Monday 28 November 2016

राज्यातील दोन रेल्वे मार्गाच्या निधीच्या तरतुदीस मंजुरी : महादेव जानकर








                                                                        
नवी दिल्ली, २८ : राज्यातील फलटण ते पंढरपूर आणि आष्टी-जामखेड-ढवळस या रेल्वे मार्गांच्या निधीच्या तरतुदीस केंद्र शासनाच्या आगामी अर्थसंकल्पात समावेश करण्यास मंजुरी मिळाल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध आणि मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी  सोमवारी दिली.  
            श्री. जानकर यांनी आज रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांची रेल्वे भवन येथे भेट घेतली. यावेळी रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि पंढरपूर-लोणंद रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. सोमनाथ वाघमोडे, महेश डोंगरे उपस्थित होते. यावेळी झालेल्या बैठकीतफलटण ते पंढरपूरआणिआष्टी-जामखेड-ढवळस रेल्वे मार्गासाठी निधीच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली. तसेच, सोलापूर जिल्हयातील कुर्डूवाडी येथील आर.पी.एफ ट्रेनिंग सेंटरचे स्थलांतर होणार नसल्याची ग्वाही रेल्वे मंत्र्यांनी दिली.  
            श्री. जानकर यांनी सांगितले, लोणंद ते पंढरपूर  रेल्वे मार्गाचे २००८ मध्ये फेर सर्वेक्षण होऊन लोणंद ते पंढरपूर रेल्वे मार्गासाठी आर्थिक तरतूदीस मंजुरी मिळाली होती. उर्वरित फलटण ते पंढरपूर रेल्वे मार्गाच्या कामासाठी ४०० कोटी खर्च अपेक्षित आहे. आजच्या बैठकीत रेल्वे मंत्र्यांनी फलटण ते पंढरपूर मार्गासाठी २०१७-१८च्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी मान्य केली .  
             मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा आणि शेतक-यांना महत्वाचा ठरणारा आष्टी-जामखेड-ढवळस(कुर्डूवाडी) या नवीन रेल्वे मार्गाच्या कामासाठी ५० कोटींच्या निधीसाठी आगामी अर्थसंकल्पात मंजुरी दिल्याचे श्री. जानकर यांनी सांगितले. या उभय प्रकल्पांसाठी केंद्र शासनाच्यावतीने ५० टक्केंचा निधी उपलब्ध होणार असून उर्वरित ५० टक्के निधी राज्य शासन उपलब्ध करून देणार आहे.  
 सोलापूर जिल्हयातील माढा तालुक्यातील कुर्डूवाडी  येथील आर.पी.एफ. ट्रेनिंग सेंटरचे स्थलांतरण रोखण्याच्या मागणीस रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली. तसेच, या कार्यशाळेच्या सुविधा वाढविण्यासाठी रेल्वे मंत्रालय आवश्यक मदत देणार असल्याचे आश्वासन श्री. प्रभु यांनी दिल्याचे श्री. जानकर यांनी सांगितले. 

                                                           …….*…….. 

No comments:

Post a Comment