Saturday, 31 March 2018

महाराष्ट्रातील ४ जिल्हे ठरले "महत्वाकांक्षी" नीति आयोगाची "ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्टस" क्रमवारी जाहीर उस्मानाबाद देशात तिसऱ्या स्थानावर




नवी दिल्ली दि.३०:  पायाभूत सुविधा, शिक्षण कृषी, कौशल्य विकास, आरोग्य, आर्थिक समावेशन आदी निकषांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशातील १०१ जिल्ह्यांची रँकिंग नीति आयोगाने जाहीर केली आहे. या क्रमवारीत महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा समावेश आहे.
           
देशातील मागास जिल्ह्यात स्पर्धेचे वातावरण निर्माण करून विकासाला चालना देण्यासाठी विविध स्तरावर मागास असलेल्या १०१ जिल्ह्यांची निवड  महत्वाकांक्षी जिल्हे रूपांतरण या कार्यक्रमासाठी करण्यात आली होती. जानेवारी २०१७ मध्ये या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. भारत छोडो आंदोलनाच्या ७५ व्या वर्धापन दिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना, " देशात विविध निकषांवर मागास असलेल्या १०० जिल्ह्यांची सामाजिक व आर्थिक परिस्थिती सुधारली तर देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल असे म्हटले होते. या अनुषंगाने नीति आयोगाने  ट्रान्सफॉरमिंग ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्टस हा उपक्रम सुरू केला.

अभिसरण, सहयोग व स्पर्धा हे धोरण
केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचे अभिसरण व या योजनांच्या अंमलबजावणीत प्रभारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांचा सहयोग आणि या योजना अंमलबजावणीचे रूपांतर स्पर्धात्मक व लोक चळवळीत करणे या धोरणातून महत्वाकांक्षी जिल्ह्यांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी देशातील २८ राज्यातील ११५ जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती. ही निवड करताना आर्थिक समावेशन, शिक्षण, आरोग्य व मूलभूत सुविधा हे निकष ठरविण्यात आले होते.

उस्मानाबाद तिसऱ्या स्थानावर
नीति आयोगाने विविध निकषांवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १०१ जिल्ह्यांची क्रमवारी जाहीर केली आहे यात महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा समावेश आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद हा जिल्हा तिसऱ्या स्थानावर आहे. वाशीम हा जिल्हा ११ व्या, गडचिरोली जिल्हा १४ व्या स्थानावर तर नंदूरबार ३९ व्या स्थानावर आहे.

शैक्षणिक निकषांवर महाराष्ट्राची प्रगती
नीति आयोगाने विविध आठ शैक्षणिक निकषांवर देशातील जिल्ह्याचे मूल्यमापन करून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या टॉप २० जिल्ह्यांची क्रमवारी जाहीर केली आहे या मध्ये महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. उस्मानाबाद जिल्हा शैक्षणिक प्रगतीत दुसऱ्या स्थानावर आहे. गडचिरोली जिल्हा तिसऱ्या तर वाशीम पाचव्या स्थानावर आहे.

कृषी क्षेत्रात उस्मानाबाद चौथ्या स्थानावर
उस्मानाबाद हा जिल्हा कृषी क्षेत्रातील विविध निकषांवर देशातील टॉप 20 जिल्ह्यात चौथ्या स्थानावर राहिला आहे. कृषी क्षेत्रांतील कार्याचे मोजमाप हे विविध १० निकषांवर करण्यात आले , यामध्ये गुणवत्तापूर्ण बियाणे वाटप, माती, आरोग्य कार्ड, जनावरांचे लसीकरण, पीक विमा , बाजार उपलब्धता आदी निकषांचा समावेश होता.

आम्हाला ट्विटर वर फॉलो करा
http://twitter.com/micnewdelhi

No comments:

Post a Comment