नवी दिल्ली, ७ : भामरागड येथील
लोकबिरादरी प्रकल्पात गेल्या ४ दशकांपासून सुरु असलेली निरपेक्ष सेवा हाच मी खरा
आनंद आणि समाधान मानतो. अशा भावना, समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी आज
महाराष्ट्र परिचय केंद्रात व्यक्त केल्या.
परिचय केंद्रात आज डॉ.
प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे आणि त्यांचे पूत्र अनिकेत आमटे यांचा सत्कार आणि
अनौपचारीक चर्चा असा कार्यक्रम आयोजित
करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे
यांनी डॉ. प्रकाश आमटे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. श्री.
कांबळे यांनी अनिकेत आमटे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. माहिती अधिकारी अंजू
कांबळे-निमसरकर यांनी डॉ. मंदाकिनी आमटे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
डॉ.
प्रकाश आमटे यांनी लोकबिरादरी प्रकल्पाबाबत माहिती देताना सांगितले, वडील बाबा
आमटे यांनी केलेल्या आवाहनावरून माझ्या जीवनाची दिशा ठरली. येथूनच गडचिरोली
जिल्हयातील, हेमलकसा तालुक्यामधील भामरागड येथे प्रकल्पाला सुरुवात झाली. या
भागातील माडिया आदिवासींना आरोग्य, शिक्षण आदी सुविधांच्या माध्यमातून मुख्यप्रवाहात
आणण्याची दिशा ठरली. रस्ते, वीज, पाणी अशा पायाभूत सुविधांचा पूर्ण अभाव आणि
आदिवासींचा विश्वास संपादन करण्याचे आव्हान समोर होते. पहिल्यांदा आमच्याकडे रूग्ण
आला. उपचारानंतर तो सुखरूप घरी गेला आणि
येथूनच आमच्या कार्याला सुरुवात झाली. आम्ही उपचार केलेल्या पहिल्या रुग्णाने
आम्हाला धन्यवाद न मानताच तो निघून गेला याचे तेव्हा थोडे वाईट वाटले. मात्र, नंतर
लक्षात आले, एकमेकांना मदत करने हे कर्तव्य मानणारी आदिवासी संस्कृती आहे. हाच
धागा धरून गेल्या ४ दशकांपासून लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून निरपेक्ष
भावनेने आम्ही अव्याहत कार्य करीत आहोत. आमचे २ मुल आणि सुनाही आता आमच्या
कार्याचा डोलारा समर्थपणे पुढे नेत आहेत.
प्रकल्पाच्या सुरुवतीच्या
काळात प्रतिकूल वातावरणात आम्ही आदिवासींना आरोग्य सेवा देण्यास सुरुवात केली.
महाराष्ट्र शासनाने आम्हाला १९७३ मध्ये प्रकाल्पासाठी जागा दिली. त्यानंतर १९७६ मध्ये शाळा उभारून आम्ही आदिवासी
मुलांना शिक्षण देण्याचे कार्य सुरु केले. आता याठिकाणी सर्वोपचार करणारा सुसज्ज
दवाखाना, बालवाडी ते १२ वी पर्यंत शिक्षण देणारी शाळा, मुला–मुलींसाठी वसतीगृह ,
जखमी प्राण्यांसाठी अनाथालय समर्थपणे कार्यरत आहेत.
लोकबिरादरीच्या कामाने समाधानी : डॉ. मंदाकिनी आमटे
शहरात लहानाची मोठी झालेली मी, लग्नानंतर पती डॉ. प्रकाश आमटे
यांच्या सोबत थेट जंगलात वास्तव्याला गेले आणि ताटव्यांची झोपडी उभारून येथेच
लोकबिरादरी प्रकल्पला सुरुवात केली. स्थानिक आदिवासींची भाषा शिकण्यापासून ते या
प्रकल्पात काम करणारे अन्य कार्यकर्ते पुरुष होते. स्त्री म्हणून मी एकटेच होते त्यामुळे,
सुरुवातीच्या काळात फार एकटेपण जाणवत होता असे डॉ. आमटे म्हणाल्या. उपचारांसाठी
आदिवासी येऊ लागले आणि मग काम आणखी वाढत गेले. आदिवासींमधील तंटे बखेडे
सोडविण्यासाठी आम्ही लोकअदालत भरवत असू अशा एकानेक आठवणी त्यांनी यावेळी
सांगितल्या. लोकबिरादरी प्रकल्पाचे कार्य आता सर्व दूर पोहचले असून या प्रकल्पात
आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून कार्य करणा-या कार्यकर्त्यांचेही मोठे योगदान
आहे. आरोग्य, शिक्षण सेवांसह आता आम्ही परिसरात शेततळे उभारण्याचे कार्यही हाती
घेतले आहे. वर्षा काठी १० शेततळे उभारण्यात येत आहेत. याचा स्थानिक आदिवासींना
शेतीसाठी मोठा फायदा होत आहे. आज लोकबिरादरीच्या कामाला जनतेचा सहभाग मिळत असून या
प्रकल्पाच्या कामाने आपण खूप समाधानी असल्याच्या
भावना डॉ. मंदाकिनी आमटे
यांनी व्यक्त केल्या.
आदिवासी
मुलांमध्ये प्रचंड क्षमता : अनिकेत आमटे
लोकबिरादरी प्रकल्पाच्या
माध्यमातून सुरु असलेल्या निवासी शाळेत
शिकणारे आदिवासी मुल- मुली संगणकाचा प्रभावीपणे उपयोग करून नवनवीन ज्ञान मिळवत
आहेत. ही मुले काटक असतात म्हणून ती क्रीडा क्षेत्रातात झळकतात. आमच्या शाळेतील असंख्य
मुल- मुलींनी राष्ट्रीय व राज्य पातळी पर्यंत धाव घेतली आहे, असे अनिकेत आमटे
यांनी सांगितले. बालवाडी ते १२ वी पर्यंत येथे शाळा चालविण्यात येते. यात, ६५० मुल-
मुली शिक्षण घेत आहेत. येथे ३०० मुलींसाठी आणि ३५० मुलांसाठी स्वतंत्र वसतीगृह आहेत. शाळेत संगणक लॅब असून यात ४० संगणक आहेत.
या शाळेतून शिक्षण घेऊन मुल- मुली डॉक्टर,
वकील, पोलीस, शिक्षक झाले आणि जवळपास ९० टक्के विद्यार्थी याच भागात कार्यरत आहेत.
शाळेतून उर्त्तीण झाल्यावर मोठया प्रमाणात मुले- मुली पुणे, मुंबई सारख्या मोठया
शहरात उच्च शिक्षणासाठी जातात. या मुलांमध्ये प्रंचड क्षमता असून लोकबिरादरीच्या
शाळेतून आम्ही त्यांच्या व्यक्तीमत्वाला आकार देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे
अनिकेत आमटे म्हणाले.
यावेळी उपस्थित प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि
विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. प्रकाश, डॉ. मंदाकिनी
आणि अनिकेत आमटे यांनी दिलखूलास उत्तर दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसंचालक
दयांनद कांबळे यांनी तर सूत्रसंचालन उपसंपादक रितेश भुयार यांनी केले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या
अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
000000
सूचना : सोबत छायाचित्र आहेत.
No comments:
Post a Comment