Thursday 30 December 2021

साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार प्रदान ; महाराष्ट्राच्या लेखिका सोनाली नवांगुळ आणि डॉ. मंजुषा कुलकर्णी यांचा सन्मान



            

नवी दिल्ली, 30 : प्रसिध्द लेखिका सोनाली नवांगुळ  यांना मराठी भाषेसाठी  तर  ख्यातनाम लेखिका डॉ मंजुषा कुलकर्णी यांना संस्कृत भाषेकरिता आज साहित्य अकादमीचे  मानाचे अनुवाद पुरस्कार  प्रदान करण्यात आले.

             हा पुरस्कार आयुष्यातील महत्वाचा व आत्मविश्वास वाढविणारा असल्याच्या भावना श्रीमती नवांगुळ यांनी व्यक्त केल्या असून डॉ. कुलकर्णी यांनी या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेप्रती ऋणनिर्देश व्यक्त केले.  

             येथील कोपर्निक्समार्ग स्थित साहित्य अकादमीच्या रविंद्र सभागृहात वर्ष 2020च्या अनुवाद पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. अकादमीचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर कंबार यांच्या हस्ते देशातील 24 प्रादेशिक भाषांतील अनुवादकांना यावेळी सन्मानित करण्यात आले.  50 हजार रुपये आणि ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  अकादमीचे  उपाध्यक्ष माधव कौशिक यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.   ‍ि                                                 

         आयुष्यातील महत्वाचा व आत्मविश्वास वाढविणारा सन्मान – सोनाली नवांगुळ   

               देशभरातील २४ प्रादेशिक भाषेतील नामवंत साहित्यिकांसह मराठी भाषेसाठी साहित्य अकादमीचा मानाचा अनुवादाचा पुरस्कार प्राप्त करणे हा आयुष्यातील महत्वाचा व आत्मविश्वास वाढविणारा सन्मान असल्याच्या भावना सोनाली नवांगुळ यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राशी बोलताना व्यक्त केल्या. अपंग व्यक्ती  दर्जेदार साहित्यनिर्मिती  करू शकत नाही अशा दृष्टीकोणातून बघितले जात नाही उलट त्यांना सहानुभूती दिली जाते. मात्र, आपल्या मनात असले  व आपल्या भाषेवर प्रेम असेल तर अतिशय उत्कृष्ट कार्य आपण करू शकतो व त्याची शाबासकीही मिळू शकते हा आत्मविश्वासच या पुरस्काराने दिल्याचे त्यांनी सांगितले.

          श्रीमती नवांगुळ यांनी अपंगत्वावर मात करत साहित्य क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांनी तामीळ भाषेतून मराठीत अनुवादीत केलेल्या ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या कादंबरीला मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट अनुवादित पुस्तकासाठी सन्मानित करण्यात आले. लेखिका सलमा यांच्या ‘इरंदम जामथिन कथाइ’ या तामीळ भाषेतील कादंबरीचे मराठी अनुवादित ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ हे पुस्तक मनोविकास प्रकाशनाच्या ‘भारतातील लेखिका’ या लेखमालेतील 2015 मध्ये प्रकाशित पुस्तक होय.

             पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आभार – डॉ. मंजुषा कुलकर्णी 

               आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे  प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते  डॉ. प्रकाश आमटे यांनी केलेले समाज कार्य हे संपूर्ण विश्वाला प्रेरणादायी आहे. त्यांच्या आत्मकथनाचा संस्कृत भाषेत अनुवाद करणे महा खडतर असे कार्य होते. संस्कृत ही भारताचा आत्मा व्यक्त करणारी भाषा असून या भाषेतून व्यक्त झालेल्या कलाकृती चिरकालीन व अजरामर होतात म्हणूनच डॉ प्रकाश आमटे यांच्या ‘प्रकाशवाटा’ या आत्मकथनाचा ‘प्रकाशमार्गा:’ हा संस्कृत भाषेतील अनुवाद करण्याचे खडतर कार्य यशस्वीपणे पूर्ण केले. या कार्यासाठी  त्यांनी  महाराष्ट्रातील तमान जनतेचा व संस्कृततज्ज्ञांचे आभारही मानले.

           डॉ कुलकर्णी यांची 25 पुस्तके प्रकाशित असून त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केले आहे. लेखिका, कवियित्री, व्याख्याता आणि निवेदिका म्हणून त्या प्रसिध्द आहेत तसेच त्यांनी नाटयप्रयोगही केले आहेत.

                                                       00000  

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic            

                                                      

रितेश भुयार /वि.वृ.क्र. 263 /दि. 30.12.2021               

 

 


 

साहित्य अकादमी युवा पुरस्कारांची घोषणा : प्रणव सखदेव यांना मराठी भाषेसाठी पुरस्कार
























नवी दिल्ली, 30 : युवा लेखक प्रणव सखदेव यांना ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ या कादंबरीकरिता मराठी भाषेसाठीचा ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’आज जाहीर झाला आहे.

देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नाव लौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने आज वर्ष 2021च्या युवा पुरस्कारांची घोषणा केली. अकादमीचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील २२ प्रादेशिक भाषांसाठी साहित्य अकादमी युवा पुरस्कारांची निवड व घोषणा करण्यात आली.

प्रणव सखदेव ; मराठीतील आघाडीचे तरुण लेखक

प्रणव सखदेव हे मराठी भाषेतील आघाडीच्या तरुण लेखकांमध्ये प्रसिध्द नाव आहे. ‘पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह, 'निळ्या दाताची दंतकथा’, ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य' हे कथासंग्रह, व ‘काळेकरडे स्ट्रोक्स', ‘96 मेट्रोमॉल’ या त्यांच्या कादंबऱ्या प्रकाशित आहेत. त्यांनी अग्रगण्य मराठी दैनिकांत पत्रकार म्हणून काम केले असून ते मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये संपादक व अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कथा आणि कविता मान्यवर नियतकालिकांमधून प्रकाशित होत असतात. अनुवाद-प्रकल्पासाठी त्यांना २०१५-१६ सालची ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची अभ्यासवृत्तीही मिळाली आहे. त्यांना लेखनासाठी महत्त्वाची पारितोषिके मिळाली असून त्यांनी इंग्रजीतल्या गाजलेल्या पुस्तकांचा अनुवाद केला आहे. आजच्या तरुणांची मानसिकता, त्यांचे प्रश्न, विखंडित जगणे व तंत्रज्ञानाचा वाढता वापर या सगळ्यांचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात दिसून येते.

‘काळेकरडे स्ट्रोक्स’ विषयी

काळेकरडे स्ट्रोक्स ही कादंबरी आजच्या जगण्याचे संदर्भ घेत तरुणाईचे एक वेगळे भावविश्व ,त्यातील आवर्तने व आंदोलने उभी करते. या कादंबरीतील पात्रांच्या जीवनात चांगले साकारायला जावे आणि सतत फटकाऱ्यांनी चित्राचे सौंदर्य बिघडावे असे प्रसंग घडतात. तरुणाईचे विस्कटलेले भावविश्व प्रणव सखदेव यांनी या कादंबरीत उत्तमरित्या मांडले आहे. सहज आणि साधी संवाद शैली, व्यक्तीरेखा उभी करण्याची उत्तम हातोटी, ओघवते लेखन हे या कादंबरीचे बलस्थाने आहेत.

परिक्षक मंडळ व पारितोषिकाविषयी

इंद्रजीत भालेराव,नागनाथ कोत्तापल्ले आणि भास्कर चंदनशिव या साहित्यिकांचा मराठी भाषेतील साहित्य अकादमी युवा पुरस्कार निवडीच्या परिक्षक मंडळात समावेश होता. 50 हजार रुपये आणि ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून साहित्य अकादमीच्या विशेष कार्यक्रमात पुस्काराचे वितरण करण्यात येईल.

00000

आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार /वि.वृ.क्र. 262 /दि. 30.12.2021

Tuesday 28 December 2021

सर्वंकष आरोग्य निर्देशांक अहवालात महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक



निती आयोगाचा आरोग्य निर्देशांक जाहीर

नवी दिल्ली, 28 : आरोग्य क्षेत्रात उत्तम कामगिरी नोंदवत महाराष्ट्राने निती आयोगाच्या सर्वंकष आरोग्य निर्देशांक अहवालात 69.14 गुणांसह यापूर्वीच्या निर्देशांकापेक्षा एक स्थान अव्वल जात पाचवे स्थान मिळविले आहे.

आरोग्य क्षेत्रात परिवर्तन घडविण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने निती आयोगाने सोमवारी देशातील राज्य व केंद्रशासित प्रदेशांचा ‘सर्वंकष आरोग्य निर्देशांक २०१९-२०’(चौथी आवृत्ती) जाहीर केला. नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, अतिरिक्त सचिव डॉ. राकेश सरवाल आणि जागतिक बँकेच्या वरिष्ठ आरोग्य विशेषज्ञ शीना छाब्रा यांच्या उपस्थितीत ‘निरोगी राज्य, प्रगतीशील भारत अहवाल’ या शिर्षकाचा सर्वंकष आरोग्य निर्देशांक अहवाल प्रसिद्ध झाला.

यापूर्वी 2018-19 च्या आरोग्य निर्देशांकात (तिसरी आवृत्ती) महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर होता. राज्याने सहाव्या स्थानाहून सुधारणा करत 2019-20 च्या आरोग्य निर्देशांकात (चौथी आवृत्ती) पाचवे स्थान मिळविले आहे. जागतिक बँक आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने निती आयोगाने 2018-19 च्या माहितीच्या आधारावर हा अहवाल तयार केला आहे. या अहवालात संकलीत माहितीच्या आधारावर गुणांकनासाठी देशातील 19 मोठी राज्य,8 लहान राज्य आणि 7 केंद्रशासीत प्रदेश अशी वर्गवारी करण्यात आली आहे. विविध तीन क्षेत्रांमध्ये एकूण २४ मानकांच्या आधारे 19 मोठ्या राज्यांमध्ये 100 पैकी 82.20 गुण मिळवून केरळ प्रथम स्थानावर कायम आहे तर 69.14 गुणांसह महाराष्ट्राने पाचवे स्थान मिळविले.

महाराष्ट्रात बाल मृत्यू दर आणि नवजात बालकांच्या मृत्यू दरात घट

अहवालात 5 वर्षाखालील बालकांच्या मृत्यू दरात आणि नवजात बालकांच्या मृत्यूदरात घट आलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र अग्रणी राहिले आहे. 2015 च्या आधाराभूत माहितीनुसार राज्यात 5 वर्षाखालील बालकांच्या मृत्यू दराचे प्रमाण 1000 बालकांमागे 24 होते. हे प्रमाण घटून 2019-20च्या आधाराभूत माहितीनुसार 1000 बालकांमागे 22 एवढे झाले आहे. जन्मापासून 28 दिवसांपर्यंतची बालके नवजात बालक म्हणून गणली जातात. राज्यात 2014 च्या आधाराभूत माहितीनुसार नवजात बालकांच्या मृत्यू दराचे प्रमाण 1000 बालकांमागे 16 एवढे होते यात घट होवून 2019-20 च्या आधाराभूत माहितीनुसार 1000 बालकांमागे 13 एवढे झाले आहे.

संस्थात्मक प्रसुतीमध्ये वाढ

महाराष्ट्रात संस्थात्मक प्रसुतीमध्ये वाढ झाली असून परिणामी बाल व माता मृत्यूदरात घट झाली आहे. अहवालात नमूद 2015-16 च्या आधारभूत माहितीनुसार संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण 85.3 टक्के एवढे होते. 2019-20 च्या आधाराभूत माहितीनुसार संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण 91.19 टक्के एवढे वाढल्याचे अहवालात नमूदआहे.

गर्भवती महिलांच्या नोंदणीत वाढ

आरोग्य माहिती व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत राज्यात गर्भवती महिलांचे पहिल्या तिमाहीतील नोंदणीचे प्रमाण वाढले आहे. राज्यात 2014 च्या आधाराभूत माहितीनुसार गर्भवती महिलांचे पहिल्या तिमाहीतील नोंदणीचे प्रमाण ६३.५८ टक्के होते यात वाढ होवून 2019-20 च्या आधाराभूत माहितीनुसार नोंदणीचे प्रमाण ८५.७२ झाले आहे.

जिल्हा वैद्यकीय अधिका-यांची उपलब्धता लक्षणीय

आरोग्य विभागाच्या योजना व कार्यक्रमांची जिल्हा स्तरावर प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी राज्यातील जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांना पुरेसा कालावधी मिळणे आवश्यक असते. यात महाराष्ट्राची स्थिती सुधारली असून राज्यात 2013-16 च्या आधारभूत माहितीनुसार मुख्य जिल्हा वैद्यकीय अधिका-यांच्या स्थिर कालावधीचे प्रमाण 15.6 एवढे होते. 2017-19 च्या आधाराभूत माहितीनुसार हे प्रमाण 18.55 एवढे वाढले आहे. आरोग्य क्षेत्रात राज्य स्तरावरील महत्वाच्या अधिकारी पदाचा स्थिर कालावधीही याच कालवधित १०.५८ हून ११.१ झाले आहे.
‍ 00000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार /वि.वृ.क्र. 261 /दि. 28.12.2021


 

Monday 27 December 2021

‘सुशासन निर्देशांक अहवाल-२०२१’ मध्ये महाराष्ट्र देशात द्वितीय क्रमांकावर

       

 

नवी दिल्ली, 27 :  कृषी व कृषी संलग्न क्षेत्र, मनुष्यबळ, सरकारी पायाभूत सुविधा  आणि समाज कल्याण व विकास या क्षेत्रांमध्ये विविध 58 मानकांवर सरस ठरत महाराष्ट्र राज्याने केंद्र शासनाच्या ‘सुशासन निर्देशांक अहवाल-२०२१ ’ मध्ये संयुक्त श्रेणीत द्वितीय स्थान मिळविले आहे.

                केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या  प्रशासकीय सुधारणा व जन तक्रार निवारण विभागाच्यावतीने ‘सुशासन निर्देशांक अहवाल 2021’  तयार करण्यात आला असून नुकतेच केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते ‍हा  निर्देशांक जाहिर करण्यात आला.

              महाराष्ट्राने या अहवालात ५.४२५  गुणांसह दुसरे स्थान मिळविले असून राज्याच्या समग्र प्रशासनात सकारात्मक बदल होत असल्याचे या अहवालात दिसून येते. एकूण १० क्षेत्रांमध्ये ५८ मानकांच्या आधारे करण्यात आलेल्या मुल्यांकणात महाराष्ट्राने  कृषी व कृषी संलग्न क्षेत्र, मनुष्यबळ, सरकारी पायाभूत सुविधा  आणि समाज कल्याण व विकास या क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे.

                सुशासन निर्देशांक अहवाल 2021’ मध्ये सहभागी देशातील सर्व राज्यांपैकी 20 राज्यांनी गुणांकणाच्याबाबतीत सुधारणा केली  आहे. यात गुजरात पाठोपाठ महाराष्ट्र आणि गोवा ही राज्ये पहिल्या तीन क्रमांकावर आहेत.     

                                              00000  

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     

रितेश भुयार /वि.वृ.क्र. 260 /दि. 27.12.2021               

 

 


 

राजधानीत डॉ पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी




                 

                      

नवी दिल्ली,  27 : कृषी क्रांतीचे प्रणेते आणि शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांची जयंती आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.

                   कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त शामलाल गोयल यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे , सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. 

                        महाराष्ट्र परिचय केंद्रात डॉ. पंजाबराव देशमुख यांना अभिवादन

               महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात डॉ. पंजाबराव देशमुख यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी  तसेच उपस्थित पत्रकार यांनी यावेळी डॉ पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस  पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

                                                  00000  

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     

वि.वृ.क्र. 259 /दि. 27.12.2021               

 


 

Monday 13 December 2021

 




नवी दिल्ली, 13 ड‍िसेंबर : आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेतंर्गत सर्वाधिक लाभार्थी  राज्य म्हणून महाराष्ट्र अव्वल स्थानी असल्याची माहिती आज केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत दिली.

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना (एबीआरवाय) अंतर्गत कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या अर्जांनुसार महाराष्ट्रातून एबीआरवाय मधून सर्वाधिक लाभ घेतला असल्याचे श्री तेली यांनी सांगीतले. महाराष्ट्रातील एकूण 17,524 कपंन्यांमधील 6,49,560 कर्मचा-यांनी 4,09,72,34,366 इतकी रकम वर्ष 2019-20 ते आर्थिक वर्ष 2021-22 या कालावधीत उचलली आहे.  महाराष्ट्र पाठोपाठ गुजरात, कर्नाटक या राज्यातील कामगारांनी रकम उचलली आहे.  

केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) दाव्यांच्या निपटा-यांची प्रक्रिया कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) जानेवारी 2020 मध्ये सरु केली होती.

महामारी, पूर, भूकंप इत्यादी आपत्तीच्या वेळी इपीएफ सदस्यांना अखंड सेवा देण्यासाठी इपीएफओ मध्ये मल्टी-लोकेशन क्लेम सेटलमेंट सुविधा सुरू करण्यात आली होती. या व्यवस्थेमुळे ईपीएफ सदस्यांना अखंड सेवा पुरवण्यात मदत झाली आहे.

खासदार सदाशिवराव लोखंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट



 

नवी दिल्ली, 13 : शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला सदिच्छा भेट दिली.

परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ. का.)अमरज्योत कौर अरोरा यांनी श्री. लोखंडे यांचे स्वागत केले. उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी श्रीमती अरोरा यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राद्वारे प्रका‍शित करण्यात येणारी प्रकाशने, प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय, कार्यालयाच्या सोशल मिडीयाहून देण्यात येणारी माहिती, दिल्लीस्थित विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागांशी साधण्यात येणारा समन्वयाबाबत माहिती दिली. तसेच, परिचय केंद्राच्यातवीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही दिली. श्री . लोखंडे यांनी परिचय केंद्राच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
‍ 00000

Thursday 9 December 2021

महाराष्ट्र शासनाच्यावतीने ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात येईल : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ



नवी दिल्ली, 9 ड‍िसेंबर : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होणा-या निवडणूका ओबीसी प्रवर्ग सोडून होऊ नयेत यासाठी  राज्य शासनाच्यावतीने इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात येणार असल्याची, माहिती  राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिली.

 आज कस्तुरबा गांधीमार्गस्थित महाराष्ट्र सदन येथे श्री भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली. श्री भुजबळ यांनी सांगितले, ओबीसी प्रवर्गाला सोडून निवडणुक न व्हावी, यासाठी राज्य शासनाच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी 13 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात न्यामुर्ती ए.एम. खानविलकर यांच्या खंड पीठापुढे बाजु मांडणार आहेत.  

ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने 4 मार्च 2021 ला निर्णय दिला होता. मात्र, तरीही देशातील इतर राज्यांमध्ये झालेल्या न‍िवडणुकीमध्ये संबधित राज्यांनी ओबीसी प्रवर्गाला आरक्षण दिले होते. महाराष्ट्र राज्यानेही अध्यादेश काढून अन्य प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता ओबीसींना 27 टक्के आरक्षण दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक संस्थांच्या ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांच्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे. या निणर्यामुळे ओबीसी प्रवर्गातील निवडणुक लढवणा-या उमेदवारांना निवडणुक लढविता येणार नाही. ओबीसी प्रवर्गातील पात्र उमेदवार निवडणुक लढविण्यासाठी अपात्र ठरतील. असेही श्री भुजबळ यांनी सांगितले.

जातनिहाय जनगणनेची माहिती  (इम्पिरिकल डाटा) जी भारत सरकारकडे उपलब्ध आहे, ती माहिती राज्य शासनास उपलब्ध करून देण्यात यावी, अशी बाजु राज्य शासनाकडून सर्वोच्च न्यायालयात मांडण्यात येणार असल्याचे श्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.


स्किलबुक एप हे ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्माचा संगम : डॉ. ज्ञानेश्वर मुळे

 



स्किलबुक एप प्रकल्पाचा देशार्पण सोहळा संपन्न

नवी दिल्ली, 9 ड‍िसेंबर :  स्किलबुक एप हे ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्माचा संगम असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केले.

नवीन महाराष्ट्र सदन येथे आज स्किलबुक एप चा देशार्पण सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाशी जिल्हा उस्मानाबाद येथे शिल्पनिदेशक ( कोपा) या पदावर कार्यरत असलेले डॉ. किरण प्रकाश झरकर यांनी तयार केलेल्या स्किलबुक एप च्या देशार्पण समारंभ कार्यक्रमात जगन्नाथ पुरी येथील गोवर्धन मठाचे शंकराचार्य निश्लानंद सरस्वती यांच्यासह भारतातील विविध पंथांचे गुरू उपस्थित होते. तसेच महाराष्ट्रातील विविध ह.भ.प.  प्रमुख मंचावर उपस्थित होती.

श्री मुळे म्हणाले, स्किलबुक एप हा विद्यार्थ्यांपासून ते शेतक-यांपर्यंत प्रत्येकाला उपयोगी पडणारे  महत्वाचे एप आहे. हा उपक्रम फेसबुक समाज माध्यमांपेक्षा चारपट मोठा उपक्रम आहे. याचा लाभ अधिकाधिक लोकांनी घ्यावा आणि इतरांनाही करून दयावा, असे आवाहनही श्री मुळे यांनी यावेळी केले.

श्री. झरकर यांनी  डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्किल बुक या संगणकीय प्रणालीची निर्मिती केली आहे. शिक्षण क्षेत्रात क्रांतीकारी बदल करणारे स्किलबुक हे उपकरण विद्यार्थ्यांना व शेतक-यांना उपलब्ध करून देण्यासाठी मुळे आण्णा सोशल फाउंडेशन, औरंगाबाद या संस्थेच्या मदतीने स्किलबुक हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे एप तयार करण्यात आले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्किल इंडिया या महत्त्वाकांक्षी योजनेला बळ देण्यासाठी डॉ. झरकर यांनी गेल्या चार वर्षापासून स्किल बुक या अत्याधुनिक संगणकीय प्रणालीवर संशोधन केले आहे.

 

स्किल बुक हे एक कोटी विद्यार्थी व शेतकरी यांना एक लाख कौशल्यांशी जोडण्याचे डिजिटल माध्यम आहे. मोबाईल एप्लिकेशन, संगणक वेबपोर्टल व इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस या तिन्ही माध्यमातून ते उपलब्ध होणार आहे. स्किल बुक या एप प्रणालीतून मुख्यत्वे विद्यार्थी व शेतकरी यांचे एक लाख कौशल्याचे जाळे तयार करण्यात येणार आहेत. यात कौशल्य प्रकाशन, प्रशिक्षण, अभ्यासक्रम, प्रमाणपत्र, नोकरी, शिकाऊ उमेदवारी, सेवा व स्टार्टअप या सुविधा सर्वांना उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

स्किल बुक या प्रकल्पास स्मित किरण पब्लिशिंग प्रा. ली. या कंपनीने स्टार्टअप इंडिया या केंद्र शासनाच्या उपक्रमाअंतर्गत तयार केलेले आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाच्यावतीने कंपनीस डिप प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.

यावेळी कार्यक्रमास  स्किल बुकच्या संचालिका, प्राचार्य डॉ. भारती पाटील, तसेच विशेष निमंत्रीत करण्यात आलेले माहिती जनसंपर्क विभागाचे माजी संचालक तथा न्यूज स्टोरी टूडे या आंतरराष्ट्रीय वेब पोर्टलचे संपादक देवेंद्र भुजबळ आणि  जेष्ठ दूध तज्ञ्ज अशोक कुंदप हे ही  उपस्थित होते.

Wednesday 8 December 2021

राजधानीत संत जगनाडे महाराज जयंती साजरी





 

                      

नवी दिल्ली, 08 :  संत  जगनाडे  महाराज यांची  जयंती  आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.           

            कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त शामलाल गोयल यांनी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे ,  सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. 

 

महाराष्ट्र परिचय केंद्रात संत जगनाडे महाराज यांना अभिवादन

                  

                  महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात संत जगनाडे महाराज यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी  तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी  संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. माहिती अधिकारी अंजु निमसरकर  यांच्यासह  उपस्थित  कर्मचा-यांनी  प्रतिमेस  पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

     ‍ि                                                          00000  

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     

वि.वृ.क्र. 253 /दि. 08. 12. 2021