Thursday 31 May 2018

महाराष्ट्रातील सर्व पर्यटन स्थळांना केंद्र शासन चालना देणार : डॉ. महेश शर्मा




नवी दिल्ली,31 : महाराष्ट्रातील सर्व पर्यटन स्थळांना केंद्र शासन चालना देणार असल्याचे  केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा  आज येथे  म्हणाले.

केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. शर्मा यांनी आज महाराष्ट्र सदनातील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यालयाला भेट दीली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सर्वच पर्यटन स्थळांना केंद्र शासन चालना देणार, असल्याचे श्री शर्मा म्हणाले. यावेळी राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी श्री शर्मा यांचे स्वागत केले.

यावेळी राज्यातील विविध पर्यटन विषयांवर चर्चा झाली. यामध्ये महाराष्ट्रातील किल्ल्यांना पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करता येईल आणि भारतीय पुरात्तत्व विभागाशी कसा समन्वय साधता येईल, यावर चर्चा झाली. यामध्ये येणा-या अडचणींना लवकरात लवकर निकाली काढण्यात येईल, असे श्री शर्मा म्हणाले.

यासह अजिंठा-वेरूळ लेण्यांच्याजवळ इंडो-जपान केंद्र बनिवण्यात आले असून केंद्रच्या सांस्कृतिक विभागाने यासाठी निधी दिलेला आहे. याचा प्रचार-प्रसार कसा करता येईल, याविषयीही यावेळी चर्चा करण्यात आली. याशिवाय स्थानिक कलांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी ही केंद्र शासन प्रयत्न करणार असल्याचे श्री शर्मा यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील पर्यटन विषयावरील निवेदन श्री रावल यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री शर्मा यांना यावेळी दिले.


खान्देशात सैनिक भरती प्रशिक्षण केंद्र असावे : जयकुमार रावल




नवी दिल्ली,31 : खान्देश विभागात सैनिक भरती प्रशिक्षण केंद्र मिळावे, अशी मागणी नंदुरबार जिल्ह्याचे पालक मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना केली.

श्री रावल यांनी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री  सुभाष भामरे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन खान्देशात सैनिक भरती प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबतची मागणी  केली.   

खान्देश हा विभाग आदिवासी बहुल असून या भागात  धुळे, नंदुरबार, जळगाव हे जिल्हे मोडतात. या भागातील तरूणांना रोजगाराच्या संधी  उपलब्ध  यासाठी सैनिक भरती प्रशिक्षण केंद्र मिळावे, अशी मागणी श्री रावल यांनी  श्री भामरे यांच्याकडे केली.  

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री यांनी याबाबत सकारात्मक आश्वासन दिल्याचे श्री रावल यांनी माहिती दिली.

श्री. रावल यांनी आज केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री हंसराज अहीर यांची त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.

घारापुरी बेट व इगतपुरी वेलनेस हब ठरणार पर्यटकांचे आकर्षण -पर्यटनमंत्री जयकुमार रावल






नवी दिल्ली दि. ३१ : रायगड जिल्हयातील प्रसिध्द घारापुरी बेट व नाशिक जिल्हयातील ‘इगतपुरी वेलनेस हब’ ला देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत पोचविण्यासाठी पर्यटन विभाग कार्यरत असून, ही स्थळे पर्यटकांचे खास आकर्षण ठरतील, असा विश्वास राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रात व्यक्त केला.


श्री. रावल यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. उपसंचालक दयानंद कांबळे यांनी श्री. रावल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी झालेल्या अनौपचारिक चर्चे दरम्यान, श्री रावल यांनी पर्यटन विभागाच्यावतीने सुरु असलेल्या उपक्रमांबद्दल माहिती दिली.

घारापुरी बेटांवर ८ जून रोजी पर्यटकांचा महाकुंभ

पर्यटन विभागाच्यावतीने नव-नवीन पर्यटन स्थळे विकसित करून ते जगासमोर मांडण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत निसर्ग सौंदर्याने नटलेल्या घारापुरी बेटाला देश-विदेशातील पर्यटकांसमोर मांडण्यासाठी ८ जून २०१८ रोजी विशेष आयोजन करण्यात आल्याचे श्री. रावल यांनी सांगितले.

राज्यशासनाच्या प्रयत्नाने घारापुरी बेटावर नुकतीच वीज उपलब्ध करून देण्यात आली आहे. पर्यटन विभागाच्यावतीने पर्यटकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बेटावरील जगप्रसिध्द एलिफंटा गुंफा, येथील समुद्र, पहाड, जंगल आदींचा पर्यटकांना आनंद घेता यावा व या बेटांची जागतिक स्तरावर ओळख निर्माण करून देण्यासाठी ‘एअर बीएनबी’ या जगविख्यात कंपनी सोबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सामंजस्य करार केला आहे. याचाच भाग म्हणून ८ जून २०१८ रोजी घारापुरी बेटावर देश -विदेशातील पर्यटकांसाठी पर्यटन मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

इगतपुरी येथे ‘वेलनेस हब’

देश-विदेशातील पर्यटकांना एकाच ठिकाणी आयुर्वेद, युनानी, योगा,रेकी,ॲक्युप्रेशर आदी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक जिल्हयातील इगतपुरी येथे वेलनेस हब उभारण्यात येणार असल्याची माहिती श्री. रावल यांनी दिली. पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने १०० एकरावर हे ‘वेलनेस हब’ उभारण्यात येणार असून यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच केंद्राकडे सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. रावल यांनी वाहिली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना आदरांजली

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त श्री. रावल यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. उपसंचालक दयानंद कांबळे, जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजू निमसरकर–कांबळे, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

000000

सूचना : सोबत छायाचित्रे जोडली आहेत.

रितेश भुयार /वृत्त वि. क्र. २१६/ दिनांक ३१.५.२०१८

रायगडला आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र बनविण्यासाठी महाराष्ट्राची केंद्रासोबत भागीदारी पर्यटन मंत्री जयकुमार रावल




नवी दिल्ली दि. 31 : रायगड किल्ल्याला आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र बनविण्यासाठी महाराष्ट्र शासन केंद्र शासना सोबत भागीदारी करणार असल्याची, माहिती पर्यटन मंत्री जयकुमार श्री रावल यांनी दिली.

श्री रावल यांनी केंद्रीय सांस्कृतिक राज्य मंत्री डॉ. महेश शर्मा यांची भेट घेतली. यावेळी रायगड किल्ल्याला आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र बनविण्यासंदर्भात चर्चा झाली.
महाराष्ट्रातील जनतेसाठी रायगड किल्ला अतिशय महत्वाचा आहे. या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व जगभर मांडण्यासाठी या किल्ल्याचा विकास पर्यटनाच्या दृष्टीने होणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र शासन केंद्र शासना सोबत मिळून काम करणार असल्याचे श्री रावल यांनी सांगितले.
केंद्र शासनाने रायगडच्या नविणीकरणासाठी पहिला टप्प्याचा निधी म्हणुन 60 कोटी रूपयें दिलेले आहेत.  महाराष्ट्रातील  किल्ले हे भारतीय पुरात्तत्व विभागाच्या अंतर्गत येतात. भारतीय पुरात्तत्व विभाग आणि महाराष्ट्र शासन यात सांमज्यस ठेवून रायगड किल्ल्याचा विकास करण्यात येईल, अशी चर्चा आजच्या बैठकीत झाल्याची, माहिती श्री रावल यांनी आज दिली.
औरंगाबाद येथील जगप्रसिद्ध अंजठा-वेरूळ लेण्या बघण्यासाठी देशी-विदेशी  पर्यटक येतात. येथील तिकीट केंद्राची जागा बदलुन हे केंद्र  इंडो-जपान केंद्रात सुरू करण्यात यावे, अशी मागणी आज राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री यांच्याकडे केली.
भारत आणि जपान यांच्या संयुक्त विद्यमाने अंजठा-वेरूळ लेण्यांजवळ इंडो-जपान केंद्र उभारण्यात आलेले आहे. या केंद्रालाही पर्यटकांनी भेटी द्यावे या मागाचा हा उद्देश असल्याचे सांगितले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री यांनी यावर सकारात्मकता दर्शविल्याचे, श्री रावल यांनी सांगितले.
                                                          000000  
सूचना : सोबत छायाचित्रे जोडली आहेत.
वृत्तक्रमांक217अंजूनिमसरकरमाअदिनांक31-05-2018

जागतिक बुध्दिस्ट परिषदेचे औरंगाबादेत आयोजन





नवी दिल्ली, 31 : जगप्रसिध्द अजिंठा व वेरुळ येथे  दिनांक 22 ते 25 आँगस्ट 2018 दरम्यान जागतिक बुध्दिस्ट परिषद होणार असल्याची माहिती  महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री पर्यटन जयकुमार रावल यांनी आज दिली.

येथील परिवहन भवनात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ए.के. अल्फाँस यांची आज श्री रावल यांनी भेट घेतली. बैठकीनंतर श्री रावल यांनी महाराष्ट्रात प्रथमच जागतिक बुध्दिस्ट परिषद होणार असल्याचे सांगितले. ही परिषद यावर्षी  दिनांक 22 ते 25 ऑगस्टला युनोस्कोचा दर्जा प्राप्त असलेल्या औरंगाबाद येथील अंजिठा-वेरूळ लेण्यांच्या ठिकाणी ही जागतिक बुद्धिस्ट परिषद होणार असल्याचे सांगितले.

यापूर्वी जागतिक बुद्धिस्ट परिषद ही उत्तर प्रदेश आणि बिहार येथे होत असे. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांनी महाराष्ट्राला ही संधी प्रथमच मिळाली असल्याचे  श्री रावल म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक बुद्धिस्ट परिषदेसाठी महाराष्ट्राची निवड केल्याबद्दल आभार मानले.

            जागतिक बुद्धिस्ट परिषदेत जगातील बौद्ध राष्ट्रांचे प्रतिनिधीत्व असेल. किमान 25 राष्ट्रे या परिषदेत सहभागी होतील असे रावल यांनी सांगितले. या जागतिक परिषदेनिमित्त महाराष्ट्राला आदरातिथ्य करण्याची संधी मिळेल, यासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याचे ही श्री रावल म्हणाले.
0000
सूचना : सोबत छायाचित्रे जोडली आहेत.
अंजू निमसरकर /वृत्त वि. क्र. 215/ दिनांक 31.05.2018

राजधानीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी












  

नवी दिल्ली दि. ३१ :  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९३ वी जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.
 
कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात अपर निवासी आयुक्त समीर सहाय यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, विजय कायरकर, अजितसिंग नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी  कर्मचा-यांनीही  यावेळी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

महाराष्ट्र परिचय केंद्रात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह यावेळी कार्यालयात उपस्थित अभ्यागत  व  कर्मचा-यांनीही  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. 
                                                           000000  
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. २१४/ दिनांक २८.५.२०१८











Wednesday 30 May 2018

‘पढो परदेश’ अंतर्गत महाराष्ट्रातील २३४ अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना लाभ











   
                 
नवी दिल्ली, दि. ३० : अल्पसंख्याक समाजातील गुणवान विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्जावर सूट देणा-या  केंद्र शासनाच्या पढो परदेश योजनेंतर्गत गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रातील २३४ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे.

        अल्पसंख्याक समाजातील गुणवान विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर शिक्षण, एमफील व पीएचडी हे संशोधनात्मक अभ्यास पूर्ण करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाच्यावतीने पढो परदेश योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत वर्ष २०१४-१५ ते २०१६-१७ या कालावधीत देशभरातील ३६ राज्य व केंद्र शासित प्रदेशातील एकूण ३ हजार ६८७  विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. यात महाराष्ट्रातील २३४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

                           राज्यातील जैन समाजाच्या ९९ विद्यार्थ्यांनी घेतला लाभ                 
परदेशात उच्च शिक्षण घेणा-या महाराष्ट्रातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द ,जैन, पारसी आणि शीख या अल्पसंख्याक समाजातील गुणवान मुला-मुलींना पढो परदेश योजनेंतर्गत शैक्षणिक कर्जाच्या व्याजातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. राज्यात जैन समाजातील सर्वात जास्त ९९  विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. मुस्लिम समाजातील ५३, ख्रिश्चन समाजातील  ४४, शीख समाजातील २३, बौध्द समाजातील ९ तर पारसी समाजातील ६ विद्यार्थ्यांनी  या योजनेचा लाभ घेतला आहे.

पढो परदेश योजनेंतर्गत देशातील अल्पसंख्याक समाजातील  विद्यार्थ्यांनी  पदव्युत्तर शिक्षण, एमफील व पीएचडी हे संशोधनात्मक अभ्यास पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या शैक्षणिक कर्जावरील व्याज केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाच्यावतीने भरण्यात येते. मंत्रालयाच्यावतीने परदेशात शिक्षणासाठी ठरवून दिलेल्या एकूण ४१ विषयांमध्ये उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. वर्ष २००६ मध्ये पढो परदेश योजनेला सुरुवात झाली असून बँक आणि केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयामध्ये या योजनेसंदर्भात झालेल्या सामंजस्य करारानुसार प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येते.          
                                                          000000  


रितेश भुयार /वृत्त वि. क्र. २१३/ दिनांक ३०.५.२०१८

Monday 28 May 2018

मौलाना आझाद शिष्यवृत्तीत महाराष्ट्र तिसरा



नवी दिल्ली दि. २८ : अल्पसंख्यांक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना केंद्र शासनाच्यावतीने देण्यात येणा-या मौलाना आझाद शिष्यवृत्ती अंतर्गत गेल्या चार वर्षात महाराष्ट्रातील २४९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळविली असून देशात राज्याचा  तिसरा क्रमांक आहे.  

            केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालयाच्यावतीने देशातील अल्पसंख्याक समाजाच्या गुणवंत मुला-मुलींसाठी    एमफील व  पीएचडी या संशोधनात्मक अभ्यासक्रमासाठी वर्ष २०१४-१५  ते २०१७-१८ या चार वर्षात ३ हजार २४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. या चार वर्षात महाराष्ट्रातील २४९ अल्प संख्याक विद्यार्थ्यांनी ही  शिष्यवृत्ती मिळविली असून राज्याचा देशात तिसरा क्रमांक आहे. उत्तर प्रदेशातील ४५० विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती  मिळवली असून या राज्याचा देशात पहिला क्रमांक लागतो तर पश्चिम बंगाल मध्ये ३२४ विद्यार्थ्यांनी  शिष्यवृत्ती  मिळविली असून राज्य दुस-या क्रमांकावर आहे .

                                राज्यात मुस्लीम समाजातील १४१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

        मौलाना आझाद शिष्यवृत्ती योजनेंतर्गत राज्यातील बौध्द ,ख्रिश्चन,जैन, मुस्लीम, पारसी, शीख या अल्पसंख्याक समाजातील गुणवंत मुला-मुलींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. राज्यात मुस्लीम समाजातील सर्वात जास्त १४१  विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली, यात  ८६  मुलींचा  तर ५५ मुलांचा समावेश आहे.  बौध्द समाजातील ७८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली असून यात, ४५ मुली व ३३ मुलांचा समावेश आहे. जैन समाजातील ९ मुली व ६ मुले अशा एकूण १५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. ख्रिश्चन समाजातील १० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली, यात ८ मुली व २ मुलांचा समावेश आहे. शीख समाजातील ३ मुली व १ मुलगा अशा चार तर पारसी समाजाच्या एका मुलाला शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे.   
            विद्यापीठ अनुदान आयोगाचे (युजीसी) मानांकन प्राप्त देशातील विद्यापीठ व संस्थामध्ये एमफील व पीएचडी या संशोधनात्मक अभ्यास करणा-या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना मौलाना आझाद शिष्यवृत्ती योजनेंतर्गत संशोधनाच्या ५ वर्षाच्या कालावधीसाठी या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य पुरविण्यात येते.                    
                                                           000000  

रितेश भुयार /वृत्त वि. क्र. २१२/ दिनांक २८.५.२०१८

राजधानीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी







नवी दिल्ली दि. २८ :  थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर  यांची  जयंती आज  महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली . 

कोपरनिकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त राजीव मलिक यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी  कर्मचा-यांनीही  यावेळी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

 महाराष्ट्र परिचय केंद्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन  

            महाराष्ट्र परिचय केंद्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा, माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह यावेळी कार्यालयातील उपस्थित कर्मचा-यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. 
                                                          000000  



Friday 25 May 2018

‘पीएमएसबीवाय’अंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ४५ हजार ११५ विमाधारक










नवी दिल्ली दि. २५ : देशातील गरीब जनतेला अत्यल्प दरात अपघात विमा देणा-या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत (पीएमएसबीवाय) आतापर्यंत देशातील उद्दिष्टित १६ हजार ८५० खेडयांमध्ये २६ लाख ११ हजार ७८७ विमाधारकांची नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रातील उद्दिष्टित १९२ खेडयांमध्ये ४५ हजार ११५ विमा धारकांची नोंद झाली आहे.

        केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या वतीने देशातील गोर-गरीब जनतेला सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल मानल्या जाणारी प्रधानमंत्री  सुरक्षा विमा योजना १ जून २०१५ पासून सुरु करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या योजनेचे उदघाटन केले. योजनेनुसार वार्षिक १२ रूपये इतका प्रीमिअम असून अपघाती मृत्यू झाल्यास विमाधारकाच्या कुटुंबियांस २ लाख रूपये किंवा अपघातात दुखापत झाल्यास उपचारासाठी १ लाख रूपये देण्यात येतात. बँक खाते असणारी १८ ते ७० वयोगटातील व्यक्ती या योजनेस पात्र ठरते. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या ग्राम स्वराज विभागाच्यावतीने या योजनेची अंमलबजाणी सुरु असून मागास खेडयांची यासाठी निवड करण्यात आली आहे. आजपर्यंत देशभरातील उद्दिष्टित २७ राज्य व केंद्र शासित प्रदेशातील १६ हजार ८५० खेडयांमधे या योजनेच्या माध्यमातून  २६ लाख ११ हजार ७८७ लोकांचा विमा उतरविण्यात आला आहे.     
    
              विदर्भात सर्वात जास्त ३२ हजार ६६८ विमाधारक
             ही योजना राबविण्यासाठी  राज्यातील एकूण २३ जिल्हयांतील १९२ खेडयांची निवड करण्यात आली  व पीएमएसबीवाय योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी  सुरु आहे. यानुसार विदर्भातील सर्वच ११ जिल्हयांतील १४०  खेडयांतील ३२ हजार ६६८ लोकांचा विमा उतरविण्यात आला. मराठवाडयातील ७ जिल्हयातील ३९ खेडयांतील ६ हजार ९९२, पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्हयातील ९ खेडयांतील २०९७ लोकांना आणि खान्देशातील दोन जिल्हयातील  ३ हजार३५८ जणांना विमा सुरक्षा देण्यात आली आहे.


                पीएमएसबीवाय योजनेंतर्गत विदर्भात गडचिरोली जिल्हयात सर्वात जास्त विमा उतरविण्यात आला. गडचिरोली जिल्हयातील ८ खेडयांतील १२ हजार २६७ जणांचा विमा उतरविण्यात आला आहे. यासोबत अकोला जिल्हयातील ३४ खेडयांमधील २ हजार ७३६, अमरावती जिल्हयातील २५ खेडयांमधील ८०१ हजार ८९०, भंडारा जिल्हयातील ७ खेडयांतील १ हजार ३१६, बुलडाणा जिल्हयातील २२ खेडयांतील ४ हजार ९८४,चंद्रपूर जिल्हयातील ७ खेडयांतील ४ हजार १५६, नागपूर जिल्हयातील ४ खेडयांतील १हजार ११, गोदिंया जिल्हयातील ३ खेडयांतील ३१९, वाशिम जिल्हयातील १५ खेडयांतील १ हजार ४४१, यवतमाळ जिल्हयातील १३ खेडयांतील १ हजार ११३  आणि वर्धा जिल्हयातील २ खेडयांतील ४३५ जणांचा या योजनेंतर्गत विमा उतरविण्यात आला आहे.
           
                                        मराठवाडयात ६ हजार ९९२ विमाधारक

            या योजनेंतर्गत मराठवाडा विभागात लातूर जिल्हयात सर्वात जास्त १ हजार ६३६ जणांचा वीमा उतरविण्यात आला या जिल्हयातील ७ खेडयांमध्ये ही अंमलबजावणी झाली. औरंगाबाद जिल्हयातील एका खेडयातील ३४१, बीड जिल्हयातील ३ खेडयांतील ५०८, हिंगोली जिल्हयातील ५ खेडयांतील ८०१, उस्मानाबाद जिल्हयातील २ खेडयांतील १ हजार १२५, नांदेड जिल्हयातील २० खेडयांतील १ हजार ६११ आणि जालना जिल्हयातील एका खेडयातील ९७० जणांचा या योजनेंतर्गत विमा उतरविण्यात आला.

                                        पश्चिम महाराष्ट्रात २ हजार ९७ विमाधारक
        पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हयात या योजनेंतर्गत सर्वात जास्त १ हजार १३५ जणांचा विमा उतरविण्यात आला आहे, या जिल्हयात एकूण ७ खेडयांमध्ये ही योजना राबविण्यात आली.  तसेच सातारा जिल्हयातील एका खेडयात ५६५ व कोल्हापूर जिल्हयातील एका खेडयात ३९७  जणांचा या योजनेंतर्गत विमा उतरविण्यात आला आहे .

              खान्देश विभागात अहमदनगर जिल्हयात सर्वात जास्त २ हजार ७२९ जणांचा वीमा उतरविण्यात आला या जिल्हयातील ३ खेडयांमध्ये ही अंमलबजावणी झाली. जळगाव जिल्हयातील एका खेडयामध्ये या योजनेंतर्गत  ६२९ जणांचा वीमा उतरविण्यात आला आहे.                                                                                         
                              000000  

आम्हाला ट्विटर वर फॉलो करा  http://twitter.com/micnewdelhi

रितेश भुयार/वृत्त वि.क्र.२०९/दिनांक २५.५.२०१८

सर्वाधिक आंतर-जातीय विवाह महाराष्ट्रात




वर्ष 2012-17 पर्यंत 20,475 विवाह

नवी दिल्ली 25 : जाती भेदाच्या भिंती पुसट करण्यासाठी आंतर-जातीय विवाह हे एक महत्वपूर्ण माध्यम असून महाराष्ट्रात वर्ष 2012-13 ते 2016-17 या कालावधीत सर्वाधिक 20,475  आंतर जातीय विवाह महाराष्ट्रामध्ये झाले आहेत.

      केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे आंतर-जातीय विवाह करणा-या जोडप्यांचे नवीन आयुष्य सुलभ व सुकर होण्यासाठी आर्थिक सहायता पुरविली जाते. यामध्ये मुलगा अथवा मुलगी दोघांपैकी एक अनुसूचित जातीचे असणे आवश्यक आहे. ही आर्थिक मदत नागरी हक्कांचे संरक्षण याअतंर्गत प्रदान करण्यात येते.
वर्ष 2012 - 13 मध्ये महाराष्ट्रात एकूण 4,682 आंतर जातीय विवाह झालेले आहेत. वर्ष 2013-14 मध्ये 4971,  वर्ष 2014-15 या वर्षात 4283, वर्ष 2015-16 मध्ये 3405, विवाह तर वर्ष 2016-17 मध्ये 3134 इतके आंतर-जातीय विवाह संपन्न झाले आहेत. वर्ष 2012 ते 17 मध्ये एकूण 20,475 आंतर जातीय विवाह महाराष्ट्रात  झालेले आहेत.

      महाराष्ट्र पाठोपाठ केरळ या राज्यात आंतर-जातीय विवाह जास्त झाले आहेत. वर्ष 2012-13  मध्ये 2189, वर्ष 2013-14 मध्ये 2184, वर्ष 2015-16 मध्ये 2131, वर्ष 2015-16 मध्ये 1790, वर्ष 2016-17 मध्ये 1466 अशे आंतर जातीय विवाह झालेले आहेत. वर्ष 2012 ते 17 मध्ये एकूण 9,760 आंतर जातीय विवाह झाले आहेत.

आंतर-जातीय विवाह झाल्यावर सबंधित नव दांपत्याने त्यांच्या जिल्ह्यातील स्थानिक समाज कल्याण कार्यालयात लग्नाच्या प्रमाणपत्रासह अनुसूचित जातीचे आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास शासनाकडून निर्धारित केलेला निधी त्यांना दिला जातो.
वर्ष 2006 पासून केंद्राकडून 50 हजार रूपये रकमेची आर्थिक मदत नवविवाहितांनाकेली जाते. ही मदत रक्कम वाढवून 2017-18 मध्ये केंद्र शासनाने 1 लाख 25 हजार रूपये केलेली आहे. राज्य सरकारांनी 1 लाख 25 हजार रूपये एवढा निधी अथवा त्यापेक्षा अधिक निधी दिल्यास केंद्र शासनाची हरकत नाही. नवोदित विवाहीतांनी त्यांच्या आयुष्याची सुरूवात आनंदाने करावी आणि समाजात समता निर्माण व्हावी, हा या मागचा मुख्य उद्देश आहे.