Monday, 14 November 2016

डिजीटल महाराष्ट्र दालनाचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन




नवी दिल्ली दि. 14 : डिजीटल महाराष्ट्र दालनाच्या माध्यमातून देश-विदेशातील जनतेला महाराष्ट्राच्या उद्योग, तंत्रज्ञान व दळणवळण क्षेत्रातील प्रगतीची माहिती मिळणार असल्याचा विश्वास राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. 
प्रगती मैदान येथे आजपासून सुरु झालेल्या 36व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात श्री. सुभाष देसाई यांच्या हस्ते एका शानदार कार्यक्रमात डिजीटल महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन झाले. उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, खादी व ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष विशाल चोरडिया, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्वा चंद्रा, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजीराव दौंड, खादी व ग्रामोद्योग महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रिचा बागला, सचिव तथा महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आभा शुक्ला, राजशिष्टाचार व गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र यावेळी उपस्थित होते.
श्री देसाई म्हणाले, महाराष्ट्र दालनामध्ये ग्रामपंचायतींना इंटरनेटच्या माध्यमातून जोडणारी ई-चावडी, भूमापनासाठी वापरण्यात येणारी ई-मोजणी, राज्याची वनसंपदा व उद्योग क्षेत्रासह दळणवळण क्षेत्रातील प्रगती दर्शविणारी आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात झालेली परदेशी गुंतवणूक व या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेला रोजगार हे डिजीटल स्वरुपात ठळकपणे दर्शविण्यात आले आहे. शासकीय कामकाज पारदर्शी व जलद गतीने होण्यासाठी राज्य सरकार राबवित असलेली  आपले सरकार ही संकल्पना तसेच, राज्यातील स्मार्ट सिटी प्रकल्पाची  माहिती डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करुन  मांडण्यात आली आहे. या मांडणीमुळे महाराष्ट्र दालनास भेट देणा-या देश विदेशातील ग्राहक व जनतेला डिजीटल महाराष्ट्राची  ओळख होणार आहे.
            राज्य शासनाने 14 हस्तकलांसाठी समूह विकास योजना सुरु केली असून या माध्यमातून हस्तकलाकारांच्या वस्तुंना जागतिक स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. राज्य शासनाच्या उद्योग विषयक विविध योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली .
डिजीटल महाराष्ट्र सीडी व पुस्तिकेचे  विमोचन
उद्योग मंत्री सुभाष देसाई व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी महाराष्ट्राची डिजीटल क्षेत्रातील प्रगती दर्शविणारी सीडी व माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.    
दरम्यान, येथील हंसध्वनी सभागृहात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते 36व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे थाटात उदघाटन झाले. यावर्षीच्या भारत आंतरराष्ट्रीय मेळाव्यात देश-विदेशातील ७००० कंपनी सहभागी झाल्या आहेत. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेसह २४ देशांच्या एकूण २४० कंपन्यांचे उत्पादन येथे विक्री व प्रदर्शनासाठी लावण्यात आल्या  आहेत. डिजीटल इंडिया ही  मेळाव्याची मुख्य संकल्पना असून दक्षिण कोरिया हा मेळाव्याचा भागीदार देश आहे. बेलारूस हा फोकस देश आहे. हरियाणा हे फोकस राज्य असून मध्यप्रदेश आणि झारखंड ही भागीदार राज्य आहेत. दिनांक १४ ते १८ नोव्हेंबर पर्यंत केवळ व्यापारी वर्गासाठी हा मेळावा खुला राहणार आहे. १९ नोव्हेंबर पासून सर्वसामान्य जनतेसाठी मेळावा खुला होईल. सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत या मेळाव्यात प्रवेश मिळणार आहे.         



No comments:

Post a Comment