Monday, 30 May 2016

चंद्रपूरमधून सीईपीआय निर्बंध उठवले ; नव्या गुंतवणुकीसाठी मार्ग मोकळा




नवी दिल्ली दि. ३० : केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल मंत्रालयाने चंद्रपूरमधील एमआयडीसी, घुग्गुस,बल्लारपूर,टडाली येथील व्यापक पर्यावरण प्रदूषण निर्देशांका(सीईपीआय)नुसार घालण्यात आलेले निर्बंध उठवले आहेत.त्यामुळे गेल्या ५ वर्षांपासून या भागात रखडलेल्या नव्या गुंतवणूकीचा मार्ग मोकळा झाला आहे.  

        मंत्रालयाने या संदर्भात २० मे २०१६ रोजी एक प्रपत्र काढले आहे. १३ जानेवारी २०१० मधे देशात ४३ सीईपीआय क्षेत्रांमधे  असे निर्बंध लावण्यात आले होते. महाराष्ट्रातील चंद्रपूर भागात लावण्यात आलेल्या या निर्बंधाअंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च २०१६ या कालावधीत गंभीर प्रदुषीत भागांचा(सीपीए) निरीक्षण व अभ्यास करण्यात आला. वर्ष २०१३ मधे सीईपीआय आकडा ८१.९३ एवढा होता त्यात आता घट होऊन हा आकडा ७० च्याही खाली गेला आहे. त्यानुसार सीईपीआयच्या आकडयांची समीक्षा करण्यात आली. अभ्यास समितीने या संदर्भातील आपला अहवाल  १८ एप्रिल २०१६ रोजी  केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल मंत्रालयाला सोपवला.

            सीईपीआयच्या आकडयांचे पुनरमुल्यांकन आणि पर्यावरण गुणवत्ता सुधारासाठी तयार करण्यात आलेल्या योजनेसाठी लागणारा वेळ लक्षात घेता चंद्रपूरभागात सीईपीआय नुसार लावण्यात आलेले निर्बंध उठविण्याचा निर्णय घेण्यात आला. हे निर्बंध काही अटी व शर्तींच्या अधिन राहून उठविण्यात आले आहेत.
                                                           000000   

No comments:

Post a Comment