Thursday 31 August 2017

अथक परिश्रमाचा खरा सन्मान झाला : अंगणवाडी सेविका












 


                       महाराष्ट्र परिचय केंद्रात झाला तीन सावित्रींचा सत्कार    

नवी दिल्ली, ३१ :  अंगणवाडी क्षेत्रात बालकांचे आधारकार्ड काढणे, कुपोषणमुक्ती, बालकांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे यासांरख्या कामांसह आपल्या भागात व्यसनमुक्ती, पुरुष नसबंदी, किशोर वयीन मुलींना विविध विषयांवर मार्गदर्शन करणे आदी कामांमध्ये  झोकून घेत आज राष्ट्रीय स्तरावर आपल्या कतृत्वाची छाप सोडणा-या महाराष्ट्रातील तीन अंगणवाडी सेविकांनी आपले अनुभव कथन केले.राष्ट्रीय सन्मान हा आपल्या अथक परिश्रमाचा खरा सन्मान असल्याच्या भावना त्यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित सत्कार समारंभात व्यक्त केल्या.
            केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालयाच्यावतीने महाराष्ट्रातील तीन अंगणवाडी सेविकांना आज राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. या अंगणवाडी सेविकांचा आज महाराष्ट्र परिचय केंद्रात सत्काराचा आणि संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी यावेळी  चंद्रपूर जिल्हयातील गोपालपूर येथील अगंणवाडी सेविका चंद्रकला झुरमुरे, परभणी जिल्हयाच्या पडेगाव येथील अंगणवाडी सेविका लताबाई वांईगडे आणि कोल्हापूर जिल्हयातील पैडाखले अंगणवाडी सेविका चंद्रकला चव्हाण यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अंगणवाडी सेविकांनी आपले अनुभव कथन केले.
                          मुलांमध्ये शिक्षणाची गोडी वाढली – चंद्रकला झुरमुरे
चंद्रकला झुरमुरे यावेळी म्हणाल्या, गोपालपूर गाव हे आदिवासी बहुल आहे त्यामुळे येथील मुलांना अंगणवाडी पर्यंत आणने हे जिकरीचे काम होते. जनतेमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधला अडचणींवर मात केली. मग गोपालपूर गावातील मुल हळू हळू अंगणवाडीत येऊ लागले आज  अगंणवाडीची पटसंख्या १०० टक्के झाली. आमच्या शाळेत मुलांना ओळखपत्र आहे, त्यांना आठवडयातून दोन गणवेश आहेतस्थानिक गोंडी भाषेतून शिक्षण देण्यात येत होते हळू हळू ते मराठी भाषेतून देण्यात येऊ लागले आता मुल इंग्रजी भाषेतून आपला परिचय देतात हा बदल जनसहभाग आणि पर्यवेक्षिका दीपा हमंद यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करू शकले अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. गोपालपूर अंगणवाडी मध्ये बालकांचे १०० टक्के आधारकार्ड तयार करण्यात आली. अंगणवाडीत पूर्णपणे कुपोषण मुक्त  बालके आहेत. गावात दारूबंदी करण्याचा श्रीमती झुमरे यांचा अनुभव उपस्थितांना प्रेरणादायी ठरलाया सर्व प्रवासात अंबुजा सिमेंट फाऊंडेशन ग्रामपंचायत ग्रामस्थांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.
                     प्रामाणीक प्रयत्नाने मिळाले यश – लताबाई वाईंगडे 
            लताबाई वाईंगडे म्हणाल्या, परभणी जिल्हयातील पडेगाव अंगणावाडीत कामालासुरूवात केली तेव्हा मोठया प्रमाणात मुलांची गळती, कुपोषणाचा प्रश्न, अस्वच्छतेचा प्रश्न होता. कार्यकर्तृत्वाने कुपोषण ७५ टक्के वर आणल, १०० टक्के  कुपोषण मुक्त अंगणवाडी केली. पुरूष नसबंदीचे महत्वाचे आणि धाडसाचे काम केले. शासनाची योजना प्रभावीपणे राबवून किशोर वयीन मुलींना आरोग्य , स्वच्छता शिक्षणाबाबत मार्गदर्शन केले आदी अनुभव श्रीमती वाईंगडे यांनी कथन केला.
                     प्रामाणीक प्रयत्न व ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रतीकुलतेवर मात : चंद्रकला चव्हाण  
            चंद्रकला चव्हाण म्हणाल्या, कोल्हापूर जिल्हयातील  पैडाखले गाव हे दुर्गमभागात आणि डोंगरात वसलेले गाव आहे. याठिकाणी सततचा पाऊस पडत असतो. यासर्व समस्यांवर मात करून अंगणवाडीत घडविण्याचे काम केल्याचे त्यांनी सांगितलेया अंगणवाडीतून पहिल्या वर्गात शिकायला गेलेला मुला मुलींना अक्षर आकडयांची जाण भाषेची माहिती पूर्णपणे करून देण्यात येते. गाव पूर्णपणे कुपोषण मुक्त केले आणि बालकांचे  आधारकार्ड तयार करून घेतले या कार्यात गावकरी अधिका-यांची मोलाची साथ मिळाल्याचे त्यांनी सांगितले.  
        यावेळी कार्यक्रमास उपस्थित अंगणवाडी सेविकांचे राज्य समन्वयक अधिकारी प्रकाश भांदककर ,चंद्रपूर जिल्हयातील पर्यवेक्षिका विद्या शेट्टीपरभणी जिल्हयातील पर्यवेक्षिका संगीता दडवी, चंद्रपूर जिल्हयातील पर्यवेक्षिका दीपा हमंद यांचे परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा यांनी पुष्प गुच्छ देऊन  स्वागत केले. त्यांनी यावेळी आपले अनुभव कथन केले. यावेळी उपसंचालक दयानंद कांबळे यांनी प्रास्ताविक केले तर उपसंपादक रितेश भुयार यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

                                                       ००००००००