Tuesday 26 November 2019

राजधानीत ‘संविधान दिन’ साजरा









                                

नवी दिल्ली, 26 :  महाराष्ट्र सदन आणि  महाराष्ट्र परिचय केंद्र येथे आज संविधान दिन साजरा करण्यात आला.
 कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात राज्य घटनेच्या उद्देशिकेचे’ सामुहिकपणे वाचन करण्यात आले. यावेळी गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, विजय कायरकर, अजितसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.    

                           महाराष्ट्र परिचय केंद्रात संविधान दिन साजरा

महाराष्ट्र परिचय केंद्रात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचा-यांनी राज्य घटनेच्या उद्देशिकेचे’ सामुहिकपणे वाचन केले. यावेळी उपसंचालक दयानंद कांबळे यांच्यासह  महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी, कर्मचारी व अभ्यागत  उपस्थित होते.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. २५८/ दिनांक 26/11/2019     




Monday 25 November 2019

खेलो इंडियाअंतर्गत महाराष्ट्राला 45.93 कोटींचा निधी









                   
नवी दिल्ली, 25 : देशातील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देवून उत्तमोत्तम खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या ‘खेलो इंडिया’ या महत्वाकांक्षी  योजनेंतर्गत महाराष्ट्राला 8 प्रकल्पांसाठी 45 कोटी 93 लाखांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

            केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने देशात क्रीडा क्षेत्राच्या विकास व प्रोत्साहनासाठी 2017 मध्ये ‘खेलो इंडिया’ ही महत्वाकांक्षी योजना सुरु करण्यात आली. या योजनेंतर्गत देशातील 28 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी 173  प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. या सर्व प्रकल्पांसाठी एकूण 1 हजार 226 कोटी 62 लाखांचा निधी मंजूर झाला असून आतापर्यंत एकूण 580 कोटी 62 लाखांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

            महाराष्ट्रात ‘खेलो इंडिया’ योजनेंतर्गत एकूण 8  प्रकल्पांसाठी 90 कोटी 41 लाख रुपये मंजूर झाले असून आतापर्यंत एकूण 45 कोटी 93 लाखांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

            केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) किरेन रिजीजु यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.

    महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. २५७ /  दिनांक 25/11/2019     




Friday 22 November 2019

दिवाळी अंकांची समृध्द संस्कृती जपण्याचे उत्तम कार्य परिचय केंद्र करीत आहे : उपायुक्त संदीप माळवी









             
              महाराष्ट्र परिचय केंद्रात दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन

नवी दिल्ली, 22 : महाराष्ट्रातील दिवाळी अंकांची समृध्द संस्कृती राजधानी दिल्लीत जपण्याचे मोलाचे कार्य महाराष्ट्र परिचय केंद्र करीत असल्याचे गौरवोद्गार ठाणे महानगर पालिकेचे उप आयुक्त संदीप माळवी यांनी आज येथे काढले.
            श्री. माळवी यांच्या हस्ते आणि अनिवासी भारतीय ॲड. प्रणिता देशपांडे यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र परिचय केंद्राच्या दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी श्री. माळवी यांनी हे विचार मांडले.    परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी  श्री माळवी आणि श्रीमती देशपांडे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.  महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

            शिक्षण, आरोग्य, राजकारण, महिला, बालक, तरूण, चित्रपट अशा विविध विषयांना वाहिलेली सकस दिवाळी अंक मराठी भाषेत प्रक्राशित होतात. ही दिवाळी अंकाची मेजवाणी परिचय केंद्र मराठी वाचकांना राजधानी दिल्लीत उपलब्ध करून देते, दिवाळी अंकांची समृध्द संस्कृती या निमित्ताने जपली जाते ही गौरवाची बाब असल्याचे श्री. माळवी यांनी सांगितले.

            ॲड. देशपांडे म्हणाल्या, मराठी भाषेतील वैविद्यपूर्ण वांड:मय दिवाळी अंकांच्या रूपात वाचकांना एकत्रित वाचायला मिळते.हा साहित्यिक ठेवा वाचकांपर्यंत पोचविण्याची परिचय केंद्राची दीर्घ पंरपरा कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. परिचय केंद्रात असलेल्या हस्तलिखीत दिवाळी अंकांचे डिजीटायजेशन केल्यास आम्हा परदेशातील मराठी जणांनाही हे दुर्मीळ अंक वाचायला मिळतील अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.


                                          प्रदर्शनात 125 दिवाळी अंकांची मेजवानी  

      या प्रदर्शनात गृह लक्ष्मी, आवाज,  मिळून सा-याजनी, चार चौघी, श्री व सौ, अंतर्नाद, जत्रा, किशोर, अक्षरधारा, तारांगण, कालनिर्णय, उत्तम कथा, निरंजन, अन्नपुर्णा, लोकसत्ता, महाराष्ट्रटाईम्स,लोकमत-दिपोत्सव, साप्ताहिक सकाळ,तरूण भारत,  प्रभात, झी मराठी आदी 125  दिवाळी अंक मांडण्यात आले आहेत. हे प्रदर्शन दिनांक 28 नोव्हेंबर 2019 पर्यंत सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजे पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

    महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. २५५ /  दिनांक 22/11/2019     





Wednesday 20 November 2019

आंतरराष्ट्रीयव्यापार मेळ्यात ‘महाराष्ट्र दिन’ उत्साहात साजरा






नवी दिल्ली, 20 : नमन,गण-गौळण,लावणी,भारूड, कोळीनृत्य या महाराष्ट्रातील समृध्दलोककलांच्या बहारदार सादरीकरणाने आज प्रगतीमैदान येथील महाराष्ट्र दिन कार्यक्रमात राज्याच्या वैविद्यपूर्ण संस्कृतीचे दर्शनघडले आणि या कार्यक्रमाने उपस्थित देश-विदेशातील प्रेक्षकांची मने जिकंली. 

येथील प्रगतीमैदानावर 39 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयात आज भारतीयसांस्कृतिक संबंध परिषदेचेअध्यक्ष तथा खासदार डॉ.विनय सहस्त्रबुध्दे यांच्या हस्ते ‘महाराष्ट्रदिन’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन  झाले. यावेळी खासदार तथा माजी केंद्रीय मंत्रीअरविंद सावंत, खासदार विनायक राऊत, खासदार राजन विचारे ,महाराष्ट्र सदनाचे निवासीआयुक्त समीर सहाय आणि महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक विजय कपाटे उपस्थित  होते.   

भारतीयआंतरराष्ट्रीय व्यापार मेळयात दररोज सायंकाळी ‘हंसध्वनी सभागृह’ येथे व्यापार मेळयात सहभागी देश व राज्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचेसादरीकरण होते. या उपक्रमांतर्गत व्यापार मेळयाच्या सातव्या दिवशी आज ‘महाराष्ट्र दिन’ कार्यक्रम साजरा करण्यात आला.                                     
 
महाराष्ट्राच्यासांस्कृतिक वारशाचे बहारदार सादरीकरण


मुंबई येथील ‘'पृथ्वीइनोव्हेशन्स’ गृपच्या कलाकारांनी ‘महाराष्ट्रदिन कार्यक्रमाचे’ सादरीकरण केले. गणेश वंदनेने या कार्यक्रमाची सुरुवात झाली.महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पहाटेचे दर्शन घडविणारे वासुदेव नृत्य तसेचपंढरपुरच्या वारीचे दर्शन घडविणारे दिंडी नृत्य सादर करण्यात आले. थेटप्रेक्षकांमधून निघालेली वारक-यांची दिंडी पाहून उपस्थितांनी उभे राहत दिंडीलामानवंदना दिली. शेतकरी नृत्य, खानदेशी नृत्य, धनगर नृत्य, जोगवा या लोककलांच्यासादरीकरणाने येथे उपस्थित देश-विदेशातील रसिक प्रेक्षकांच्या टाळया मिळवल्या.

            ‘बाजाराला विकण्या निघाली दही दूध,तूप आणि लोणी...’ ही ग्रामीण बाज दर्शविणारी  गौळण, ‘वेदांनाही नाही कळला अंतपार याचा कानडा राजापंढरीचा..’ हा भक्तीरसाने ओतप्रोत अभंग, ठाकर या आदिवासी जमातीचे सांस्कृतिक वैभव दर्शविणारे ‘लिंगोबाचा डोंगुर आभाळी गेला….’  या गितांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.   महाराष्ट्राच्या कडा-कपारीत राहणा-या आदिवासी जमातीचे दर्शन घडाविणारे नृत्य,कोळी नृत्य, वाघ्या-मुरळी, संताचे अध्यात्मिक विचार उलगडणारे भारूड आदींनीरसिकांच्या मनाचा ठाव घेतला. विविध लोककला व लोकनृत्यांचा आविष्कार       असणा-या या कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रतिबींबचउभे राहिले आणि यास उपस्थितांचा भरभरून प्रतिसाद लाभला.                

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटरहॅण्डलला फॉलो करा :                              http://twitter.com/micnewdelhi                          000000

 रितेश भुयार /वृत्त वि. क्र.254/  दिनांक २०.११.२०१९

Tuesday 19 November 2019

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण : पश्चिम विभागात महाराष्ट्राने पटकाविला दुसरा क्रमांक





नवी दिल्ली, 19 : ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण’ अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाला आज केंद्रीय रसायने व खते मंत्री सदानंद गौडा यांच्या हस्ते देशातील पश्चिम विभागातील दुस-या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

            केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल  व स्वच्छता विभागाच्यावतीने आज जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून येथील प्रवासी भारतीय केंद्रात आयोजित कार्यक्रमात ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण-2019’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री रतनलाल कटारीया , पेयजल व स्वच्छता विभागाचे सचिव परमेश्वरन अय्यर यावेळी मंचावर उपस्थित होते.

            उत्कृष्ट कार्याकरिता यावेळी विविध श्रेणींमध्ये पुरस्कार वितरीत करण्यात आले. पश्चिम विभागामधून महाराष्ट्राला दुस-या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव तथा स्वच्छ भारत अभियान ग्रामीणचे  प्रकल्प संचालक अभय महाजन यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

            पुरस्काराविषयी माहिती देताना स्वच्छ भारत अभियान ग्रामीणचे राज्य  समन्वयक गणेश वाडेकर यांनी सांगितले, स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत घालून दिलेल्या विविध घटकांच्या उत्तम अंमलबजावणीसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यात मुख्यत्वे राज्यातील 34 जिल्हयांतील निवडक एकूण 800 ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रम राबविणे, ऑनलाईन डाटा तयार करणे, सार्वजनिक स्थळांची केंद्र शासनाच्या पथकांकडून झालेल्या तपासणीत उत्तम कामगिरी, थर्टपार्टी निरीक्षण यांसह प्रत्यक्ष जनतेसोबत व ग्रामपंचायतींच्या पदाधिका-यांसोबत सवांद आणि मोबाईल ॲपद्वारे सर्वेक्षणामध्ये उत्तम कामगिरीची दखल या पुरस्कारासाठी घेण्यात आल्याचे श्री. वाडेकर यांनी सांगितले.   

       महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                              http://twitter.com/micnewdelhi                        
000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.253/  दिनांक १९.११.२०१९


इंदिरा गांधी यांची जयंती राजधानीत साजरी




















नवी दिल्ली, 19 : भारत देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री  इंदिरा गांधी यांची 101 वी जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे  साजरी करण्यात आली.

               कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, विजय कायरकर, अजितसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी -कर्मचारी  उपस्थित होते. उपस्थितांनी यावेळी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
         इंदिरा गांधी यांची जयंती राष्ट्रीय 'एकात्मता दिन' म्हणून पाळण्यात येते. यावेळी निवासी आयुक्त समीर सहाय यांनी उपस्थित अधिकारी -कर्मचा-यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. 

                     महाराष्ट्र परिचय केंद्रात इंदिरा गांधी यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यालयात उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.  यावेळी  उपसंचालक  दयानंद  कांबळे यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.      
       महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                              http://twitter.com/micnewdelhi                        
000000

रितेश भुयार /वृत्त वि. क्र.252/  दिनांक १९.११.२०१९

Saturday 16 November 2019

राष्ट्रपती भवनात मराठी चित्रमुद्रा




          डॉ.उत्तम पाचारणे यांच्या पुढाकाराने प्रथमच चित्रकारांचे निवासी शिबीर 

नवी दिल्ली, 16 : महाराष्ट्राचे सुपुत्र तथा राष्ट्रीय ललित कला अकादमीचे अध्यक्ष डॉ. उत्तम पाचारणे यांच्या पुढाकाराने राष्ट्रपतीभवनात प्रथमच देशातील ज्येष्ठ व नामवंत आणि तरूण चित्रकारांचे निवासी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या चित्रकारांच्या कलाकृती कायम स्वरूपी राष्ट्रपतीभवनात लावण्यात येणार आहेत. असा उपक्रम राबविण्याचा मान डॉ. पाचारणेंना मिळाला असून त्यांच्या रूपाने मराठीची चित्रमुद्राच राष्ट्रपतीभवनात उमटली आहे.  
        राष्ट्रीय ललित कला अकादमीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. पाचारणे यांनी अकादमीच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. राष्ट्रपतीभवनात बहुतांश परदेशी चित्रकारांचीच चित्रे असल्याचे निदर्शनास आल्यावर या भव्य वास्तुत देशातील नामवंत चित्रकारांच्या चित्रांचाही समावेश व्हावा या चिंतनातून डॉ पाचारणे यांनी अकादमीच्यावतीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा मानस केला. त्याचीच फलश्रूती म्हणजे देशातील ज्येष्ठ व नामवंत चित्रकार आणि तरूण चित्रकारांच्या निवासी शिबीराचे या वास्तुतीतील आयोजन होय. 

            10 ते 17 नोव्हेंबर 2019 या कालावधित आयोजित या शिबीरामध्ये देशातील ज्येष्ठ व नामवंत 12 चित्रकार आणि 3 तरूण चित्रकारांचा समावेश आहे. प्रत्येक कलाकार हा आपल्या वैशिष्टपूर्ण शैलीसाठी प्रसिध्द असून त्यांच्या दीर्घ साधनेतून राष्ट्रपती भवनाच्या वास्तुत श्रेष्ठ कलाकृती आकारला येत आहेत. प्रत्येक चित्रकार या शिबीरा दरम्यान आपल्या दोन कलाकृती तयार करीत आहे.

                                       महाराष्ट्रातील तीन चित्रकारांचा समावेश

       राष्ट्रीय ललित कला अकादमीच्या माध्यमातून प्रथमच चित्रकारांचे निवासी शिबीर राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आले आहे. हा एक ऐतिहासिक प्रसंग असून महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ आणि दोन तरुण असे तीन चित्रकार या शिबीरात सहभागी झाले आहेत. राष्ट्रपती भवनातील निसर्गरम्य वातावरणात चित्र काढण्याचा वेगळाच आनंद असल्याचे मुबंई येथील ज्येष्ठ व नामवंत  चित्रकार सुहास बहुलकर यांनी सांगिलते. चित्रकारांच्या पहिल्यावहिल्या निवासी शिबीरात सहभागी होण हा बहुमान असल्याचेही ते म्हणाले. श्री. बहुलकर यांनी भिंतीवरील चित्रशैली आणि त्यात पोतांचा लिलया वापर करून या ठिकाणी दोन कलाकृती साकारल्या आहेत. त्यात महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा , वाडे , पुर्वज आणि त्याच्यावर उमटलेल्या नियतीच्या पाऊल खुणा रेखाटली असून या सगळयांची वर्तमानासोबत सांगड घातली आहे.

            तुळजापूर येथील सिध्दार्थ शिंगाडे आणि अहमदनगर येथील प्रणिता बोरा हे तरूण चित्रकारही या ऐतिहासिक शिबीरात सहभागी झाले आहेत. सिध्दार्थ शिंगाडे यांनी साकारलेल्या पहिल्या कलाकृतीत भगवान शंकर आणि त्यांचे वाहन नंदी निवांत समयी आराम करीत असल्याचे दर्शविले असून यात निळयारंगाची उत्तम छटा दाखवत  निसर्गरम्य पहाटेचे सौदर्यंही खुलविले आहे. श्री. शिंगाडे यांच्या दुस-या कलाकृतीत त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राचे चित्ररेखाटले आहे ज्यात खेळणी विकणारे दांपत्य, गायी चारायला नेणारा मुलगा, मंदिर, स्त्री आदी प्रतिमा साकारल्या आहेत. प्रणिता बोरा यांनी उत्तम रंगसंगतीचा उपयोग करून  राधा-कृष्ण आणि मिरा यांच्या विविध प्रतीमा कौशल्यपूर्ण पध्दतीने आपल्या कलाकृतीत मांडल्या आहेत.
 
                                       राष्ट्रपती कोविंद साधणार चित्रकारांशी संवाद

            राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे 17 नोव्हेंबर रोजी स्वत: या निवासी शिबीराचे अवलोकन करणार असून सहभागी चित्रकारांसोबत संवाद साधणार आहेत. या शिबीरा दरम्यान चित्रकारांनी चितारलेल्या कलाकृती कायमस्वरूपी राष्ट्रपतीभवनात प्रदर्शीत करण्यात येणार आहे. राष्ट्रपती भवनाची शोभा या कलाकृतींच्या माध्यमातून वाढणार आहे. राष्ट्रपती भवनास भेट देणारे देश-विदेशातील विशेष अतिथी तसेच सामान्य जनतेलाही या कलाकृती बघायला मिळणार आहेत.

             शिबीरात सहभागी कलाकारांमध्ये अंजली इला मेनन, अन्वर खान, अर्पिता सिंग, चंद्रा भट्टाचार्यजी,  चिन्मय रॉय, गणेश हालोई, क्रिशेन खन्ना,लालुप्रसाद शॉ, परमजित सिंग, सनत कर, संजय भट्टाचार्य आणि सुहास बहुलकर या  ज्येष्ठ व नामवंत चित्रकारांसह विम्मी इंद्रा , प्रणिता बोरा आणि सिध्दार्थ शिंगाडे या तरूण चित्रकारांचा समावेश आहे.
       महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                              http://twitter.com/micnewdelhi 
                                          000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.२५ /  दिनांक  १.११.२०१९ 






लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी, मसुरी येथे “महाराष्ट्र दिन” साजरा




            मसुरी (उत्तराखंड), 16 : महाराष्ट्र राज्याच्या थोर परंपरेचे दर्शन लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी, मसुरी (उत्तराखंड) येथे महाराष्ट्र दिन कार्यक्रमात झाले.
            मसुरी (उत्तराखंड) येथील लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी मधील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना देशातील सर्व राज्यांच्या संस्कृति व परंपरांची ओळख करून देण्याचा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमातील एक भाग म्हणून 15 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्र दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी संपूर्ण लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी झेंडूच्या फुलांनी सजविण्यात आली होती. अकादमीतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी गणेश पूजनाने कार्यक्रमाची सुरूवात केली. यात मराठी अधिकाऱ्यांसोबत अमराठी अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
            या कार्यक्रमानिमित्त दिवसभर महाराष्ट्रीय वातावरण जोपासण्यात आले. सकाळच्या नश्ता पासून रात्रीच्या जेवणात महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात आला. सायंकाळच्या प्रशिक्षण सत्राच्या दरम्यान वडापाव/मिर्ची चा नाश्ता तर रात्रीच्या जेवणात कोल्हापूरी जेवणाचा समावेश केला होता.
            सायंकाळी अकादमीतील मराठी व अमराठी अधिकाऱ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून प्रत्यक्ष सहभाग घेतला. यावेळी अकादमीतील सर्व मराठी व अमराठी अधिकारी महाराष्ट्रीयन वेशभूशेत सहभागी झाले होते. पुरूष अधिकाऱ्यांनी फेटे बांधले होते तर महिला अधिकाऱ्यांनी नऊवारी साडी व नथ घातली होती. तसेच मुंबई येथील पृथ्वी इनोव्हेशन्स गृपच्या कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. या सांस्कृतिक कार्यक्रामचे आयोजन अकादमीतीली संपूर्णानंद ऑडिटोरियम मध्ये करण्यात आले होते.
            लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीच्या या महाराष्ट्र दिन कार्यक्रमात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ सहभागी झाले होते. अकादमीच्या कर्मशीला हॉलमध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाने संपूर्ण दिवस प्रदर्शनी लावली होती. या प्रदर्शनीत महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळातर्फे पैठणी साडी/पर्स च्या स्टॉल सोबत कोल्हापुरातील हुपरी ज्वेलरीचे स्टॉल लावण्यात आले होते. तसेच लावणी साड्यांवर 50 टक्के सूटही देण्यात आली होती.
            यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या  जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा व महाराष्ट्र सदनच्या व्यवस्थापक भगवंती मेश्राम यांना "महाराष्ट्र  दिन" कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीचे प्रशिक्षण समन्वयक  निरंजन  सुधांशु  यांच्या हस्ते गौरविण्यात आले.     




Friday 15 November 2019

स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांची जयंती राजधानीत साजरी






               
नवी दिल्ली, 15 :  स्वातंत्र्य सेनानी  बिरसा मुंडा यांची जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे  साजरी करण्यात आली.

                कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा  यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थि सर्वांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

                    महाराष्ट्र परिचय केंद्रात बिरसा मुंडा यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात  स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक  दयानंद कांबळे यांनी  बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित अधिकारी-कर्मचारी आणि अभ्यागतांनी यावेळी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
       महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                              http://twitter.com/micnewdelhi 
                                          000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.२५० /  दिनांक  १५.११.२०१९