नवी दिल्ली, ७ : महाराष्ट्र व देशामध्ये स्कायडायव्हींग मध्ये नव- नवीन विक्रम घडविणारे खेळाडू तयार व्हावे यासाठी स्कायडायव्हींग ला क्रीडा प्रकार म्हणून मान्यता मिळाली पाहिजे, आपण यासाठी प्रयत्नरत असल्याची माहिती प्रसिध्द पॅराशूट जंपरच व स्काय डायव्हर पद्मश्री पुरस्कार प्राप्त शितल महाजन यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रात दिली.
नुकताच शितल महाजन यांनी जगातील सातही खंडात स्कायडायव्हींग व पॅराशुट जंप करण्याचा विक्रम नोंदविला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र परिचय केंद्रात त्यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. दैनिक सामनाचे दिल्ली ब्युरोचिफ निलेश कुलकर्णी यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.
शितल महाजन म्हणाल्या, जगातील ८९ देशांमध्ये स्काय डायव्हींग आणि पॅराशुट जंपींगला क्रीडा प्रकार म्हणून मान्यता आहे. भारतात आणि महाराष्ट्रात मात्र यास क्रीडा प्रकार म्हणून मान्यता नाही. केवळ ॲडव्हेंचर म्हणून याकडे बघितले जाते. स्काय डायव्हींग आणि पॅराशुट जंपींगला क्रीडा प्रकार म्हणून मान्यता मिळावी त्यासाठी आपण प्रयत्नरत आहोत असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्या म्हणाल्या, गेल्या १० वर्षांपासून मी जगातील सर्व खंडामध्ये पॅराशुट व स्कायडायव्हींगचा विश्व विक्रम करण्यासाठी प्रयत्नरत होते आणि माझ हे स्वप्न पूर्ण झाले. नुकतेच २२ नोव्हेंबर २०१७ रोजी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नी मला यासंदर्भातील अधिकृत प्रमाणपत्र बहाल केले. जगात आतापर्यंत अशी कामगिरी करणारे ८ पुरुष स्कायडाव्हर आहेत मात्र, हा मान मिळविणारी मी जगातील पहिली महिला ठरली आहे. ही माझ्यासाठी खूप मोठी उपलब्धी आहे. त्यामुळे आता याक्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर मला आपल्या देशात माझ्या सारख्या शंभर शितल महाजन तयार करायच्या आहेत. देशात विविध ठिकाणी पॅराशुट व स्कायडायव्हींग शिबीर आयोजित करणार असून येथूनच या कार्यास सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांनी स्कायडायव्हिंग या क्रीडा प्रकारात नुकतेच १ जागतिक व २ राष्ट्रीय विक्रम नोदंवून नवी उंची गाठली आहे. आतापर्यंत त्यांनी ६ जागतिक व १७ राष्ट्रीय विक्रम नोंदविले आहे. त्यांनी हा सर्व प्रवास यावेळी विस्ताराने विषद केला. तत्कालीन राष्ट्रपती दिवंग ए.पे.जे. अब्दुल कलाम यांनी दक्षिण ध्रुवावर स्काय डायव्हींग करण्यासाठी शितल महाजन यांना केलेले मार्गदर्शन व सहाय यांची आठवण त्यांनी सांगितली.
पद्मश्रीच्या आठवणी : खानदेश कन्येकडून सन्मान मिळाल्याचा सार्थ अभिमान
शितल महाजन यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना २०११ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत केले. या विषयी आठवण सांगताना त्या म्हणाल्या, हा पुरस्कार मिळाल्याने माझ्या जीवनाला मोठे सकारात्मक वळण मिळाले. हा पुरस्कार मी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील या खानदेश कन्येकडून स्वीकारला स्वत: खानेदशातील जळगावची असल्यामुळे खानदेश कन्येकडून हा पुरस्कार स्वीकारल्याचा मला सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी शितल महाजन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा उपसंपादक रितेश भुयार, दैनिक सामनाचे दिल्ली ब्युरोचिफ निलेश कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर या प्रकट मुलाखातीचे लाईव्ह प्रसारण करण्यात आले. आपण महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत युटयुब चॅनल, फेसबुक अकाऊंट व ट्वीटर हँडलवर ही प्रकट मुलाखात पाहू शकता.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
No comments:
Post a Comment