Wednesday 30 November 2022








महाराष्ट्रातील दोन प्रशिक्षक आणि चार खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान

 

वर्ष 2022 चे क्रीडा पुरस्कार आणि वर्ष 2021 चे तेनजिंग नोर्गे साहस पुरस्कार आज प्रदान

 

नवी दिल्ली , 30 : क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या खेळाडूंना विविध श्रेणीतील राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने  आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये  वर्ष 2022 चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आणि  वर्ष 2021 साठीचा तेनजिंग नोर्गे साहस पुरस्कार  प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील दोन प्रशिक्षक आणि चार   खेळाडूंचा यात समावेश आहे. क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना द्रोणाचार्य आजीवन पुरस्कार आणि शुभम वनमाळी यांना जल साहसासाठी वर्ष 2021 साठीचा तेनजिंग नोर्गे साहस पुरस्कार आज प्रदान करण्यात आला.

 

केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात  केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर, केंद्रीय राज्यमंत्री  निसिथ प्रमाणिक तसेच वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करून खेळाडूंना गौरविण्यात आले.

 

दरवर्षी खेळाडूंच्या चमकदार कामगिरीसाठी केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात येतात.  यावर्षी 1 खेळाडूला ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार’, 25 खेळाडूंना ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाले होते. यासह  ‘द्रोणाचार्य पुरस्कारामध्ये आ‍जीवन श्रेणीत 3 आणि नियमित द्रोणाचार्य पुरस्कारासाठी 4   खेळाडूंना तसेच क्रीडा प्रशिक्षकांना पुरस्कार जाहीर झाले होते. याशिवाय ‘ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार’ देशातील 4 खेळाडूंना जाहीर झाले होते. 3 संस्थांना ‘राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार’, आणि गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसरला  ‘मौलाना अबुल कलाम आझाद ट्राफी’ ची घोषणा करण्यात आली होती.

 

क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना द्रोणाचार्य आजीवन पुरस्कार प्रदान

 

क्रिकेट क्षेत्रात प्रशिक्षक म्हणुन उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दिनेश लाड यांना द्रोणाचार्य आजीवन पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. मागील 30  वर्षांपासून श्री लाड क्रिकेट प्रशिक्षक आहेत. मुंबईतील बोरीवलीतील श्री स्वामी विवेकानंद हायस्कूल याठिकाणी श्री लाड यांची क्रिकेट अकादमी आहे.  त्यांच्या या अकादमीतून अनेक प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू आतापर्यंत तयार झालेले आहेत.

 

त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत जवळपास 90 च्या वर रणजीपटू तयार झाले आहेत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर, सिद्धेश लाड यांच्या सह अनेक क्रिकेट खेळाडूंचे ते प्रशिक्षक आहेत.  

मुंबईच्याच सुमा शिरूर यांना पॅरा नेमबाजी क्रीडा प्रकारात प्रशिक्षक म्हणुन द्रोणाचार्य पुरस्काराने (नियमित) आज गौरविण्यात आले. अग्नी रेखा, ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर, शाहु माने, आशिष चौकसे, सुनिधी चौव्हान, किरण जाधव, प्रसिद्धी महंत, अबनव शहा, आत्मिका गुप्ता, आकृती दहीया सारख्या ख्यातनाम खेळाडूंना त्यांनी प्रशिक्षित केलेले आहे. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना आज सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्रातील 3 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार

महाराष्ट्रामधून मल्लखांब या क्रीडा प्रकारासाठी सागर ओव्हळकर, अविनाश साबळे  यांना एथलेटिक्ससाठी, तर स्वप्निल  पाटील यांना पॅरा जलतरन क्षेत्रातील आतापर्यंच्या चमकदार कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला होता.

मुंबईतील मल्लखांब चा उत्कृष्ट खेळाडू श्री ओव्हळकर यांनी लहान वयापासूनच मल्लखांब हा साहसी खेळ खेळायला सुरुवात केली. वर्ष 2019 मध्ये आयोजित जागतिक अजिंक्य पद  (चॅम्पियनशिप)  स्पर्धेत पोल मल्लखांब लॉन्ग सेट स्पर्धा, स्मॉल सेट स्पर्धा आणि रोप मल्लखांब लॉन्ग सेट या तीन्ही प्रकारात श्री ओव्हळकर यांनी सुवर्ण पदक पटकाविले आहे. तसेच 2019 मध्येच  जागतिक अजिंक्य पद (चॅम्पियनशिप) स्पर्धेतील एकल प्रकारात रौप्य पदक पटकाविले आहे. विविध कसरती करण्यात श्री ओव्हळकर  अतिशय कुशल आहे.  विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्रासह देशाचे नाव उंचावले आहे. त्यांच्या या कर्तबगारीसाठी  अर्जुन पुरस्काराने आज गौरविण्यात आले.

 

बीडचे  एथलेटिक्स खेळाडू अविनाश साबळे यांनी राष्ट्रमंडळ क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये धाव स्पर्धेत पुरूषांच्या 1 हजार मीटरची स्टीपल चेस स्पर्धा प्रकारात आणि वर्ष 2019 मध्ये एशिया अजिंक्य पद (चॅम्पियनशिप) स्पर्धेत  3 हजार मीटरची स्टीपल चेस प्रकारात श्री साबळे यांनी रौप्य पदक पटकावले आहे. त्यांच्या क्रिडा क्षेत्रातील या उत्तुंग कामगिरीसाठी आज त्यांना  अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

कोल्हापूरचे पॅरा जलतरनपटू स्वप्निल पाटील यांनी आशियाई पॅरा क्रिडा स्पर्धा वर्ष 2018 मध्ये 100 मीटर ब्रेसस्ट्रोक एस 10 या प्रकारात रौप्य पदक, 100 मीटर फ्री स्टॉईल एस 10 स्पर्धेत कांस्य पदक आणि 400 मीटर फ्री स्टॉईल एस 10 मध्येही कांस्य पटकाविले होते त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना आज अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

साहसिक जलतरणपटू शुभम वनमाळी यांना वर्ष 2021 चा तेनजिंग नोर्गे साहस पुरस्कार

 

पालघर जिल्ह्यातील साहसिक जलतरणपटू शुभम वनमाळी यांना राष्ट्रपती यांच्या हस्ते वर्ष 2021 साठी चा तेनजिंग नॉर्गे साहस पुरस्काराने आज गौरविण्यात आले. मांडवा जेटी ते एलिफंटापर्यंतचे 21 किलो मीटर समुद्रीमार्गाचे अंतर 5 तास, 4 मिन‍िटे, 5 सेकंदात त्यांनी पूर्ण केले. यासह गेटवे ऑफ इंडिया ते डहानु बीचचे 147 किलो मीटरचे अंतर 28 तास 40 मिनिटे, तसेच राजभवन ते गेटवे ऑफ इंडिया मधील 14 किलो मीटरचे अंतर 3 तास 13 मिनिटे 10 सेकंदात पोहून पूर्ण  केलेले आहे.  श्री वनमाळी यांना महाराष्ट्र शासनाचा वर्ष 2018-19 शिव छत्रपती राज्य साहस पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

                                                          ००००


 

 


Monday 28 November 2022

भागीदार राज्याचा ‘महाराष्ट्र दालना’ला पुरस्कार

 




41 वा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा  संपन्न

 

नवी दिल्ली, 28 : भागीदार राज्याचा पुरस्कार महाराष्ट्र दालनाला प्रदान करण्यात आला. यावर्षी 41 व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयात महाराष्ट्र हे भागीदार राज्य होते.

 

येथील प्रगती मैदानात 41 व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयाची सुरूवात 14 नोव्हेंबरपासून  झाली होती. याचे समापन रविवारी 27 नोव्हेंबरला झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र दालना ला  पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गेनाइजेशन चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक प्रदीप खरोला यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.  महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक विजय कपाटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.  महाराष्ट्र दालन यावर्षी हॉल क्रमांक 2, तळमजल्यावर मांडण्यात आले होते.

 

यावर्षीच्या व्यापार मेळयाची मध्यवर्ती संकल्पना      वोकल फॉर लोकल, लोकल टू ग्लोबल होती.

 ही संकल्पना मांडताना राज्याचे  डिज‍िटल, ई-तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास,  लघुउद्योग, उत्पादन समूह केंद्र(क्लस्टर),  बचत गट, स्टॉर्टअपला चालना देणारे धोरण, यासह इतर विषयांचे  आकर्षक प्रदर्शन महाराष्ट्र दालनात दिसत होते. एकूण 45 स्टॉल्स याठ‍ीकाणी मांडण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्र शासनाचे तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाअंतर्गत येणारे निवडक विषयांवर स्टॉल्स होते.   बचत गटांचे, काराग‍िरांचे, मध्यम, लघु, सुक्ष्म उद्योगातंर्गत  येणारे उद्योग समूह (क्लस्टर) चे  आणि  स्टॉर्टअप चे स्टॉल्स या ठीकाणी होते.

            महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्यक्रम ‘महाराष्ट्र दिवस’  शनिवारी 26 नोव्हेंबरला येथील खुल्या सभागृहात  झाला. यावेळी राज्याच्या  बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.

000000


महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय ‘शिल्प’ पुरस्कार प्रदान

 








नवी दिल्ली, 28 : महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना  राष्ट्रीय शिल्प पुरस्काराने केंद्रीय वस्त्र मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले.

येथील विज्ञान भवनात केंद्रीय वस्त्र मंत्रालयाच्यावतीने वर्ष 2017, 2018, आणि 2019 साठीचे शिल्प गुरू पुरस्कार आणि राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी उपराष्ट्रपती जगदीप धनखड़, केंद्रीय वस्त्र मंत्री श्री गोयल, केंद्रीय वस्त्र सचिव रचना शहा, हस्तकला विकास आयुक्त व्यासपीठावर उपस्थित होते.  उपराष्ट्रपती यांच्या हस्ते शिल्प गुरू पुरस्कार प्रदान करण्यात आले.  राष्ट्रीय शिल्प पुरस्कार केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

शिल्प गुरू पुरस्काराचे स्वरूप सुवर्ण पदक ताम्रपत्र आणि दोन लाख रूपये रोख असे आहे. तर, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त हस्त शिल्पकारांना ताम्रपत्र आणि 1 लाख रूपये रोख असे पुरस्कारास्वरूप प्रदान करण्यात आले.

महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकार सन्मानित

कोल्हापूरचे अमर सातपुते यांना चामडयापासून कोल्हापूरी चपला हाताने  बनविण्याच्या कारीगिरीसाठी आज राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. श्री. सातपुते यांना वर्ष 2019 साठीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.  श्री. सातपुतेंचा चामडयापासून चपला बनविण्याचा वड‍िलोपार्जित  व्यवसाय आहे.

श्री अमर सातपुते हे या व्यवसायात वर्ष 2005 पासून स्वच्छेने काम करीत आहेत. वडीलांकडून त्यांनी चपला बनविण्याचे बारकावे शिकल्याचे श्री. अमर यांनी पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर सांगितले. हस्तकला विभागाकडून महाराष्ट्राबाहेर अनेक‍ ठिकाणी प्रदर्शन निमित्त स्टॉल लावण्याची संधी मिळते. यातून आणखी काही कल्पना सुचत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यवतमाळच्या रजनी शिर्के यांना भरतकाम हस्तकलेसाठी वर्ष 2019 च्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमती शिर्के यांनी 32 वर्षांपूर्वी मध्यप्रदेशातून विशेष भरतकामाचे प्रशिक्षण घेतले. सध्या त्या यवतमाळ आणि परिसरात बचत गटांतील  मुलींना- महिलांना भरतकाम शिकवित असल्याचे पुरस्कार प्राप्त केल्यानंतर सांगितले.

अभय पंड‍ित यांना कुंभार कामांसाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री पंड‍ित यांना वर्ष 2018 च्या राष्ट्रीय हस्त शिल्प पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

000000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     

अंजु निमसरकर/ वि.वृ.क्र. 184 /दि. 28-11-2022

 

 

Saturday 26 November 2022

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात ‘महाराष्ट्र दिन’ उत्साहात साजरा









नवी दिल्ली, 26 : राजधानीत सुरु असलेल्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात आज आयोजित ‘महाराष्ट्र दिन’ कार्यक्रमात गणपती वंदना, भुपाळी, जात्यावरील ओवी, भारूड, गौळण, लावणी, जोगवा, कोळीनृत्य, पोवाडा, शिवराज्यभिषेक आदि महाराष्ट्राच्या समृध्द लोककलांचे दमदार सादरीकरण झाले. राज्याच्या वैविद्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिकंली.

येथील प्रगती मैदानावर 41 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्र सदनाच्या अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र दिन’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन झाले. याप्रसंगी सहायक निवासी आयुक्त डॉ राजेश अडपावार, निलेश केदार (प्रभारी) आणि महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक विजय कपाटे उपस्थित होते.

भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळव्यात दररोज सायंकाळी ‘खुल्या सभागृहात’ व्यापार मेळाव्यात सहभागी देश व राज्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होते. या उपक्रमांतर्गत व्यापार मेळाव्याच्या 13 व्या दिवशी आज ‘महाराष्ट्र दिन’ कार्यक्रम साजरा करण्यात आला.

महाराष्ट्राच्या लोककलांचे दमदार सादरीकरण

कोल्हापूरच्या श्रिजा लोकसंस्कृती फाउंडेशन समुहाच्या कलाकारांनी ‘महाराष्ट्र लोक कला दर्शन’ कार्यक्रमाचे सादरीकरण केले. गणपती वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर भूपाळी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पहाटेचे दर्शन घडविणारे वासुदेव नृत्य तसेच पहाटे घरा-घरांमध्ये जात्यांवर दळण दळतांना गायिल्या जाणाऱ्या ओवींचे सादरीकरण झाले. शेती दिनचर्येशी संबधित नृत्य सादर करण्यात आले. मंगळागौर सणाची झलकच यावेळी रंगमंचावर पहायला मिळाली. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा भाग असलेला पोतराजचे सादरीकरण आजच्या कार्यक्रमात झाले. कोळी बांधवांचा उत्साह दर्शविणारे कोळीगीतांचे सादरीकरणही झाले. लोकगायन आणि लोकनृत्याच्या सादरीकरणाने समा बांधला. यल्लमाच वार भरल अंगात.. गाण्याने भक्तिमय वातवरणात केले. बाई माझ्याग दुधात नाही पाणी...... गवळण गायली गेली. तुझ्या उसाला लागेल कोल्हा..... ही गाजलेले लावणी गायली गेली, प्रेक्षकांनी यावर दाद दिली. नव्या-जुन्या गाण्यावर मनमोहक मराठमोळी लावणी सादर करण्यात आली. शेवटी पोवाडा आणि शिवराज्यभिषेक सादर करण्यात आला.

लावणी ,गौळण, शेतकरी नृत्य, कोकणी नृत्य, धनगर नृत्य, जोगवा या लोककलांच्या सादरीकरणाने येथे उपस्थित देश-विदेशातील रसिक प्रेक्षकांची दाद मिळविली. विविध लोककला व लोकनृत्यांच्या आविष्काराने सजलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या समृध्द लोक संस्कृतीचे प्रति‍बिंबच उभे राहिले आणि यास उपस्थितांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला.

00000

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :

 

Friday 25 November 2022

राजधानीत ‘संविधान दिन’ साजरा





नवी दिल्ली, 26 : महाराष्ट्र सदन येथे आज ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात ‘राज्य घटनेच्या उद्देशिकेचे’ सामुहिकपणे वाचन करण्यात आले. यावेळी सचिव तथा महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त डॉ. निधी पांडे, सहायक निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावर, निलेश केदारे, सहायक निवासी आयुक्त (अ.का.) यांच्यासह महाराष्ट्र सदन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

*******

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
वृत्त वि. क्र. 181/दि.26.11.2022

 

महाराष्ट्रातील 3 हजार कोटी रूपयांच्या अतिरिक्त प्रकल्पांच्या प्रस्तावास मंजुरी मिळावी : उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस

 




केंद्रीय अर्थसंकल्प : 2023-24 च्या पूर्व बैठकीत विविध महत्वपूर्ण मागण्या

नवी दिल्ली दि. 25, : भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य वर्ष 2021-22 च्या 15 हजार कोटींहून आर्थिक वर्ष 2022-23 साठी 1 लाख कोटी रुपये इतके वाढवून मिळालेले आहे. महाराष्ट्र शासनाने सुमारे 3000 कोटी रुपयांचा अतिरिक्त प्रकल्पांसाठीचा प्रस्ताव सादर केलेला आहे, यास मंजुरी प्रदान करण्यात यावी. यामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला गती मिळेल, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.

येथील मानेकशॉ सेंटरमध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेत केंद्रीय अर्थसंकल्प : 2023-24 ची  पूर्व बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत श्री फडणवीस बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय राज्य अर्थ मंत्री डॉ. भागवत कराड, पंकज चौधरी यांच्यासह विविध राज्यांचे वित्तमंत्री तसेच वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री फडणवीस पुढे म्हणाले, वर्ष 2017-18 ते वर्ष 2020-21 या आर्थिक वर्षांतील वस्तु व सेवा कर (जीएसटी) ची भरपाई  महाराष्ट्राला प्राप्त झाली आहे. वर्ष 2021-22 या आर्थिक वर्षासाठी तसेच वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीसाठी हंगामी भरपाई प्राप्त मिळाली आहे. याबद्दल केंद्राचे आभार त्यांनी मानले. उर्वरित कालावधीसाठी नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांकडून (सीएजी) प्रमाणपत्राची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी बैठकीत  सांगितले.

राज्यात प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेची अतिशय चांगली सुरूवात आहे, असे सांगत लॉजिस्टिक क्षेत्रासाठी आगामी अर्थसंकल्पात आर्थिक सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी श्री फडणवीस यांनी केली. केंद्रीय भविष्य निर्वाह निधीत योगदानासाठी आर्थिक सहाय्य करता आले तर सुक्ष्म, लघु, मध्यम  (एमएसएमई) क्षेत्रात रोजगाराच्या व्यापक संधी निर्माण होतील, असे श्री फडणवीस यावेळी म्हणाले.

लोहखनिज यावरील अबकारी करात  (एक्साईज ड्युटी) केलेली वाढ मागे घेतल्याबद्दल श्री फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. यासंदर्भातील मागणी यापुर्वी त्यांनी पत्र पाठवून केलेली होती. विपुल खणिज संपदा असलेल्या कोकणासारख्या क्षेत्राच्या अर्थकारणाला त्याचा मोठा लाभ होईल. यामुळे खणिकर्म आणि संलग्न उद्योगांना चालना मिळेल,अशी माहिती श्री फडणवीस यांनी यावेळी दिली.

मोठ्या प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी बँकांकडून कर्ज उपलब्ध होत नाही यासाठी केंद्र शासनाच्या स्तरावर योजना तयार करण्यात यावी, अशी मागणी करत याचा लाभ महाराष्ट्र सह इतर राज्यांनाही होईल, असे श्री फडणवीस म्हणाले.

हवामान बदलांच्या प्रश्नावर भारताची प्रतिबद्धता अधिक दृढ करण्यासाठी नॅशनल डिटरमाईंड कॉन्ट्रिब्युशन (एनडीसी) ला मंजुरी दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानत, आगामी अर्थसंकल्पात स्वच्छ ऊर्जा  (क्लिन एनर्जी) उद्योगांसाठी करांमध्ये काही सवलती आणि प्रोत्साहनपर योजना असाव्यात, अशी विनंती श्री फडणवीस यांनी यावेळी  केली.

 गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 1444 कोटी रुपयांच्या कार्यप्रदर्शन निधी (परफॉर्मन्स ग्रांटस) आर्थिक वर्ष 2018-19 आणि वर्ष 2019-20 साठी शिफारस केलेले आहे. त्याप्रमाणे पंचायत राज मंत्रालयाने वर्ष 2017-18 ते वर्ष 2019-20 या आर्थिक वर्षांसाठी ग्रामीण स्थानिक संस्थांना 1208.72 कोटी रुपयांची शिफारस केलेली होती. 14 व्या वित्त आयोगाचा हा निधी राज्याला देण्यात यावा.

उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी केलेल्या मागण्या आणि सुचना

नवीन 8170 अंगणवाडयांना मंजुरी मिळावी

पोषण कार्यक्रमांतर्गत देण्यात येणारे दर वर्ष 2017 चे असल्याने त्यात वाढ करण्यात यावी. तसेच नवीन 8170 अंगणवाड्यांना मंजुरी देण्यात यावी. केंद्र सरकारच्या किमान आधारभूत किंमत (एमएसपी) खरेदी योजनेतील मर्यादा 25 टक्क्यांवरून 40 टक्के करण्यात यावी.

आरटीईच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 348.83 कोटींची मागणी

शिक्षणाचा अधिकार (राईट टू एज्युकेशन) कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 348.83 कोटी रुपये देण्यात यावेत. समग्र शिक्षा अभियानात पायाभूत विकासासाठी निधीची तरतूद करण्यात यावी. नवीन राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रीय खते (ऑर्गेनिक मॅन्युअर) कार्यक्रमासाठी 46 कोटी रूपये देण्यात यावेत, अशी मागणी केली. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानासाठी देण्यात येणारा निधी 4 हप्त्यांऐवजी 2 हप्त्यांमध्ये देण्यात यावा, यामुळे या योजनेची अधिक प्रभावी अंमलबजावणी शक्य होईल.

राज्यातील 6 किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 500 कोटींची मागणी

महाराष्ट्रातील 6 किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 500 कोटी रुपये देण्यात यावेत. यात रायगड, तोरणा, शिवनेरी (पुणे जिल्हा), सुधागड (रायगड), विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग (सिंधुदुर्ग जिल्हा) या किल्ल्यांचा समावेश आहे.

स्वदेश 2.0 अंतर्गत पर्यटन सुविधा निर्माण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्यात यावे. यात निवती (सिंधुदुर्ग), अंजठा (औरंगाबाद), ताडोबा (चंद्रपूर), गोसेखुर्द धरण (भंडारा), टिपेश्वर (यवतमाळ), शिवसृष्टी (पुणे) यांचा समावेश आहे.

कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि हवामान बदलाच्या समस्यांचा मुकाबला करणे यासाठी कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधीचा अधिक उपयोग करण्यात यावा. केंद्र शासनाच्या विविध मंत्रालय, विभाग आणि कार्यालये यात बांबू फर्निचर आणि इतर जंगल संबंधित उत्पादनांची खरेदी करताना 25 टक्के प्राधान्य देण्यात यावे.

कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रक्रिया, पॅकेजिंग इत्यादींचा समावेश करण्यात यावा. आदिवासी आणि जंगलांत राहणाऱ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि कौशल्यवृद्धी कार्यक्रमांची आखणी करण्यात यावी. व्याघ्र संवर्धनासाठी देण्यात येणारे योगदान 100 टक्के करमुक्त करावे. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेत तेंदूपत्ता वेचणारे,  लाकुड विहरीत (नॉन टिंबर) वनसंपदा गोळा करणाऱ्यांना विमा देण्यात यावा.

केंद्रीय रस्ते निधीत राज्याला वर्ष 2000 ते वर्ष 2022 या काळात 7316.45 कोटी रुपये प्राप्त झाले आणि राज्याने 8295.71 कोटी रूपये खर्च केले. उर्वरीत 979.26 कोटी रुपये राज्याला परत देण्यात यावे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशाला वर्ष 2028-29 पर्यंत जे 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य निर्धारित केले आहे, त्यात महाराष्ट्र आपले भरीव आणि भक्कम योगदान देईल, असे श्री फडणवीस यांनी या बैठकीत आश्वस्त केले.

Thursday 24 November 2022

स्वकष्टाने उत्पादित केलेल्या मालाला आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयात प्रचंड प्रतिसाद

 





 


नवी दिल्ली, 24 : स्वकष्टाने उत्पादित केलेल्या मालाला आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयात चांगला प्रतिसाद मिळत असल्याची महाराष्ट्र दालनातील बचत गट, लघू उद्योजक, विविध वस्तु उत्पादन समुह केंद्रांच्यावतीने लावलेल्या स्टॉल धारकांनी उत्सफूर्त प्रतिक्रिया दिली.

येथील प्रगती मैदानात 41 वा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयाची सुरूवात 14 नोव्हेंबरपासून झाली आहे. महाराष्ट्र या यावर्षी ‘भागीदार राज्य’ म्हणून आहे. महाराष्ट्र दालन हे सर्वसामवेश असे दालन दिसत आहे. 

असे आहे महाराष्ट्र दालन 

       महाराष्ट्र दालनाच्या प्रवेशव्दारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनावर बसलेला पुतळा आहे. येथे स्वागतासाठी तुतारी वादक आहेत.  विविध विभागाकडून राज्याचा होत असलेला सर्वांगीण विकास दर्शविण्यात आला आहे. दालनाच्या मधल्या भागात इलेक्ट्रीकल ऑटो, बॉईक, भारतीय नौदलाला लागणारे सुटे भाग, फिरती पृथ्वी, पैठणीत असलेली महिलेची प्रतिमा असे दालनाचे रूप आहे. दालनाच्या बाहेरच्या बाजूस इलेक्ट्रीकल चारचाकी वाहन आहे. येथे राज्याच्या उद्योग वाढीचा आलेख दिसत आहे यासोबतच बचत गट, वस्तु उत्पादन समुह अंतर्गत विविध उत्पादित वस्तुंची  दालने मांडण्यात आलेली आहेत. आधुनिक आणि  पारंपरिक अशी सरमिसळता महाराष्ट्र दालनात दिसते.

 

सांगलीची हळद, मनुके, जळगाव जिल्ह्यातील विशेषता असणा-या केळींची विविध पदार्थ, औरंगाबाद जिल्ह्याची साखळी हस्तकला, बंजारा हस्तकला,  कोल्हापूरच्या चपला, दागीने, मुंबईतून आलेल्या समूहाची लेदर बॅग आणि कापडयांची बॅगचे स्टॉल्स आहेत.

 

सांगलीच्या हळदीला, आणि जळगाव च्या केळींना भौगोलिक मानाकंन (जियो टॅग)मिळाले आहे. या ठ‍िकाणी असलेल्या या दालनांना ग्राहकांनी विशेष पसंती दिली आहे. उरमेरीक वस्तु उत्पादन समुह (कल्सटर) सांगलीवरून आलेल्या या समुहातील दालनात हळद, मनुके, कांदा लसून चटणी, तीळाची, जवस, नारळाची चिक्की आहे. या सर्व वस्तुंना ग्राहकांची प्रचंड मागणी असल्याचे योगेश कोठवाल यांनी सांगितले.

जळगाव जिल्ह्यातील यावल येथील संकल्प एन्टरप्राईजेस चे अशोक गडे यांनी केळींवर प्रक्रिया करून खाद्य पदार्थ बनविलेले आहेत. यात केळीचे बिस्कीट, चॉकलेट, लाडू आहेत. या पदार्थांचे त्यांचे स्वामित्व (पेटेंट) ही आहेत. येथे व्यापार मेळयात प्रथम आले असल्याचे त्यांनी सांगितले. येथे त्यांना अनेक व्यवसायिकांनी संपर्क साधून दरमहा मोठया प्रमाणात माल उपलब्ध करून देण्याची मागणी केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

अभिषेक बंजारा वस्तु उत्पादन समूहाचे स्टॉल याठिकाणी आहे. या स्टॉलवर बंजारा समुहात वापरत असलेली विविध जुन्या पैश्यांची दागीने, पॅच वर्क, बॅग्स आहेत. स्टॉल अतिशय सुंदर सजविलेले आहे. विशेष म्हणजे या उत्पादन समुहाकडून प्लाजो-स्कर्ट धोती सारखे बनविले आहे. ते कसे नेसतात हे ही श्री बालाजी पवार यांनी दाखविले. हा पॉल्जो-स्कर्ट मुलींना विशेष आवडत असल्याचे श्री पवार यांनी सांगितले.

शिव समर्थ महिला उद्योग क्रेंद्र, सांगलीच्या सुनंदा म्हेत्रे यांनी सांगितले, प्रथमच व्यापार मेळयात स्टॉल लावायची संधी मिळाली, याचा आनंद आहे देशाच्या राजधानीत मंच मिळवून दिल्याबद्दल शासनाला धन्यवाद दिले. लोक येतात विचारपूस करतात. ज्यांना खरी जाण आहे ते विकतही घेतात, अशी प्रतिक्रीया श्रीमती म्हेत्रे यांनी दिली. यांच्या दालनात अव्वल दर्ज्याचा काजू, मुनके, हळद, कोकम हे पदार्थ आहेत.

 

बटूआ लेदर’ या नावाने हरदिप सिंग यांचा मागील 23 वर्षांपासून लघु व्यवसाय आहे. ते या व्यापार मेळयात प्रथमच आलेत त्यांच्या या स्टॉल्सला महिला-पुरूषांची गर्दी दिसते. येथे चांगला प्रतिसाद असल्याची प्रतिक्रीया त्यांनी दिली.

ऐनीटाईम स्नॅक्स या स्टॉलमध्ये आरोग्याला लाभदायक असा ज्वार, बाजरा आणि नाचणीचा चिवडा आहे. या स्टॉल्सला आरोग्य जागरूक ग्राहकांची विशेष पसंती आहे.

गुणवत्तापुर्ण आणि दर्जेदार बॅग बनविणा-या दिप्ती क्रीयेशन्सच्या दिप्ती मागील 5 वर्षांपासून हॅन्ड बॅग बनवित आहे. ज्यांना दर्जेदार वस्तूंची आवड आहे त्या स्टॉल्सला भेट देऊन खरेदी करतात, असे श्रीमती दिप्ती यांनी सांगीतले.

सातारा, वाई वरून आलेले किरण ताबवे यांच्या चपलांचे स्टॉल आहे. यांच्या दालनालाही मुली, महिलांची विशेष पसंती आहेत. पायांना आरामदायक अशा चपलांची निर्मिती श्री ताबवे करतात. यासह ते प्रत्येकांच्या मागणीनुसार हव्या तशा चपला बनवुन देत असल्याचेही त्यांनी सांगीतले.

 

औरंगाबाद येथील रोहीदास महाराज बचत गट यांच्या स्टॉलवर साखळी टाक्याचे लोभस कुर्ती आहेत. या कुर्तींना तरूण मुलींची विशेष आवडत असल्याचे श्याम चंद्र यांनी माहिती दिली. आठ वर्षांपासून हा लघू व्यवसाय करीत असल्याचे श्री चंद्र यांनी सांगितले.

 

हातमागावरील पैठणी बनविण्याचे प्रात्यक्षिक

महाराष्ट्र लघु विकास महामंडळाच्यावतीने हातमागावरील पैठणी बनविण्याचे प्रात्यक्षिक याठ‍िकाणी मांडण्यात आले आहे. नंदिनी झुंझे आणि मीनाक्षी वावळ या प्रशिक्षित पैठणी बनविणा-या महिला हे प्रात्यक्षिक करून दाखवित आहेत. या दालनास लोक आर्वजून भेट देऊन येथे थांबून हे प्रात्यक्षिक बघत असल्याचे या दोघींनी सांगितले. पैठणी कशी विणली जाते आणि पैठणी या महावस्त्राबद्दल कुतूहलाने विचारतात.

 

 

हे प्रदर्शन दि.27 नोव्हेंबरपर्यंत आहे. शनिवारी, 26 नोव्हेंबरला सायंकाळी 5.30 वाजता कोल्हापूर येथील श्रीजा समुहातर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम येथील खुल्या सभागृहात सादर केला जाणार आहे.

000000