नवी दिल्ली दि. 23: नैसर्गिक व इतर आपत्ती काळात ज्या कोषातून आपत्तीग्रस्तांना मदत दिली जाते त्या प्रधानमंत्री राष्ट्रीय सहायता निधीत आज 2 हजार 875 कोटी 10 लाख रुपयांचा निधी जमा आहे तर 2010 ते 2017 याकाळात सहायता निधीतून 2086 कोटींचा निधी आपत्तीग्रस्ताना सहायता निधी म्हणून देण्यात आला आहे.
प्रधानमंत्री राष्ट्रीय सहायता निधीची स्थापना जानेवारी 1948 साली करण्यात आली,त्यावेळी पाकिस्तानातून आलेल्या विस्थापितांना सहाय्य करणे हा उद्देश होता. आज या निधीच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्ती, अपघात, अतिरेकी हल्ले, दंगली तसेच हृदय उपचार,किडणी रोपण आदींसाठी या सहायता निधीचा वापर केला जातो.
गेल्या पाच वर्षात 2741 कोटी जमा
सन 2010 ते नोव्हेंबर 2017 या आठ वर्षाच्या काळात प्रधानमंत्री राष्ट्रीय सहायता निधीत दान स्वरूपात व जमा रक्कमेवरील व्याज असे एकूण 3308 कोटी 81 लाख रुपयांचा निधी जमा झाला होता तर या आठ वर्षात 2086 कोटी 44 लाख रुपयांचा निधी गरजूंना वितरित करण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षात 2741 कोटी 41 लाख या निधीत जमा झाले . सन 2010-11 या वर्षी 1625 कोटी 64 लाखाची शिल्लक होती, ती नोव्हेंबर 2017 अखेर 2875 कोटी 10 लाख इतकी झाली आहे.
महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्तांना 4 कोटींचे अर्थसहाय्य
पुणे जिल्ह्यातील माळीण भूस्खलन, पुण्यातील बेकरी आग, राज्यातील पूरपरिस्थिती, घाटकोपर व भेंडी बाजार इमारत दुर्घटना, परेल रेल्वे स्टेशन येथील चेंगराचेंगरी या सर्व दुर्घटना मधील आपत्ती ग्रस्तांना व मृतांच्या नातेवाईकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय सहायता निधीतून 4 कोटी 76 लाख रुपयांचा सहायता निधी देण्यात आला आहे.
जम्मू- काश्मीर पूरपरिस्थिती साठी 700 कोटी
2014साली जम्मू-काश्मीरमधील उद्भवलेल्या पूरपरिस्थितीचा मुकाबला करणे व आपत्तीग्रस्तांना सहायता यासाठी सुमारे 743 कोटी हुन अधिक निधी मदत स्वरूपात देण्यात आला आहे, यातील 142 कोटींचा निधी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन एजेंसी ला वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी देण्यात आला. सन 2013 साली उत्तराखंड येथील पूरपरिस्थितीतील 112 कोटी रुपयांचा निधी वितरित केला गेला. गेल्या आठ वर्षात सर्वाधिक 624 कोटींचा निधी 2015-16 या वर्षात सहायता निधीतून खर्च करण्यात आला.
राज्यातील 41 रुग्णालये पॅनलवर
हृदय शस्त्रक्रिया, किडणी रोपण, ऍसिड हल्ले, कर्करोग उपचार आदीसाठी गरजूंना उपचार घेता यावेत यासाठी देशपातळीवर नामांकित रुग्णालयांना राष्ट्रीय स्तरावरील पॅनल मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. देशात 231 रुग्णालये पॅनलमध्ये समाविष्ट आहेत, यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक 41 रुग्णालये या पॅनल मध्ये आहेत, पुण्यातील सर्वाधिक 12, नागपूरमधील 6 तर मुंबईतील 5 रुग्णालये या यादीत समाविष्ट आहेत.
आम्हाला ट्विटर वर
फॉलो करा
http://twitter.com/MahaGovtMic
No comments:
Post a Comment