Thursday 31 October 2019

राजधानीत सरदार पटेल जयंती आणि इंदिरा गांधी यांचा स्मृतीदिन साजरा








नवी दिल्ली, 31 : देशाचे प्रथम गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची 144 वी जयंती  ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे  साजरा  करण्यात आली, तर देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या 35 व्या स्मृतीदिनी त्यांना अभिवादन करण्यात आले.

                कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात, गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त  शामलाल गोयल यांनी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक  निवासी आयुक्त सुमन चंद्रा, विजय कायरकर यांच्यासह महाराष्ट्र सदनातील व महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी -कर्मचारी  उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
            सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून तर इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणून पाळण्यात येते. यावेळी गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त  शामलाल गोयल यांनी उपस्थित अधिकारी - कर्मचा-यांना  राष्ट्राची एकात्मकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्याची शपथ दिली.
            या कार्यक्रमानंतर, दक्षता जनजागृती सप्ताह’ निमित्त नवीन महाराष्ट्र सदनाच्या प्रेस कॉन्फरन्स हॉल मध्ये ईमानदारी-एक जीवनशैली’  या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र सदन व परिचय केंद्राच्या बहुसंख्य कर्मचा-यांनी सहभाग नोंदविला.

महाराष्ट्र परिचय केंद्रात सरदार पटेल व इंदिरा गांधी  यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात  सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन  साजरा करण्यात आला. महाराष्ट्र परिचय केंद्राचे जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा यांनी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित कर्मचा-यांनी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा यांनी यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांना राष्ट्रीय एकता दिनाची शपथ दिली.      

Wednesday 30 October 2019

महाराष्ट्र सदन आणि परिचय केंद्रात ‘भ्रष्टाचार निर्मुलना’ची शपथ









                                                                      
नवी दिल्ली, 30 :  महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेण्यात आली.
            दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधी दरम्यान करण्यात आले असून यातंर्गत भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेऊन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना सत्यनिष्ठा राखण्याची प्रतिज्ञा दिली. यावेळी सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, विजय कायरकर यांच्यासह अन्य अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र परिचय केंद्रात भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ

महाराष्ट्र परिचय केंद्रातही भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेण्यात आली. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा यांनी उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना सत्यनिष्ठा राखण्याची प्रतिज्ञा दिली. यावेळी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Wednesday 23 October 2019

महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचा ‘ई-पंचायत राष्ट्रीय पुरस्कार’







            राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना एकूण 18 पुरस्कार
                   
नवी दिल्ली दि. 23 : पंचायतराज श्रेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास व पंचायतराज विभागाला केंद्रीय पंचायतीराज मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते पहिल्या क्रमांकाच्या ‘ई-पंचायत राष्ट्रीय पुरस्काराने’ आज  गौरविण्यात आले.

            अहमदनगर जिल्हयातील लोणी (बु) ग्रामपंचायतीला ‘नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्काराने’ तर राज्यातील एक जिल्हा परिषद, दोन पंचायतसमीत्या आणि 14 ग्रामपंचायतींना ‘दिनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्काराने’  सन्मानित करण्यात आले.    

केंद्रीय पंचायतीराज मंत्रालयाच्यावतीने येथील पुसा परिसरातील सी सुब्रमन्यम सभागृहात आयोजित कार्यक्रमात  ‘राष्ट्रीय पंचायत पुरस्कार-2019’ चे वितरण करण्यात आले. यावेळी छत्तीसगड, कर्नाटक, आसाम आणि तामीळनाडू राज्यांचे पंचायतराज मंत्री तसेच केंद्रीय पंचायतीराज मंत्रालयाचे सचिव अमरजित सिन्हा, अपर सचिव संजयसिंह मंचावर उपस्थित होते.

             या कार्यक्रमात पंचायतराज श्रेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी एकूण 5 श्रेणींमध्ये देशातील विविध राज्य, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना एकूण 246 पुरस्कार वितरीत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राला तीन श्रेणींमध्ये  एकूण 19  पुरस्कार प्रदान करण्यात आले.

             पंचायतराज श्रेत्रात केंद्र व राज्य शासनाच्या विविध इलेक्ट्रॉनिक्स सेवांची प्रभावी अंमलबजावणी  केल्याबद्दल महाराष्ट्राच्या ग्रामीण विकास व पंचायतराज विभागाला देशातील पहिल्या क्रमांकाच्या ‘ई-पंचायत राष्ट्रीय पुरस्काराने’ गौरविण्यात आले. राज्याच्या ग्रामीण विकास व पंचायतराज विभागाचे प्रधानसचिव असिमकुमार गुप्ता यांच्यासह वरिष्ठ अधिका-यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
           
            ग्राम सभांच्या माध्यमातून गावांचा सामाजिक व आर्थिक विकास केल्याबद्दल अहमदनगर जिल्हयातील राहता तालुक्याच्या लोणी (बु.) ग्रामपंचायतीला सन्मानित करण्यात आले. सरपंच लक्ष्मण बनसोडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

            स्वच्छता,नैसर्गिक स्त्रोतांचे व्यवस्थापन, ई-प्रशासन यांच्यासह नागरीकांना उत्तमरित्या शासनाच्या सेवा पुरविल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा परिषद, अहमदनगर जिल्हयातील राहता पंचायत समिती आणि बुलढाणा  जिल्हयातील खामगाव पंचायत समितीला ‘दिनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
    
  राज्यातील  14 ग्रामपंचायतींना ‘दिनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यात सांगली जिल्हयातील पलुस तालुक्याच्या अंकलखोप ग्रामपंचायत, गोंदिया जिल्हयाच्या अर्जुनीमोरगाव तालुक्यातील सिरेगांव, नागपूर जिल्हयातील मौदा तालुक्याच्या चिरव्हा ग्रामपंचायत याच जिल्हयातील कामठी तालुक्याच्या कढोली ग्रामपंचायत, अहमदनगर जिल्हयाच्या राहता तालुक्यातील चंद्रपूर ग्रामपंचायत, गडचिरोली जिल्हयातील मुलचेरा तालुक्याच्या सुदंरनगर, रत्नागिरी जिल्हयाच्या राजापूर तालुक्यातील धौलवेली,  अहमदनगर जिल्हयातील राहुरी तालुक्याच्या खदांबे (खु.), भंडारा जिल्हयाच्या मोहाडी तालुक्यातील पालडोंगरी, सातारा जिल्हयातील कराड तालुक्याच्या बनवाडी, अमरावती जिल्हयाच्या अमरावती तालुक्यातील पुसदा, सांगली जिल्हयाच्या सिरला तालुक्यातील कंसगली, बुलढाणा जिल्हयाच्या शेगाव तालुक्यातील मोरगाव डिग्रस आणि चंद्रपूर जिल्हयातील सावली तालुक्याच्या वियाहद (खु)  या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
                         
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic 
         000000
रितेश भुयार /वृत विशेष क्र.238/ दि.23.10.2019




संचालक गणेश रामदासी यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट








नवी दिल्ली दि. 23 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या औरगांबाद विभागाचे संचालक गणेश रामदासी यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला सदिच्छा भेट दिली.

                महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी श्री रामदासी यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. श्री रामदासी यांची पदोन्नती होवून त्यांनी नुकताच औरगांबाद विभागाच्या संचालकपदाचा पदभार स्वीकारला आहे. संचालक पद स्विकारल्यानंतर त्यांनी प्रथमच महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली आहे. श्री. रामदासी यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक म्हणून 11 वर्षां पर्यंत यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली आहे.

              महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने जनसंपर्कासाठी प्रभावीपणे वापरण्यात येणा-या सोशल मीडियाबाबत श्री. रामदासी यांनी यावेळी कौतुक केले व समाधान व्यक्त केले.

 
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

000000

रितेश भुयार /वृत विशेष क्र.237 / दि.23.10.2019

Monday 21 October 2019

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 60.5 टक्के मतदान


             सातारा लोकसभा पोट निवडणुकीसाठी 60.25 टक्के मतदान
नवी दिल्ली दि. 21 :  राज्यात विधानसभेच्या 288 जागांसाठी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 60.5 टक्के मतदान झाले असून सातारा लोकसभा पोट निवडणुकीसाठी 60.25 टक्के मतदान झाल्याची माहिती भारत निवडणूक आयोगाचे निवडणूक उपायुक्त चंद्रभूषण कुमार यांनी आज येथे दिली.

            महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यात आज पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांसह विविध राज्यांतील विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकांविषयी माहिती देण्यासाठी भारत निवडणूक आयोगात आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रभूषण कुमार यांनी ही माहिती दिली. आयोगाचे वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा, डॉ. संदीप सक्सेना आदि यावेळी उपस्थित होते.
           
महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर चांगले मतदान झाले असून 6 वाजेपर्यंत प्राप्त माहिती नुसार 60.5 टक्के झाल्याची माहिती आहे मात्र अजून मतदान केंद्रावर मतदानाच्या रांगा आहेत व त्यानंतर अंतिम मतदानाचा आकडा  स्पष्ट होईल असेही चंद्रभूषण यांनी यावेळी सांगितले. राज्यात 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 63.08 टक्के मतदान झाले होते. यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत 60.79 टक्के मतदान झाले होते असे सांगून आजच राज्यात पार पडलेल्या सातारा लोकसभा पोट निवडणुकीसाठी 6 वाजेपर्यंत प्राप्त माहिती नुसार  60.25 टक्के मतदान झाल्याचे त्यांनी सांगितले.
                             24 ऑक्टोबरला 288 ठिकाणी होणार मतगनना
राज्यात 24 ऑक्टोबर रोजी 288 मतमोजणी केंद्रांवर मतगनना पार पडणार असून प्रत्येक केंद्रासाठी एक असे एकूण 288 मतगनना निरीक्षकांच्या  देखरेखीत ही प्रक्रिया पार पडणार असल्याचे चंद्रभूषण कुमार यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात निवडणूक कालावधित 41 हजार 910 अजामीनपत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून 2 हजार 762 मतदान केंद्र संवेदनशील मतदान केंद्र म्हणून घोषित करण्यात आले होते असे ही त्यांनी सांगितले. राज्यात 49 हजार 284 इमारतींमध्ये 96 हजार 661 मतदान केंद्र स्थापन करण्यात आली होती यातील   352 मतदान केंद्र ही पूर्णपणे महिलांद्वारे संचलीत करण्यात आली.

                                                   राज्यात पेडन्युजची 32 प्रकरणे
        निवडणूक कालावधीत महाराष्ट्रात पेडन्युजचे एकूण 32 प्रकरण नोंद झाल्याचे भारत निवडणूक आयोगाचे माध्यम महासंचालक धिरेंद्र ओझा यांनी सांगितले. हरियाणात 33 महाराष्ट्रात 32 आणि राजस्थान मध्ये 1 अशा पेड न्युजच्या एकूण 66 प्रकरणांची नोंद झाल्याचे ओझा यावेळी म्हणाले.

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic 
         000000
रितेश भुयार /वृत विशेष क्र.235 / दि.21.10.2019

Friday 18 October 2019

" बार्टी " च्या व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचा दिल्ली येथे शुभारंभ




                                                  

नवी दिल्ली दि.18 : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून प्रेरणा घेऊन समाजाचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न भावी सनदी अधिकाऱ्यांनी करावा आणि सामाजिक परिवर्तन करावे  असे आवाहन श्री.दादा इधाते यांनी केले. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आणि ईग्नायटेड माईंडस, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि.18 व 19 ऑक्टोंबर 2019 रोजी "दोन दिवसीय व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा" युपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी दिल्ली टेक्नॉलॉजीकल युनिर्व्हसिटी, रोहिणी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी दादा इधाते बोलत होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर ऑडिटोरियम मध्ये पार पडलेल्या उद्घाटन समारंभास श्री.दादा इधाते, श्री.कैलाश कणसे, महासंचालक, बार्टी, श्री.दिनेश दासा, अध्यक्ष, गुजरात लोकसेवा आयोग, श्री.योगेश सिंह, कुलगुरू, दिल्ली टेक्नॉलॉजीकल युनिर्व्हसिटी, डॉ.दयानंद सोनसळे, श्री.विनय पत्राळे, अध्यक्ष, ईग्नायटेड माईंडस, पुणे, श्रीमती प्रणाली दहिवाळ, प्रकल्प संचालक, यूपीएससी प्रशिक्षण विभाग, बार्टी, पुणे, श्री.शशांक खांडेकर, ईग्नायटेड माईंडस, पुणे आदी उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.
दिल्ली टेक्नॉलॉजीकल युनिर्व्हसिटीचे कुलगुरू श्री. योगेश सिंह, यांनी युपीएससीच्या विद्यार्थ्यांनी "सनदी अधिकारी झाल्यावर पदाने मोठे व्हाल पण मनाने पण मोठे व्हा ", असा सल्ला दिला. आपल्या मोठेपणातून आई-वडिलांसाठी, समाजासाठी काही केले तर तुम्ही खऱ्या अर्थाने मोठे व्हाल, असे सांगून या विद्यार्थ्यांना उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या.
बार्टीचे महासंचालक श्री.कैलास कणसे यांनी बार्टीच्या विविध योजनांचा परिचय उपस्थितांना करून दिला. युपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आयएएस, आयपीएस अशा पदांसोबतच विविध राज्य सरकारी स्पर्धा परिक्षांकडेही लक्ष द्यावे, असे मार्गदर्शन केले. बार्टीच्या माध्यमातून अनुसूचित जातीतील ज्या उपजातीमधील उमेदवारांना आज पर्यंत युपीएससी, एमपीएसी प्रशिक्षणाचा लाभ मिळाला नाही, अशा सर्व उमेदवारांसाठी बार्टीमार्फत विशेष प्रयत्न करून त्यांना प्रशिक्षणाच्या संधी उपलबध करून दिल्या आहेत, असे सांगितले. या व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेतून विद्यार्थ्यांनी उत्तम व्यक्तिमत्व घडवून यशस्वी सनदी अधिकारी व्हावे, असे सांगितले.     
ईग्नायटेड माईंडस, पुणे चे अध्यक्ष श्री.विनय पत्राळे यांनी या कार्यशाळेची भूमिका विषद केली आणि याचा जास्तीत जास्त लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे सांगितले. गुजरात लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री.दिनेश दासा यांनी एकाच वेळी मुलाखत, मुख्यपरीक्षा आणि पूर्व परीक्षा यांचा बहुआयामी अभ्यास कमी वेळेत कसा पूर्ण करावा? याबाबत बहुमोल मार्गदर्शन केले. प्रशासकीय अधिकारी म्हणून निवड करतांना उमेदवारांमधील कोणत्या गुणांचा कस लागतो? याच्या अनुभवपूर्ण मार्गदर्शनामुहे उपस्थित विद्यार्थी भारावून गेले.
मान्यवरांचे आभार प्रदर्शन प्रकल्प संचालक श्रीमती प्रणाली दहीवाळ यांनी केले. याच वेळी बार्टीचा प्रत्येक विद्यार्थी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, न्याय, बंधुता या तत्वांचा वैश्विक प्रसारासाठी कार्यरत असेल अशी ग्वाही त्यांनी मान्यवरांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.शशांक खांडेकर यांनी केले.

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा    http://twitter.com/MahaGovtMic 
दयानंद कांबळे/वृत विशेष क्र.235  दि.18.10.2019


Tuesday 15 October 2019

भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती राजधानीत साजरी


















नवी दिल्ली दि. 15 :  माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.

            कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, विजय कायरकर,अजितसिंह नेगी,महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही  यावेळी  प्रतिमेस  पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. 

           महाराष्ट्र परिचय केंद्रात डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना अभिवादन
 महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यालयात उपस्थित अधिकारी- कर्मचारी व अभ्यागतांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic 
         000000
रितेश भुयार /वृत विशेष क्र.234 / दि.15.10.2019









Monday 14 October 2019

महाराष्ट्रातील सर्व टोल प्लाझावर आता ‘फास्टॅग’













                         पारदर्शीता व कामाला येणार गती

नवी दिल्ली दि. १४ : राज्यशासनाच्यावतीने सुरु असलेल्या सर्व टोल प्लाझावर आता ‘फास्टॅग’ यंत्रणा कार्यान्वीत होणार असून यामुळे टोल वसुलीच्या कामाला पारदर्शीता व गती मिळणार आहे. ‘फास्टॅग’संदर्भात  आज राज्याच्यावतीने सामंजस्य कराराचे अनौपचारीक हस्तांतरण झाले.

            केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्यावतीने देशभरात कार्यरत टोल प्लाझांवर ‘फास्टॅग यंत्रणा’ कार्यान्वीत असून मंत्रालयाच्या आवाहनाला साद देत देशातील काही राज्यांनी ही यंत्रणा राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रानेही फास्टॅग यंत्रणा राबविण्याबाबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या भारतीय रस्ते वाहतूक व्यवस्थापन कंपनी (आयएचएमसीएल) सोबत दोन महिन्यांपूर्वीच सामंजस्य करार केला आहे.

डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे आज आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे आणि आयएचएमसीएलचे वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये अनौपचारीक रित्या सामंजस्य कराराचे हस्तांतरण झाले.
              
                             डिसेंबर अखेर राज्यात फास्टॅग यंत्रणेबाबतची तयारी होणार पूर्ण
        केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने राज्याला यावर्षी डिसेंबर महिन्या अखेर फास्टॅग यंत्रणेबाबतची तयारी पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून नियत वेळेत हे काम पूर्ण करू असा विश्वास श्री. वाघमारे यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील केंद्रशासनाच्या टोल प्लाझावर फास्टॅग यंत्रणा कार्यान्वीत झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने सुरु असलेल्या राज्यातील एकूण 73 टोल प्लाझावर ही फास्टॅग यंत्रणा कार्यान्वीत करण्यात येणार असल्याचेही श्री. वाघमारे यांनी सांगितले.

                                                 असे फायदे आहेत फास्टॅग यंत्रणेचे

        फास्टॅग यंत्रणेमुळे वाहतुकदार, टोल प्लाझा चालक आणि सरकारला फायदा होणार आहे. फास्टॅग यंत्रणेचा वापर कर्त्या  वाहतुकदाराला प्रती व्यवहारावर 2.5 टक्के सुट मिळणार आहे. तसेच, या प्लाझावर विना थांबा वाहतूक असल्याने वाहतुकदारांच्या वेळेची बचत होणार, ईपेमेंट मुळे रोख रक्कम बाळगण्याची गरज भासणार नाही, या व्यवहाराची पावती थेट मेलवरच मिळणार असल्याने तसा लेखाजोखाही ठेवता येणार आहे.

            फास्टॅगमुळे टोल प्लाझा चालकांना प्लाझा चालविण्यासाठी येणा-या खर्चात बचत होणार आहे. स्वयंचलीत एकीकृत संगणकीय व्यवस्थेमुळे प्लाझा चालकांना लेखे-जोखे अद्ययावत ठेवता येणार आहे. तसेच, कमीत- कमी यंत्रणा राबवून प्रभावी सुविधा पुरविता येणार आहे.

            केंद्र व राज्य शासनाला फास्टॅगमुळे इंधन बचत करणे ,कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण घटविणे शक्य होईल. तसेच  टोल प्लाझा व्यवस्थेमध्ये पारदर्शीता ठेवता येणार आहे  व या यंत्रेणस गतीही देता येईल.   

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic 
         000000
रितेश भुयार /वृत विशेष क्र.233 / दि.14.10.2019


Saturday 12 October 2019

महाराष्ट्र सदनात महर्षि वाल्मिकी यांची जयंती साजरी











नवी दिल्ली दि. १३ : महर्षि वाल्मिकी यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली.

  
            कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त विजय कायरकर, अजितसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी  यावेळी उपस्थित होते . उपस्थित अधिकारी –कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic 
         000000
रितेश भुयार /वृत विशेष क्र.232 / दि.13.10.2019





सरस आजिवीका मेळाव्यात महाराष्ट्राच्या हस्तकला व व्यंजनांची रेलचेल














              जावळी घोंगडी, काळा तांदूळ आणि पुरणाचे मांडे खास आकर्षण

नवी दिल्ली दि. १२ : सरस आजिवीका मेळाव्यात महाराष्ट्रातील महिला बचत गटांच्या स्टॉल्सवरील हस्तकलेच्या वस्तू आणि खास महाराष्ट्रीय व्यंजनांची मोठी रेलचेल दिसून येत आहे. वैशिष्टयपूर्ण जावळी घोंगडी, काळा तांदूळ आणि पुरणाचे मांडे येथे भेट देणा-यांचे खास आकर्षण ठरले आहे.

             केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या ‘दिनदयाल उपध्याय अंत्योद-राष्ट्रीय आजिवीका योजनेंतर्गत’ येथील इंडिया गेट वरील राजपथ लॉनवर 10 ते 23 ऑक्टोबर 2019 दरम्यान सरस आजिवीका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या हस्ते या मेळाव्याचे आज उद्घाटन झाले. विभागाचे सचिव अमरजित सिन्हा आणि अतिरीक्त सचिव उपमा चौधरी यावेळी मंचावर उपस्थित होत्या. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियानाच्या (उमेद) मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला आणि दिल्ली स्थित महाराष्ट्र सदनाचे गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल यावेळी उपस्थित होते.

 या मेळाव्यात देशातील 29 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांतील एकूण 500 महिला बचत गट सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या ‘राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियानाअंतर्गत’ (उमेद) कार्यरत राज्यातील 10 महिला बचत गटांनी या मेळाव्यात  सहभाग घेतला आहे.

                                                   जावळी घोंगडीने घातली भुरळ      
        या मेळाव्यातील हॉल क्रमांक 2 मध्ये महाराष्ट्राच्या हस्तकला व खाद्यपदार्थांची स्टॉल्स आहेत. यात पुणे जिल्हयातील इंदापूर येथील हिरकणी बचत गटाने उभारलेला विविध घोंगडयांचा स्टॉल्स येथे भेट देणा-यांचे आकर्षण ठरला आहे. या स्टॉल वरील जावळी घोंगडी ही पाठ दुखी, मनक्यांचे दुखने यात फायदेशीर असून रक्ताभिसरणासाठीही ही उत्तम मानली जाते. मेंढीच्या लोकरीपासून निर्मित चार प्रकारच्या घोंगडया याठिकाणी विक्रीसाठी  ठेवण्यात आल्या  आहेत.
            
चंद्रपूर जिल्हयातील नागभिड तालुक्याच्या चिंधीचक गावचा वैष्णवी बचतगटावरील काळा तांदूळ येथील खास आकर्षण आहे. ॲसिडीटी, मधुमेह आणि हृदय विकार या आजारासाठी काळा तांदूळ उपयुक्त असल्याने याची मागणी मोठया प्रमाणात दिसून येते. ब्राऊन तांदूळ, सुंगधी मोहरा आणि चकोरा तांदूळही या स्टॉलवर विक्रीस ठेवण्यात आला आहे.

            या हॉलमध्ये नंदुरबार येथील दशमा बचतगट, वर्धा येथील उद्योगिनी बचतगट आणि सातारा जिल्हयातील वाई येथील संस्कृती बचत गटांनी वैविद्यपूर्ण मसाले, पापड आणि डाळींपासून निर्मित खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले आहेत.  
                                    पुरणाचे मांडे ठरले खवय्यांचे आकर्षण
         
या मेळाव्यातील फुड कोर्टमध्ये खवय्यांसाठी महाराष्ट्रीय लज्जतदार व्यंजनांची खास मेजवाणीच आहे. येथे रत्नागिरी येथील जिजामाता बचतगट आणि नाशिक जिल्हयातील निफाड येथील माऊली बचतगट यांचा  खास महाराष्ट्रीय व्यंजनांचा स्टॉल असून येथील पुरणाचे मांडे खवय्यांचे आकर्षण ठरले आहे. यासोबतच पुरण पोळी, वडापाव, थालीपीठ, भेळ, सोलकडी, पोहे, उकडीचे मोदक, प्रॉन मसाला, चिकन पकोडा, फिश फ्राय आदी जिन्नस याठिकाणी  खवय्यांसाठी उपलब्ध आहेत.
             
 या मेळाव्यातील हॉल क्रमांक एक मध्ये महाराष्ट्रातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या विविध कला कुसरीच्या वस्तुंचे स्टॉल्स आहेत. यात  गडचिरोली जिल्हयातील धानोरा तालुक्याच्या मोहली गावचा शारदा बचतगट, भंडारा जिल्हयातील मोहाडी तालुक्याच्या आंधळगाव येथील यशस्वी बचतगट,धुळे जिल्हयातील फागणे गावचा राधाकृष्ण बचतगट, औरंगाबाद जिल्हयातील पैठण तालुक्याच्या म्हारोंलागावचा रेणुका बचतगट, नाशिक जिल्हयातील येवला तालुक्याच्या नेऊरगाव येथील श्रीगणेश बचतगटाचा स्टॉलही येथे मांडण्यात आला आहे.

            दरम्यान, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाचे सचिव अमरजित सिन्हा आणि अतिरीक्त सचिव उपमा चौधरी तसेच दिल्ली स्थित महाराष्ट्र सदनाचे गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल यांनी या मेळाव्यातील महाराष्ट्राच्या महिला बचत गटांच्या स्टॉल्सला भेट दिली.  

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic 
         000000
रितेश भुयार /वृत विशेष क्र.231 / दि.11.10.2019