Saturday 28 January 2017

महाराष्ट्राच्या चित्ररथाला तिस-या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान











नवी दिल्ली, 28 : लोकमान्य टिळकांच्या योगदानावर आधारित`बाळ गंगाधर टिळकया महाराष्ट्राच्या चित्ररथाला शनिवारी सर्वोत्तम पथसंचलनाचा तिस-या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या हस्‍ते शनिवारी महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य  विभागाचे  उपसचिव संजय भोकरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.   

            कँन्टॉनमेंट बोर्डाच्या रंगशाला सभागृहात एका शानदार समारंभात प्रजासत्ताक दिनी पार पडलेल्या पथ संचलनातील चित्ररथ पुरस्कार विजेत्या राज्यांना श्री.भामरे यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. लोकमान्य टिळकांच्या 160 व्या जयंती निमित्त महाराष्ट्र राज्याच्यावतीने यावर्षी टिळकांच्या जीवनावर आधारीत 'लोकमान्य बाळ गंगाधर टिळक' हा चित्ररथ सादर करण्यात आला होता.  
शुक्रवारी उशिरा रात्री संरक्षण मंत्रालयाच्यावतीने राजपथावरील चित्ररथ पथसंचलनाचा निकाल जाहीर करण्यात आला.  अरूणाचल प्रदेशला  प्रथम, त्रिपुरा ला द्वितीय तर महाराष्ट्राला तिस-या क्रमांकाचा  पुरस्कार जाहीर झाला .

महाराष्ट्राच्यावतीने श्री. भोकरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. महाराष्ट्रासह अरूणाच प्रदेशला प्रथम तर त्रिपुराला  द्वितीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.  अरूणाचल प्रदेशच्या वतीने राजपथावर याक नृत्य प्रदर्शित करण्यात आले होते. त्रिपुराच्या चित्ररथाच्या माध्यमातून रियांग हे आदिवासी नृत्य प्रदर्शित करण्यात आले होते. यावेळी संरक्षण मंत्र्यांनी प्रत्येक राज्याच्या कलाकारांच्या चमूची भेट घेतली. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. यावर्षी राजपथावर 17 राज्यांचे आणि 6  केंद्रीय मंत्रालयांचे असे एकूण २३ चित्ररथ प्रदर्शित करण्यात आले होते.
                                     राजपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथाची गौरवशाली परंपरा कायम
महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने दिल्लीतील राजपथावर राज्याचे वैशिष्टय दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची दीर्घ परंपरा आहे. 1980 मध्ये शिवराज्याभिषेक या चित्ररथास, 1983 मध्ये बैल पोळा या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला. यानंतर लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे शताब्दीवर्ष’, हापूस आंबा’, बापू स्मृती या चित्ररथांनी 1993 ते 1995 असे सलग तीन वर्ष महाराष्ट्राला प्रथम पारितोषिकाचा बहुमान मिळवून दिला. 1986 मध्ये भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महाराष्ट्राचे योगदान या चित्ररथास द्वितीय पारितोषीक प्राप्त झाले होते. 1988मधे राज्याच्यावतीने प्रदर्शित करण्यात आलेल्या लोकमान्य टिळकांवरील ऐतिहासीक खटला यास द्वितीय पारितोषीक मिळाले होते. 2007 मधे जेजुरीचा खंडेराय या चित्ररथास तृतिय तर 2009 मधे धनगर या चित्ररथास द्वितीय पारितोषीक मिळाले आहे. 
           2015 मध्ये सादर करण्यात आलेल्या पंढरीची वारी या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला होता. यावर्षी तिसरा क्रमांक मिळवून महाराष्ट्राने राजपथावरील चित्ररथांची गौरवशाली परंपरा कायम ठेवली आहे.  

                                   ००००००

No comments:

Post a Comment