Wednesday 10 January 2018

महाराष्ट्राच्या एनएसएस स्वयंसेवकांचा दिल्लीत कसून सराव


राजपथावरील  पथसंचलनात होणार सहभागी

नवी दिल्ली, दि. 10 : प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथ संचलनासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) 14 आणि गोव्यातील 2 असे  एकूण 16 विद्यार्थी- विद्यार्थीनी दिल्लीत कसून सराव करीत आहेत. 

     यावर्षी प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणा-या पथसंचलनासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयांतर्गत एनएसएस सराव शिबीराला येथील चाणक्यपुरी भागातील विश्व युवक केंद्र येथे 1 जानेवारी पासून सुरुवात झाली आहे. देशभरातील 15 विभागांमधून एकूण 198 एनएसएस स्वयंसेवक या शिबीरात सहभागी झाले आहेत. पुणे विभागात समावेश असणा-या महाराष्ट्रातून 7 विद्यार्थी आणि 7 विद्यार्थीनी तर गोव्यातून प्रत्येकी 1 विद्यार्थी आणि 1  विद्यार्थीनी असे एकूण 16 स्वयंसेवक या शिबीरात सराव करीत आहेत.

            महाराष्ट्राच्या चमुत यवतमाळ येथील नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालयाचा शिवम दुधाने, अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील कला महाविद्यालयाचा शैलेश पाथरकर, पुणे येथील सर परशुराम महाविद्यालयाचा नरेश येवले आणि वायएमसी महाविद्यालयाचा सत्यम देवकर, चंद्रपूर जिल्हयातील चिमूर येथील ग्रामगीता महाविद्यालयाचा अतुल फुलसंगे, नागपूर येथील धनवटे नॅशनल कॉलेजचा निलेश साखरकर , सांगली येथील शिकजी कला व वाणिज्य महाविद्यालयाचा विकास शिंदे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर औरंगाबाद येथील पंडीत नेहरू महाविद्यालयाची निशा पाटील आणि शासकीय कला व वाणिज्य महाविद्यालयाची खान अल्मास अंजुम, सोलापूर जिल्हयातील अकलूज येथील शंकरराव मोहीते महाविद्यालयाची स्वप्नाली जाधव, मुंबईतील माटुंगा येथील डॉ. बीएमएन महाविद्यालयाची दिव्या पोंगडे, सातारा जिल्हयातील रहमतपूर येथील एसबीएम महाविद्यालयाची पुजा उबाळे, अमरावती जिल्हयातील कारंजा लाड येथील इनानी महाविद्यालयाची मेघा कोटक, पुणे येथील मॉडर्न महाविद्यालयाची अमृता यादव या विद्यार्थींनींचा समावेश आहे.

            यासोबतच गोव्यातील मापुसा येथील सेंट झेवीयर्स महाविद्यालयाचा श्रेयस बांदोडकर आणि शिवोलीम येथील एसएफएक्स उच्च माध्यमिक शाळेची जे. जेनीता या विद्यार्थीनीचाही या चमुत समावेश आहे.   

प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनासाठी एकूण 198 पैकी 160 विद्यार्थी विद्यार्थीनींची निवड करण्यात येणार आहे. त्यात महाराष्ट्र व गोव्यातील सर्वच म्हणजे 16 विद्यार्थी विद्यार्थीनीची निवड होईल असा विश्वास महाराष्ट्राच्या चमुच्या समन्वयक तथा अमरावती येथील मातोश्री विमलाबाई देशमुख  महाविद्यालयाच्या प्राध्यापिका मंदा नांदुरकर यांनी व्यक्त केला.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी  आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना हे एनएसएस स्वयंसेवक भेटणार असून यावेळी सादर होणा-या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील स्वयंसेवकांची निवड नक्की होईल, असा विश्वास मंदा नांदुरकर  यांनी व्यक्त केला.  
                                       महाराष्ट्र एनएसएसची गौरवशाली परंपरा  
              प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथ संचलनात राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे नेतृत्व करण्याचा बहुमान महाराष्ट्राच्या सोपान मुंडे, खूशबु जोशी आणि आसीफ शेख यांनी मिळविला आहे.

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic

                                                                  00000


सूचना : सोबत छायाचित्रे आहेत.

No comments:

Post a Comment