Friday 30 April 2021

राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी

 




 

नवी दिल्ली दि. 14 :  राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांची जयंती आज महाराष्ट्र सदन साजरी करण्यात आली. 

कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त  डॉ. राजेश आडपावार यांनी राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी तुकडीजी  महाराज  यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

             

Thursday 29 April 2021

 


महिलांनी घडविलेला महाराष्ट्र’ या विषयावर निवेदिका क्ष‍िप्रा मानकर

 यांचे व्याख्यान

नवी दिल्ली, दि. 29 : सुप्रसिद्ध निवेदिका क्षिप्रा मानकर यांचे ‘महिलांनी घडविलेला महाराष्ट्र’ या विषयावर उद्या शुक्रवार दिनांक 30 एप्रिल 2021 रोजी महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे 38 वे पुष्प गुंफणार आहेत.

महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेली 60 वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने 19 मार्च 2021 पासून महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला सुरु आहे. या व्याख्यानमालेत 30 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता क्ष‍िप्रा मानकर या ‘महिलांनी घडविलेला महाराष्ट्र’ या विषयावर विचार मांडणार आहेत.

क्षिप्रा मानकर यांच्या विषयी

मुळच्या अमरावतीच्या असणा-या क्ष‍िप्रा मानकर या  उत्कृष्ट निवेदिका,  समुपदेशक म्हणुन या प्रसिद्ध आहेत. अमरावती विद्यापीठातून बी.एस.सी., पुर्ण केले. यासह त्यांनी पत्रकारीतेत, समाजकार्य या विषयात पदवीत्तोर शिक्षणपुर्ण केले. अमरावतीतील स्थानिक आरसीएन या डिजीटल माध्यमांच्या त्या संचालक आहेत.   त्यांनी अमरावतीमधील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा स्त्री रूग्णालय, जिल्हा सामान्य रूग्णालय (असंर्गजन्य रोग नियंत्रण अभियान) समुपदेशक म्हणुन काम केलेले आहे. त्यांनी अनेक विषयांवर व्याख्याने देत असतात.

श्रीमती मानकर यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  यामध्ये अमरावती विद्यापीठाचा उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेव‍िका पुरस्कार, उत्कृष्ट एनएसएस  फर्स्ट कलर होल्डर पुरस्कार, उत्कृष्ट वक्ता पुरस्कार असे विविध पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण

शुक्रवार, दिनांक 30 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 7  वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे ‍मराठी  ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi  आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi   वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI, फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/   आणि फेसबुक मिडीया ग्रुप

 https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share 

तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhiयुटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे.    

आमच्या ट्विटर हँडलला फॉलो करा :https://twitter.com/MahaGovtMic


Saturday 24 April 2021

सातारा जिल्हा परिषदेला राष्ट्रीय दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार प्रदान




महाराष्ट्राला विविध गटांमध्ये 16 ग्रामपंचायतींना विविध पुरस्कार

नवी दिल्ली, दि. 24 : सातारा जिल्हा परिषदेने उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल या जिल्हा परिषदेला दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. याशिवाय गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) आणि राहाता (जि. अहमदनगर) या दोन पंचायत समित्यांसह राज्याच्या विविध भागातील एकूण 16 ग्रामपंचायतींना विविध गटांमध्ये आज दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमाने पुरस्कार प्रदान करण्यात आले.

            आज पंचायतराज दिनानिमित्त दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमाने पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केन्द्रीय पंचायतराज मंत्री नरेंद्रसिंग तोमर, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यांचे पंचायतराज मंत्री उपस्थित होते. राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांच्यासह राज्यातील ग्रामपंचायतीचे प्रमुख उपस्थित होते. आज झालेल्या ऑनलाइन कार्यक्रमात देशभरातील एकूण 313 पंचायतींना सन्मानित करण्यात आले.

            दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2021 (पडताळणी वर्ष 2019-20) हा राज्यातून सातारा जिल्हा परिषदेला आणि गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) व राहाता (जि. अहमदनगर) या दोन पंचायत समित्यांना ऊत्कृष्ट कार्यासाठी ऑनलाइन रोख रकम देऊन सन्मानित करण्यात आले.

            सातारा जिल्हा परिषदेला 50 लाख रुपये रोख ऑनलाइन माध्यमाने खात्यात जमा करण्यात आले. तर, गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) आणि राहाता (जि. अहमदनगर) या पंचायत समित्यांना प्रत्येकी 25 लाख रुपये रोख रकम त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली.

            यासह राज्यातील 14 ग्रामपंचायतीच्या कामाच्या गुणवत्तेनुसार या ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली. यामधे मान्याचीवाडी (ता. पाटण, जि. सातारा), चंद्रपूर (ता. राहाता. जि. अहमदनगर), लोहगाव (ता. राहाता. जि. अहमदनगर), जाखोरी (ता. जि. नाशिक), गोवरी (ता. मौदा, जि. नागपूर), नागोसली (ता. इगतपुरी, जि. नाशिक), येनीकोनी (ता. नरखेड, जि. नागपूर), मरोडा (ता. मूल, जि. चंद्रपूर), तमनाकवाडा (ता. कागल, जि. कोल्हापूर), लेहेगाव (ता. मोर्शी, जि. अमरावती), वांगी (ता. कडेगाव, जि. सांगली), देगांव (ता. वाई, जि. सातारा), अंजनवेल (ता. गुहागर, जि. रत्नागिरी) आणि पीरगयबवाडी (ता. घनसावंगी, जि. जालना) या 14 ग्रामपंचायती आहेत. या 14 ग्रामपंचायतींना लोकसंख्येप्रमाणे 5 ते 15 लाख रुपयांपर्यंतची रक्कम पुरस्कार स्वरुपात प्रदान करण्यात आली आहे.

मान्याचीवाडीला नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार

            नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार 2021 हा राज्यातून मान्याचीवाडी (ता. पाटण, जि. सातारा) या ग्रामपंचायतीने पटकावला आहे. या ग्रामपंचायतीस 10 लाख रुपये रक्कम पुरस्कार स्वरुपात प्रदान करण्यात आली आहे.

            ग्रामपंचायत विकास आराखडा पुरस्कार 2021 हा राज्यातून लोणी बुद्रुक (ता. राहाता, जि. अहमदनगर) या ग्रामपंचायतीने पटकावला आहे. या ग्रामपंचायतीस 5 लाख रुपये रक्कम पुरस्कार स्वरुपात प्रदान करण्यात आली आहे.

सिरेगावला बालसुलभ ग्रामपंचायत पुरस्कार

            राज्यातून सिरेगाव (ता. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदीया) या ग्रामपंचायतीस बालसुलभ ग्रामपंचायत पुरस्कार 2021 ने सन्मानित करण्यात आले. या ग्रामपंचायतीस 5 लाख रुपये रक्कम पुरस्कार स्वरुपात प्रदान करण्यात आलेली आहे.

आमच्या ट्विटर हँडलला फॉलो करा :https://twitter.com/MahaGovtMic

००००

Monday 19 April 2021

जगाच्या पाठीवर मराठी माणसांची चमकदार कामगिरी- खासदार संजय राऊत


 

नवी दिल्ली, १९ : प्रतिभा  व प्रतिमेच्या जोरावर जगात मराठी माणसाने व्यापार-उद्योगात नाव कमाविले आहे. तसेच, काही देशांमध्ये राजकारणातही उत्तम कामगिरी केली आहे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे, असे मत खासदार तथा दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आज व्यक्त केले.

          जगाच्या पाठीवरील मराठी या विषयावर  महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे ३१ वे  पुष्प गुंफताना श्री. राऊत बोलत होते.

       महाराष्ट्र व मराठीचा जागतिक राजकारण आणि समाजकारणावर प्रभाव पडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युध्द कौशल्यास जागतिक इतिहासात मानाचे स्थान आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात मराठी माणसाने जागतिक स्तरावर अन्यायाविरोधात आवाज उठवत समर्थपणे भूमिका मांडल्या आहेत. जगाच्या स्पर्धेत पुरेपूर उतरणाऱ्या मराठी माणसाने आज जगात सर्वत्र आपले अस्तित्व निर्माण केले असून व्यापार, उद्योग आणि राजकारणातही त्यांनी प्रवेश केला आहे,ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे श्री. राऊत म्हणाले.

            कौशल्य व ज्ञानाच्या जोरावर आज जगभरात मराठी माणसांचा वावर आहे. स्पर्धेत पूरेपूर उतरून मराठी माणसाने विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे ,उत्तुंग झेप घेतली आहे व आपले अस्तित्व  टिकवून ठेवले आहे. अमेरीकेपासून,इस्त्रायल,आयर्लंड,जपान,मॉरीशस,अफगाणीस्तान आदी देशांमध्ये मराठी माणसांनी  कर्तबगारी दाखविल्याचे आश्वासक चित्र आहे.

             आयर्लंडचे पंतप्रधानपद भूषविणारे लिओ वराडकर हे कोकणातील मालवणचे आहेत. त्यांच्या रूपाने मराठी माणसाने एका देशाच्या प्रमुखपदाचे सर्वोच्च स्थान मिळवीले आहे. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. अमेरिकेच्या असेंब्लीमध्ये श्री. ठाणेदार हे मराठी गृहस्थ मोठया मतांनी निवडून आले आहेत, अनेक वर्ष तेथील राजकारणात त्यांनी महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. इंग्लडमधील राजकारणात मराठी माणूस आहे. मॉरीशस मधील राजकारणात, संसदेत व मंत्रिमंडळात मराठी माणस आहेत. जगाच्यापाठीवरील या मराठी माणसांकडे आपण मोठया अपेक्षेने पाहिले पाहिजे असे श्री राऊत म्हणाले.

              मराठी माणूस हे कलाप्रेमी आहेत. परदेशातही मराठी नाटक, चित्रपट, संगीत  मैफिली आदींच्या आयोजनांतून त्यांनी मराठीची जोपसना केली आहे. बृह्नमहाराष्ट्र मंडळ, मराठी परिषदा आदींच्या माध्यमातून मराठी संस्कृतीची जोपासना केली आहे.मॉरीशस आणि अमेरिकेत मराठी मंडळांच्यावतीने गणेशोत्सव साजरे होतात. शिकागो, न्युयॉर्क आणि  कॅनडामध्ये भरणारे बृह्ममहाराष्ट्र परिषदांचे अधिवेशन यावरही श्री. राऊत यांनी प्रकाश टाकला. इस्त्रायलमध्ये मायबोली हे मराठी नियकालीक चालवले जाते,त्यास मोठा मराठी वाचक लाभला आहे. तेथे मराठी कार्यक्रम, उत्सव मोठया प्रमाणात साजरे केले जातात. मराठी भाषेचे उत्सव साजरे होतात.माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली व कुसुमाग्रजांच्या उपस्थितीत इस्त्रायलमध्ये जागतिक मराठी परिषदेचे पहिले संमेलन भरविण्यात आले होते. जगभरातील मराठी माणसांनी व्यापाराच्या संधी शोधण्यासाठी जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना केल्याचेही त्यांनी सांगितले.

             मराठी माणसांनी जागतिकस्तरावर सक्षमपणे भूमिका मांडल्या

          भारतात ब्रिटीशांच्या राजवटीत लंडन हे मराठी माणसाचे लक्ष्य होते. लोकमान्य टिळक हे लंडनला जावून आपली बाजू मांडून आले होते. राघोबादादांना पेशवाईचे वस्त्र मिळाले नव्हते तेव्हा त्यांनी आपला वकील लंडनला संपर्कासाठी पाठविला होता. ब्रिटीशांनी अन्यायपणे साताऱ्याची गादी खालसा केल्याच्या विरोधात   छत्रपती प्रतापसिंह राजे यांचे वकील रंगो बापुजी हे लंडनला संपर्कासाठी गेले होते. त्यावेळी रंगो बापुंनी लंडनच्या हैलपार्कमध्ये ‘राजा मेला, तरी न्याय मेला नाही’ अशी  गर्जना  करून वैचारीक लढा दिला. डॉ. एम. के. पारधी हे मराठी गृहस्थ 1910 मध्ये लंडन येथे स्थायीक झाले. साहित्य सम्राट न. चि. केळकर यांनी 1932 च्या सुमारास गोलमेज परिषदेत गर्जना केली होती. स्वातंत्र्याच्या क्रांतिची ठिणगी देशात टाकणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी याची सुरुवात लंडनपासून केली, येथील वास्तव्यात त्यांनी मराठी क्रांतिकारकांना एकत्र करण्याचे काम केले, असे श्री राऊत म्हणाले.

            परदेशात नोकरदारीत अग्रणी असलेल्या मराठी माणसांनी आता प्रशासनातही  आपला दबदबा निर्माण करण्याची गरज आहे. जगात मराठीची अस्मिता जपावी व प्रशासनात सहभागी होऊन मराठी माणसांनी संकटसमयी महाराष्ट्राला सहकार्य करावे तसेच राज्याच्या विकासात योगदान दयावे, अशी अपेक्षाही श्री राऊत यांनी व्यक्त केली. 

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा:  

     http://twitter.com/micnewdelhi

                                                             ०००००

रितेश भुयार /वृत्त.वि. क्र.114/दिनांक 19.04.2021      

Friday 16 April 2021

‘संसदेतील महाराष्ट्र’या विषयावर ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी यांचे व्याख्यान

 

 

नवी दिल्ली, दि. 16 : महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी हे 17 एप्रिल 2021 रोजी  संसदेतील महाराष्ट्र या विषयावर 29 वे पुष्प गुंफणार आहेत.

 

            महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेली 60 वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने 19 मार्च 2021 पासून महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला सुरु झाली आहे. 17  एप्रिल रोजी या व्याख्यानमालेच्या एकोणतीसाव्या दिवशी ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी  सायंकाळी 4 वाजता विचार मांडणार आहेत.

व्यंकटेश केसरी यांच्या विषयी

ज्येष्ठ पत्रकार श्री केसरी यांचा पत्रकारीता क्षेत्रात एकूण अनुभव जवळपास 42 वर्षांचा असून जवळपास  27 वर्षे त्यांनी संसेदचे अधिवेशनकालीन सत्रांचे वार्तांकन केलेले आहे. व्यंकटेश केसरी मुळचे लातुर जिल्ह्यातील निलंगा येथील आहेत. 1978 पासून त्यांनी विविध दैनिकात काम करायला सुरूवात केली. 1981-82 मध्ये दै. मराठवाडा या वर्तमान पत्राचे संपादक अनंत भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री केसरी यांनी पत्रकार म्हणून  कामाला सुरूवात केली.

पुढे दै. लोकमतसह इंग्रजी दै लोकमत टाईम्स मध्येही श्री केसरी यांनी  कामे केले. याच दैनिकांचे दिल्ली प्रतिनिधी म्हणूनही  श्री केसरी यांनी काम पाहिले. या दैनिकातील दिल्ली डायरी हे सदर श्री केसरीमुळे अधिकच प्रसिद्ध‍िस आले.

एशीयन ऐज या इंग्रजी  दैनिकात  श्री केसरी यांची सुरूवात  1997 ला झाली  ते 2016 पर्यंत या दैनिकात होते. एशीयन ऐज मध्ये राजकीय पत्रकार म्हणुन सुरूवात केली. जवळपास चार प्रधानमंत्र्यांचा कार्यकाळ त्यांना बघुन त्यांच्या बातम्या करता आले. याच काळात त्यांनी सर्वच संसदेचे अधिवेशनांचे वार्तंकन केले.  

एशीयन ऐजमधून निवृत्त झाल्यावर श्री केसरी हे  विविध दैनिकात तसेच ेसंकेत स्थळांवर लिखाण करीत असतात.

           

 

समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण

      17 एप्रिल 2021 रोजी  सायंकाळी 4 वाजता  परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे ‍मराठी  ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi  आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi   वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI  , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/   आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share  तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhiयुटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे. 

  

दिल्लीत महाराष्ट्राची उंच पताका- ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक


 

नवी दिल्ली,१६ : महाराष्ट्र स्नेहसंवर्धक समाज ही शंभर वर्ष जुनी संस्था,मराठी शाळा, मराठी मंडळे आणि विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणा-या मराठी माणसांनी महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक व वैचारीक वारसा जपत दिल्लीतील महाराष्ट्राची पताका उंचाविली असल्याचे, मत ज्येष्ठ पत्रकार तथा लेखक  विजय नाईक यांनी आज व्यक्त केले.   

         महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत ‍‍दिल्लीतील महाराष्ट्र  या विषयावर २८वे पुष्पगुंफताना श्री. नाईक बोलत होते.

              महाराष्ट्र स्नेह संवर्धक समाज, बाडा हिंदुराव रुग्णालय,तालकटोरा उद्यान,नोएडा गोल्फ कोर्स येथील स्तंभ आदी वास्तू तसेच शिवाजी स्टेडियम, खाशाबा जाधव स्टेडियम, शिवाजी ब्रिज, तिलक ब्रिज, बाजीराव पेशवे रोड, न्या.सुनंदा भंडारे रोड अशा महाराष्ट्राच्या ठसठसीत खुणा आज देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये बघायला मिळतात. केंद्रीय मंत्रिमंडळात महत्वाचे पद भुषवून प्रदीर्घ काळ दिल्लीत वास्तव्यास असलेले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री  यशवंतराव चव्हाण यांनी दिल्लीतील महाराष्ट्राला आकार दिला तर दिल्लीत मराठी माणसांसाठी सदैव मदतीस तत्पर असणारे काकासाहेब गाडगीळ हे मराठी जणांचे आधारवडच ठरले. दिल्लीच्या वेगवेगळया भागातील मराठी संस्था. मंडळे व वेगवगेळया क्षेत्रात कार्यरत मराठी माणसांनी महाराष्ट्राची वेगळी छाप दिल्लीत सोडली असून राज्याची पताका अभिमानाने उंचाविली असल्याचे श्री नाईक म्हणाले.   

            जन्मभूमी अहमदनगर असलेले व गेल्या ५२ वर्षांपासून दिल्लीवासी  झालेले आणि सक्रीय पत्रिकारीतेत ४५ वर्ष कार्यरत श्री नाईक यांनी यावेळी दिल्लीतील महाराष्ट्राच्या वेगवेगळया पाऊल खुणांबाबत माहिती दिली. २०व्या शतकाच्या प्रारंभी दिल्लीत मराठी माणसांची पहिली वसाहत नया बाजार भागात झाली. मराठी लोकांनी एकत्र येत नवी दिल्ली रेल्वे स्टेशन पासून अवघ्या २ कि.मी. अंतरावरील पहाडगंज भागात १९१९ मध्ये महाराष्ट्र स्नेह संवर्धक समाज ही संस्था स्थापन केली.संस्थेच्या माध्यमातून मराठी सण,उत्सव साजरे करण्यात येऊ लागले. पुढे दिल्लीत मराठी माणसाला हक्काची व अल्पदरात राहण्याची व्यवस्थाही संस्थेने बृह्नमहाराष्ट्र भवनच्या रुपाने केली, नुतन मराठी शाळाही पहाडगंज भागातच उभारली. पुढे खारी बावली, चांदणी चौक भागात मराठी लोकांचा विस्तार झाला आजही या भागात मराठा सेनानी गंगाधर यांनी बांधलेले शिवपार्वती मंदीर असल्याचे श्री नाईक यांनी सांगितले.

मराठी महिलांच्या सांस्कृतिक व सामाजिक कार्यकलापासाठी १९५३ मध्ये लोधी कॉलनी परिसरात वनिता समाजाची स्थापना झाली. दिल्ली  राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात अंदाजे ३ लाख मराठी लोकसंख्या असून वेगवेगळया भागात जवळपास ४५ मराठी मित्रमंडळ कार्यरत आहेत. नुतन मराठी शाळा, चौगुले पब्लिक स्कुल या मराठी शाळा दिल्लीत कार्यरत आहेत. दिल्लीत कार्यरत मराठी अधिका-यांनी स्थापन केलेली पुढचे पाऊल संस्था व दिल्लीत दिवाळी पहाटचा अनोखा उपक्रम राबविणा-या दिल्ली मराठी प्रतिष्ठान या अलीकडच्या संस्थांही दिल्लीत महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करीत असल्याचे श्री नाईक म्हणाले.

                     दिल्लीत महाराष्ट्राच्या ऐतिहासिक पाऊल खुणा

 स्वातंत्र्योत्तर काळाचा विचार करता‍ ‍दिल्लीतील महाराष्ट्राच्या महत्वाच्या तीन पाऊल खुणा सापडतात, असे श्री नाईक म्हणाले. १७३७-३८ मध्ये बाजीराव पेशवे यांनी मोघल सुलतान सादत खान याला पराभूत केले तेव्हा पेशव्यांच्या सैन्यांच्या येथील मुक्कामात त्यांना थाळी व कटोरीतून जेवन दिले जात असे म्हणून येथील उद्यानाला तालकटोरा उद्यानअसे नाव पडले.

ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्यातील महाराजा दौलतराव यांचे जावई मराठा उमराव राजा हिंदुराव यांनी १८५७ च्या उठावानंतर जुन्या दिल्लीत मुक्काम ठोकला. १९५८ मध्ये त्यांच्या महालाचे रुपांतर बाडा हिंदुराव रुग्णालयात करण्यात आले. 

नोएडा येथील गोल्फ कोर्समध्ये १९१६ साली उभारण्यात आलेला स्तंभ आजही मराठा सैन्याच्या शौर्याची गाथा सांगत आहे. ४० फुट उंचिच्या या स्तंभावर २१८ वर्षांआधी मराठा सैन्यांनी या परिसरात गाजविलेल्या  शौर्याचा उल्लेख आढळतो.    

                           दिल्लीतील  महाराष्ट्राची जडणघडण

            भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे पहिले विधी मंत्री  झाले व त्यांच्या रुपाने दिल्लीत महाराष्ट्राच्या राजकीय अस्तित्वाला सुरुवात झाली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण १९६२ मध्ये देशाचे संरक्षण मंत्री झाले. पुढे १९८४ पर्यंत केंद्र सरकारमध्ये विविध पदांवर कार्यरत असताना त्यांच्या दिल्लीतील वास्तव्यात दिल्लीतील महाराष्ट्राची जडणघडण झाल्याचे श्री नाईक म्हणाले.महाराष्ट्राचे उत्तुंग नेते म्हणून त्यांची दिल्लीत ओळख होतीच याबरोबरच साहित्याचे उपासक, कलाकारांना वाव देणारे त्यांचे व्यक्तीमत्व होते. दिल्लीत भरलेल्या ४३ व्या अखिल भारतीय मराठी नाटय संमेलाचे अध्यक्षपद श्री चव्हाण यांनी भूषविले होते. यानंतर दिल्लीत अनेक मराठी नाटके ,गीत-संगीत व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरु झाली. दिल्लीत महाराष्ट्र घडविणा-या मान्यवरांमध्ये मराठी माणसांना सहकार्यासाठी सदैव तत्पर असणारे काकासाहेब गाडगीळ, महाराष्ट्र सांस्कृतिक समितीचे मानद अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री वसंतराव साठे,मुरलीधर भंडारे,माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आदींसह दिल्लीत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशात भर घालणारे महाराष्ट्र सांस्कृतिक समितीचे दीर्घकाळ अध्यक्ष राहिलेले रा.मो. हेजीब, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे माजी सचिव व राजदूत द्वय सुधीर देवरे आणि डॉ ज्ञानेश्वर मुळे आदी मंडळींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

 यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेल्या महाराष्ट्र परिचय केंद्रानेही दिल्लीतील महाराष्ट्राला बळकट करण्यात महत्वाची भूमिका बजावल्याचे सांगून परिचय केंद्राच्या आजवरच्या प्रमुखांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यावरही त्यांनी प्रकाश टाकला. उदरनिर्वाहासाठी दिल्लीच्या रस्त्यावर चहाची टपरी चालविणारे लक्ष्मण राव यांनी लिखणाचा व्यासंग जपला व आज ते ख्यातीप्राप्त लेखक झाले ॲमेझॉन, किंडल, फ्लीपकार्टवर त्यांची पुस्तके विकली जातात. जागतिक किर्तीचे शिल्पकार पद्मभूषण राम सुतार, अरबी समुद्रातील छत्रपती शिवराय, अयोध्येतील राममंदिरात रामाचा भव्य पुतळा तयार करण्याचे काम करीत असलेले जय काकतीकर यांच्यासह राजकारण,प्रशासन,पत्रकारिता आदी क्षेत्रात दिल्लीतील मराठी माणसांनी महाराष्ट्राची मान गौरवाने उंचाविली आहे.

     मराठी संस्था,मंडळे, विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांनी महाराष्ट्राचा समृध्द वारसा जपत राज्याची पताका दिल्लीत उंचाविली असल्याचे श्री नाईक यांनी यावेळी सांगितले.  

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा:

         http://twitter.com/micnewdelhi

                                                             ००००० 

रितेश भुयार /वृत्त.वि. क्र.१०८/दिनांक १६.०४.२०२