Monday, 27 February 2017

भाषा अनुवादाच्या चळवळीची गरज ज्ञानेश्वर मुळे





                                                                          
नवी दिल्ली, २७ : मराठी भाषा विकासाबरोबरच या भाषेला वैश्विकता प्राप्त करून देण्यासासठी अनुवादाची चळवळ उभारण्याची गरज असल्याचे मत परराष्ट्र व्यवहार सचिव तथा लेखक ज्ञानेश्वर मुळे यांनी  व्यक्त केले.               
महाराष्ट्र परिचय केंद्रात आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त श्री. मुळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी श्री. मुळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
            यावेळी श्री. मुळे म्हणाले, मराठी भाषेला संपन्न पार्श्वभूमी आहे. संतांनी, कवी-साहित्यिकांनी आणि विविध लोक परंपरांनी मराठी भाषा समृध्द केली व तिच्या विकासात मोलाचे योगदान दिले. मराठी भाषेला  वैश्विक बनविण्यासाठी अन्य देशात मराठीबाबत होत असलेल्या अभ्यासाला चालना देण्याची गरज आहे. मराठी भाषा विकासाबरोबरच या भाषेला वैश्विकता प्राप्त करून देण्यासासठी अनुवादाची व्यापक चळवळ उभारावी लागेल असे श्री. मुळे म्हणाले. या माध्यमातून मोठया प्रणामात भाषिक व्यवहार होईल व रोजगाराच्या संधी  उपलब्ध होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सध्या संगणक, शास्त्रीय संशोधन मराठी भाषेत होऊन त्याला वैश्विक स्वरूप प्राप्त होण्याची गरज आहे, त्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे श्री. मुळे म्हणाले. जपानमध्ये तेथील जनतेने मातृभाषेत संशोधनाला प्राधान्य दिल्याने जपानी भाषेची वैश्विक पातळीवर दखल घेतल्याचेही  त्यांनी नमूद केले.
           
                           देश-विदेशातील  विद्यापीठात मराठी भाषेचा अभ्यास व्हावा    
भारतातील विविध विद्यापीठात मराठी भाषा अध्यासन उभारून या भाषेतील लोक संस्कृती व अन्य संपन्न परंपरांचा अभ्यास होण्याची गरज आहे. ही चळवळ जागतिक पातळीवरही राबवावी लागेल जागतिकस्तरावर निवडक २५-३० विद्यापीठांत मराठी  भाषेचे अध्यासन उभारून या भाषेवर अभ्यास व्हावा त्यास शासन व जनतेनेही मदत करावी असे श्री. मुळे म्हणाले.
            जगभरातील विविध भाषा सवंर्धनासाठी दरवर्षी युनोस्कोच्यावतीने २१ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणारा अंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन, त्यामागील पार्श्वभूमी आणि उद्देश याविषयी श्री. मुळे यांनी मार्गदर्शन केले. मराठीतील उत्तुंग व्यक्तीमत्वाचे साहित्यिक वि.वा.शिरवाडकर यांच्या रचनांमधील सौंदर्यदृष्टी आणि सामाजिक जाणीवा याविषयी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी वि.वा.शिरवाडकरांच्या पृथ्वीचे प्रेमगीत, कोलंबसाचे गर्वगीत आदी कवीतांच्या ओळी उदधृत करून त्यातील भावार्थही श्री. मुळे यांनी उपस्थितांसमोर मांडला.
            परराष्ट्र सेवेत असूनही मराठी भाषेत लिखान करण्याचा अभिमान असल्याचे श्री. मुळे म्हणाले. मराठी भाषा आणि आपली जन्मदात्री आई यांच्याशी असलेली घट्ट नात्याची विन मराठी भाषेतील लिखानाने आणखी घट्ट होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.            
            यावेळी उपसंचालक दयानंद कांबळे यांनी  प्रास्ताविकात, महाराष्ट्र शासनाच्यावतीने साजराकरण्यात येणा-या मराठी भाषा गौरव दिनाची संकल्पना सवीस्तरपणे मांडली उपसंपादक रितेश भुयार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर   माहिती अधिकारी अंजू निमसरकर –कांबळे यांनी  आभार मानले.   
                                              0000



No comments:

Post a Comment