Sunday, 22 January 2017

प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ सज्ज





 नवी दिल्ली, 22 जानेवारी : महाराष्ट्र राज्याच्यावतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या व्यक्तीमत्वावर आधारीत चित्ररथ यावर्षी राजपथावरील प्रजासत्ताक दिनी होणा-या पथसंचलनासाठी सज्ज झाला आहे. चित्ररथात सहभागी होणा-या कलाकारांनी कसून सराव केला आहे. चित्ररथाची बांधणीही पूर्ण झाली आहे.
 महाराष्ट्रासह 17 राज्यांचे आणि 6 केंद्रीय मंत्रालयांचे असे एकूण 23 चित्ररथ राजपथावरील पथसंचलनात सहभागी होणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी धनंजय मोहंती यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले. प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणा-या पथसंचलनातील सहभागी विविध राज्य आणि मंत्रालयांच्या चित्ररथांच्या सज्जतेबाबत माहिती देण्यासाठी दिल्ली कॅन्टॉनमेंट भागातील रंगशाळा शिबीरात संरक्षण मंत्रालयाच्या वतीने आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.                    
दरवर्षी राजपथावर 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात भारत देशाच्या विविध राज्यांची संस्कृती व वैशिष्टये दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची परंपरा आहे. पथसंचलानात बहुतांश वेळा महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमाकांने गौरविण्यात आले आहे. हीच गौरवशाली परंपरा कायम ठेवत यावर्षी महाराष्ट्राच्यावतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे व्यक्तीमत्व दर्शविणारा चित्ररथ राजपथावर प्रदर्शित होणार आहे. लोकमान्य टिळकांच्या 160 व्या जयंती निमित्त या चित्ररथाच्या माध्यमातून देशवासियांना  टिळकांचे बहुआयामी व्यक्तीमत्व आणि स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे योगदान दर्शविण्यात येणार आहे. भारत देश पारतंत्र्यात असताना लोकमान्य टिळकांनी मराठाकेसरीवृत्तपत्रातून केलेली सामाजिक जागृकता आणि ब्रिटीशांना दिलेले सडेतोड उत्तर, छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि गणेशोत्सव सुरु करून भारतीयांना संघटीत करण्याचे केलेले कार्य, टिळकांवर चालविण्यात आलेले खटले, शिक्षण, शारीरिक शिक्षणाला दिलेले प्रोत्साहन आदीं बाबींना या चित्ररथाच्या माध्यमातून दर्शविण्यात येणार आहे.
   चित्ररथाचे संकल्पनाचित्र तसेच त्रिमिती प्रतिकृती प्रसिध्द कला दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे यांनी तयार केले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली एकूण 40 कारागीरांनी अतिशय देखना चित्ररथ उभारला आहे. चित्ररथाच्या प्रारंभी लोकमान्य टिळकांचा 15 फुट उंचीचा पुतळा असून ते अग्रलेख लिहीताना दर्शविण्यात आले आहेत. पुतळयाच्या मागे एक प्रिंटीग प्रेस दर्शविण्यात आली असून 1919 मध्ये लो. टिळकांनी लंडनहून मागविलेली डबल फिल्टर प्रिटींग मशीन व त्यातून छपाई होणारे केसरीमराठा वृत्तपत्र दर्शविण्यात आले आहे. चित्ररथाच्या मध्यभागी फिरते मंदिर दर्शविण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपती  मुर्तीची स्थापना करतानाचे दृष्य दर्शविण्यात आले आहे. चित्ररथाच्या उजव्या आणि डाव्या बाजुला बंगालच्या फाळणीनंतर लो.टिळकांवर चालविण्यात आलेला मुंबई उच्च न्यायालयातील खटला आणि मंडाले येथील तुरुंगवास दर्शविण्यात आला आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात मल्लखांब आणि कुस्तीकरणारे मुले  प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करताना दर्शविण्यात आले आहेत. लो. टिळकांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान अधोरेखित करण्यासाठी बाकावर बसलेला शाळकरी मुलगा व मुलगी दर्शविण्यात आली आहेत.  
       स्वराज्य हा माझा जन्म सिध्द हक्क आहे आणि तो मी मिळविणारच ही लो. टिळकांची उदघोषणा चित्ररथावर ऐकायला मिळणार आहे. या चित्ररथाच्या  दोन्ही बाजुला पयल नमन हो करितो वंदन, तुम्ही ऐका हो गुणीजन , मी करितो कथन.. या गितावर नृत्य करणारे कलाकार राजपथावर दिसणार आहेत. रायगड जिल्हयातील उरण येथील रुद्राक्ष ग्रुपच्या 28  कलाकारांचा चमू राजपथावर सादरीकरण करणार असून आज या चमूने येथे नृत्याचे सादरीकरण दिले. मुंबईतील दादर येथील श्री समर्थव्यायाम मंदीराचे ३ क्रिडापटु चित्ररथावरील मल्लखांब आणि कुस्तीचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत त्यांनीही आज सादरीकरण केले.     
महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने दिल्लीतील राजपथावर राज्याचे वैशिष्टय दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची दीर्घ परंपरा आहे. 1980 मध्ये शिवराज्याभिषेक या चित्ररथास, 1983 मध्ये बैल पोळा या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला. यानंतर 1993 ते 1995 असा सलग 3 वर्ष प्रथम क्रमांकाचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. 2015 मध्ये प्रदर्शित पंढरीची वारी या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला ही उल्लेखनीय बाब आहे.                            
                                                                *****

No comments:

Post a Comment