Wednesday, 14 February 2018

राजधानी दिल्लीत वैविद्यपूर्ण कार्यक्रमांसह शिवजयंती सोहळा : खासदार छत्रपती संभाजी राजे




नवी दिल्ली, १४ : शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाचा वारसा देश- विदेशात पोहचावा, या उद्देशाने अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे दिल्ली येथे 19  20 फेब्रुवारी 2018  दरम्यान वैविध्यपूर्ण कार्यक्रमांच्या आयोजनांसह शिवजयंती सोहळा साजरा होणार असल्याची माहिती खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी आज दिली.
        छत्रपती संभाजी राजे यांच्या ४९, लोधी इस्टेट या निवासस्थानी त्यांनी ही माहिती दिली. राजधानीत आयोजित करण्यात येणा-या शिवजयंती सोहळयात देशभरातील हजारोसंशोधक, अभ्यासक,शिवप्रेमी सहभागी होणार आहेत. कोल्हापुरातून हजारो शिवभक्त सोहळ्यात सहभाग घेत शिवछत्रपतींच्या शौर्याचा वारसा विविध उपक्रमांतून उलगडणार आहेत. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
 
               शिवछत्रपती हे अखंड देशाचे प्रेरणास्थान असून,
 अठरापगड जातींच्या लोकांचे संघटन करून स्वराज्य स्थापन करणारे युगप्रवर्तक आहेत. कुशल प्रशासक, उत्कृष्ट योद्धा व प्रजाहितदक्ष लोककल्याणकारी ही गुणवैशिष्ट्ये असलेल्या या राजाला जागतिक व विशेषत्वाने भारतीय इतिहासात अत्युच्च स्थान आहे. शिवरायांनी लोकशाहीच्या तत्त्वावर राज्यकारभार करत स्वराज्य उभारले. त्यांचे आचार-विचार व राष्ट्राच्या जडघडणीतील भूमिका, शासन व न्याय व्यवस्था, सामाजिक धोरण यांचा प्रसार संपूर्ण देशात करण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
                  आजच्या काळातही देशभरात शिवछत्रपतींचे विचार कसे  प्रासंगीक आहेत. दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याला "लोकोत्सवा'चे स्वरूप प्राप्त झाले असून, शिवजयंती "राष्ट्रोत्सव' होण्यासाठी आम्ही बांधील आहोत. त्यासाठीच दिल्लीमध्ये शिवजयंती सोहळा थाटामाटात आयोजित केला जाणार असल्याचे ते म्हणाले.
 
                 या सोहळ्याच्या तयारीसाठी देशभरातील शिवभक्त अहोरात्र नियोजनात व्यस्त आहेत. महाराष्ट्रातून दिल्लीत येणारे शिवभक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित रहाणार आहेत. शिवराज्याभिषेक सोहळ्याप्रमाणे शिवजयंती सोहळा दिल्लीमध्ये उत्साहात साजरा करण्यासाठी शिवभक्तांनी निर्धार केला आहे. हरियाणातील तीन हजार रोड मराठा बांधव सोहळ्यात सहभागी
होत आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना "राजर्षी' पदवी बहाल करणारे उत्तर प्रदेशातील कुर्मी बांधवही उपस्थित रहाणार आहेत. पंजाब, उत्तरप्रदेश व दिल्लीमध्ये असलेले सर्व मराठी भाषिक व इतर  समाजांचासुद्धा सोहळ्यात सहभाग असणार आहे.

    राजधानीत   भव्य मिरवणूक
                          19 फेब्रुवारीला संसदेच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला सकाळी नऊ वाजता पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सदन येथे शिवजन्मकाळ सोहळा होणार असून, त्यानंतर भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शोभायात्रेत पुण्याचे तीनशे कलाकारांचे स्वराज्य ढोलपथक, साठ कलाकरांचे ध्वज पथक, बारा कलाकारांचे तुतारी पथक, दोनशे जणांची वारकरी दिंडी, सत्तर कलाकारांचे लेझीम पथक, बारा हलगी वादक, वीस जणांचे शाहिरी पथक, ऐंशी कलाकारांचे मर्दानी खेळ पथक, पंचवीस खेळाडूंचे मल्लखांब पथक, पन्नास जणांचे धनगरी (गज) ढोल पथक सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे पूर्वोत्तर राज्यातील लोककलाकर पारंपारिक वेशभूषेत सहभागी होतील.


असे असणार कार्यक्रमाचे स्वरूप 

19 फेब्रुवारी
सकाळी 9 : 00 - संसदेच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार
अर्पण.
सकाळी 10 : 10 -
 नवीन महाराष्ट्र सदन येथे शिवजन्मोत्सव सोहळा व शाहिरी कार्यक्रम 
                         (पाचशे महिलांचा महाराष्ट्रीय वेशभूषेत सहभाग).

सकाळी11 : 00 ते दुपारी 1 -
 महाराष्ट्र सदन, कस्तुरबा गांधी मार्ग, राजपथ ते इंदिरा गांधी राष्ट्रीय
कला केंद्रापर्यंत शोभायात्रा

दुपारी
 1 : 00 ते सायंकाळी 6 - इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र येथे शिवकालीन युद्धकलेची 
प्रात्यक्षिके, महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांच्या छायाचित्र व ऐतिहासिक नाण्यांचे प्रदर्शन,  डॉक्‍युमेंट्रीचे सादरीकरण, रक्तदान शिबिर, पुस्तक प्रकाशन.
सायंकाळी 6 : 00 - मुख्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शिवमूर्तीस अभिवादन. 
7 : 00 - शिवछत्रपतींच्या जीवन चरित्रावर आधारीत "शिवगर्जना' महानाट्याचा प्रयोग
 
                                    20
 फेब्रुवारी
सायंकाळी 7 : 00 - "शिवगर्जना' महानाट्य प्रयोगाचे पुन्हा सादरीकरण

       महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा         :  http://twitter.com/micnewdelhi
 

                                         ०००००००

No comments:

Post a Comment