Wednesday 31 October 2018

49 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवासाठी 2 मराठी चित्रपटांची व 8 लघुपटांची निवड




नवी दिल्ली, ३१ : 49 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवासाठी  2 मराठी चित्रपटांची व 8 मराठी लघुचित्रपटांची निवड करण्यात आलेली आहे.

            आज चित्रपट दिग्दर्शक राहूल रवेल यांच्या अध्यक्षेतखाली 13 सदस्यांच्या चित्रपट ज्यूरींनी 49 व्या आंतराराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवामध्ये इंडियन पॅनोरमासाठी एकूण 22 चित्रपटांची निवड केली. यामध्ये 2 मराठी चित्रपटांचा समावेश आहे. तर, लघु चित्रपटांमध्ये एकूण 21 चित्रपटांची निवड केली असून यामध्ये  सर्वाधिक 8 मराठी लघुपट दाखविण्यात येणार आहेत.  आंतरराष्ट्रीय  भारतीय चित्रपट महोत्सव गोव्यात होणार आहे.

मराठी चित्रपटांमध्ये निपूण धर्माधिकारी दिग्दर्शित धप्पा आणि प्रतिमा जोशी दिग्दर्शित आम्ही दोघी या चित्रपटांची निवड इंडियन पॅनोरमासाठी करण्यात आली आहे.


            लघुपट चित्रपटांमध्ये आदित्य जांभळे दिग्दर्शित खरवस या मराठी लघुपट प्रदर्शनाने प्रारंभ होणार आहे. मेधप्रणव पोवार यांचा हॅपी बर्थ डे, नितेश पाटणकरांचा ना बोले वो हराम, प्रसन्ना पोंडेंचा सायलेंट स्क्रीम, सुहास जहागिरदार यांचा येस आय ॲम माऊली, शेखर रणखांब यांचा पाम्पलेट, गौतम वझे यांचा आई शपथ, आणि स्वपनील कपुरे यांचा भर दुपारी या 8 लघुपटांचा समावेश आहे.


राजधानीत सरदार पटेल जयंती आणि इंदिरा गांधी यांचा स्मृतीदिन साजरा
















    

नवी दिल्ली, ३१ : देशाचे प्रथम गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची १४ वी जयंती  ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे  साजरा  करण्यात आला. तर देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या ३४ वा स्मृतीदिनी अभिवादन करण्यात आले.

                कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त (अ.का.) समीर सहाय यांनी सरदार पटेल व इंदिरा गांधी  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, इशु संधू, अजितसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदनातील व महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी -कर्मचारी  उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
            सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून तर इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणून पाळण्यात येते. यावेळी निवासी आयुक्त(अ.का.) समीर सहाय यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांना  राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्याची शपथ दिली.

महाराष्ट्र परिचय केंद्रात सरदार पटेल व इंदिरा गांधी  यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात  सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन  साजरा करण्यात आला. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजु निमसरकर-कांबळे, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह उपस्थित कर्मचा-यांनी यावेळी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
            उपसंचालक श्री. कांबळे यांनी यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ
दिली.      
       महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                             http://twitter.com/micnewdelhi                       
000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.३९०/  दिनांक  31.10.2018 




Monday 29 October 2018

‘हौसला और रास्ते’ प्रेरणादायी लघुचित्रपट : खा. मधुकरराव कुकडे








आंतरराष्ट्रीय महोत्सवात 'हौसला और रास्ते' ठरला विशेष लक्षवेधी लघुचित्रपट     

नवी दिल्ली, 29 : ग्रामीण तरुण-तरूणींमध्ये प्रचंड क्षमता आहे. योग्य संधी मिळाल्यास हा तरुण वर्ग देखील संधीचे सोने करू शकतो. त्याची प्रचिती हौसला और रास्ते या लघुचित्रपटात दिसली आहे. हा लघुचित्रपट प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रीया, भंडारा-गोंदिया मतदार संघाचे खासदार मधुकरराव कुकडे यांनी व्यक्त केली.

            आज महाराष्ट्र परिचय केंद्रात हौसला और रास्ते हा हिंदी लघुचित्रपट दाखविण्यात आला. यावेळी खा. कुकडे,  हौसला और रास्तेचे निर्माता चेतन भैरम, सहनिर्माता प्रशांत वाघाये, छायाचित्रकार प्रशांत चव्हाण, लघुचित्रपटातील कलाकार अतुल भांडारकर, उपसंचालक दयानंद कांबळे, जनसंपर्क अधिकारी अमरज्योत अरोरा, माहिती अधिकारी अंजु निमसरकर तसेच पत्रकार, कार्यालयातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
            हौसला और रास्ते हा लघुचित्रपट शेतकरी आत्महत्या आणि त्यांच्या कुटुंबातील समस्या या ज्वलंत विषयावर आहे. या चित्रपटातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासह शासनाच्या योजनांबद्दलची माहितीही देण्यात आली असल्याचे श्री कुकडे यावेळी म्हणाले.

            दिल्ली येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय लघु-चित्रपट महोत्सवात हौसला और रास्ते दाखविण्यात आला असून या लघुचित्रपटास विशेष लक्षवेधी चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले. या महोत्सवात जगभरातील जवळपास 55  देशातील 400 पेक्षा अधिक लघुचित्रपट दाखविण्यात आले. हा लघुचित्रपट 25 मिनीटांचा आहे. हा चित्रपटाचे चित्रीकरण भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी करण्यात आलेले आहे.

या लघुचित्रपटात गुजरातमधील अभिनेता मौलिक चव्हाण आणि नागपुर येथील हिमांशी कावळे, औरंगाबादचे सुरेश जोशी प्रमुख भुमीकेत आहेत. भंडारा जिल्ह्याच्या लाखनीतील प्रसिद्ध नाट्यकलाकार संजय वनवे, उद्योजक अतुल पाटील भांडारकर, अंजली भांडारकर, तुमसर येथील सरोजलता बर्वे, स्वप्निल जांगळे, नीलेश हंबरडे यांच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात काम करणा-या कलाकारांनी मानधन घेतले नाही. या पुढेही हा चित्रपट लंडन, फ्रान्स, यु.के. स्पेन येथे होणा-या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविण्यात येणार असल्याचे श्री भैरम यांनी सांगितले.

महाराष्ट्र परिचय केंद्रा तर्फे लोकराज्य मोहिम अभियान.













दि. विशाल महाराष्ट्रीयन को-ऑपरेटिव्ह (अर्बन) थ्रिप्ट तथा क्रेडिट सोसायटी लि. या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 28.10.2018 रोजी मयुर विहार येथील सामुदायिक केंद्रात आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्रा तर्फे लोकराज्य मोहिम अभियान राबविण्यात आले होत. या अभियानाअंतर्गत लोकराज्य वर्गणीदार सभासद बनविण्यात आले. या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.  




महाराष्ट्राला लागणारा 1 लाख 20 हजार मेट्रिक टन कोळसा मिळावा : ऊर्जा मंत्री बावनकुळे



नवी दिल्ली, 29 : महाराष्ट्र राज्याने ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात उच्चांक गाठला असून सध्या महाराष्ट्राला 1 लाख 20 हजार मेट्रिक टन कोळश्याची आवश्यकता असून हा कोळसा केंद्राकडून मिळावा, अशी मागणी केली असल्याची  माहिती महाराष्ट्र सदन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली.
     
वीज निर्मितीमध्ये कोळसा अत्यंत महत्वाचा  घटक आहे. राज्याला हा कोळसा सिंगरीन कोलरीस कंपनी लिमीटेड, महानदी कोल्डफिल्ड लिमीटेड, वेर्स्टन कोलफिल्ड लिमीटेड या कंपन्यांमधून  उपलब्ध होतो. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये कोळसा मिळण्यासंदर्भातील झालेल्या करारानुसार कोळसा नियमित मिळावा, यासाठी केंद्रीय कोळसा मंत्री पियुष गोयल यांनी प्रयत्न केले असून महाजनको आणि केंद्रीय कोळसा विभागाची बैठक घेण्याची सूचना श्री गोयल यांनी दिली होती. त्याप्रमाणे आज शास्त्री भवन येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे बैठक घेण्यात आली असल्याची, माहिती  श्री बावनकुळे यांनी दिली.
सध्या राज्यात वीजेची मागणी वाढलेली आहे. यावर्षी 24 हजार 142 मेगा वॅटपर्यंत वीज निर्माण करण्याचा उच्चांक राज्याने गाठला आहे. यापुर्वी ऑक्टोबर महिन्यात 19 हजार मेगा वॅटपेक्षा अधिक वीज निर्माण झालेली नाही. सध्या राज्याला 1 लाख 20 हजार मेट्रिक टन कोळश्याची आवश्यकता असल्याची, माहिती श्री बावनकुळे यांनी दिली.
राज्यातील 7.50 लाख शेतक-यांना वीज जोडणी दिलेली आहे. घरगुती ग्राहकांच्या वीज जोडणीमध्येही वाढ झालेली आहे. त्यामुळे वीजेची मागणी मागील वर्षीच्या तुलनेत वाढलेली  आहे. सध्या राज्याला 32 रॅक कोळसा हवा आहे. हा कोळसा लवकरात लवकर मिळावा, यासाठी आज वरिष्ठ अधिका-यांच्या समवेत बैठक घेण्यात आली.  राज्याला महाराष्ट्रा बाहेरून मिळणारा कोळसा लवकरात लवकर उपलब्ध व्हावा,  यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली असून केंद्रीय कोळसा विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी यावर लवकर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
000000

अंजुनिमसरकर/वृ.क्र.387/29/10/2010

महाराष्ट्र सदन आणि परिचय केंद्रात ‘भ्रष्टाचार निर्मुलना’ची शपथ





नवी दिल्ली, 29 :  महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेण्यात आली.
            दिनांक 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधी दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून यातंर्गत आज भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेऊन कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त (.का.) समीर सहाय यांनी उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना सत्यनिष्ठा राखण्याची प्रतिज्ञा दिली. यावेळी सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, इशु सिंधु, विजय कायरकर यांच्यासह अन्य अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र परिचय केंद्रात भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ
महाराष्ट्र परिचय केंद्रातही भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेण्यात आली. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांना  सत्यनिष्ठा राखण्याची शपथ दिली. यावेळी जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजु निमसरकर तसेच कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

000000
अंजुनिमसरकर/वृ.क्र.388/26/10/2010

राज्यातील रस्ते विषयक विविध प्रश्न निकाली ;ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे









                                                   
             
नवी दिल्ली दि. 29 : नागपूर शहर व जिल्हयासह महाराष्ट्राच्या इतर जिल्हयातील रस्ते विषयक समस्या  आज निकाली काढण्यात आल्याची माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी  येथे दिली.

            केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज परिवहन भवन येथे महाराष्ट्रातील विविध रस्ते विषयक कामांचा आढावा घेण्यात आला. या बैठकी नंतर महाराष्ट्र सदन येथे आयोजित पत्रकार परिषदेत  श्री. बावनकुळे बोलत होते.  

                                      मनसर टोल नाका स्थलांतरित करण्याचा निर्णय
नागपूर जिल्हयातील रामटेक येथील मनसर टोल नाका, नागपूर महानगर विकास प्राधिकरणातून (एनएमआरडीए) वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. मनसर येथील टोल नाका आता सवासा सीमेकडे स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला असून  यामुळे  रामटेक येथे दर्शनासाठी येणारे भाविक आणि येथील स्थानिक शेतक-यांना  मोठा दिलासा मिळणार असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले. पाटण-सावंगी-सावनेर रस्त्यावरील टोलनाका बैतुलकडे स्थलांतरित करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

                     कोराडी महालक्ष्मी अपघात प्रवण भागाचा प्रश्न सुटणार
नागपूर जिल्हयातील कोराडी येथील महालक्ष्मी भागात होत असलेल्या अपघातांच्या समस्येवर यावेळी चर्चा झाली. या अपघातग्रस्त स्थळी  सुरक्षेच्या पुरेशा उपाय योजना करण्याच्या सूचना श्री. गडकरी यांनी या बैठकीत केल्या. यामुळे हा विषय लवकरच मार्गी लागणार असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले. नागपूर- सावनेर- छिंदवाडा या राष्ट्रीय महामार्गावरील अपघात प्रवण स्थळ चिन्हित करून याठिकाणी उड्डानपुल बांधण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला . तसेच राज्यातील राष्ट्रीय महामार्गावर चिन्हित करण्यात आलेल्या अपघात प्रवण भागांना अपघात मुक्त करण्यासाठी उपाय योजनाबाबत निर्णय घेण्यात आला.
                शहरांच्या मध्यवर्ती भागापर्यंत(झीरो माईल) राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात येणार
 नागपूर- भंडारा, नागपूर-काटोल–सावनेर- धापेवाडा, नागपूर-भंडारा, रामटेक-तुमसर तसेच राज्यातील ज्या शहरांतून राष्ट्रीय महामार्ग जातात, त्या शहरांच्या मध्यवर्ती भागापर्यंत (झीरो माईल) हे मार्ग बांधण्याच्या सूचना श्री. गडकरी यांनी या बैठकीत संबंधित अधिका-यांना केल्या. राष्ट्रीय महामार्ग हे शहरांच्या सीमेपर्यंत बांधण्यात येत असत व पुढे हे काम स्थानिक महानगर पालिकांकडे सोपविण्यात येत असे. शहरातील मध्यवर्ती केंद्रापर्यंत (झीरो माईल)  राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असून या निर्णयानुसार यापुढे राज्यातील राष्ट्रीय महामार्गही शहरांच्या मध्यवर्तीभागापर्यंत (झीरो माईल) बांधण्याचे निर्देश देण्यात आल्याचे श्री . बावनकुळे यांनी सांगितले.
 या बैठकीत नागपूर जिल्हयातील उमरेड-काटोल, नागपूर-उमरेड, वणी-वरोरा या प्रस्तावित रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. अमरावती जिल्हयातील नांदगाव पेठ टोल नाका, जालना जिल्हयातील चिखली –तडसुद, नाशिक- पुणे महामार्गावरील पाच बायपास तसेच टोल नाके आणि मुंबई – गोवा महामार्ग अशा  २४ प्रकल्पांचा आढावा यावेळी घेण्यात आला.   
                     
            परिवहन भवन येथे आयोजित राज्यातील रस्ते विकास कामांच्या आढावा बैठकीस श्री. बावनकुळे यांच्यासह रामटेक लोकसभा मतदार संघाचे खासदार कृपाल तुमाने आणि रामटेकचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डी,  रत्नागिरी व सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत , राज्य व केंद्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.   
000000

    रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 385/  दिनांक २९.१०.२०१८ 
          





Friday 26 October 2018

महाराष्ट्रातील मंगरूळपीरचा ‘सेंद्रीय खपली गहु’ वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हलमध्ये




 केंद्रीय महिला व बाल मंत्री मनेका गांधी यांच्या हस्ते उद्घाटन
                                                                      
नवी दिल्ली, 26 :  वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीरचा सेंद्रीय खपली गहु राजधानी दिल्लीत आयोजित वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हलमध्ये विक्रीसाठी आणण्यात आला  आहे. यासह सेंद्रीय (organic) पद्धतीने तयार केलेले बंसी गहु, तांदुळ, हळद, डाळी, मसाले, तेलबिया, चिप्स, बॉडी लोशन, लीप बाम, कपडे, गृह सजावटीच्या वस्तु ऑरगॅनिक मेळयात प्रदर्शित केलेल्या आहेत.  या मेळयाचे उद्घाटन केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी  यांनी आज केले.

            केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हलचे आयोजन दिल्लीतील इंदिरा गांधी कला केंद्र येथे करण्यात आले. या मेळयाची सुरूवात आजपासून झाली असून या मेळयात 250 पेक्षा अधिक महिला उद्योजिकांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील महिला उद्योजिकांचाही समावेश आहे.

             महाराष्ट्रातील औरंगाबादमधून सानंद फुडच्या आरती डुघ्रेकर या आलेल्या आहेत त्यांच्या दालनात तुर, मुंग,चणा, उडीद डाळ, हळद, लाल मिरची  पावडर आहे. राज्यातील  सेंद्रीय शेती करणारे अनेक शेतकरी समुह त्यांच्यासोबत जोडलेले आहेत. दिल्लीमध्ये येण्याचे त्यांचे पहिले वर्ष असून सेंद्रीय शेती करणा-यांना यामाध्यमातून संधी मिळु शकते, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाच्या गायत्री राऊत यांचे दिल्लीत ऑरगॅनिक मेळयात येण्याचे दुसरे वर्ष आहे. त्यांच्या स्टॉलवर जवस, डाळी, मुंगाच्या डाळीच्या वडया आहेत. त्यांनाही या ऑरगॅनिक प्रदर्शनातून बरीच अपेक्षा आहे.
यासह राज्यातील नंदुरबार, जळगाव, नागपूर, अमरावती, यवतमाळ, हिंगोली, बीड, मुंबईसह विदर्भ कापूस उत्पादक समिती, सबीना असोसिएशन ऑफ ऑरगॉनिक फारर्मस यांचीही दालने याठिकाणी आहेत.

या मेळयात सहभागी झालेल्या महिला उद्योजिका  देशातील सर्वच राज्यांमधील ग्रामीण तसेच शहरी भागातून आलेल्या आहेत. ऑरगॅनिक वस्तुंच्या वापराला प्रोत्साहन मिळावे, महिलांना  योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी या मेळयाचे आयोजन करण्यात आले आहे.

याठिकाणी दैंनदिन वापराच्या, गृह उपयोगी सर्वच वस्तुचे प्रदर्शन मांडले असून याच्या वापराने आरोग्यावर कोणताही दुष्यपरिणाम होत नसुन हे आरोग्याला हितकारकच आहे. मागील चार वर्षांपासून या ऑरगॅनिक मेळयाचे आयोजन केले जात आहे. दरवर्षी  मेळयात सहभागी महिला उद्योजिकांच्या आर्थिक लाभात वाढ होत असते, यंदाही लाभ होईल, अशी अपेक्षा सहभागी महिलांनी  व्यक्त केली. याठिकाणी नामाकिंत उद्योगसमुहांना बोलवून त्यांच्याशी महिला उद्योजिकांशी चर्चा घडवून आणण्यात येणार आहे. जेणे करून महिला उद्योजिकांना  ऑरगॅनिक वस्तु विक्रीच्या क्षेत्रात आणखी संधी मिळू शकणार.

या ऑरगॅनिक मेळयामध्ये औषधीयुक्त काळे तांदूळ, पारपांरिक तांदूळ, तेलबिया, केळीचे चिप्स, अचार, नागलीचे विविध खाद्य पदार्थ, चिक्की, बेसनाचे लाडू, अंबाडी,  गवती चहा, तरोटा कॉफी, बेबी बॉडी वॉश, बॉडी क्रिम, लीप बाम, मालीश तेल, हॉन्डवॉश, कपडे, गृह सजावटीच्या वस्तु आदि विविध वस्तु तसेच पदार्थ येथे विक्रीसाठी प्रदर्शित केलेले आहे.

या प्रदर्शनाला भेट देऊन महिलांना आर्थिक बळकटीकरण करण्याचे आवाहान केंद्रीय मंत्री यांनी यावेळी केले.   हे प्रदर्शन 4 नोव्हेंबरपर्यत राहणार आहे. हे प्रदर्शन नि:शुल्क आहे.

Thursday 25 October 2018

राज्यात लवकरच ‘मुख्यमंत्री पशुधन योजना’ : पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर










                                                      
नवी दिल्ली दि. 25 : राज्यातील पशुधनात वाढ करण्यासाठी, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व शेत-यांच्या हिताच्यादृष्टीने महत्वपूर्ण अशी ‘मुख्यमंत्री पशुधन योजना’ महाराष्ट्रात लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी येथे ‘ ॲग्रो वर्ल्ड-२०१८’ परिषदेत आज दिली.
.
            येथील पुसा परिसरातील एनएएससी कॉम्पेलस मध्ये  भारतीय कृषी व खाद्य परिषदेच्यावतीने व केंद्रीय कृषी मंत्रालय, केंद्रीय वाणीज्य व उद्योग मंत्रालय आणि केंद्रीय अन्न प्रक्रिया विभागाच्या सहकार्याने तीन दिवसीय ‘ॲग्रो वर्ल्ड २०१८’ परिषदेचे  आयोजन करण्यात आले. या परिषदेच्या उदघाटन प्रसंगी श्री जानकर बोलत होते. केंद्रीय कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंह यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन झाले. मिझोरमचे राज्यपाल कुम्मनम राजशेखरन,  यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

            या प्रसंगी विचार मांडताना श्री. जानकर यांनी  गेल्या चार वर्षात महाराष्ट्रात पशुसंवर्धन, मत्स्य व दुग्धविकास मंत्रालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या महत्वपूर्ण निर्णय व त्याचा झालेला सकारात्मक परिणाम याविषयी माहिती दिली. राज्यात पशुधनाची संख्या वाढविण्यासाठी  लवकरच ‘मुख्यमंत्री पशुधन योजना’ सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या योजनेसाठी २ हजार कोटींचा खर्च येणार असून राज्यातील प्रत्येक जिल्हयामध्ये ही योजना सुरु करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती  व अनुसूचित जमाती व खुल्या प्रवर्गातील जनतेला ‘मागेल त्याला पशुधन’ या तत्वावर प्रत्येकी  एक गाय, म्हैस, शेळी, मेंडी आदी पशुधन देण्यात येणार आहे. राज्य शासन बँकांच्या मदतीने कर्ज उपलबध्द करून देणार आहे. शेतक-यांच्या अर्जांची बँकेकडून छाननी करण्यात येणार असून पात्र शेतक-यास पशुधनासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कर्जावरील व्याजाची रक्कम राज्य सरकार भरणार असल्याचे श्री. जानकर यांनी सांगितले.   राज्यातील पशुधनात वाढ करण्यासाठी, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व शेत-यांच्या हिताच्यादृष्टीने ही योजना महत्वपूर्ण असल्याचेही त्यांनी सांगितले.
             
                      राज्यात कॅटल होस्टेल ; पालघर व उस्मानाबाद येथे प्रायोगिक तत्वावर सुरुवात
        पशुसंवर्धन मंत्रालयाच्या माध्यमातून राज्यात कॅटल होस्टेल सुरु करण्यात येणार असल्याचेही श्री. जानकर यांनी यावेळी सांगितले. प्रायोगिक तत्वावर पालघर आणि उस्मानाबाद जिल्हयांमध्ये हे कॅटल होस्टेल उभारण्यात येणार आहे. जिल्हयाच्या ठिकाणी उभारण्यात येणा-या अशा होस्टेल मध्ये शेतक-यांना आपले जनावर ठेवता येणार आहे. या जनावरांची देखभाल राज्य शासन करेल व त्यातून येणा-या उत्पन्नाचा वाटा शेतक-यांना देण्यात येणार असल्याचे श्री.जानकर म्हणाले.
                                            
                                  गेल्या चार वर्षात दूध उत्पादनात विक्रमी वाढ
        राज्यात दुधाचे विक्रमी उत्पादन होत आहे सध्या  दिवसाला १ कोटी ३० लाख लिटर दूध उत्पादन होत आहे. या पूर्वी राज्यात दिवसाला ५७ लाख लिटर दूध उत्पादन होत असे त्यांनी सांगितले. मत्स्य उत्पादनातही ३८ टक्केंनी वाढ झाली आहे. तसेच कुक्कुट पालनातही राज्याने आघाडी घेतली आहे. असे श्री. जानकर यांनी सांगितले.    

000000

    रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 384/  दिनांक २५.१०.२०१८