Saturday 20 May 2017

अशांतीतूनच लेखन स्फुरते : एम.जे.अकबर



               डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या शांती की अफवांए पुस्तकाचे प्रकाशन  
नवी दिल्ली दि. २० : समाजात विविध क्षेत्रातील अशांती हीच विचारास प्रवृत्त करते व त्यातून साहित्यकृती जन्माला येते डॉ. ज्ञानेश्वर मुळेंनाही त्यातूनच प्रेरणा मिळाली असावी म्हणूनच त्यांनी एक उत्तम काव्य संग्रह वाचकांसाठी आणला अशा भावना केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम.जे.अकबर यांनी व्यक्त केल्या.  
        साहित्यीक व परराष्ट्र व्यवहार विभागाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे लिखीत आणि आलोकपर्व प्रकाशनाच्यावतीने प्रकाशित शांती की अफवाएं या काव्य संग्रहाचे येथील प्रवासी भारतीय केंद्रात प्रकाशन झाले त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री. अकबर बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार तथा राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष बलदेवभाई शर्मा यांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजेजू ,न्यूज ऑब्जर्व्हर पोस्टचे मुख्य संपादक ओंकारेश्वर पांडे यावेळी उपस्थित होते.   
            श्री . अकबर म्हणाले, समाजात विविध क्षेत्रात असलेली अशांतता ही साहित्यीकाला स्वस्थ बसू देत नाही. साहित्यीकाच्या मनात या सर्व अशांतीमुळे विचारांचे आंदोलन सुरु असतात यासर्वांचा परिपाक म्हणून उत्तम साहित्यकृती जन्माला येते. डॉ. मुळे यांनी हाच धागा पकडला म्हणूनच अफवांमध्ये शांततेचा शोध घेणारा नायक हा त्यांच्या कवितेचा मूळ आत्मा ठरतो असे त्यांनी सांगितले. भारतीय परराष्ट्र सेवेत कार्य करताना स्वत:तील साहित्यीक जीवंत ठेवत डॉ. मुळे यांनी  केलेले वैविध्य पूर्ण  लेखन कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. 
            श्री. किरेन रेजीजू म्हणाले, डॉ. मुळे हे परराष्ट्र सेवेतील उत्तम अधिकारी आहेत. देशासह परदेशात त्यांच्या उत्तम कार्याची महती  ऐकायला मिळते. परराष्ट्र सेवेतील आपल्या अनुभवांना त्यांनी साहित्यात उतरवले आणि वाचकांपुढे मांडले ही महत्वाची उपलब्धी आहे. हिंदी सोबतच ते मराठी या आपल्या मातृभाषेतही लेखन करतात त्यामुळे राजभाषा विभागाचा मंत्री म्हणून मला त्यांचा अभिमान आहे. डॉ. मुळे यांनी अजुनही लेखन करून साहित्याची सेवा करावी अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.            
               प्रशासनात येऊनही आपल्यातील साहित्यीक कसा जीवंत आहे आणि तो दिवसेंदिवस कसा प्रगल्भ होत आहे हे डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्यांनी यावेळी शांती की अफवाएं या काव्य संग्रहातील कौन क्या बोला आणि फालुजा या कविताही सादर केल्या.  
              ओंकारेश्वर पांडे यांनी यावेळी  डॉ. मुळे यांच्या साहित्यावर प्रकाश टाकला, बलदेवभाई शर्मा यांनी डॉ. मुळे यांच्या काव्य संग्रहातील बारकावे आपल्या भाषणात मांडले. पत्रकार तथा आलोकपर्व प्रकाशनाचे प्रमुख रामगोपाल शर्मा यांनी आभार प्रदर्शन केले.


                                                          000000  

No comments:

Post a Comment