Tuesday 28 February 2023

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली राष्ट्रपती यांची सद‍िच्छा भेट

 



 

नवी दिल्ली , 28 : महाराष्ट्राचे   राज्यपाल रमेश बैस यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन येथे पत्नी श्रीमती रमाबाई बैस यांच्या समवेत सदिच्छा भेट घेतली.

 

याप्रसंगी श्री. बैस यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना पुष्पगुच्छ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती भेट दिली.

 

राष्ट्रपती यांनी यावेळी श्री. बैस यांच्या सोबत महाराष्ट्रासंबंधी चर्चा केली.

आद‍ि महोत्सवाची यशस्वी सांगता

 



महाराष्ट्राच्या आदिवासी दालनांना उत्तम प्रतिसाद

 

नवी दिल्ली , 28 : राजधानी दिल्लीत आदिवासी मंत्रालयाकडून आदि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. सोमवारी या महोत्सवाची यशस्वी सांगता  झाली असून याठीकाणी असणाऱ्या  राज्यातील आदिवासी दालनांना उत्तम प्रतिसाद मिळाला.

येथील ध्यानचंद स्टेडियम येथे आदि महोत्सवाचे उद्घाटन 16 फेब्रुवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. तर, समापन केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थित झाले. यावेळी केंद्रीय आदिवासी मंत्री अर्जुन मुंडा,  ट्रॅायफेडचे अध्यक्ष रामसिंह राठवा उपस्थित होते.

राज्याच्यावतीने याठ‍िकाणी दालने उभारली होती. यातंर्गत तीन वारली चित्रकांराची दालने, गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींची दोन दालने, आदिवासी समाज जीवनातील खाद्य पदार्थांचे दालन, एक आदिवासी शेतकरी उत्पाद‍ित कपंनीच्या वस्तुंचे दालन आणि आणखी एक ऑरगानिक वस्तुंच्या उत्पादनाची स्टॉलही होता. या दालनांना राजधानीतील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याची प्रतिक्रिया स्टॉलधारकांनी दिली.

राज्याच्या दालनाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी भेट‍ दिली होती.  केंद्रीय  आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांनी ही भेट दिली.  पद्श्री पुरस्कार प्राप्त रजनीश यांनी भेट देऊन प्रमाणपत्र स्टॉल धारकांना वितरीत केले.

आदि महोत्सवामुळे आदिवासी कारगीरांना लाभ झाल्या असल्याचे केंद्रीय आदिवासी मंत्री श्री मुंडा सांगता सोहळयात म्हणाले. तीन कोटी पेक्षा अधिक आर्थिक व्यवहार  या महोत्सवात झाला असल्याचे श्री मुंडा यांनी सांगितले.   याप्रसंगी सहभागी लाभार्थींना आयुष्मान कार्ड चे वाटप करण्यात आले.

200 पेक्षा अधिक  दालने या महोत्सवात होती. यातंर्गत आदिवासी समाजातील समृद्धता आणि सांस्कृत‍िक पंरपरेचे दर्शन घडविले गेले. हे वर्ष अंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष (भरडधान्य/ श्री अन्न) म्हणुन साजरे केले जात असल्यामुळे येथे आदिवासी समाजात रोजच्या जेवणात वापरण्यात येणारे भरड धान्याचे दालन विशेष आकर्षणाचे ठरले. यासोबत हस्तकला, हातमाग, मातीची भांडे, दागदागिने, अलंकार, सजावटीच्या वस्तू इत्यादी आदि महोत्सवाचे आकर्षण होते.

राज्यपाल रमेश बैस यांची माजी राज्यपाल यांनी घेतली सद‍िच्छा भेट

 




नवी दिल्ली , 28 : राज्यपाल रमेश बैस यांची माजी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी आज सदिच्छा भेट घेतली .

 

महाराष्ट्र सदन येथे राज्यपाल रमेश बैस यांची भगत सिंह कोश्यारी यांनी सदिच्छा भेट घेतली. श्री कोश्यारी यांनी राज्यपाल श्री बैस यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी श्री कोश्यारी यांनी राज्यपाल श्री बैस यांना उत्तराखंड येथील प्रसिद्ध केदारनाथ मंदिराची प्रतिकृती छायाचित्र स्वरूपात भेट दिली.

राज्यपाल रमेश बैस यांची उपसंचालक (माहिती) यांनी घेतली सदिच्छा भेट




 

नवी दिल्ली, 28 :  परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक, अमरज्योत कौर अरोरा यांनी  राज्याचे नवनियुक्त राज्यपाल  श्री. रमेश बैस यांची  महाराष्ट्र सदन येथे आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्रीमती अरोरा यांनी श्री. रमेश बैस यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

             श्रीमती अरोरा यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राद्वारे करण्यात येणारे कार्य, प्रका‍शित करण्यात येणारी प्रकाशने, प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय, कार्यालयाच्या सोशल मिडीयाहून देण्यात येणारी माहिती, दिल्लीस्थित विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागांशी साधण्यात येणारा समन्वयाबाबत माहिती दिली. तसेच, परिचय केंद्राच्यातवीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही दिली. 

 


 

Monday 27 February 2023

महाराष्ट्र परिचय केंद्रात मराठी भाषा गौरव दिन साजरा





 

नवी दिल्ली , 27 : महाराष्ट्र  परिचय केंद्रात ‘मराठी भाषा गौरव दिन’ आज साजरा करण्यात आला.परिचय केंद्राच्या ग्रंथालयात विष्णू वामन शिरवाडकर उर्फ  ‘कुसुमाग्रज’ यांच्या प्रतिमेस जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (मा.)(अ.का.)अमरज्योत कौर अरोरा यांनी ‘कुसुमाग्रज’ यांच्या पुष्प अर्पण करून अभिवादन केले. महाराष्ट्र शासन ‘कुसुमाग्रज’ यांची जयंती ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरी करते.  याप्रसंगी उपस्थित माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांच्यासह कार्यालयातील उ‍पस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

मराठी भाषा गौरव दिन’ आणि ‘कुसुमाग्रज’

विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या साहित्यिकसांस्‍कृतिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान  आहे. एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवीनाटककार व कादंबरीकार म्हणून त्यांची ख्याती आहे. ‘कुसुमाग्रज’ या नावाने त्यांनी काव्यलेखन केले. प्रसिध्द साहित्यिक वि.स.खांडेकर यांच्या नंतर  मराठी साहित्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे कुसुमाग्रज  दुसरे मराठी साहित्यिक ठरले.

             वि.वा शिरवाडकर यांचे  एकूण २४ कविता संग्रह ३ कादंब-या१६ कथा संग्रह१९ नाटके५ नाटिका व एकांकी आणि ४ लेखसंग्रह आदि साहित्य संपदा प्रसिध्द आहे. १९६४ मध्ये  गोव्यात आयोजित ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे ते अध्यक्ष होते. १९७४ मध्ये कुसुमाग्रज लिखित ‘नटसम्राट’  ह्या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. तरयाच साहित्यकृतीला १९८७ मध्ये ‘ज्ञानपीठ’ पुरस्कारही  मिळाला. 

 


 

Saturday 25 February 2023

समाजातील सक्षमांनी किमान दोन लोकांचे मार्गदर्शकत्व स्वीकारावे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 



नवी दिल्ली दि. 25 : समाजातील सक्षमांनी किमान दोन लोकांचे मार्गदर्शकत्व स्वीकारण्याचे आवाहन, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

 

            येथील अशोक हॉटेलमध्ये आज ‘ब्रह्मोद्योग 2023’ परिषदेचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयो‍जन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने करण्यात आले. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री  म्हणाले,  ब्राम्हण लोकांचे मार्गदर्शकत्व  करीत असताना अन्य समाजातील दुर्बल घटकांमधून किमान एकाचे  मार्गदर्शकत्व स्वीकारने ही वसुधैव कुटुम्बकम् चे पाऊल असून ती आपली जीवन शैली असल्याचे ते यावेळी म्हणाले.

            या कार्यक्रमात केंद्रीय संसदीय राज्य  मंत्री प्रल्हाद जोशी, विश्वप्रसन्न्‍ तीर्थ महास्वामी, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे  डॉ गोविंद कुलकर्णी, उद्योजक श्रीकांत बडवे, शेफ विष्णू मनोहर, विविध राज्यांतील खासदार आणि उद्योजक या परिषदेस उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, आपले भारतीय ज्ञान, मुल्ये पंरपरा जतन करून पुढील पिढयांपर्यंत पोहोचविणे आपले कर्तव्य आहे. प्रधानमंत्री नरेंद्र  मोदी यांच्या नेतृत्वात जागतिक स्तरावर मजबूत राष्ट्र बनविण्याच्या भारताच्या या प्रवासात प्रत्येकाने आपली भुमिका निभावून संधीचा योग्य वापर कारण काळाची गरज आहे.

            सर्वांनी एकाच दिशेने न जाता करीयरच्या विविध संधी निवडाव्यात. जगण्याचा दृष्टीकोण नेहमी व्यापक ठेवून विचार केल्यास, यश नक्कीच मिळेल. ब्रह्मोद्योगाच्या माध्यमातून भविष्यात हे शक्य होईल, असा विश्वास श्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

            कोविड महासाथीच्या काळात भारत एक सशक्त देश म्हणून जगापूढे आलेला आहे. जागतिक व्यापारात पूढे असणाऱ्यांच्या यादीत भारताचे स्थान अधिक वरचे होत आहे. आपल्या देशात प्रचंड क्षमता आहे. जगातील मोठे उद्योजक भारताकडे बघत आहेत. भारत उद्योग क्षेत्रात नवीन अध्याय सुरू करणार असून भविष्यात जगातील सर्वात मोठे कारखाने भारतात असतील, असे ही ते यावेळी म्हणाले.

             तंत्रज्ञान, कृत्रिम बुध्दिमत्ता यासह आपल्या देशाची समृद्ध सांस्कृतिक पंरपरा यांच्या एकत्रिकरणाने भारत हा एक सशक्त देश बनत आहे. आज प्रत्येक  क्षेत्रात ब्राम्हण तरूण तरूणी पुढे असल्याचे नोंदवून, ही वाटचाल अशीच राहील अशा शुभेच्छा श्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

            व्यवसाय क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान आणि उपायांवर चर्चा करण्यासाठी उदयोगपती, व्यवसायिक यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

 

00000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic            

अंजु निमसरकर वृत्त वि. क्र. 41  / दिनांक  25.02.2023

Thursday 23 February 2023

प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान

 



पद्मश्री दर्शना झवेरी यांचा अकादमी रत्न सदस्यता ने सन्मान

महाष्ट्रातील 12 कलावंताना पुरस्कार

 

नवी दिल्ली , 23 :   संगीत, नाटक, शास्त्रीय गायन आणि नृत्य क्षेत्रात उल्लेखणीय काम करणा-या कलावंताना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील 12 कलावंताचा समावेश आहे.

            पद्मश्री दर्शना झवेरी यांना मणिपूरी या नृत्यातील विशेष योगदानासाठी   अकादमी रत्न सदस्यता या संगीत अकादमीच्या  मानाच्या पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले.

याासह राज्यातून नंदक‍िशोर कपोते यांना त्यांच्या सर्वकष योगदानासाठी गौरविण्यात आले. त्यांच्यासह लोक संगीतकार  पांडूरंग घोटकर, शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर, नाटय अभिनेते प्रशांत दामले, कथक नृत्यांगना शमा भाटे, दिग्दर्शक कुमार सोहोनी, कळसूत्रीकार  मीना नाईक, सुगम संगीत गायक अनूप  जलोटा, सतारमेकर मजीद गुलाबसाहेब, ओडिसी र्नतक रबिंद्र कुमार अतिबुद्धि आणि समसामयिक र्नतक भुषण लकंद्री  यांना कला क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी आज गौरविण्यात आले.

येथील  विज्ञान भवनात आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने संगीत नाटक अकादमी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रापती, केंद्रीय सांस्कृत‍िक, पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी, केंद्रीय सांस्कृतिक राज्य मंत्री अर्जुन राम मेघवाल, संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा व्यासपीठावर उपस्थित होत्या.

आजच्या पुरस्कार प्रदान सोहळयात वर्ष 2019, वर्ष 2020 आणि वर्ष 2021 असे तीन वर्षांचे पुरस्कार वितरण करण्यात आले असून एकूण 128 कलावंताना पुरस्कार प्रदान करण्यात आले. अकादमी रत्न सदस्यता पुरस्काराचे स्वरूप 3 लाख रूपये रोख आणि ताम्रपत्र असे आहे. तर साहित्य अकादमी पुरस्काराचे स्वरूप  1 लाख रूपये रोख आणि ताम्रपत्र असे आहे.

वर्ष 2019 साठी महाराष्ट्रातील दिग्दर्शन क्षेत्रात योगदान देणारे कुमार सोहोनी यांना त्यांच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखणीय कार्यासाठी आज राष्ट्रपती यांच्या पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्राप्तीनंतर श्री सोहोनी यांनी दिलेल्या प्रतिक्रीयेत ते म्हणाले, दिग्दर्शनाच्या क्षेत्रात 50 या वर्ष झाली असून याच वर्षी महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभागाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तसेच संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार प्राप्त होने हा यथोचित सन्मान असल्याची प्रतिक्रीया त्यांनी दिली.

लोक संगीत क्षेत्रात योगदान देणारे पांडुरंग घोटकर यांना ही त्यांच्या योगदानासाठी वर्ष 2019 च्या संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले.

वर्ष  2019 साठीच सतारमेकर मजीद गुलाबसाहेब यांना वाद्य निर्मितीच्या योगदानासाठी सन्मानित करण्यात आले.

वर्ष 2020 साठीच्या पुरस्कारांमध्ये नंदकिशोर कपोते यांना कला प्रदर्शन क्षेत्रातील सर्वकष योगदानासाठी संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने राष्ट्रपती यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

हिंदुस्थानी शास्त्रीय गायनासाठी सुमधूर स्वरांची गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांना वर्ष 2020 च्या संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने राष्ट्रपती यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

सुप्रसिद्ध सिने तथा नाटय अभिनेते  प्रशांत दामले यांना नाट्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखणीय योगदानासाठी गौरविण्यात आले. पुरस्कार प्राप्तीनंतर दिलेल्या प्रतिक्रीयेत श्री दामले म्हणाले, मराठी नाटकात काम करण्याचा प्रचंड अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. नाटक हे टिम वर्क असून माझ्यासह निर्माते, सहकलाकार, कुंटूबाचे सदस्य, रसिक प्रेक्षक ते  महाराष्ट्रातील असो, भारतातील कुठल्याही राज्याचे असो वा संपूर्ण जगभरात पसरलेले मराठी नाटय प्रेमी यांचाही या पुरस्कारात  त‍ितकाचा वाटा आहे. आज हा मिळालेला पुरस्कार या सर्वांच्यावतीने मी घेत असल्याचे ते म्हणाले. सोबतच तरूण पिढीला आवाहन करत म्हणाले, चांगल्या कामाचा आनंद आणि पैसे दोन्ही मराठी नाटक देते.

 वर्ष 2020 साठी अभिनेत्री, दिग्दर्शिका कळसुत्रीकार  मीना नाईक  यांना कळसुत्रीच्या माध्यमातून समाज जागृती तसेच वैविध्यपूर्ण विषयांवर नाटक बसविण्याच्या उल्लेखणीय योगदानासाठी आज संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने त्यांच्या कामाचा सन्मान करण्यात आला.

सुगम संगीतातील ख्यातनाम गायक अनूप जलोटा यांना संगीत क्षेत्रातील अन्य प्रमुख पंरपरा अंतर्गत येणाऱ्या सुगम संगीतासाठी संगीत नाटक अकादमीचा मानाचा वर्ष 2020साठी पुरस्कार  प्रदान करण्यात आला.

ओड‍िसी न्यृत्य क्षेत्रातील योगदानासाठी वर्ष 2020 चा पुरस्कार मुंबईतील रबिंद्र कुमार अतिबुद्ध‍ि यांना प्रदान करण्यात आला. तसेच अहमदनगरचे भूषण लकंद्री यांना समसायिक नृत्य क्षेत्रातील योगदानासाठी संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

वर्ष 2021 साठी सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना शमा भाटे यांना नृत्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. 

Tuesday 21 February 2023

सांगली जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित विविध विषयांवर केंद्रीय रेल्वे मंत्र्याशी सकारात्मक चर्चा : कामगार तथा सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री सुरेश खाडे




नवी दिल्लीदि. 21 फेब्रुवारी : सांगली जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित विविध विषयांवर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्व‍िनी वैष्णव यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असल्याची, माहिती राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री सुरेश खाडे यांनी आज येथे दिली.

येथील संचार भवनात श्री खाडे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत  सांगली जिल्ह्यात रेल्वेशी संबंधित विषयांवर चर्चा केली असून संबंधित निवेदने ही श्री खाडे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री यांना यावेळी दिले.

 यामध्ये  सांगली जिल्ह्यातील अराग-मिरज येथे रेल्वे अंडर ब्रिज (RUB) असा रेल्वेचा प्रस्ताव असून यासाठीचे कंत्राट देण्याकरीता निविदा काढण्यात आले आहेत. या प्रक्रियेला रद्द करून  या ठिकाणी  रेल्वे ओव्हर ब्रिज  बांधण्यात यावे, अशी मागणी  श्री  खाडे यांनी केंद्रीय मंत्री श्री वैष्णव यांच्याकडे केली. केंद्रीय रेल्वे मंत्री श्री वैष्णव यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन सर्वेक्षण करण्याबाबतचे तत्काळ निर्देश दिले, असल्याचे श्री खाडे यांनी सांगितले.  

यासह सांगली जिल्ह्यातील येरळा नदीवरील रेल्वेच्या जागेतील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीचे रस्ते रेल्वे विभागाकडून बांधावे, अशी मागणीही केली.  सांगली येथील रेल्वे स्थानकाचे शेड अपूर्ण असून ते पूर्ण व्हावे. याशिवाय सीएसटीएम कोल्हापूर-तिरूपती महालक्ष्मी एक्सप्रेस ही रोज चालणारी गाडीचे नुतनीकरण व्हावे. काही गाडयांचा थांबा सांगली रेल्वे स्थानकांवर व्हावा.  सांगली आणि परिसरातील लोकांची अध‍िक प्रवास असलेल्या स्थानकांपर्यंत नवीन रेल्वे गाडया सुरू करण्याची मागणी श्री खाडे यांनी यावेळी केली.

मिरजमध्ये क्रिडा संकुलची केंद्रीय क्रिडा मंत्री यांच्याकडे मागणी

मिरज येथे क्रिडा संकुल असावे असे निवेदन आज सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री श्री खाडे यांनी केंद्रीय युवक कल्याण आणि क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे दिले. खेलो इंडिया अंतर्गत मिरज येथे क्रिडा संकुलाची मागणी श्री खाडे यांनी केंद्रीय क्रिडा मंत्री यांच्याकडे केली. केंद्रीय क्रिडा मंत्री यांनी याबाबत लवकर सकारात्मक निर्णय घेऊ, अशी माहिती बैठकीनंतर श्री खाडे यांनी दिली.

Monday 20 February 2023

राजधानीत बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी




 

नवी दिल्ली , 20 : बाळशास्त्री जांभेकर यांची  जयंती आज महाराष्ट्र सदन  आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.  

 

            कॉपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रभारी  निवासी  आयुक्त डॉ. निधी पांडे यांनी  बाळशास्त्री जयंती प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी   कर्मचाऱ्यांनी  बाळशास्त्री जांभेकरांच्या  प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 

 

महाराष्ट्र परिचय केंद्रात बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन

              

            महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित कर्मचा-यांनी  प्रतिमेस  पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.                           

                                                         0000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

अ.अरोरा /वि.वृ.क्र. /37/ दि.20.02.2023


 

Sunday 19 February 2023

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आग्र्याच्या लाल किल्ल्यात होणे सुवर्ण क्षण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 






नवी दिल्ली, दि. 19 : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आग्र्याच्या लाल किल्ल्यात साजरी होणे हा ऐतिहासिक क्षण आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

 

आग्रा (उत्तर प्रदेश) येथील लाल किल्ल्यामध्ये मोठ्या जल्लोषात छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती आज साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्याचा हा कार्यक्रम  महाराष्ट्र शासन, आर. आर. पाटील फाउंडेशन आणि अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान, औरंगाबाद या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला.

 

लाल किल्ल्यात शिवाजी महाराजांना औरंगजेबाने नजरकैदेत ठेवले होते. शिवरायांनी याच किल्ल्यात औरंगजेबाला खडे बोल सुनावले होते. येथून शिवाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीतून  सुखरूप सुटले होते. या ऐतिहासिक लाल किल्ल्यात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होणे हा एक अविस्मरणीय आणि ऐतिहासिक क्षण असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

 

मुख्यमंत्री म्हणाले की, मी आजच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून आलो आहे. आजचा दिवस अवघ्या महाराष्ट्रासाठी रोमहर्षक आहे. शिवरायांनी मोगल, आदिलशाही, निजामशाहीच्या अत्याचाराच्या कालखंडात हिंदवी स्वराज्य स्थापन करून कल्याणकारी राज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे आजही शिवाजी महाराज हे सदैव मार्गदर्शक आहेत. शिवराय हे कुशल संघटक आणि राजनीतिज्ञ होते. शिवाजी महाराज म्हणजे दैवी शक्तीच. त्यांना केवळ साम्राज्य बनवायचे नव्हते तर रयतेचे कल्याण करायचे होते. स्वातंत्र्याचे बीज त्यांनी रोवले.

 

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, महाराष्ट्र आणि हिंदुस्तानचे दैवत म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. औरंगजेबास महाराजांनी याच दिवाण - ए - खासमध्ये आपले तेज दाखवून दिले होते. तेथेच आज शिवजयंती साजरी होत आहे. हा दिवस आमच्या आयुष्यात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल. स्वातंत्र्यानंतर प्रथमच लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी होत आहे. मराठीजनांच्या जीवनातील हा रोमांचक क्षण आहे. आतापासून दरवर्षी येथे शिवजयंती साजरी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. 

  

            उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांच्या संदेशाचे यावेळी प्रक्षेपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  आर आर पाटील फाउंडेशनचे विनोद पाटील यांनी केली.

 

कार्यक्रमात  नितीन सरकते हंसराज, वैशाली माडे यांचे गायन, शिवबा पाळणा गायला गेला. शिवाजी महाराजांचा जीवन प्रवास सॅन्ड कलेच्या माध्यमातून सर्वम पटेल या कलाकारांनी मांडला.  शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर लघुनाटक सादर करण्यात आली.

 

कार्यक्रमास राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, उत्तर प्रदेशचे विधी एवं न्याय  मंत्री श्री. उपाध्य, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय  विधी राज्यमंत्री एस पी सिह बघेल, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, प्रशांत बंब, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरीभाऊ बागडे, आमदार संजीव शिरसाट, सतीश चव्हाण‌ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.   यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्री. दानवे यांनी आभार प्रदर्शन केले.

 

00000


Saturday 18 February 2023

राजधानीत “शिवाजी महाराज जयंती” जल्लोषात साजरी







‘जय भवानी जय शिवाजी ’ च्या गजराने महाराष्ट्र सदन दुमदुमले

                   

नवी दिल्ली दि. 19 : छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती राजधानीत जल्लोषात साजरी करण्यात आली. बाल शिवाजीच्या जन्मोत्सवी पाळण्याने, ढोल-ताशांच्या गजराने आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या उत्स्फुर्त घोषणांनी महाराष्ट्र सदन दुमदुमले.

 

            शिवजयंती राष्ट्रोत्सव समिती दिल्लीच्या वतीने  येथील कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आज शिवजयंती सोहळयाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र सदनाच्या प्रवेश भागातील केंद्रीयस्थानी  छत्रपती शिवाजी महाराजांची बैठी प्रतिमा विराजमान करण्यात आली. या ठिकाणी कोल्हापूर येथील छत्रपती परिवारातील युवराज शहाजी राजे छत्रपती यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवात सहभाग घेऊन शिवजन्माचा पाळणा गायला. यानंतर पालखी पुजन करण्यात आले. याप्रसंगी प्रभारी निवासी आयुक्त, डॉ. निधी पांडे, सहायक निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

 

            सदनाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळयाजवळ आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र सदनाच्या प्रभारी निवासी आयुक्त डॉ.निधी पांडे, सहायक निवासी आयुक्त डॉ.अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी-कर्मचा-यांनी व दिल्ली राजधानी क्षेत्र, हरियाणा, उत्तर प्रदेशातून या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 

 

ढोल ताशांचे सादरीकरण ठरले आकर्षण

            ढोल ताशांच्या गजराने सदनाचे वातावरण दुमदुमले. सोबतीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेने वातावरण निनादले.  नाशिक येथील वादकांच्या ढोल पथकात सहभागी तरुणाईंचा उत्साह व सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. या वाद्यवृदांच्या सादरीकरणाने उपस्थितांनी ठेका धरला.

 

संसद भवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

            संसद भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास अभिवादन करण्यात आले. यावेळी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. 

 

00000