नवी दिल्ली, दि. ०६ : मुंबई येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या
सिमाक्षेत्रापासून १०० मीटर ते ४ कि.मी. पर्यंतचे क्षेत्र हे पर्यावरण संवेदनशील
क्षेत्र गणले जाईल अशी माहिती केंद्रीय पर्यावरण व वने मंत्री अनिल दवे यांनी
दिली. या निर्णयामुळे या परिसरातील मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्प व इतर विकास
प्रकल्पांना चालना मिळणार आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातील एकूण
५९.४६ चौ.कि.मी एवढे क्षेत्र हे पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून अधिसूचीत
करण्यात आले होते. या राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ १०३.६८ चौ. कि.मी. इतके
आहे. यापैकी ४४.४४ चौ. कि.मी क्षेत्र
मुंबई जिल्हयात तर उर्वरीत ५९.२४ चौ. कि.मी. हे क्षेत्र ठाणे जिल्हयांतर्गत येत
आहे. या राष्ट्रीय उद्यानाच्या सिमेपासूनचे एकूण ५९.४६ चौ. कि.मी. हे क्षेत्र पर्यावरण
संवेदनशील क्षेत्र आहे पैकी १९.२५ चौ.कि.मी. हे वनक्षेत्र आहे तर ४०.२१ चौ. कि.मी.
वन विरहीत क्षेत्र आहे.यामुळे या क्षेत्रात कोणतेही विकास प्रकल्प राबविणे शक्य
नव्हते. या संदर्भात लोकप्रतिनिधी, मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन, मुंबई महानगर
पालिका, विविध संस्था आदींनी पर्यावरण मंत्रालयाकडे निवेदन सादर करून पर्यावरण
संवेदनशील क्षेत्राबाबत फेरविचार करण्यात यावा अशी विनंती केली होती. सर्वोच्च
न्यायालयानेही पर्यावरण मंत्रालयाने या संदर्भात सर्वसमावेशक विचार करून अंतिम
अधिसूचना काढण्याचे निर्देश दिले होते.
मंत्रालयाला विविध क्षेत्रातून प्राप्त सूचना,
या राष्ट्रीय उद्यान परिसरातील जैव विविधतेचे संरक्षण, वन्यजीव आणि मानवी वस्ती
यातील संघर्ष टाळणे आदी बाबींचा सखोल विचार करून दिनांक ५ डिसेंबर २०१६ ला अंतिम
अधिसूचना काढण्यात आल्याचे श्री. दवे यांनी सांगितले.उद्यानाच्या सीमाक्षेत्रापासून
१०० मीटर ते ४ कि.मी. पर्यंतचे क्षेत्र त्या-त्या भौगोलिक परिस्थितीनुसार पर्यावरण
संवेदनशील क्षेत्र म्हणून निर्धारीत करण्यात आले आहे.
मुंबई मेट्रो रेल्वे शेड उभारणीचा मार्ग मोकळा
या अधिसूचनेमुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
परिसरातील १.६५ चौ.कि.मी क्षेत्रावर मुंबई मेट्रो रेल्वेला शेड उभारता येणार आहे. यामुळे
या भागात आता मेट्रो रेल्वेच्या कामांना गती येणार आहे.
वन्यजीव
संरक्षणासाठी कुंपन उभारणार
या राष्ट्रीय उद्यान परिसरात मोठया प्रमाणात असलेले
बिबटे आणि अन्य वन्य जीव तसेच
जैवविवधेतेचे संरक्षण करण्यासाठी
उंच भिंतीसह कुंपन उभारण्यात येणार आहे. यामुळे मानवी वस्ती शेजारील या
वन्य प्राण्यांना संरक्षण मिळणार असून वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील संघर्षही
थांबणार आहे.
००००००
No comments:
Post a Comment