Monday, 8 May 2017

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश अतिरिक्त एक लाख टन तुरीची 31 मेपर्यंत खरेदी करण्यास परवानगी



  
नवी दिल्ली, 08 राज्यात यंदा तुरीचे विक्रमी उत्पादन झाले आहे. अतिरिक्त एक लाख टन तुरीची 31 मेपर्यंत नाफेडमार्फत खरेदी करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे दिली. तसेच ही खरेदी झाल्यानंतर परिस्थिती पाहून आणखी एक लाख टन तुरीची खरेदी करण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे.
     राज्यातील तुरीचे विक्रमी उत्पादन पाहता तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे अतिरिक्त दोन लाख टन तूर खरेदीसाठी परवानगी मागितली होती. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. त्यानुसार अतिरिक्त एक लाख टन तुरीची खरेदी नाफेडमार्फत करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच ही खरेदी झाल्यानंतर परिस्थिती बघून आणखी एक लाख टन तुरीची खरेदी करण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे.
     मागील सरकारच्या काळात जेव्हा 13 लाख टन उत्पादन झाले होते, तेव्हा केवळ 20 हजार टन तुरीची खरेदी करण्यात आली होती. यंदाच्या वर्षात वीस लाख टनाहून अधिक उत्पादन झाले असताना राज्य सरकारने केलेली आजपर्यंतची विक्रमी खरेदी आहे. ही खरेदी सहा लाख टनावर जाण्याची शक्यता आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment