नवी
दिल्ली, 4 : ‘शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच पोटाची खडगी
भरण्यासाठी रिक्षा चालविणे, पानाची टपरी चालविणे आदी व्यवसायात गुंतलेल्या मुलांना
विद्यादान देण्याचे कार्य प्रामाणिकपणे केले, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळविताना
आज या कार्याचा सार्थ अभिमान वाटतो’, अशा भावना अहमदनगर
येथील प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल पंडित यांनी
महाराष्ट्र परिचय केंद्रात व्यक्त केल्या.
राष्ट्रीय शिक्षक दिना निमित्त
दिल्लीत आयोजित कार्यक्रमात सुनिल पंडित यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय
पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर श्री. पंडित यांचा सत्कार व
त्यांच्याशी संवादाचा कार्यक्रम महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित करण्यात आला
होता, यावेळी त्यांनी या भावना व्यक्त
केल्या. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी सुनिल पंडित व त्यांची
शिक्षक पत्नी श्रीमती पंडित यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी श्री.
पंडित यांनी आपले अनुभव कथन केले.
श्री. पंडित म्हणाले, माझे शिक्षण
प्रतीकुल परिस्थितीत आणि ग्रामीण भागात झाले. गरिबीची जाण असल्याने शिक्षण क्षेत्रात कार्य करताना शाळेतील
विद्यार्थ्यांबरोबरच गरिबीमुळे शिक्षणापासून वंचित असणा-या मुलांनाही शिक्षणाच्या
मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले. पोटाची खडगी भरण्यासाठी वडीलांसोबत
रिक्षा चालविणारे, पानाच्या टपरीवर काम करणारे विद्यार्थी यांना शाळेत प्रवेश
मिळवून दिला त्यांना शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आणले. आज हे विद्यार्थी मोठ- मोठया पदांवर कार्यरत आहेत, त्याचा सार्थ अभिमान आहे असे श्री. पंडित यांनी
सांगितले. मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी श्री. पंडित यांनी शाळेत अभिनव
उपक्रम राबविले, शिक्षक व मुख्याध्यापकांना उपयुक्त अशी पुस्तके त्यांनी लिहीली,
मुख्याध्यापक संघाच्या मुखपत्रातही श्री. पंडित लिखान करतात. विविध शिक्षण
समित्यांवरही त्यांनी कार्य केले आहे. रक्तदान शिबीर आणि वृक्षलागवड आदी
उपक्रमांचे आयोजन करून जनजागृतीचे कार्यही श्री. पंडित करतात.
राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने कामाची
पावती मिळाली आहे. महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीतील सन्मान कायम
स्मरणात राहील अशा भावनाही श्री. पंडित
यांनी यावेळी व्यक्त केल्या.
श्री. दयानंद कांबळे यांनी
प्रास्ताविक भाषणात शिक्षणातील शिक्षकांची भूमिका विविध उदाहरणांद्वारे पटवून दिली.
उपसंपादक रितेश भुयार यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
00000
No comments:
Post a Comment