Sunday 1 May 2016

‘महाराष्ट्र दिन समारोहा’चा बहारदार समारोप






नवी दिल्ली, ०१: पाश्चिमात्य ढंगातील पण भारतीय संदर्भाने नटलेल्या लयपश्चिमाआणि बालगंर्धवांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित देणे गंधर्वांचेया बहारदार कार्यक्रमांच्या सादरीकरणाने राजधानीत महाराष्ट्र दिन समारोहाची सांगता झाली.

            या सांगता समारोहास लोकसभा अध्यक्ष सुमीत्रा महाजन, केंद्रीय वने व पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर, खासदार डॉ. नरेंद्र जाधव आणि प्रसिध्द शिल्पकार पद्मभूषण राम सुतार, सार्वजनिक उत्सव समितीचे रा.मो.हेजीब आदी मान्यवर उपस्थित होते.

            कार्यक्रमाची सुरुवात पुणे येथील बालगंधर्व संगीत रसिक मंडळाच्या गायकांनी सादर केलेल्या ‘..प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा..’ या महाराष्ट्र गिताने झाली. यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

                    डॉ. आशुतोष जावडेकर यांच्या लयपश्चिमाया कार्यक्रमाने उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला. या कार्यक्रमात त्यांनी  कंट्री , पॉप, रॉक, जाझ अशा पाश्चिमात्य संगित प्रकाराची गाणी आणि या गाण्यांचे भारतीय विशेषत: मराठी गीतांशी असलेले संदर्भ उलगडून दाखवले. गप्पा, गाणी आणि अभिवाचन अशा वैविद्यपूर्ण छटांतून डॉ. जावडेकर यांनी उपस्थितांना आगळी -वेगळी संगीत मेजवानी दिली.
            या कार्यक्रमा नंतर श्रीमती सुमीत्रा महाजन आणि श्री. प्रकाश जावडेकर यांनी उपस्थितांनी संबोधित करून महाराष्ट्र दिन समारोहा सारख्या आयोनातून महाराष्ट्राबाहेर मराठीची सांस्कृतिक चळवळ जपली जात असल्याचे गौरवोदगार काढले.
   
               या नंतर सादर झालेल्या बालगंधर्वांच्या जीवनातील हृद्य प्रसंगांवर आधारित देणे गंधर्वांचे या नाटयगीतांच्या कार्यक्रमानेही उपस्थितांना मंत्र मुग्ध केले. गायिका बकुल पंडीत, अस्मिता चिंचाळकर, कविता टिकेकर आणि गायक सुरेश साखवळकर, रविन्द्र कुलकर्णी यांच्या सुरेल सुरांनी या कार्यक्रमाला वेगळी रंगत आली.  

            सार्वजनिक उत्सव समिती, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि महाराष्ट्र परिचय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिन समारोह २०१६ चे दिनांक ३० एप्रिल आणि १ मे रोजी आयोजन करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या  समारोहात वैविद्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता.

*********


No comments:

Post a Comment