Tuesday 27 February 2024

शिवचरित्राने मराठी माणसाला इतिहासाचा “कणा” दिला --कवी, जीवन तळेगावकर महाराष्ट्र परिचय केंद्रात मराठी भाषा गौरव दिन साजरा

 








नवी दिल्ली, 27: झुकणारी ना मान दिली, ना लवणारा कणा दिला..... मराठमोळ्या मनामनाला आकाशाचा मान दिला... कवी जीवन तळेगावकर यांच्या या गौरवास्पद कवितेने तसेच त्यांच्या स्वरचित  कवितांनी, मराठी भाषा गौरव दिन आज साजरा करण्यात आला. 

प्रख्यात कवी, नाटककार, कादंबरीकार, ज्ञानपीठ पुरस्कार मानकरी, वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त शासनाद्वारे साजरा करण्यात येणारा मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने कार्यालयात एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रसिध्द कवी व लेखक श्री जीवव तळेगावकर हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. उपसंचालक (मा.) श्रीमती अमरज्योत कौर अरोरा यांनी श्री तळेगावकर यांचे रोपटे देऊन स्वागत केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला श्री  तळेगावकर व उपसंचालक (मा.) श्रीमती अरोरा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 वा राज्यभिषेक वर्ष असल्याने त्यांच्या प्रतिमेला पुष्पअर्पण करून नम्र अभिवादन केले. तद्नंतर वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेला पुष्पअर्पण करून अभिवादन केले. कार्यालयात उपस्थित सर्व कर्मचा-यांनीही यावेळी पुष्पअर्पण करून अभिवादन केले.

या कार्यक्रमात श्री तळेगावकर यांनी त्यांच्या स्वरचित कवितांचे सादरीकरण केले. छत्रपती शिवाजी महाराजांवर तसेच  रोखठोक या स्वरचित कवितांचे प्रस्तुतीकरण केले. यासोबतच त्यांनी आपले  कांही अनुभवही कथन केले. कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्याच नावाने असलेला कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिकचा साहित्यभूषण पुरस्कार श्री तळेगावकर यांना प्राप्त झाल्याचे तसेच नाशिक येथे त्यांच्या तरूण  वयात  वि.वा. शिरवाडकरांसोबत भेटीचे योग प्राप्त झाल्याचे, श्री तळेगावकर यांनी आपल्या समृध्द आणि संस्मरणीय अनुभवाची भावना व्यक्त केली.  आपल्या बोली भाषेचा न्यूनगंड न बाळगता त्या-त्या भाषेतून व्यक्त होण्याची आवश्यकता, तसेच  विविध राज्यांतील भाषांचे आदान-प्रदान व्हावे, ज्‍याने भाषा समृद्ध होतील असेही ते म्हणाले. उपसंचालक श्रीमती अरोरा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व आभार प्रदर्शन केले.    

                ******************

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.39 / दिनांक 27.02.2024


Monday 26 February 2024

भारतातील वस्त्रोद्योगाचे भविष्य उद्धृत करणाऱ्या भारत टेक्स 2024 जागतिक वस्त्रोद्योग महोत्सवाचे थाटात आयोजन





नवी दिल्‍ली, 26: भारत टेक्स 2024 या जगातील आतापर्यंतच्या सर्वात भव्य अशा वस्त्रोद्योग महोत्सवाची उद्घाटन, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. हे महोत्सव देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या जागतिक वस्त्रोद्योग महोत्सवांपैकी एक असून, यात महाराष्ट्र राज्य सहभागी झाला आहे.

राजधानीतस्थित प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे आज पासून सुरू झालेल्या या चार दिवसीय महोत्सवाचे आयोजन, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय कडून करण्यात आले आहे. या प्रदर्शनीमध्ये सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सहभागी झाले आहेत.

महोत्सवात सहभागी, महाराष्ट्राच्या दालनाचे उद्घाटन वस्त्रोद्योग विभागाचे सचिव, विरेंद्र सिंग यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यातील खादी व ग्रामोद्योग बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीमती आर. विमला, महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी, अजय भंडारी व महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक, श्रीमती फरोग मुकादम उपस्थित होते.

महाराष्ट्र दालनात एकूण 28 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यामध्ये वीरमाता जीजाबाई टेक्‍नोलॉजी इन्स्टिटयूट, इन्स्टिटयूट  ऑफ केमिकल टेक्‍नोलॉजी, खादी ग्रामउद्योग मंडळ, डिकेटिई सोसायटीचे टेक्सटाईल इंजिनिअरिंग इन्स्टिटयूट, महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र पर्यंटन विकास महामंडळ या दालनांचा समावेश आहे.  यात राज्याची पारंपारिक पैठणी, खण, हिमरू, घोंगडी, सोलापूर चादर, पुणेरी पगडी,  टस्सर रेशीम, मलबेरी रेशीम, हातमाग साड्या, टोप्या, टेरी टॉवेल, कोल्हापूरी चप्पल, पैठणीच्या बॅग यासह माविम कडूनही स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. आयोजकांनी हा महोत्सव लक्षवेधक आणि अभ्यागतांसाठी आकर्षक ठरेल, अशी सजावट केली आहे.

भारताचे जागतिक सामर्थ्य, त्याचे शाश्वत उपक्रम तसेच मूल्य साखळीतील सामर्थ्य अधोरेखित करण्यासाठी एक माध्यम म्हणून या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे.  यामध्ये सुमारे 40 देशांमधले प्रदर्शक आणि ग्राहक सहभाग नोंदवले आहे. भारत टेक्स 2024 संपूर्ण वस्त्रोद्योग क्षेत्रातील मूल्य साखळीचे व्यापक दर्शन घडवेल, भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि वस्त्रोद्योग परंपरांपासून ते अगदी अलीकडील तांत्रिक नवनिर्मितीचे प्रतिबिंब या महोत्सवातून दिसून आला. यामध्ये 40 देशांतील 1,000 हून अधिक प्रदर्शक आणि 30,000 पेक्षा अधिक कारीगीर व उद्योजक सहभागी झाले आहेत.

या मेगा इव्हेंटमध्ये ज्ञानाधारित सत्रे, परिसंवाद आणि संमेलने, सीईओ गोलमेज परिषद, बी टू बी  आणि जी टू जी बैठक, धोरणात्मक गुंतवणूक घोषणा, उत्पादन शुभारंभ सोहळा आणि जागतिक स्तरावर कापड उद्योगाला पुन्हा एकदा परिभाषित करणाऱ्या उपक्रमांचा समावेश असेल. चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात 65 हून अधिक ज्ञान सत्रे असतील ज्यात 100 पेक्षा जास्त जागतिक पॅनेल या क्षेत्राशी संबंधित विविध समस्यांवर चर्चा करतील. यामध्ये टिकाऊपणा आणि पूनर्वापरासाठी यावर समर्पित मंडप, एक 'इंडी हाट', भारतीय कापड वारसा, टिकाऊपणा आणि जागतिक डिझाईन्स यांसारख्या विविध थीमवर फॅशन सादरीकरणे तसेच परस्पर फॅब्रिक चाचणी झोन आणि उत्पादनांची प्रात्यक्षिके देखील असतील. यासोबतच, आंतरराष्ट्रीय भागीदारीसह 46 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात येणार असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. तर, या इव्हेंटमध्ये फायबर, फॅब्रिक आणि फॅशन फोकसच्या माध्यमातून परदेशी आणि संपूर्ण टेक्सटाइल व्हॅल्यू चेनचा समावेश असेल. आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत या पंतप्रधानांच्या व्हिजनला पुढे नेण्यासाठी हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.

******************

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.38 / दिनांक 26.02.2024

 

 

 

 

Tuesday 20 February 2024

राजधानीत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी





 













 

नवी दिल्ली,20: आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे आज साजरी  करण्यात आली.  

 

           कॉपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात अपर निवासी आयुक्त श्रीमती नीवा जैन यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त श्रीमती स्मिता शेलार, डॉ. प्रतिमा गेडाम यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

महाराष्ट्र परिचय केंद्रात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

 

महाराष्ट्र परिचय केंद्रात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राच्या उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

 

****************

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र. 34  दि.20.02.2024

Monday 19 February 2024

‘जय जय जय शिवाजी ’ च्या गजराने महाराष्ट्र सदन दुमदुमले शिवजयंती उत्साहात साजरी




नवी दिल्ली दि. 19 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळयातील ढोल-ताशांचे दिमाखदार सादरीकरण आणि जोडीला ‘जय भवानी, जय शिवाजी’ या उत्स्फुर्त घोषणांमुळे आज राजधानीतील ल्युटियन दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचा परिसर दुमदुमला.

              शिवजयंती राष्ट्रोत्सव समिती दिल्लीच्या वतीने  येथील कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आज शिवजयंती सोहळयाचे आयोजन करण्यात आले. भव्य महाराष्ट्र सदनाच्या केंद्रस्थानी  कोल्हापूर येथील छत्रपती परिवारातील युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवात सहभाग घेऊन शिवजन्माचा पाळणा केला. यानंतर पालखी पूजन करण्यात आले.  

           महाराष्ट्र सदनाच्या केंद्रस्थानी  स्थापित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळयाला छत्रपती परिवारातील सदस्य, केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार, माजी मंत्री प्रा. राम शिंदे, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्तांसह वरिष्ठ अधिका-यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तर सदनाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळयाजवळ आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त रूपिंदर सिंग, अप्पर निवासी आयुक्ती निवा जैन, सहाय्यक निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी-कर्मचा-यांनी व दिल्ली राजधानी क्षेत्र, हरियाणा, उत्तर प्रदेशातून या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 

 ढोल ताशांचे सादरीकरण ठरले आकर्षण

             ढोल ताशांच्या गजराने सदनाचे वातावरण दुमदुमले होते आणि सोबतीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेने वातारवण निणादून गेले होते.  शिवराय ढोल पथक, नाशिक येथील 30 वादकांच्या ढोल पथकात सहभागी तरुणाईंचा उत्साह व सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. या वाद्यवृदांच्या सादरीकरणाने उपस्थितांना ठेका धरायला लावला.

00000000000000

 आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र. 33  दि.19.02.2024




Friday 16 February 2024

वाचनसंस्कृतीचा महाकुंभमेळा ! मराठी पुस्तकांना जागतिक पुस्तक मेळ्यात चांगली मागणी

नवी दिल्ली, 16:देशविदेशातील साहित्य रसिकांसाठी दहा ते अठरा फेब्रुवारी या कालावधी दरम्यान साहित्य महाकुंभमेळ्याचा म्हणजेच जागतिक पुस्तक प्रदर्शनाचा आनंद लुटता येणार आहे. पुस्तकप्रेमींसाठी आकर्षणाचा विषय असणारा नवी दिल्ली येथील ‘विश्व पुस्तक मेळा’ प्रगती मैदानावर भरण्यात आले आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल बुक ट्रस्ट (NBT) द्वारे आयोजित, या वर्षीचा पुस्तक मेळा 'बहुभाषिक भारत: एक जिवंत परंपरा' या संकल्पनेवर आधारित आहे. याअतंर्गत, सौदी अरेबियाला यावर्षीच्या प्रदर्शनातील पाहुण्या देशाचा मान (गेस्ट ऑफ ऑनर) देण्यात आले असल्याचे एनबीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे यांनी माहिती दिली. सौदी अरब या देशाच्या सहभागाने, दोन राष्ट्रांमधील सांस्कृतिक देवाणघेवाण, साहित्यिक प्रवचने आणि संवादांने नक्कीच चालना मिळेल, असे ही त्यांनी सांगतिले. प्रगती मैदानावरील नवनिर्मित भारत मंडपमच्या परिसरात भरणाऱ्या या जागतिक पुस्तक प्रदर्शनात तळमजल्यावरील क्रमांक एक ते पाच या दालनांत होणाऱ्या यंदाच्या प्रदर्शनात, महाराष्ट्रासह अनेक राज्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. येथे राजभाषा हिंदीसह इंग्रजी, मराठी आणि अन्य भाषांतील पुस्तके आहेत. याठिकाणी भारतीय विचार साधना फाऊंडेशन, ज्योत्स्ना प्रकाशन, विश्वकर्मा प्रकाशन, माय मिरर प्रकाशन, ग्रंथ भवन पुणे, सरहद फाऊडेशन, पुणे बुक फेस्टिवलचा स्टॉल उभारण्यात आला आहे. या प्रकाशनाच्या दालनांमध्ये मराठीसह अन्य भाषांतील पुस्तके मांडण्यात आलेली आहेत. पुस्तकांमध्ये मराठी साहित्य, आध्यात्मिक, धार्मिक, वैचारिक आणि स्वयंविकासाची पुस्तके अधिक प्रमाणात खरेदी केली जात असल्याची माहिती प्रकाशकांनी दिली. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने (एनबीटी) होणारे यंदाचे 52 वे जागतिक पुस्तक प्रदर्शन प्रत्येक वयोगटातील ग्रंथप्रेमींसाठी वसुधैव कुटुंबकम या कल्पनेनुसार अनेक अर्थांनी खास आहे. या मेळाद्वारे बौद्धिक संवाद आणि वाचकवर्गाला चालना देण्याचा उत्तम व्यासपीठ प्राप्त झाल्याची प्रतिक्रिया ग्रंथ भवन बुक स्टॉलचे संस्थापक, हेमंत देशमुख यांनी दिली. तसेच पुण्याचे विश्वकर्मा ग्लोबल एजुकेशन सर्व्हिसेस प्राइवेट लि. चे संस्थापक, उत्तम पाटील यांनी मेळ्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्रिया दिली. यावेळी पुस्तक मेळ्यात युनायटेड किंगडम, फ्रान्स, तुर्की, इटली, रशिया, तैवान, इराण, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रिया, बांगलादेश, स्पेन, नेपाळ, श्रीलंका यासह इतर अनेक देश या पुस्तक मेळ्यात सहभागी झाले आहेत. पुस्तक महोत्सवासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्रे, साहित्यिकांच्या मुलाखती, सृजनशीलतेला वाव देणारे आणि वाव देणारे तसेच वाचन संस्कृतीचा विकास घडविणारे कार्यक्रमांचा समावेश आहे. या प्रदर्शनात किमान 40 देश- विदेशातील 1500 हून जास्त प्रकाशक सहभागी झाले असून, 22 भारतीय तसेच परदेशी भाषांमध्येही पुस्तके उपलब्ध आहेत. प्रमुख संकल्पना, बालके, जागतिक दालने व आणि लेखक कट्टा याशिवाय प्रामुख्याने व्यावसायिक बैठकांसाठी प्रथमच एक वेगळे दालन उभारण्यात आले असून, याद्वारे भारतीय रसिकांना जगभरातील उत्तमोत्तम भव्यपुस्तक प्रदर्शनासह वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी वाचक वर्गाला मिळणार आहे. या महोत्सवाची सांगता 18 फेब्रुवारी रोजी होणार आहे. ****************** आम्हाला ट्विटर वर फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.32 / दिनांक 16.02.2024

Wednesday 14 February 2024

असीम सर्जकता: महाराष्ट्रातील 6 तरूण कलाकारांकडून “अष्टकला” राजधानीत चित्रप्रदर्शन

नवी दिल्ली, 14: महाराष्ट्रातील पाच व अन्य राज्यातून तीन अशा आठ चित्रकारांनी एकत्रितपणे सादर केलेल्या त्यांच्या वैशिट्यपूर्ण चित्रकृतीचा अनोखा कलाविष्कार “अष्टकला” या शीर्षकांतर्गत दिल्ली येथील हॅबीटेट सेंटर येथे संपन्न झाले. येथील ओपन पाल्म आर्ट गॅलेरी, हॅबीटेट सेन्टरमध्ये एक समूह चित्रप्रदर्शन संपन्न झाले. आठ चित्रकारांचा त्यात सहभाग होता. त्यातील पाच मुंबईचे, दोन दिल्लीचे तर एक जबलपूरातील होते. प्रत्येक चित्रकाराची शैली भिन्न होती, त्यामुळेच या चित्रप्रदर्शनाला 'अष्टकला - आठ चित्रकारांची असीम सर्जकता' असे शीर्षक देण्यात आले होते. या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन अग्रगण्य चित्रकार सजल पात्रा आणि अजय कुमार समीर यांच्या हस्ते झाले. हे दोन्ही चित्रकार सहभागी चित्रकारांच्या अनन्यशैलीने प्रभावित झाले होते. सहभागी आठ कलाकारा मध्ये विवेक प्रभुकेळुसकर हे मुंबईस्थित चित्रकार असून त्यांची साठाच्यावर चित्र प्रदर्शने झाली आहेत. ह्या प्रदर्शनात त्यांनी जलरंग आणि ॲक्रॅलिक रंगात रंगवलेली कल्पनारम्य चित्रे मांडली होती. वास्तववादी चित्रशैलीत त्यांनी लहान मुलांच्या दृष्टिकोनातून बालगणेशाचे भावविश्व रेखाटले होते. निलांगी प्रभुकेळुसकर यांनी पंचवीसपेक्षा अधिक चित्र प्रदर्शनात भाग घेतलेला आहे. कलेचे कुठलेही शिक्षण न घेता स्वशिक्षित असलेल्या निलांगी यांनी या प्रदर्शनात अमूर्तवादाचा अविष्कार मांडला होता. उजळ तेजस्वी रंग व ठळक गणितीय आकार हा त्यांच्या चित्रशैलीचा गाभा आहे. शीतल बावकर ह्या मुंबईस्थित चित्रकर्तीने 'दृश्यकला' या विषयात पीएच.डी. केली आहे. या व्यक्तीचित्रणात पारंगत असणाऱ्या या चित्रकर्तीने 'कुपंणामागे' या कल्पनेच्या भोवतालात चितारलेली आपली चित्रे सदर चित्रप्रदर्शनात मांडली होती. उशीता जैन ह्या चित्रकर्ती प्रिंटमेकिंग या तंत्राद्वारे आपल्या संकल्पनात्मक चित्रांची मांडणी करते. या चित्रप्रदर्शनात प्रिंटमेकिंगसोबत ह्या चित्रकर्तीने स्री-पुरुष-बालक यांच्यातील समानतेवरील प्रयोगात्मक चित्रेही मांडली होती. सुनिल विणेकर हे नवतंत्रावर स्वतंत्रपणे कार्यरत असणारे एक चित्रकार आहेत. या चित्रप्रदर्शनात त्यांनी प्रतिरुप चित्रणाच्या पद्धतीने साकारलेल्या भौमितिक प्रतिकांनीयुक्त चित्रे मांडली होती. सुनिता चौहान ह्या 1995 पासून शिल्पकार म्हणून काम करतात, त्यांनी प्रामुख्याने कास्यधातूच्या माध्यमातून स्रीवादी कल्पना मांडणारी शिल्पे घडवली आहेत. या चित्रप्रदर्शनात त्यांची हीच कास्यशिल्पे पहायला मिळाली. शर्मिला शर्मा ह्या जलरंग आणि ॲक्रॅलिक या माध्यमातून बाहुल्यांची चित्रमालिका साकारणाऱ्या चित्रकर्तीच्या चित्रातील प्रत्येक बाहुली स्वतंत्र रुप घेवूनच त्यांच्या चित्रांतून वावरताना दिसते. हीच बाहुल्यांची चित्रमालिका या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. हे चित्रप्रदर्शन 10 फेब्रुवारी रोजी सुरू झाले व 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पार पडले. ****************** आम्हाला ट्विटर वर फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.30 / दिनांक 14.02.2024

Friday 2 February 2024

सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार 2023 योजना नामनिर्देशन सादर करण्याची 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदत वाढली

नवी दिल्ली, 02: देशभरातील सनदी अधिकाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट सेवेची दखल घेत अशा अधिकाऱ्यांच्या कार्याचा गौरव करून, त्यांना सन्मानित करण्यासाठी, केंद्र सरकारने सार्वजनिक प्रशासनातील पंतप्रधान उत्कृष्टता पुरस्कार योजना सुरू केली आहे. वर्ष 2023 साठी सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठीच्या पंतप्रधान पुरस्कार योजनेत सुधारणा करून, त्यात जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासात सनदी अधिकाऱ्यांनी दिलेल्या योगदानाचा, विविध श्रेणींमध्ये समावेश करण्यात आला आहे. सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी देण्यात येणारा पंतप्रधान पुरस्कार, 2023 अंतर्गत नामांकनाची तारीख 12 फेब्रुवारी पर्यंत वाढवण्यात आली आहे. नामांकनांच्या श्रेणींमध्ये -- श्रेणी-1- 12 प्राधान्य क्षेत्र कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास. या श्रेणीत 10 पुरस्कार दिले जातील. तसेच, श्रेणी 2 मध्ये केंद्रीय मंत्रालये/विभाग, राज्ये, जिल्ह्यांसाठी नवकल्पना. या अंतर्गत 6 पुरस्कार दिले जातील. अर्जदारांद्वारे डेटा अपलोड करण्याची आवश्यकता आणि विविध संस्थांकडून प्राप्त झालेल्या विनंत्या केंद्र सरकारने लक्षात घेऊन, वेब-पोर्टलवर (www.pmawards.gov.in ) नोंदणी आणि ऑनलाइन नामांकन सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार 2023 अंतर्गत सादर करण्याची अंतिम तारीख 31.01.2024 ते 12.02.2024 (1700 तास) पर्यंत वाढवण्यात आली आहे. ****************** आम्हाला ट्विटर वर फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.29 / दिनांक 02.02.2024