Wednesday, 8 March 2017

कायद्यांविषयी महिलांनी जागरुक असावे- विजया रहाटकर







                  
नवी दिल्ली, ८ : महिलांविषयीच्या विविध कायद्यांबाबत जागरूकता निर्माण होण्याची गरज असून यासाठी राज्य महिला आयोग प्रयत्नरत असल्याचे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सांगितले.
            महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात आज आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात श्रीमती रहाटकर बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आभा  शुक्ला अध्यक्ष स्थानी होत्या. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यावेळी  मंचावर उपस्थित होते. दिल्लीत विविध क्षेत्रात कार्यरत महिला यावेळी मोठया संख्येने उपस्थित होत्या.
            श्रीमती. रहाटकर म्हणाल्या, महिलांनी आज विविध क्षेत्रात प्रगती केली आहे. मात्र, अनेक महिला आपल्या अधिकारांपासून वंचित असल्याचेही चित्र आहे. महिला सुशिक्षीत झाल्यात. पण, त्यांना आपल्या अधिकारांची जाणीवही होण्याची गरज आहे. आपल्यासाठी अस्तित्वात असलेल्या कायद्यांबाबत महिलांमध्ये जागरूकता निर्माण झाली पाहिजे. यासाठी राज्य महिला आयोग प्रयत्नरत आहे. राज्यातील सर्वच महाविद्यालयांमध्ये विद्यार्थीनींना महिला सुरक्षाविषयक कायद्यांबाबत प्रशिक्षण देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काळात राज्यातील सर्व शाळांमध्ये, शासकीय, गैर शासकीय कार्यालयांमध्येही असे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या. सर्वोच्च न्यायालयाने महिला सुरक्षा कायद्याविषयक जाहीर केलेल्या विशाखा मार्गदर्शकीची  राज्यामध्ये अंमलबजावनी होत असल्याचे त्यांनी सांगितले. 
 महिलांविषयक कायदे , योजना यांसोबतच स्वअधिकाराचे ज्ञान महिलांनी करून घेतले पाहिजे. असे ज्ञान कुटुंबातूनच देण्याची सुरुवात व्हायला हवी, आईने आपल्या मुला मुलींना कायदेविषयक जुजबी ज्ञान दिले पाहिजे. तसेच, विविध आव्हांनाशी लढण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी महिला पुढे आल्यास त्या ख-या अर्थाने सक्षम होतील, असे श्रीमती रहाटकर म्हणाल्या.
राज्यातील महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी व सन्मान मिळवून देण्यासाठी राज्य महिला आयोग उत्तमरित्या काम करीत असल्याचे श्रीमती रहाटकर यांनी सांगितले. महिलांची सुरक्षा आणि आपणॲसिड हल्ला पिडीत महिला व समाजाचा दृष्टीकोण या विषयावर त्यांनी विविध घटना व उदाहरणांचे दाखले देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. स्त्रीविषयक विविध कायद्यांची माहिती  महिलांना असल्यास त्यांच्यावरील होणारे अत्याचार कमी होतील, या विचाराने राज्य महिला आयोग काम करीत आहे. ॲसीड हल्ला पिडीत महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी  राज्य महिला आयोगाने पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले. या महिलांच्या पुर्नवसनासाठी देण्यात येणारी आर्थिक मदत ३ लाख रूपयांहून ५ लाख रूपये येवढी वाढविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ॲसीड हल्ला पिडीत महिलांच्या पुर्नवसनासाठी विविध प्रशासकीय यंत्रणा आणि गैर शासकीय संघटनांचा सहभाग घेण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
आर्थिकदृष्टया महिला  सक्षम झाल्या पाहिजेत तरच त्या सुरक्षीत होतील, असे श्रीमती आभा शुक्ला म्हणाल्या.  समाजात परिवर्तनला सुरुवात झाली असून महिला मेहनतीच्या जोरावर विविध क्षेत्रात आपले स्थान निर्माण करीत आहेत. महिलांच्या कर्तबगारीवर आधारीत चित्रपटांची निर्मिती होत आहे, प्रसार माध्यमांमध्येही महिलांविरोधी अन्यायाला वाचा फोडली जात आहे. समाजात महिलांना समान अधिकार प्राप्त होण्यासाठी त्या  आर्थिकदृष्टया सक्षम झाल्या पाहिजेत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. 
यावेळी  प्रास्ताविक भाषणात उपसंचालक श्री. कांबळे यांनी जागतिक महिला दिन साजरा करण्याची परंपरा विषद केली. भारतात महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना समान अधिकार मिळवून देण्यासाठी दिलेल्या योगदानाची माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमासाठी उपस्थित दिल्लीतील विविध क्षेत्रात कार्यरत महिलांना यावेळी गुलाब पुष्प आणि पामेला सरदार व ब्रजरंजन मनी संपादित सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनावर आधारीत पुस्तक भेट स्वरूपात देण्यात आले. माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार मानले.
                                    मृदूला घोडके यांचे नृत्य सादरीकरण
यावर्षीच्या जागतिक दिनाची संकल्पनाच्या अनुषंगाने दिल्ली आकाशवाणीच्या मराठी वृत्त विभागाच्या प्रमुख मृदुला घोडके यांनी स्त्री शक्तीचे महात्म्य सांगणा-या तूही तू .. तूही तू.. या गितावर नृत्य सादर केले. श्रीमती घोडके यांच्या नृत्याने उपस्थितांची मने जिकंली.               
              

No comments:

Post a Comment