Saturday, 16 April 2016

दिल्लीतील सफल केंद्राप्रमाणे राज्यात विक्री केंद्र उभारणार : चंद्रकांत पाटील












नवी दिल्ली दि. १६ : दिल्ली व परिसरात शेतक-यांसाठी सफल फळे व भाजीपाला विक्री केंद्रे फायद्याची ठरली आहेत, अशी विक्री केंद्रे महाराष्ट्रात सुरु करण्यात येतील. यासंदर्भात राष्ट्रीय डेअरी विकास मंडळासोबत (एनडीडीबी) सामंजस्य करार करण्यात येईल, अशी माहिती सहकार व पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.  
            येथील मंगोलपुरी भागातील सफल प्रक्रिया व  वितरण  केंद्राला श्री. पाटील यांनी आज भेट दिली. यावेळी मदर डेअरी फ्रुट एण्ड व्हेजीटेबल्स प्रा. लि. चे कार्यकारी संचालक शिवनागराजन, संचालक जगदीश राव, राज्याच्या पणन मंडळाचे कार्यकारी संचालक मिलिंद आकरे उपस्थित होते.  
श्री. पाटील यांनी राष्ट्रीय डेअरी विकास महामंडळाने सुरु केलेल्या सफल वितरण केंद्राच्या माध्यमातून विक्री करण्यात येणारा भाजीपाला ळांच्या वितरण व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी करून एनडीडीबी आणि सफलच्या अधिका-यांकडून माहिती जाणून घेतली. दिल्ली व परिसरात सफलची ४०० हून अधिक  किरकोळ विक्री केंद्र आहेत. सफल केंद्राच्या माध्यमातून दररोज ३५० टनांहून अधिक फळे, गोठवलेल्या भाज्या, भाजीपाला, फळांचे रस इत्यादी प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून स्थानिक व परदेशी बाजारपेठेत विकले जातात. लगतच्या राज्यात प्रशिक्षीत शेतकरी गट सफलने दिलेल्या वेळापत्रकानुसार दर्जेदार भाजीपाला व फळे पिकवतात. त्यामुळे शेतक-यांना खात्रीची बाजारपेठ मिळते आणि कोणताही मध्यस्थ नसल्यामुळे थेट विक्रीचे सर्व लाभ शेतक-यांना मिळतात.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर फळे भाजीपाला पिकवला जातो. राज्याच्या पणन कायद्यात सुधारणा करुन शेतमालाच्या थेट विक्रीला परवानगी दिलेली असली तरी खात्रीची व्यवस्था राज्यात नसल्यामुळे बहुतांश शेतकरी मध्यस्थांमार्फतच शेतमाल विकतात. हि परिस्थिती बदलवून राज्यात शेतकरी आणि ग्राहकांच्या फायद्याची सक्षम विक्री व्यवस्था निर्माण करण्यासाठी  श्री. पाटील यांनी स्वत: पुढाकार घेऊन राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाने शेतक-यांच्या हिताच्यादृष्टीने सुरू केलेल्या सफल  विक्री केंद्राच्या धर्तीवर राज्यात सफल वितरण व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने पावले उचलली. याचाच भाग म्हणून श्री. पाटील यांनी येथील सफल केंद्राला भेट देऊन दिल्ली शहराला वितरीत करण्यात येणारी  फळे व भाजीपाला वितरण व्यवस्थेची पाहणी  केली.

         000000

No comments:

Post a Comment