नवी
दिल्ली, २३ : लेखकांनी समाजातील विविध घटकांच्या
वेदनेला वाचा फोडणारे आणि वाचकांच्या मनात प्रश्न निर्माण करणारे ‘स्वास्थ्यहारक’ लेखन करावे,असे
आवाहन प्रसिध्द लेखक व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यीक आसाराम लोमटे
यांनी आज केले.
मराठी भाषेतील उत्तम लेखनासाठी साहित्यातील
सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळख असणारा साहित्य अकादमी पुरस्कार आसाराम लोमटे यांना
गुरुवारी प्रदान करण्यात आला. यानिमित्ताने
महाराष्ट्र परिचय केंद्रात श्री. लोमटे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. परिचय
केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी श्री.
लोमटे यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन
सत्कार केला. यावेळी समिक्षक रणधिर शिंदे यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात
आला.
यावेळी श्री. लोमटे म्हणाले, वेगाने होत असलेल्या परिवर्तनात
ग्रामीण आणि शहरी जीवनातील सिमारेषा धुसर होत चालली आहे. नेमका हाच धागा पकडून
ग्रामीण भागातील जीवन लेखनबध्द करण्याचा
आपण प्रयत्न करीत आहोत. आजकाल जाहीरातींच्या भडीमाराने स्वास्थ्यकारक आयुष्य
जगण्याची माहिती देणारे उत्पादन बाजारात आली आहेत. अशात, सर्व सामान्यांच्या
वेदनेला वाचा फोडणारे आणि वाचकांच्या मनात असंख्य प्रश्न उपस्थित करणारे
स्वास्थ्यहारक लेखन व्हावे असे श्री. लोमटे म्हणाले .
समाजव्यवस्थेत
होरपळून निघालेल्या सर्व सामान्य जनतेचे सुख, दु:ख,आशा, स्वप्न आपल्या
साहित्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे श्री. लोमटे सांगतात.
दुर्लक्षीतांचे जगणे हीच आपल्या लेखनाची प्रेरणा असल्याचे ते सांगतात. ‘आलोक’ या आपल्या कथा संग्रहाच्या माध्यमातून मराठी
भाषेतील कथा या साहित्य प्रकाराला तिस-यांदा साहित्य अकादमी पुरस्कार मिळत
असल्याचे सांगतानाच भास्कर चंदनशीव, भाऊ पाध्ये, बाबुराव बागुल आणि समकालीन लेखक
जयंत पवार हे आपले आवडते कथाकार असल्याचे ते सांगतात. मराठीतील कथा आता बहुमुखी झाल्याचे
त्यांनी सांगितले. साहित्य अकादमीच्या पुरस्काराने आंनद होत असून वाचकांनी माझ्या
लेखनाला दिलेला प्रतिसादही मला पुरस्कारवत असल्याचे श्री. लोमटे यांनी सांगितले.
समिक्षक रणदीप शिंदे यांनी यावेळी ,
श्री. लोमटे यांच्या आलोक या कथा संग्रहातील होरपळ या कथेचे कथानक आणि लेखकाने
जात,गावगाडा,कुटुंब अशा विविध पैलुंनी केलेला कथेचा विस्तार आदींबाबत विश्लेषण
केले.
यावेळी उपसंचालक दयानंद कांबळे
प्रास्ताविकात म्हणाले, मातीशी जुळलेले लेखन करण्याची दिर्घ परंपरा मराठवाडयातील
साहित्यिकांनी निर्माण केली असून श्री. लोमटे यांनी यात मोलाचे योगदान दिले आहे.
श्री. लोमटे यांच्या लिखनातून ग्रामीण भागातील वास्तव जीवन प्रकट होते. साहित्य अकादमीच्या पुरस्काराने श्री.
लोमटे यांच्या साहित्याची देशपातळीवर दखल घेतल्यागेली आहे याचा अत्यानंद होत असल्याचे
त्यांनी सांगितले. माहिती अधिकारी अंजू निमसरकर –कांबळे यांनी कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन केले तर उपसंपादक रितेश भुयार यांनी आभार मानले.
0000
No comments:
Post a Comment