Tuesday, 16 January 2018

राज्यातील पायाभूत सुविधांसाठी कमी व्याज दराने वित्त पुरवठा व्हावा:मुख्यमंत्री फडणवीस 'मॅग्नेटिक महाराष्ट्र’साठी केंद्रीय अर्थमंत्री उपस्थित राहणार




नवी दिल्ली, 16:  महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी अधिक भांडवली गुंतवणूक उभारण्याची परवानगी मिळण्यासह राज्याच्या हिश्श्याची रक्कम उभारताना नाबार्डकडून कमी व्याजदराने वित्त पुरवठा उपलब्ध करुन देण्यात यावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थ मंत्रालयात आज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन त्यांना  मुंबईत नियोजित जागतिक गुंतवणूक परिषदेस उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. यावेळी झालेल्या बैठकीत आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाबाबतही चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी विविध सूचना केल्या. केंद्रीय अर्थसंकल्पासंदर्भात राज्याच्यावतीने काही अपेक्षा आणि सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी श्री. जेटली यांच्यासमोर मांडल्या. यामध्ये विशेषत: पायाभूत सुविधांची निर्मिती करताना भांडवली गुंतवणूक वाढली पाहिजे, यासाठी महाराष्ट्रासारख्या राज्यांना पायाभूत सुविधांसाठी अधिक भांडवल उभारण्याची परवानगी देण्यात यावी; तसेच कृषी व सिंचन क्षेत्रामध्ये मूलभूत सेवा-सुविधा पुरविण्यासाठी नाबार्डने महाराष्ट्राला आतापर्यंत सुमारे एक हजार कोटी रुपये उपलब्‍ध करुन दिले आहेत. मात्र, यापेक्षा अधिक वित्तपुरवठानाबार्डने उपलब्ध करुन द्यावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

शेती क्षेत्रासाठी सिंचनासह विविध कामांकरीता केंद्राने यापूर्वी राज्याला वित्त पुरवठा केला असला तरीया विविध कामांमध्ये राज्याच्या हिश्श्याची रक्कम उभारण्यासाठी नाबार्डने कमी दराने कर्ज उपलब्ध करुन द्यावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. राज्याच्या इतर मुद्यांबाबतही मुख्यमंत्र्यांनी श्री. जेटली यांच्याशी सविस्तर चर्चा केली.


'मॅग्नेटिक महाराष्ट्र - कन्व्हर्जन्स 2018 ला  केंद्रीय केंद्रीय अर्थमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्रातील गुंतवणुकीला चालना देण्याच्या उद्देशाने मुंबईत 18 ते 20 फेब्रुवारी 2018 या कालावधीत आयोजित पहिल्या 'मॅग्नेटिक महाराष्ट्र - कन्व्हर्जन्स 2018' या जागतिक गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री श्री. अरुण जेटली यांनीही या परिषदेस उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic

No comments:

Post a Comment