Saturday 25 November 2017

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात “स्टार्टअप व स्टँडअप महाराष्ट्र” ला पुरस्कार घोषित


















नवी दिल्ली, दि.26 : प्रगती मैदान येथे सुरु असलेल्या 37 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात  महाराष्ट्राचे स्टार्टअप स्टँडअप महाराष्ट्र या दालनास सर्वोत्कृष्ट सजावट व सदरिकरणाचा पुरस्कार शनिवारी रात्री उशिरा घोषित झाला. केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सी.आर.चौधरी यांच्या हस्ते सोमवार दिनांक 27 नोव्हेंबर 2017 रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
        प्रगती मैदान येथे  दि.14 ते 27 नोव्हेंबर 2017 या कालावधीत भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 'स्टार्टअप व स्टैंडअप इंडिया' ही या मेळाव्याची मध्यवर्ती संकल्पना असून महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्यावतीने स्टार्टअप स्टँडअप महाराष्ट्र हे राज्यात उद्योग क्षेत्राच्या प्रगतीचे दर्शन घडविणारे सुरेख प्रदर्शन साकारण्यात आले. संकल्पना मांडताना राज्यात स्टार्टअप स्टँडअपयोजनेच्या माध्यमातून नव्याने उद्योग उभारणी करणा-या राज्यातील प्रतिभावान तरूण उद्योजकांचे प्रकल्प दर्शविण्यात आले . 
        अमोल यादव या तरूण उद्योजकाने निर्माण केलेल्या विमानाची प्रतिकृती दालनाच्या मुख्यद्वाराचे खास आकर्षण आहे. मुंबई-अहमदाबाद ही देशातील पहिली बुलेट ट्रेन, मुंबई नागपूर समृद्धीमार्ग आणि त्याचे फायदे ही याठिकाणी दर्शविण्यात आले आहेत. याशिवाय राज्यातील लघु उद्योजकांनी तयार केलेल्या विविध हस्तकलेच्या वस्तू, महिला उद्योजिकांद्वारे निर्मित वस्तू, महाराष्ट्राची प्रसिद्ध पैठणीही याठिकाणी प्रदर्शन व विक्रीस ठेवण्यात आली.
           स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रातील महाराष्ट्राची भरारी आणि लहान उद्योजकांना मिळालेली संधी, लघुउद्योगास चालना देणारे राज्याचे धोरण, विदेशी गुंतवणूक, पर्यटन आदी  विषयांना स्पर्श करणारे आकर्षक महाराष्ट्र दालन यंदा राज्याच्यावतीने उभारण्यात आले . 
            महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभु यांच्या हस्ते आणि  राज्याचे उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या उपस्थितीत 14 नोव्हेंबर 2017 रोजी झाले. 23 नोव्हेंबर 2017 रोजी या व्यापार मेळाव्यात राज्याची  वैविध्यपूर्ण सांस्कृती दर्शविनारा 'महाराष्ट्र दिन' कार्यक्रम साजरा झाला. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले या कार्यक्रमास उपस्थित होते.






























No comments:

Post a Comment