Tuesday, 30 May 2017

अल्पसंख्यांकांच्या न्याय व हक्कांसाठी काम करेन : सुलेखा कुंभारे


                           

 
 







नवी दिल्ली, दि. ३० : देशातील अल्पसंख्यांक समाजाच्या न्याय व हक्कांसाठी काम करेन अशा भावना, महाराष्ट्राच्या माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्य सुलेखा कुंभारे यांनी व्यक्त केल्या.

            येथील लोकनायक भवन येथे आज राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष गैरूल हसन रिझवी यांच्या उपस्थितीत सुलेखा कुंभारे यांनी आयोगाच्या सदस्य पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्या बोलत होत्या. 
             कुंभारे म्हणाल्या, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग हा देशातील बौध्द, शिख, मुस्लीम, पारसी, जैन आदी अल्पसंख्याक समाजातील लोकांसाठी काम करतो. नव्याने नियुक्त झालेल्या आयोगाचे अध्यक्ष  गैरूल हसन रिझवी यांच्या नेतृत्वाखालील चार सदस्यीय आयोग हा देशातील अल्पसंख्यांकांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्या हक्कांसाठी काम करेन. अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, त्यांच्यासाठी चांगले सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक  वातावरण निर्माण करण्यावर आपला भर असेल, असे त्या म्हणाल्या.
           
आयोगाचे अध्यक्ष तथा सदस्य हे मुळात सामाजिक कार्यकर्ते असल्याने त्यांचा समाजाचा चांगला अभ्यास आहे. त्यांना अल्पसंख्यांकाच्या प्रश्नांची जाण आहे. त्यामुळे आयोग अधिक सक्षमपणे काम करेल. आम्ही अल्पसंख्याक जनता व सरकार यांच्यामध्ये सेतु बांधण्याचे  काम करू अशाही  कुंभारे म्हणाल्या.
                              
                                  प्रधानमंत्री व मुख्यमंत्री फडणवीस यांचे मानले आभार

         कुंभारे यांनी आयोगाच्या सदस्यपदावर काम करण्याची संधी दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले. 

                                               वडिलांची आठवण     

            राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्य पदाचा पदभार स्वीकाराताना वडीलांची आठवण होत असल्याचे कुंभारे म्हणाल्या. १९७२ ते १९७८ या काळात वडील खासदार असताना त्यांच्या दिल्लीतील २०२, साऊथ एव्हेन्यू या शासकीय निवासस्थानी आम्ही येत असू, आज त्या आठवणी ताज्या झाल्याचे त्यांनी सांगितले. वडीलांकडून मिळालेल्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग करून आयोगाच्या सदस्य म्हणून उत्तम कार्य करू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.    

No comments:

Post a Comment