Wednesday, 24 January 2018

प्रधानमंत्री यांच्या हस्ते नदाफ इजाज अब्दुल रौफ ला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार









            
नवी दिल्ली, दि. 24 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नांदेड जिल्हयातील पार्डी (मक्ता) येथील नदाफ इजाज अब्दुल रौफ ला यंदाचा (वर्ष २०१७) राष्ट्रीय बाल शोर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रधानमंत्री यांच्या 7, लोककल्याण मार्ग या निवासस्थानी आयोजित शानदार सोहळयात आज ७ मुली आणि ११ मुले अशा एकूण १८ बालकांना वर्ष २०१७ च्या राष्ट्रीय बाल शौर्यपुरस्कारांचे प्रधान मंत्री यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यातील ३ बालकांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला होता, त्यांच्या नातेवाईकांनी हा पुरस्कार स्वीकारला. केंद्रीय महिला बालकल्याण मंत्री मनेका गांधी, मंत्रालयाचे सचिव राकेश श्रीवास्तव ,भारतीय बालकल्याण परिषदेच्या अध्यक्षा गीता सिध्दार्थ यावेळी उपस्थित होत्या. एकूण चार श्रेणींमध्ये प्रदान करण्यात आलेल्या या पुरस्काराचे स्वरूप पदक, सन्मानपत्र आणि रक्कम असे आहे.
            याप्रसंगी प्रधानमंत्री मोदी यांनी उपस्थित बालकांना संबोधित केले. ते म्हणालेपुरस्कार प्राप्त बालकांच्या प्रसंगावधान व साहसामुळे इतरांचे प्राण वाचलेराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांची घोषणा झाल्यापासून या शूर बालकांचे धाडसी कार्य प्रसार माध्यमांद्वारे देशभर पोहचले. देशभरातील बालकांसह संपूर्ण देशवासीयांसाठी या बालकांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांनी देशासाठी उत्तमोत्तम काम करावे असे आवाहनही प्रधानमंत्री मोदी यांनी  केले. मनेका गांधी यांनीही उपस्थित बालकांना मार्गदर्शन केले.
 नांदेड जिल्हयातील अर्धापूर तालुक्यातील पार्डी (मक्ता) येथील इजाज अब्दुल रौफ ला यावेळी राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याने प्रसंगावधान व धाडस दाखवून 2मुलींना तलावात बुडन्यापासून वाचविले. त्याच्या या कामगिरीची नोंद घेऊन हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

            प्रजासत्ताकदिनी राजपथावर होणा-या पथसंचलनात ही शूर बालके सहभागी होणार आहेत. पुरस्कार प्राप्त बालकांनी  यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अन्य गणमान्य व्यक्तींची  भेट घेतली आहे.         
भारत देशाच्या विविध भागातील अतुल्य शौर्य दाखविणा-या ६ ते १८ वर्ष वयोगटातील मुला-मुलींना केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या अधिनस्त राष्ट्रीय बालकल्याण परिषदेच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिना आधी प्रधान मंत्री यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. पुरस्कार प्राप्त बालकांना भारतीय बालकल्याण परिषदेच्यावतीने शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते. तसेच, वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रीकीचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी शिष्यवृत्ती अंतर्गत पदवी पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत पुरविण्यात येते. 
         00000
सूचना : सोबत छायाचित्र आहे.

No comments:

Post a Comment