नवी दिल्ली, ४ : कृषी क्षेत्रातील उत्तमोत्तम प्रयोग व तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचवून त्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने दिनांक १ जून ते ३१ जुलै २०१८ दरम्यान महाराष्ट्राच्या ४ महत्वाकांक्षी जिल्हयातील १०० गावांमध्ये कृषी कल्याण योजना राबविण्यात येत आहे .
देशातील शेतक-यांचे उत्पन्न वर्ष २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे केंद्र शासनाचे ध्येय असून याचाच एक भाग म्हणून केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्यावतीने देशातील १११ महत्वाकांक्षी जिल्हयांमध्ये ‘कृषी कल्याण योजना’ राबविण्यात येत आहे. देशातील प्रत्येक महत्वाकांक्षी जिल्हयातील २५ गावांमध्ये ही योजना राबविण्यात येत असून महाराष्ट्रातील उस्मानाबाद, नंदूरबार, वाशिम आणि गडचिरोली या जिल्हयांमधील प्रत्येकी २५ अशा एकूण १०० गावांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे.
कृषी कल्याण अभियाना विषयी
या कार्यक्रमासाठी निवड झालेल्या गावांमध्ये कृषी कल्याण अभियानाच्या माध्यमातून शेतीच्या विकासासाठी विविध तंत्रज्ञान, अवजारे, उत्तमोत्तम शेती पध्दती आदिंच्या प्रभावी वापराबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हे अभियान राबविण्यासाठी कृषी मंत्रालयाच्या कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण, पशुसंवर्धन , दुग्ध व मत्स विकास, कृषी संशोधन व शिक्षण विभागांनी कृती आराखडा तयार केला असून महत्वाकांक्षी जिल्हयातील प्रत्येकी २५ गावांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी स्थानिक कृषी विज्ञान केंद्र समन्वय करीत आहेत. या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निरिक्षण कक्षही स्थापीत करण्यात आला आहे. यासाठी शेती क्षेत्रातील तज्ज्ञांची निवड करण्यात आली आहे.
अभियानांतर्गत असे राबविण्यात येत आहेत कार्यक्रम
या कार्यक्रमांतर्गत निवड करण्यात आलेल्या गावांतील प्रत्येक शेतक-याला मृदा आरोग्य कार्डाचे वितरण करणे, सूक्ष्म सिंचनाची प्रात्यक्षिके आयोजित करणे, जणावरांमधील पायाच्या तसेच मौखिक आजारासाठी संपूर्ण लसीकरण करणे असे विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. मधुमक्षिका पालन, मशरुमची लागवड आणि स्वयंपाक घरातील बाग अशा उपक्रमांबाबत प्रत्येक गावात माहिती आणि प्रशिक्षण दिले जात आहे. या उपक्रमात महिला आणि शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे.
००००
रितेश भुयार/वृत्त.क्र.२२३/दिनांक ४.६.२०१८
No comments:
Post a Comment