Sunday, 16 July 2017

महाराष्ट्राला भारतीय कृषी संशोधन परिषदेचे दोन पुरस्कार












नवी दिल्ली, 16 : परभणी जिल्हयातील मनवत तालुक्यातील मनोली येथील महिला प्रगतशील शेतकरी सुनंदाबाई शिंदे आणि पालघर जिल्हयातील डहाणू येथील गोखले शिक्षण संस्थेच्या कृषी विज्ञान केंद्राला आज केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंह यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
            येथील राष्ट्रीय कृषी विज्ञान संस्थेच्या ए.पी.शिंदे सभागृहात आज भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या ८९ व्या वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणा-या देशभरातील व्यक्ती व संस्थांना केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंह यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
             वैयक्तीक गटात परभणी जिल्हयातील मनवत तालुक्यातील मनोली येथील महिला प्रगतशील शेतकरी सुनंदाबाई शिंदे यांना जगजीवनराम अभिनव किसान पुरस्कार २०१६ प्रदान करण्यात आला. श्रीमती शिंदे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रयोग करून सोयाबीन, कपाशी आणि ज्वारी पिकांचे विक्रमी उत्पादन घेतले. श्रीमती शिंदे  यांनी पाण्याची प्रभावीपणे साठवण करून जलसंधारण क्षेत्रातही उल्लेखनीय काम केले आहे, त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र आणि ५० हजार रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
            यावेळी देशभरातून विविध ११ विभागातील कृषी विज्ञान केंद्राना उल्लेखनीय योगदानासाठी सन्मानीत करण्यात आले. विभाग-८ मधून राज्यातील पालघर जिल्हयातील डहाणू येथील गोखले शिक्षण संस्थेच्या कृषी विज्ञान केंद्राला कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी पं. दीनदयाल उपाध्याय राष्ट्रीय कृषी विज्ञान पुरस्कार २०१६-१७ ने सन्मानीत करण्यात आले. गोखले शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.सर एम.एस.गोसावी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.संभाजीराव नालकर आणि शास्त्रज्ञ विलास जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सन्मान पत्र आणि  २.२५ लाख रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.     
             महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॅलो करा :
http://twitter.com/micnewdelhi

                                      0000000

No comments:

Post a Comment