशिकांचाच विचार केला जाईल.

पत्रकारांच्या तसेच वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या गटात भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.

अर्जदाराने राज्य व विभागीय पातळीवरील प्रवेशिका नागपूर आणि औरंगाबाद येथील संचालक (माहिती), अमरावती, नाशिक, पुणे, कोल्हापूर, कोकण विभाग येथील विभागीय उपसंचालक (माहिती) किंवा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे थेट पाठवाव्यात. प्रवेशिकेसोबत जिल्हा माहिती अधिकारी किंवा पत्रकार संघटनांच्या शिफारसपत्राची आवश्यकता नाही.

मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या चारही भाषेतील राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी तसेच राज्यपातळीवरील शासकीय गट व विभागीय पातळीवरील मराठी भाषेतील पुरस्कार पात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी माहिती व जनंसपर्क महासंचालनालयातर्फे परीक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल. समितीची रचना, स्पर्धा व स्पर्धेतील पुरस्कारासंबंधी शासनाचे निर्णय अंतिम राहतील.

ज्या नियतकालिकांचा खप व जनमानसावरील प्रभाव चांगला आहे, अशाच नियतकालिकांतील मजकूर स्पर्धेच्या प्रवेशिकेसाठी पात्र ठरेल.
जे पत्रकार बृहन्मुंबई, नवी मुंबई(कोकण), कोल्हापूर, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद या विभागात वास्तव्य करीत असतील, त्यांना त्या विभागासाठी असलेल्या विभागीय स्पर्धेतच भाग घेता येईल. मात्र त्यांचे लेखण अन्य कोणत्याही विभागातील वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले असेल तरी ते ग्राह्य मानण्यात येतील.
गोवा व बेळगाव येथील पत्रकारांना कोल्हापूर विभागीय स्पर्धेत (सिंधुदुर्ग आणि सांगली जिल्ह्यांसह) सहभाग घेता येईल. दिल्ली येथील पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका थेट किंवा महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत मुख्यालयात माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, मंत्रालय मुंबई-32 येथे पाठवाव्यात.

शासकीय गटातील स्पर्धेसाठी एकच प्रवेशिका पाठविण्याची मुभा राहील. प्रवेशिका संबंधी विभागाच्या संचालक किंवा उपसंचालकांना व बृहन्मुंबईच्या प्रवेशिका माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात वेगवेगळ्या पाठवाव्या लागतील.

2021 या वर्षात दैनिक वृत्तपत्रात, नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या लेखांची कात्रणे प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.

प्रवेशिका राज्यस्तर किंवा विभागीयस्तरासाठी आहे. तसेच, कोणत्या भाषेकरिता आहे याबाबतचा स्पष्ट उल्लेख असावा. स्पर्धेसाठी पाठविलेली प्रवेशिका, त्यासोबत जोडलेली लेखांची कात्रणे निटनेटकी असणे अत्यावश्यक आहे. अस्ताव्यस्त, खाडाखोड असणारी किंवा वाचता येणार नाहीत, अशी प्रवेशिका रद्द करण्यात येईल. एकाच पत्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झाला असल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही.

प्रत्येक गट व भाषेसाठी संबंधित पत्रकारांनी एकच प्रवेशिका पाठवावी. एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही.

विकास योजना संदर्भातील समाज माध्यम (सोशल मीडिया) पुरस्कार
ही स्पर्धा वृत्तविषयक/चालू घडामोडीविषयक संकेतस्थळे व ब्लॉग या समाज माध्यमात प्रसारित मराठी भाषेतील वृत्तविषयक विशेषत: शासकीय मजकुरासाठी आहे. या दोन माध्यमांचा प्रभावी वापर करणाऱ्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यक्तींना या पुरस्कारासाठी सहभाग घेता येईल. समाज माध्यमातील पत्रकारिता ही स्पर्धेच्या संबंधित वर्षातील असावी. हे लेखन किमान एक वर्षापासून सुरु असावे. या माध्यमाचा वापर करताना केंद्र शासनाने विहीत केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब केलेला असावा. प्रवेशिका पाठविताना अर्जदाराने व त्यांचे नामनिर्देशन ज्या व्यक्ती/संस्था/संघटना करतील त्यांनी संकेतस्थळ व ब्लॉग या समाज माध्यमांद्वारे करण्यात आलेल्या प्रसिद्धींची उदाहरणे व ती कोणत्या तारखेस प्रसारित झाली त्यांच्या मुद्रीत प्रती (प्रिंट आऊट) सादर कराव्यात. विविध पुरस्कारासाठी असलेल्या अटी या गटासाठी लागू राहतील.

स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार
केंद्र शासनाचे “स्वच्छ भारत अभियान” आणि राज्य शासनाचे “स्वच्छ महाराष्ट्र अभियान” प्रभावीपणे राबविले जात आहे. आपल्या लेखनातून लोकांमध्ये स्वच्छता विषयक जनजागृती करणाऱ्या पत्रकारांसाठी ही स्पर्धा आहे. या स्पर्धेत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रांमध्ये लेखन करणाऱ्या पत्रकारांना तसेच ईलेक्ट्रॉनिक्स माध्यमांमधील पत्रकारांना सहभागी होता येईल.
स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, महाराष्ट्र स्वच्छता अभियान (नागरी), संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, हगणदारीमुक्त गाव योजना, घन कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचऱ्यामधून बायोगॅस तसेच वीज निर्मिती इत्यादी बाबत लेखण केलेले असावे.शासनस्तरावरुन राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता विषयक योजनांची प्रसिद्धी, स्वच्छता अभियान लोकसहभाग वाढविण्यासाठी लेखनाद्वारे करण्यात आलेले प्रयत्न, स्वच्छतेचे महत्व पटविण्यासाठी करण्यात आलेल्या जनजागृतीपर लेखन यांचा या स्पर्धेत अंतर्भाव होईल. स्पर्धेसाठी असणाऱ्या सर्व अटी या गटासाठी लागू राहतील.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांसाठी स्पर्धा
इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांसाठी “पु.ल.देशापांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार” देण्यात येतो. ही स्पर्धा मराठी भाषेतील वृत्तकथेसाठी असून दूरदर्शन, खाजगी चित्रवाहिन्या, स्थानिक केबल न्यूज व शासकीय उपक्रम यांना यामध्ये सहभाग घेता येईल. वृत्तकथाचित्रे ही स्पर्धेच्या संबंधित वर्षात तयार केलेली व प्रसारित झालेली असावीत. वृत्तकथा किमान 3 मिनिटे असावी. प्रवेशिका पाठवितांना संबंधित प्रतिनिधीची माहिती तसेच वृत्तकथा कोणत्या तारखेस प्रसारित झाली, याबाबतचे संबंधित संस्था प्रमुख/संपादक यांचे प्रमाणपत्र जोडलेले असावे. स्थानिक केबलच्या बाबतीत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे नोंदणीपत्र सादर करणे आवश्यक आहे.
प्रवेशिकेसोबत संबंधित वृत्तकथेची सीडी/कॅसेट थेट त्या त्या विभागातील उपसंचालक /जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे तर मुंबईकरिता उपसंचालक (वृत्त), यांच्या नावाने मुंबई येथील मुख्यालयातील पत्त्यावर पाठवावे.




छायाचित्रकार पुरस्कार
“तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार” स्पर्धा, ही मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रातील पूर्णवेळ छायाचित्रकारांसाठी आहे. यात सामाजिक संदेश देणारी छायाचित्रे, समाजातील प्रश्न मांडणारी छायाचित्रे, शासकीय योजनांचा प्रचार आणि प्रसारासाठी पुरक ठरतील अशी छायाचित्रे यांच्यासह प्रवेशिका सादर करता येईल.
महाराष्ट्र शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांवरील छायाचित्र ग्राह्य धरण्यात येईल. मात्र हे छायाचित्र मूळ स्वरुपातील असावे. फोटो प्रत नसावी. स्पर्धेसाठी असणाऱ्या सर्व अटी या गटासाठी लागू राहतील.

केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, शासकीय गट (मावज)
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये छायाचित्रकार म्हणून काम करणारे कर्मचारी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात.

पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार
विविध विकास कामांची दखल, आपल्या अग्रलेखांद्वारे घेणाऱ्या पत्रकार/संपादकांना, पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार देण्यात येईल.
या स्पर्धेसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील संपादकांना सहभाग घेता येईल. या स्पर्धेसाठी लिहिलेले अग्रलेख हे स्पर्धेच्या संबंधित वर्षातील असावे.
प्रवेशिका पाठविताना अर्जकर्त्याने वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या किमान 25 अग्रलेखांची कात्रणे त्याच्या प्रसिद्धीच्या तारखेच्या माहितीसह सादर करावे.
इतर पुरस्कारांसाठी असलेले इतर सर्व नियम व अटी या पुरस्कारासाठीही लागू असतील.
00000


Wednesday 26 January 2022

राजधानीत 73वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा











 

राजपथावर महाराष्ट्राच्या 'जैवविविधता मानके' चित्ररथाचे शानदार प्रदर्शन

नवी दिल्ली, 26 : ‘अथांग सागर,रम्य किनारे। सहयाद्रीचे उंचकडे॥ गवत फुलांच्या रंगांवरती महाराष्ट्राचा जीव जडे॥…’ या वर्णनासह राज्याच्या जैवविविधतेचे दर्शन घडविणारा महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’ चित्ररथ आज राजपथावरील पथसंचलनाचे आकर्षण ठरला. महाराष्ट्राच्या सेनाधिकाऱ्यांनी विविध मार्चींग कन्टीजंटचे नेतृत्व करून राजपथावर राज्याचा गौरव वाढवला.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अन्य गणमान्य व्यक्तींच्या उपस्थितीत आज राजपथावर 73वा प्रजासत्ताक दिन सोहळा पार पडला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशासाठी शहीद झालेल्या वीर सैनिकांच्या स्मरनार्थ इंडिया गेट शेजारील राष्ट्रीय युध्द स्मारक येथे देशवासीयांच्यावतीने आदरांजली वाहिली. यानंतर मुख्य मंचावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ध्वजारोहण केले. राष्ट्रगीत व त्यासोबतच 21 तोफांची सलामी देण्यात आली. जम्मू-काश्मिर पोलीस दलाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबू राम यांना अभूतपूर्व शौर्य व बलीदानासाठी सर्वोच्च शौर्य पदक ‘अशोक चक्र’(मरणोत्तर) जाहीर झाले,आज या समारंभात बाबू राम यांच्या पत्नी रिना राणी आणि पूत्र माणिक शर्मा यांनी हा सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवीवर्षाचे प्रतिबिंब दर्शविणारा विविध फॉर्मेशनमधील 75 विमानांचा फ्लाईंग पास या पथसंचलनाचे खास वैशिष्टय ठरले. यावर्षीच्या पथसंचलनात सेनेचे अश्वदल, सीमा सुरक्षा दलाचे उंटदल, रणगाडे, आकाश क्षेपणास्त्र, युध्द टँक,लष्कर,नौदल आणि वायुदलाचे पथ संचलन आणि बँड पथकांची आकर्षक पेशकश उपस्थितांचे आकर्षण ठरले.राजपथावर देशाच्या समृध्द सांस्कृतिक वारसा व शस्त्रसज्जते सोबतच महाराष्ट्राच्या 'जैवविविधता मानके’ विषयावरील चित्ररथांसह 12 राज्यांचे चित्ररथ तसेच 7 केंद्रीय मंत्रालयांच्या चित्ररथांनी लक्ष वेधले.

महाराष्ट्राच्या सेनाधिकाऱ्यांचे दमदार नेतृत्व

आजच्या पथ संचलनात मुळच्या महाराष्ट्राच्या असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांनी विविध युध्द टँकचे नेतृत्व केले. 75-आर्मर्ड रेजिमेंटचे लेफ्टनंट स्वप्निल गुलाले यांनी भारतीय लष्कराच्या ‘अर्जुन’ या मुख्य युध्द टँकचे नेतृत्व केले.तर लेफ्टनंट ऋषिकेश सारडा यांनी आयसीव्हीबीएमपी 2 टँकचे नेतृत्व केले. भारतीय लष्कराच्या व्हिंटेज सिग्नल यंत्रणेचा महत्वाचा भाग असलेल्या ‘एचटी 16’ या 14 इलेक्ट्रीकल वारफेयर बटालीयन कोर ऑफ सिग्नल यंत्रणेच्या विशेष मॉडेलचे नेतृत्व केले.
यावेळी नाशिक येथील आर्टीलरी सेंटरमधील 75/24 पॅक होमटर्ज मार्क 1 या विशेष गनचेही पथसंचलन झाले.
महाराष्ट्राच्या ‘जैवविविधता मानके’ चित्ररथाने जिंकली मने

‘अथांग सागर,रम्य किनारे। सहयाद्रीचे उंचकडे॥ गवत फुलांच्या रंगांवरती महाराष्ट्राचा जीव जडे॥ जपतो आम्ही जैव वारसा, जपतो आम्ही वसुंधरा, झाडे
लावू झाडे जगवू हाच आमुचा धर्म खरा॥’ या शब्दांचा प्रसिध्द पार्श्वगायक सुदेश भोसले यांच्या आवाजातील अर्थपूर्ण रचनेसह राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ दाखल झाला. महाराष्ट्राचा हा चित्ररथ पाहून राजपथावर उपस्थितांनी राज्याचा समृध्द जैवविधता वारसाच अनुभवला.

चित्ररथाच्या दर्शनी भागातील ‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखराची 8 फूट उंच आणि 6 फूट रूंद पंखांच्या देखण्या प्रतिकृतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. चित्ररथावर राज्यफुल ‘ताम्हण’चे रंगीत गुच्छ दर्शविण्यात आले. या फुलांवरील छोटया आकर्षंक फुलपाखरांच्या लोभस प्रतिकृतीही उठून दिसत होत्या. चित्ररथावर मोठया आकारातील ‘शेकरू’ हा राज्यप्राणी तसेच, युनेस्कोच्या सूचीमध्ये समावेश असलेले ‘कास पठार’ दर्शविण्यात आले. या पठारावर आढळणारे विविध जीवजंतू दर्शविण्यात आले. ‘हरियाल’ पक्षाची प्रतिकृती ,चित्ररथाच्या मागील भागात वृक्षाच्या फांदीवर बसलेल्या राज्यप्राणी शेकरूची प्रतिकृती आणि राज्यवृक्ष ‘आंबा’ ची प्रतिकृतीही उपस्थितांचे आकर्षण ठरले. माळढोक पक्षी, खेकडा तसेच, मासा, वाघ, आंबोली झरा, फ्लेमिंगो, गिधाड, घुबड पक्ष्यांच्या प्रतिकृतींनीही उपस्थितांचे मन जिंकली.
देशव्यापी ‘वंदे भारतम’ नृत्य स्पर्धेद्वारे निवडलेल्या 480 नर्तकांनी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला महाराष्ट्रातील कलाकारांचाही यात समावेश होता. दृश्य कला पद्धतीचा वापर करून‘कला कुंभ’ हा स्वातंत्र्य लढ्यातील दुर्लक्षित नायकांच्या नावांची यादी असलेल्या प्रत्येकी 75 मीटर लांबीच्या दहा लेखपटांचे प्रदर्शनही यावेळी करण्यात आले.
00000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
00000
रितेश भुयार/वि.वृ.क्र.18 /दि. 26.01.2022


Tuesday 25 January 2022

महाराष्ट्राला 10 पद्म पुरस्कार ; महाराष्ट्र ठरला एक पद्मविभूषण तर दोन पद्मभूषणचा मानकरी












नवी दिल्ली, दि. 25 : देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणा-या पद्म पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. प्रतिभावंत गायिका प्रभा अत्रे यांना ‘पद्मविभूषण’ तर प्रसिध्द उद्योजक नटराजन चंद्रशेखरन आणि सायरस पुनावाला यांना ‘पद्मभूषण पुरस्कार’ जाहीर झाला.आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना मरणोत्तर ‘पद्मश्री पुरस्कार’ जाहीर झाला असून त्यांच्यासह राज्यातील अन्य सहा मान्यवरांना ‘पद्मश्री पुरस्कार’ जाहीर झाले आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणा-या पद्मपुरस्कारांची घोषणा करण्यात येते. गृह मंत्रालयाकडून आज या मानाच्या पद्मपुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावर्षी एकूण 4 मान्यवरांना ‘पद्मविभूषण पुरस्कार’ जाहीर झाले असून महाराष्ट्रातून प्रतिभावंत गायिका,संगित रचनाकार,लेखिका,प्राध्यापिका आणि विदुषी प्रभा अत्रे यांना कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच, प्रसिध्द उद्योजक नटराजन चंद्रशेखरन आणि सायरस पुनावाला यांना उद्योग व व्यापार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘पद्मभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. देशातील एकूण 17 मान्यवरांना ‘पद्मभूषण पुरस्कार’ जाहीर झाले आहेत.
सात मान्यवरांना ‘पद्मश्री पुरस्कार’

प्रसिध्द आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना वैद्यकीय क्षेत्रातील बहुमूल्य योगदानासाठी मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यासोबतच डॉ. भिमसेन सिंघल, डॉ. विजयकुमार डोंगरे आणि डॉ. हिंमतराव बावस्कर यांना वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कला क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानासाठी ज्येष्ठ लावणी गायिका व पार्श्वगीत गायिका सुलोचना चव्हाण आणि प्रसिध्द पार्श्व गायक सोनू निगम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी अनिलकुमार राजवंशी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

यावर्षी एकूण 128 पद्मपुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये 4 ‘पद्मविभूषण’, 17 ‘पद्मभूषण’ आणि 107 ‘पद्मश्री’ पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार घोषित झालेल्या मान्यवरांमध्ये 34 महिलांचा समावेश आहे. 10 अप्रवासी भारतीयांना हे मानाचे पुरस्कार जाहीर झाले असून 13 मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत .

आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
00000
रितेश भुयार/वि.वृ.क्र.17 /दि. 25 .01.2022