Wednesday, 17 January 2018

युवा संशोधक जव्वाद पटेल यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट



नवी दिल्ली, १७ : युवा संशोधक व राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त अकोला येथील जव्वाद पटेल यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली.
महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुष्प गुच्छ देऊन जव्वाद पटेल यांचे स्वागत केले. नुकतेच केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने ग्रेटर नोएडा येथील गौतमबुध्द विद्यापीठात पारपडलेल्या २२ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात जव्वाद पटेल यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आरोग्य, उर्जा, कृषी आणि जल क्षेत्रातील जव्वाद यांच्या संशोधन व नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल या पुरस्कारासाठी घेण्यात आली.
यावेळी श्री. कांबळे यांनी जव्वाद पटेल यांच्या कामगिरी बद्दल अभिनंदन केले व भविष्यातील वाटचालीसाठी  त्यांना शुभेच्छा दिल्या.
जव्वाद पटेल हे मुळचे अकोला येथील असून ते सद्य: हेद्राबाद येथील एलआयटी संस्थेतून बी.टेक चे शिक्षण घेत आहेत. त्यांनी आतापर्यंत २ हजारांहून अधिक संशोधन केली आहेत, त्यातील २ संशोधनाला पेटंटही मिळाले आहे. त्यांनी आतापर्यंत विविध ठिकाणी ३९ रिसर्च पेपर्सचे सादरीकरण केले आहे.
पुरस्कारासाठी निवड झालेले संशोधन
जव्वाद यांना सामाजोपयोगी संशोधनात विशेष रस आहे. इलेक्ट्रॉनीक्स क्षेत्राची आवड आणि संशोधकवृत्ती यांची सांगड घालून  त्यांनी  आरोग्य, उर्जा, कृषी आणि जल क्षेत्रात केलेल्या संशोधनाची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  आरोग्य क्षेत्रातील संशोधनात त्यांनी छातीचा कर्करोग शोधून काढणारे इपीडम्सी डिवाईस आणि रक्त नमुना न घेता मधुमेह चाचणी करणारे नॉन इनव्हेसीव शुगर डिटेक्शन डिवाईस तयार केले आहेत. उर्जा क्षेत्रातील संशोधनात त्यांनी सौर उर्जवर चालणारे कार तयार केली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर १०० कि.मी.पर्यंत ही कार आरामात चालू शकते असे हे संशोधन आहे. जल क्षेत्रातील संशोधनात त्यांनी हवेच्या आर्द्रतेपासून पाणी तयार करणारे डयुड्रॉप डिवाईस तयार केले आहे. कृषी क्षेत्रातील संशोधनात त्यांनी रोपटयांना योग्य प्रमाणात पाणी आणि खत पुरविण्यासाठी उपयोगी पडणारे ॲग्रीटेक हे तंत्र विकसीत केले आहे ज्या माध्यमातून रोपटयांना योग्यप्रमणात व वेळेत पाणी व खत देऊन उत्पादन क्षमता वाढविता येते. जव्वाद पटेल यांच्या डयुड्रॉप डिवाईस आणि स्मार्ट हेल्मेट या संशोधनाला पेटंट मिळाले आहे.
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic
                                                                                                                                

                                                       00000 

No comments:

Post a Comment