Tuesday 31 July 2018

बंद पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करण्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्राकडे पाठवा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी




                   








                                  
नवी दिल्ली, 31 : अहमदनगर जिल्हयातील निळवंडे धरणाचे कामपूर्ण झाले असून या धरणातून बंद पाईपलाईनद्वारे शेतीला पाणी पुरवठा करण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाने केंद्राकडे पाठवावा अशी सूचना केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
            माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने आज सकाळी श्री. गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीत  श्री गडकरी यांनी ही सूचना केली.
निळवंडे धरणाचे काम १९९० पासून सुरु असून धरण नुकतेच बांधून पूर्ण झाले आहे. या धरणाद्वारे अहमदनगर जिल्हयाच्या अकोले तालुक्यातील ३० गावांना पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. अकोले तालुका आदिवासी बहुल असून येथे जमीन अत्यल्प आहे अशा स्थितीत कालव्यांद्वारे पाणी पुरवठा केल्यास आदिवासींची  जमीन  जाईल. तेव्हा, या भागातून पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी या शिष्टमंडळाने केंद्रीय जलसंपदा मंत्री श्री गडकरी  यांच्याकडे केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत श्री. गडकरी यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना दूरध्वनीवरून या विषयाबाबत माहिती देऊन या संदर्भातील प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्याची सूचना केली.      
                           अकोले –जुन्नर जोडरस्त्याबाबत सकारात्मक चर्चा
        अहमदनगर जिल्हयातील अकोले आणि पुणे जिल्हयातील जुन्नर या शहारांना जोडणा-या  रस्त्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. यासंदर्भात वनविभागाशी चर्चा करून अडचणी सोडवू असे श्री. गडकरी म्हणाले.
                      या भेटीनंतर आमदार वैभव पिचड यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट दिली. यावेळी परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी त्यांचे स्वागत केले. जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजू निमसरकर , उपसंपादक रितेश भुयार यावेळी उपस्थित होते. आज  झालेल्या बैठकीसंदर्भात श्री. पिचड  यांनी यावेळी माहिती दिली.  
       दरम्यान, श्री. कांबळे यांनी  महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालया अंतर्गत दिल्लीत कार्यरत महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कार्याची वैविध्यपूर्ण माहिती श्री पिचड यांना दिली. कार्यालयाच्या कामाविषयी श्री पिचड यांनी समाधान व्यक्त करून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.                                         
                                         0000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.२८/ दिनांक ३१.०७.२०१८ 



Monday 30 July 2018

पुणे विद्यापीठाच्या जनसंज्ञापन विभागाच्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट







नवी दिल्ली, 30 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन विभागाच्या विद्यार्थ्यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. त्यांनी यावेळी परिचय केंद्राच्या वैविध्यपूर्ण कार्याची माहिती जाणून घेतली. 
दिल्ली अभ्यास दौ-यावर असणा-या या 26 विद्यार्थ्यांनी, विभाग  प्रमुख  डॉ. उज्ज्वला बर्वे आणि सहयोगी प्राध्यापक संदीप नरडेले यांच्यासह आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी परिचय केंद्राच्या माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे उपस्थित होत्या.    
यावेळी औपचारिक वार्तालाप झाला. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालया अंतर्गत दिल्लीत कार्यरत महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कार्याची वैविध्यपूर्ण माहिती उपसंचालक दयानंद कांबळे यांनी दिली. महाराष्ट्र सदनात कार्यरत खासदार कक्षाद्वारे साधण्यात येणारा समन्वय व महाराष्ट्राबाहेरील मराठी मंडळांशी साधण्यात येणारा समन्वय, प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय, नव माध्यमांचा प्रभावी उपयोग, परिचय केंद्रातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम आणि शासनाचा जनसंपर्क साभांळताना घ्यावी लागणारी खबरदारी आदींची उदाहरणांसहीत माहितीही श्री.कांबळे यांनी दिली.
‘शासनातील जनसंपर्क’ विषयावर आयोजित राष्ट्रीय कार्यशाळा, शासनाच्या जनसंपर्कासाठी कार्यालयाने समाज माध्यमांचा केलेला प्रभावी उपयोग याविषयी माहिती  दिली . तसेच, दिल्लीस्थित विविध राज्यांच्या जनसंपर्क विभागांसोबत संपर्क व समन्वय साधून जनसंपर्क विषयक कार्यातील सकारात्मक उपक्रमांच्या देवाण घेवाणीत या कार्यालयाचा पुढाकाराबाबतही माहिती दिली. परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, परिचय केंद्राची विविध प्रकाशने आदींची माहिती श्री. कांबळे यांनी  दिली. यावेळी  विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना श्री. कांबळे यांनी मनमोकळी उत्तरे दिली.
 उपसंपादक रितेश भुयार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व कार्याविषयी सादरीकरण केले तर  वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन विभागाची विद्यार्थ्यांनी जयश्री पाटील यांनी आभार मानले.  उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थ्यांना यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रकाशने भेट स्वरूपात देण्यात आली.       
                                                    0000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.२८१/ दिनांक ३०.०७.२०१८ 


                                             



Friday 27 July 2018

एनआरआय विवाहांमध्ये पीडित महिलांसाठी केंद्र शासनाने ठोस पाऊले उचलली : मनेका गांधी











नवी दिल्ली, 27 : अनिवासी भारतीय (एनआरआर) विवाहांमध्ये पीडित महिलांसाठी केंद्र शासनाने ठोस पाऊले उचलली, आहेत अशी, माहिती केंद्रीय माहिला व बाल कल्याण मंत्री मनेका गांधी यांनी ‘अनिवासी भारतीय विवाह आणि महिला तस्करी- समस्या आणि उपाय योजना’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या समारोपीय सत्राच्या कार्यक्रमात दिली.
केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र सदन येथे ‘अनिवासी भारतीय विवाह आणि महिला तस्करी- समस्या आणि उपाय योजना’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदे आयोजन करण्यात आले. या परिषदेच्या समारोप कार्यक्रमात श्रीमती. गांधी बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, पराराष्ट्र विभागाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे, आणि राज्य महिला आयोगाच्या अन्य सदस्या मंचावर उपस्थित होत्या.
अनिवासी भारतीयांसोबत झालेल्या विवाहांमध्ये महिलांची फसवणूक झाल्यास, फसवणूक करणा-या पुरूषांना तसेच कुटूबांतील सदस्यांना कडक शिक्षा होईल, याकडे केंद्र शासन गांभीर्याने लक्ष देत आहे. अशा पीडित माहिलांना सर्व प्रकाराचे सरंक्षण केंद्र सरकार देते. तसेच पीडित महिला अशा वेळी नैराश्य ग्रस्त होतात त्यांना या नैराश्यातून बाहेर काढण्याचे काम ही केंद्र शासच्या माहिला व बालकल्याण मंत्रालय करीत असल्याचे, श्रीमती गांधी यांनी सांगितले.
अनिवासी भारतीयांसोबतच्या एनआरआय विवाहांमध्ये येणा-या समस्यांना दूर करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालय, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, केंद्रीय विधी मंत्रालय, केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालय मिळून काम करित आहे. पुढील काळात परराष्ट्रीय व्यवहार मंत्रालयाच्या संकेत स्थळावरून ऑन लाईन वारंट काढण्यात येण्यासंदर्भात काम सुरू आहे. तुर्तास अनिवासी भारतीयांसोबतच्या विवाहांमध्ये काही समस्या असल्यास चारही मंत्रालयाचे सहसचिव मिळून तातडीने निणर्य घेत असल्याची माहिती श्रीमती गांधी यांनी यावेळी दिली. यासह एनआरआय विवाह सात दिवसांच्या आत नोंदणी करण्याची अट घालण्यात आलेली आहे, यामुळे महिलांना फायदा होत असल्याचे सांगितले.
श्रीमती गांधी म्हणाल्या, एकल प्रकरणांमधून घडलेल्या घटनेचे विविध पैलु उघडकीस येतात. तसेच, अशा प्रकरणांमधून नवीन संरक्षणासंदर्भातील नियमही तयार केली जातात. त्यामुळे एकल प्रकरणाला प्राधान्यांने हाताळण्यावर भर देण्यात यावा, असे श्रीमती मनेका गांधी म्हणाल्या.
तुरूंगातील महिलांच्या पाल्यांची नियमित भेट घडवावी
महिला आयोगांनी राज्यातील तुरूंगांना भेटी देऊन तुरूगांतील महिलांच्या समस्या जाणुन घ्याव्यात. तुरूंगात जन्माला आलेल्या पाल्यांना वयाच्या 6 वर्षापर्यंतच आईसोबत तुरूंगात राहता येते. त्यानंतर त्यांना तुरूंग सोडावा लागतो. अशा वेळी मुला-मुलांची भेट आई सोबत होत नाही. ब-याचदा अशा मुला-मुलींची तस्करी केली जाते. ही टाळण्यासाठी पाल्यांची आठवडयातून तीनदा तुरूंगात असणा-या आईशी भेट घडवण्यात यावी. याविषयी केंद्र शासन नव्याने नियमावली करीत असल्याचे, श्रीमती मनेका गांधी यांनी सांगितले.
वन स्टॉप सेंटरची संख्या 600 पर्यंत करण्यात येईल
सध्या देशभर 200 वन स्टॉप सेंटर आहेत. याची संख्या वाढवून 600 पर्यंत केली जाईल, अशी माहिती देत, श्रीमती गांधी म्हणाल्या हे वन स्टॉप सेंटर योग्य रीतीने काम करते का हे पाहण्यासाठी या केंद्रांना महिला आयोगांनी आकस्मिक भेटी देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केली .
महिला आयोगांकडे वकीलांचे पॅनल असावे
महिला आयोगांकडे येणारे प्रकरणे लवकर सोडविण्यासाठी आयोगाकडे किमान 20 वकीलांचे पॅनल असावे, या वकीलांना आयोगातर्फे किमान मानधनही देण्यात यावे, अशी महत्वपुर्ण सूचनाही श्रीमती गांधी यांनी यावेळी केली. यामुळे तक्रारकर्त्या महिलांची प्रकरणे लवकर सुटतील. ‘अनिवासी भारतीय विवाह आणि महिला तस्करी- समस्या आणि उपाय योजना’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या समारोपीय सत्रामध्ये श्रीमती रहाटकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाव्दारे राबविण्यात येणा-या उपक्रमांची माहिती दिली. प्रास्ताविक परराष्ट्र व्यवहार सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी केले

केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांनी घेतला सिंधुदुर्ग विमानतळाचा आढावा

















नवी दिल्ली, 27 : नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी आज सिंधुदुर्ग  जिल्ह्यात परुळे-चिपी येथे उभारण्यात येत असलेल्या विमानतळ कामाचा आढावा घेतला.
            केंद्र सरकारच्या ‘उडान’ या प्रादेशिक जोडणी योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांनाही परवडण्यायोग्य दरात हवाई प्रवास करता येईल, असा विश्वास प्रभू यांनी यासंदर्भातील बैठकीत व्यक्त केला. या विमानतळामुळे कोकणाचा भाग, महाराष्ट्रातील सर्व ठिकाणांसह उत्तर कर्नाटक व गोव्याला जोडला जाईल, त्याचबरोबर येथील  निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनालाही चालना मिळेल, असे श्री. प्रभु म्हणाले.
            या विमानतळ परिसरातील इमारती, धावपट्टी आणि विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू असून ते पूर्णत्वास येत आहे. या विमानतळावर 2500 मीटर लांबीच्या धावपट्टीची तरतूद असून भविष्यात तिच्या विस्ताराचीही तरतूद आहे. या विमानतळासाठी  520 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सध्या राज्यात 3 आंतरराष्ट्रीय आणि 13 देशांतर्गत विमानतळ कार्यरत आहेत.      
                                      ०००००
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. २७९/ दिनांक  २७.७.२०१८


अनिवासी भारतीय विवाहातील समस्या दूर करण्यासाठी आता ऑनलाईन वॉरंट : सुषमा स्वाराज







नवी दिल्ली, 27 : अनिवासी भारतीयांसोबतच्या एनआरआय विवाहांमध्ये येणा-या समस्यांना दूर करण्यासाठी आणि दोषी व्यक्तीस तातडीने पकडण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन वॉरंट आणि समन्स जारी करण्याचा शासन विचार करीत आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटना प्रसंगी दिली.
                    केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र सदन येथे ‘अनिवासी भारतीय विवाह आणि महिला तस्करी- समस्या आणि उपाय योजना’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मंचावर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे उपस्थित होते.
                   ‘एनआरआय विवाह’ हा विषय आता राज्याचा विषय राहीला नसून देशभरातील सर्व राज्यांमध्ये पिडीत महिलांच्या संख्यांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. याप्रकरणांमध्ये कुटूंबातील व्यक्तींची सहभागिता मोठ्या प्रमाणात दिसून येते. नव विवाहीत युवतींना संरक्षण मिळावे, यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही ठोस पाऊले उचलली आहेत. मंत्रालयाच्या संकेत स्थळावरून थेट वॉरंट आणि समन्स जारी करण्याचा प्रयत्न सुरू असून या लोकसभा सत्रात अथवा पुढच्या सत्रात या विधेयकास मंजूरी मिळेल, यामुळे दोषी व्यक्ती जगात कुठेही असल्यास त्याला तातडीने पकडता येईल. यासह अनिवासी भारतीयांसोबत विवाह झाल्यास नवविवाहीत मुलीच्या नावे संपत्तीत वाटा असावा याबाबतही कायदे बनविण्यासंदर्भात संशोधन सुरू असल्याचे श्रीमती स्वराज यांनी सांगितले.
                     सध्या अनिवासी भारतीयांसोबतच्या विवाहामध्ये तातडीने करावयाच्या बदलांमध्ये दोषी असलेल्या व्यक्तीची तक्रार केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाला केल्यास, संबधित व्यक्तींचे पासपोर्ट रद्द करण्यात येते. यामुळे पीडित महिलांना न्याय मिळण्यास मदत होत असल्याचेही श्रीमती स्वराज यांनी सांगितले. याशिवाय एनआरआय व्यक्तीसोबत विवाह करताना संपूर्ण चौकशी करूनच लग्नाचे पाऊल उचलण्याच्या सूचनाही श्रीमती स्वराज यांनी यावेळी केली.

                                            अवैध एजेंटांची माहिती शासन यंत्रणेला द्या

                       आपल्या आसपास असणारे अवैध एजेंटांची माहिती शासन यंत्रणेला देण्याचे आवाहन ही सुषमा स्वराज यांनी केले. त्या म्हणाल्या, मानवी तस्करी होण्यामागचे सर्वात महत्वाचे कारण हे अवैध एजेंटच्या माध्यमातून परदेशात जाणा-यांचे आहे. पराराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या संकेत स्थळावर देशभरातील वैध एजेंटची यादी असून आपल्या शहरातील वैध एजेंटशी संपर्क करूनच परदेशात जाणे योग्य असल्याचे श्रीमती स्वराज म्हणाल्या. भविष्यातील कुठल्याही संकटसमयी परदेशातील दूतावास आपल्या मदतीसाठी सदैव त्तपर असते. यासह ज्या रोजगारांसाठी परदेशात जायचे आहे, त्याचे योग्य प्रशिक्षण घेऊनच जायचे. यासाठी पराराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाशी करार केलेला आहे. याचा लाभही परदेशात जाणाऱ्यांनी घ्यावा असे आवाहन श्रीमती स्वराज यांनी केले.
                       परदेशात जाणा-यांसाठी प्रत्येक राज्य सरकारांनी त्यांच्या प्रादेशिक भाषांमध्ये द्रृकश्राव्य माध्यमातून प्रचार-प्रसार करावा अशा सूचनाही श्रीमती स्वराज यांनी केली.
                     या परिषदेच्या उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी केले. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय लोकाभिमूख काम करीत असल्याचे आभार प्रदर्शन करते वेळी विभागाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे म्हणाले. उद्घाटन सत्राच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राज्य महिला आयोगाच्या सचिव मंजुषा मोळवणे यांनी केले.
                         या परिषदेस राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य, महाराष्ट्र शासनाचे अधिकारी, विविध राज्यांच्या महिला आयोगाच्या सदस्य, मानवी हक्क आयोगाचे सदस्य, बाल हक्क आयोगाचे सदस्य, महारराष्ट्रातील प्रेरणा, स्नेहालय या गैरसरकारी संस्थांचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.

                                                                          0000

अंजु निमसरकर/वृत्त वि. क्र. 278/ दिनांक 27-07-2018

Thursday 26 July 2018

‘एनआरआय विवाह’ आणि ‘मानवी तस्करी’ विषयांवर आज राष्ट्रीय परिषद



परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते होणार उद्घाटन

नवी दिल्ली, 26 : एनआरआय विवाह आणि  मानवी तस्करी - समस्या आणि उपाययोजना या  विषयांवर शुक्रवारी, दि. 27 जुलै रोजी महाराष्ट्र सदन येथे राष्ट्रीय परिषद होणार असल्याची माहिती,  महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा  विजया रहाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

            परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे  उद्घाटन केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री  सुषमा स्वराज यांच्या हस्ते होणार आहे. तर, समारोपीय कार्यक्रमात उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू आणि केंद्रीय महिला व  बाल कल्याण मंत्री मनेका गांधी उपस्थितअसणार आहेत.  
            या राष्ट्रीय परिषदेत  एनआरआय विवाह आणि मानवी तस्करी – समस्या  आणि उपाययोजना या विषयांवर दोन सत्रांचे आयोजन करण्यात आलेले असून, यावेळी  विस्तृत चर्चा होणार आहे. या चर्चेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा, देशभरातील विविध राज्यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा, सदस्य उपस्थित राहतील. यासह बाल हक्क आयोग,  मानवी हक्क आयोग, विविध गैरसरकारी संस्था तसेच विषयांशी संबंधित सखोल अभ्यासकही  सहभागी होणार आहेत.       
            यावेळी पिडीत विवाहित महिला ज्यांना शासनाच्या मदतीने न्याय मिळाला. तसेच, मानवी तस्करीतून सूटका झालेल्या प्रातिनिधीक माहिला स्वानुभव सांगतील.


Wednesday 25 July 2018

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ‘डिजीटल इंडिया’चे स्वप्न पूर्ण करीत आहेत : केंद्रीय राज्यमंत्री मनोज सिन्हा




                                                       
नवी दिल्ली, २५ : महानेटच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण क्षेत्रासह शासकीय कार्यालयांना ब्रॉडबँडच्या माध्यमातून जोडण्याचे कार्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ‘डिजीटल इंडिया’चे स्वप्न ते पूर्ण करीत आहेत असे गौरवोद्गाार आज केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी लोकसभेत काढले.

            लोकसभेत आज नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिक जिल्हयातील ब्रॉडबँड सेवेच्या अंमलबजावणीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री. सिन्हा बोलत होते. श्री. सिन्हा म्हणाले, गेल्या महिन्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केंद्रीय दूरसंचार मंत्रालयात आले होते त्यांनी यावेळी केंद्र शासनाच्या ‘भारतनेट’ प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात ‘महानेट’ ही मोठी योजना तयार केल्याचे सांगितले . अंत्यत आधुनिक सुविधांचा समावेश असलेल्या महानेट योजनेच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात टेली मेडीसीन सुविधा देण्यात येत आहे. राज्यातील विविध शैक्षणीक संस्थांना या योजनेंतर्गत ब्रॉडबँडने जोडण्यात आले आहे तसेच विविध शासकीय कार्यालयांनाही ब्रॉडबँडच्या माध्यमातून जोडण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस  यांनी महानेट कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तम कार्य केले आहे, मुख्यमंत्री डिजीटल इंडियाचे स्वप्नपूर्ण करीत असल्याचे श्री. सिन्हा यावेळी म्हणाले.

            दरम्यान, नाशिक जिल्हयामध्ये एकूण ६११ ग्रामपंचायतीअसून यापैकी ६०७ ग्रामपंचयाती भारतनेटच्या पहिल्या टप्प्यात ब्रॉडबँड सेवेने जोडण्यातआल्याचे श्री. सिन्हा यांनी सांगितले.   
       
                                                                  0000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. २७७/ दिनांक  २५.७.२०१८

हिंदी प्रचार सभेच्या शिष्टमंडळाची परिचय केंद्रास भेट













नवी दिल्ली, २५ :  हैद्राबाद येथील  हिंदी  प्रचार  सभेच्या  शिष्टमंडळाने  आज  महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट दिली.

            महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी यावेळी  हिंदी प्रचार सभेचे अध्यक्ष प्रा. चंद्रदेव कवडे, महासचिव प्रा. सुरेश पुरी, साहित्य सचिव डॉ. एम.श्रीरामुलु, कोषाध्यक्ष जे.प्रेमकुमार, आंध्रप्रदेश  हिंदी प्रचार सभेचे सचिव एस. गैबुवाली, महाराष्ट्र   हिंदी प्रचार सभेचे सचिव डॉ नारायण वाकळे  आणि हिंदी प्रचार सभेचे कार्यालय सचिव एम.गोपाल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 

            प्रा. चंद्रदेव कवडे यांच्या अध्यक्षतेखालील या शिष्टमंडळाने परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी  शिष्टमंडळाच्या सदस्यांनी  हिंदी प्रचार सभेच्या कार्याविषयी माहिती  दिली. या संस्थेच्या वतीने चालविण्यात येणारे विविध उपक्रम व प्रकाशित करण्यात येणारे विविध साहित्य, हिंदी भाषेच्या प्रचार प्रसाराबाबत शासकीय व खाजगी संस्थांसोबतचा समन्वय याबाबतही माहिती दिली.

            यावेळी श्री. कांबळे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कार्याविषयी माहिती दिली. ‘शासनातील जनसंपर्क’ विषयावर आयोजित राष्ट्रीय कार्यशाळा, शासनाच्या जनसंपर्कासाठी कार्यालयाने समाज माध्यमांचा केलेला प्रभावी उपयोग याविषयी माहिती  दिली . तसेच, दिल्लीस्थित विविध राज्यांच्या जनसंपर्क विभागांसोबत संपर्क व समन्वय साधून जनसंपर्क विषयक कार्यातील सकारात्मक उपक्रमांच्या देवाण घेवाणीत या कार्यालयाचा पुढाकाराबाबतही माहिती दिली.
            महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, परिचय केंद्राची विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती श्री. कांबळे यांनी  दिली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना भेट देऊन  शिष्टमंडळाच्या सदस्यांनी माहिती जाणून घेतली व कार्यालयाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.
                                                                  0000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. २७६/ दिनांक  २५.७.२०१८

Tuesday 24 July 2018

महाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी ५२ हजार ९३५ घरे मंजूर





नवी दिल्ली, २४ : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) अंतर्गत महाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी ५२ हजार ९३५ घरे मंजूर झाली आहेत. देशात एकूण २ लाख ६७ हजार ५४६  घरे मंजूर करण्यात आली आहेत.

        केंद्रीय गृह निर्माण व नगर विकास मंत्रालयाच्या केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीच्या आज झालेल्या ३६ व्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील विविध शहरांतील गरिबांसाठी ५२ हजार ९३५ घरे मंजूर करण्यात आली आहेत.  या बैठकीत महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, राजस्थान, छत्तीसगड, पंजाब आणि उत्तराखंड या राज्यांसाठी एकूण २ लाख ६७ हजार ५४६  घरे मंजूर करण्यात आली आहेत.                                                                        

       0000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. २७५/ दिनांक  २४.७.२०१८


Monday 23 July 2018

अधिका-यांमध्ये मदतीचा भाव असावा – केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर








नवी दिल्ली, 23:  समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या सेवा पोहचतील या ध्येयाने कार्यरत राहून सनदी अधिका-यांनी सदैव मदतीचा भाव ठेवावा असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज येथे केले.
            पुढचे पाऊलसंस्थेच्यावतीने येथील माळवणकर सभागृहात आयोजित केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी परीक्षा- गुणवंताचा कौतुक सोहळा व नवीन विद्यार्थ्यांना मार्गदशनया कार्यक्रमात श्री.जावडेकर बोलत होते. यावेळी  पुढचे पाऊलसंस्थेचे संस्थापक तथा विदेश मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे  व गुणवंत विद्यार्थी मंचावर उपस्थित होते.
            श्री. जावडेकर म्हणाले, केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण  होऊन प्रत्यक्षात कार्य करताना सनदी अधिका-यांनी समाजमन जाणून घेणे महत्वाचे असते. त्यासाठी प्रत्येक सनदी अधिका-याचे ह्दय समाजसेवकाचे असावे. समाजातील प्रत्येक घटकांच्या समस्यांची जाण अधिका-याला असावी. उत्तम सनदी अधिका-याने कर्तव्य कठोरता व प्रामाणिकता हे गुण अंगी बाळगतांनाच पदाचा अहंकार टाळावा असा मोलाचा सल्ला   श्री. जावडेकर यांनी दिला.
प्रतिभेला मेहनत व शिस्तीची जोड आवश्यक
            यावेळी  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री. जावडेकर म्हणाले, या परिक्षेसाठी नव्या ऊर्जेने अभ्यासाला लागा व प्रतिभेला मेहनत आणि शिस्तेची जोड द्या. प्रत्येक विद्यार्थी हा प्रतिभावान असतो मात्र, इच्छित यश मिळविण्यासाठी मेहनत आणि शिस्तही असणे अत्यंत गरजेचे आहे. अभ्यास करतांना विषय समजून घेणे व तो समजावून सांगता येणे आणि त्या विषयाचे उचित विश्लेषण करणे या बाबींवर लक्ष दिल्यास अभ्यास सुकर होतो. महाराष्ट्रातील विद्यार्थी मेहनती आहेत अस सांगून, या विद्यार्थ्यांनी यशवंत व किर्तीवंत व्हावे अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.

गुणवंतांचा सन्मान
                या कार्यक्रमात वर्ष 2016 -17 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 30 गुणवंत विद्यार्थ्यांचा केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर  आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे,खासदार डॉ. विकास महात्मे, खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी मुळचे महाराष्ट्रातील व केंद्र शासनाच्या विविध विभागांमध्ये कार्यरत अधिकारी, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची राजधानी दिल्लीत तयारी करणारे महाराष्ट्रातील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
            तत्पूर्वी, केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षाउत्तीर्ण झालेल्या मोनिका घुगे यांनी युपीएससी पूर्व परिक्षेच्या तयारीबाबतउपस्थितांना मार्गदर्शन केले. मुख्य परिक्षेच्या तयारीसाठी अभ्यासाचे तंत्रया विषयावर सुयश चव्हाण यांनी, ‘मुख्य परिक्षेतील उत्तर लिखानया विषयावर प्रणय कानिटकर, ‘निबंध लेखनविषयावर भुवनेश पाटील, ‘एथिक्सविषयावर  वैभव गायकवाड यांनी , ‘चालू घडामोडीविषयावर सुधीर केकन यांनी तर वेळेचे नियोनवैकल्पीक विषयांबाबतजितेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. तर मुलाखतीच्या तयारी बाबात  दिग्वीजय बोडके यांनी मार्गदर्शन केले.

            यावेळी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा- उत्तीर्ण झालेले गुणवंत विद्यार्थी व लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणा-या नवीन विद्यार्थ्यांमध्ये  संवादाचा कार्यक्रमही पार पडला. उन्मेश वाघ आणि अश्विनी अढीवरेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो
 करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                
                                       0000    
  रितेश भुयार /वृत्त वि. क्र.२७४/ दिनांक २३.०७.२०१८         

राजधानीत लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी






                                       


नवी दिल्ली, 23 : भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची  जयंती आज महाराष्ट्र सदन येथे साजरी करण्यात आली.
       
        कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रधान सचिव तथा निवासी आयुक्त आभा शुक्ला  यांनी  लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी सुमन चंद्रा, इशु संधू ,अजितसिंग नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

                 महाराष्ट्र परिचय केंद्रात लोकमान्य टिळक यांना अभिवादन
 महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात लोकमान्य टिळक यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा, उपसंपादक रितेश भुयार यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित कर्मचा-यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                
                                       0000    
  रितेश भुयार /वृत्त वि. क्र.२७३/ दिनांक २३.०७.२०१८