Tuesday, 5 April 2016

पाणी बचतीसाठी राज्य शासन धोरण आखणार : विजय शिवतारे




                                                             
                                                               
नवी दिल्ली, दि. ०५ : पावसाची अनियमितता, मर्यादित जलसाठे आणि पाण्याच्या वाढत्या गरजा लक्षात घेता महाराष्ट्र शासन पाणी बचतीसाठी  धोरण तयार करीत असल्याची माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.
            केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाच्यावतीने प्रगती मैदान येथे आयोजितचौथ्या भारत जल सप्ताहात आज जल साक्षरता विषयावरीलपरिसंवादात श्री. शिवतारे बोलत होते. अध्यक्षस्थानी जलतज्ज्ञ माधव चितळे होते, तर राष्ट्रीय जल अकादमीचे मुख्य अभियंता एस. के. श्रीवास्तव यावेळी उपस्थित होते.     
            श्री. शिवतारे म्हणाले, जल साक्षरतेसाठी जलसंस्काराची गरज आहे. मुलांवर प्राथमिक शिक्षणातच जल संस्कार झाले पाहीजेत. मुंबई महानगर पालिकांच्या शाळांमधे असा प्रयोग सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. प्राथमिक शिक्षणातूनच मुलांवर जलसंस्कार होण्याच्या दिशेने  राज्य शासन योजना आखत असल्याचे ते म्हणाले. सरकार, प्रशासन आणि जनता यांच्यातील उत्तम समन्वयानेच जलसाक्षरतेचे ध्येय गाठता येईल असा विश्वास श्री. शिवतारे यांनी व्यक्त केला. राज्य शासनाने नुकतेच जल जागृती सप्ताहाच्या माध्यमातून राज्यभर मोठया प्रमाणात अभियान राबविले आहे, त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत.
            निसर्गाच्या असंतुलनामुळे पावसाची अनियमितता निर्माण झाली आहे. उपलब्ध पाण्याचे साठेही मर्यादित आहेत.  दुसरीकडे लोकसंख्या आणि नागरीकरणाचा वेग वाढत आहे. त्यामुळे शेतीला पाणी पुरविण्याच्या उद्देशाने बांधण्यात आलेल्या धरणातील पाण्याचा उपयोग पिण्याच्या गरजेसाठी होत आहे. अशा स्थितीत धरणांच्या परिसरात मोठया प्रमाणात बंधारे बांधून पिण्याच्या पाण्याची गरज भागविणे आणि जमीनीतील पाण्याची पातळी वाढविण्याची गरज लक्षात घेऊन याकामी शाश्वत नियोजनाची आवश्यकता आहे. या दिशेने राज्य शासन योजना आखत आहे. एखाद्या जिल्हयात विविध तालुक्यांतील पिकांच्या आवश्यकतेनुसार पाणी वाटप होण्याची गरज असल्याचे सागंत या दिशेने पाणी व्यवस्थापनासाठी शासनाने काम सुरु केले आहे. मर्यादित जल साठे पाहता पाण्याचा प्रभावी पुनरवापर करण्याच्या दिशेनेही काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र दालनास इस्त्रायलच्या कृषीमंत्र्यांनी दिली भेट
इस्त्रायलचे कृषीमंत्री युरी येरीयल यांनी भारत जलसप्ताहात उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र दालनास भेट दिली. श्री. विजय शिवतारे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. केंद्रीय जलसंपदा राज्यमंत्री सांवरलाल जाट आणि भारतातील इस्त्रायलचे राजदूत डॅनील कॅर्मोन उपस्थित होते. श्री. शिवतारे यांनी यावेळी महाराष्ट्रात असलेले विविध सिंचन प्रकल्प, सिंचन निर्मिती क्षेत्रात वापरण्यात येणा-या आधुनिक संकल्पना आणि शासनाच्यावतीने जलसंरक्षण व जलस्तरातील वाढीसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
 श्री. शिवतारे यांनी दुपारच्या सत्रात उपसा सिंचनावर संशोधन निबंधही सादर केला. राज्यात उपसा सिंचनाची आवश्यकता, मोठया उपसा सिंचन योजनांसमोरील आव्हाने यांची माहिती देत त्यांनी यावेळी महत्वपूर्ण शिफारशी मांडल्या.

                                                                        00000000

No comments:

Post a Comment