Tuesday 24 May 2016

‘नीट’च्या अध्यादेशावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी: महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांना यश


नवी दिल्ली दि. २४ : राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय पात्रता प्रवेश परीक्षेच्या(नीट)अध्यादेशावर मंगळवारी  राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वाक्षरी केली. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना नीट मधून यावर्षी सवलत मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता.
        महाराष्ट्रासह विविध राज्यांकडून यंदा नीट मधून सवलत देण्याबाबत वाढती मागणी पाहता केंद्र शासनाने याबाबत अध्यादेश काढून संमतीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवला. मात्र, राष्ट्रपतींनी अध्यादेशाबाबत आणखी माहिती आणि स्पष्टीकरण मागितले होते. केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांनी सोमवारी राष्ट्रपतींची भेट घेऊन नीटबाबत राज्यांच्या विरोधाची कारणे व अध्यादेशाची आवश्यकता  याची माहिती त्यांना दिली. देशाच्या महाधिवक्त्यांनी राष्ट्रपतींना नीटबाबत कायदेशीर बाजू समजावून सांगितली. अखेर आज सकाळी राष्ट्रपतींनी नीटच्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली. या अध्यादेशामुळे राज्यात यंदा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रवेश  सामाईक प्रवेश प्रक्रिया (सीईटी)नुसार होतील आणि  विद्यार्थ्यांना यावर्षी नीट मधून  सवलत मिळणार आहे.
  
           राज्यातील विद्यार्थ्यांना यावर्षी नीट मधून सवलत देण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन भूमिका मांडली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने नीट राबविण्याबाबत आयोजित सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सर्वोच्च न्यायालयाने नीटबाबत दिलेल्या निकालाचा पुनरविचार करून वर्ष २०१६ करिता राज्यांना नीटमधून सवतल दयावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली होती. तत्पूर्वी २ मे २०१६ रोजी महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून नीट मधून सवलत मिळण्याची मागणी  केली होती, विनोद तावडे  यावेळी सर्वोच्च न्यायालयात उपस्थित होते. केंद्रातील विविध मंत्र्यासोबत त्यांनी या संदर्भात भक्कम पाठपुरावा केला. अखेर राज्य शासनाच्या या प्रयत्नांना यश मिळाले असून केंद्र सरकारने नीट बाबत काढलेल्या अध्यादेशाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली.
                                                                

No comments:

Post a Comment