Wednesday, 18 July 2018

सांगली व जळगाव जिल्हयातील जल सिंचन प्रकल्पांसाठी केंद्राची मोठी मदत












             
                                                                                          नवी दिल्ली,  18 :  केंद्रीय कॅबीनेट मध्ये आज  महाराष्ट्र शासनाच्या ‘बळीराजा जलसंजीवनी’ योजनेसाठी मिळालेल्या  भरीव आर्थिक निधीच्या मंजुरीमुळे सांगली व जळगाव जिल्हयातील महत्वाचे जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार असून जिल्हयाला त्याचा मोठा फायदा होणार असल्याच्या भावना सांगलीचे खासदार संजयकाका पाटील व जळगावचे  खासदार ए.टी.नाना पाटील यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रात व्यक्त केल्या.  
                     उभय खासदारांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी खासदारद्वयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा, उपसंपादक रितेश भुयार , दैनिक सामनाचे ब्युरो चिफ निलेश कुलकर्णी आणि ज्येष्ठ पत्रकार विनीत वाही यावेळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या अनौपचारीक चर्चेत उभय खासदारांनी माहिती दिली.
                     टेंभू जलसिंचन योजनेच्या माध्यमातून जिल्हयातील दुष्काळी भागांना होणार फायदा
          महाराष्ट्र शासनाच्या ‘बळीराजा जलसंजीवनी’ योजनेंतर्गत राज्यातील दुष्काळग्रस्त व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयांतील जलसिंचन प्रकल्पांसाठी केंद्र शासनाकडून आज 13 हजार 651 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या योजनेंतर्गत राज्यातील एकूण ९१ प्रकल्पांसाठी हा निधी प्रदान करण्यात येणार असून सांगली जिल्हयातील टेंभू जलसिंचन प्रकल्पासाठी १ हजार२०३ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या सिंचन प्रकल्पामुळे सांगली जिल्हयातील जत , कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाला विशेष फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. टेंभू योजनेला निधी मिळावा यासाठी केंद्राकडे सतत पाठपुरावा केल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.
                                  जळगाव जिल्हयातील दोन महत्वाच्या जलसिंचन प्रकल्पास मोठा फायदा  
                     ‘बळीराजा जलसंजीवनी’ योजनेंतर्गत जळगाव जिल्हयातील चाळीसगाव तालुक्यातील  ‘वरखेड लोंढे’ जल सिंचन प्रकल्पाला ४५६ कोटी ८६ लाख रूपयांचा निधी केंद्राकडून मंजूर झाल्याचे जळगावचे खासदार ए.टी.नाना पाटील यांनी सांगितले. जिल्हयातील हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प असून गेल्या २० वर्षांपासून निधी अभावी या प्रकल्पाचे काम रखडले होते. मात्र, केंद्र आणि राज्य शासनाने घेतलेल्या पुढाकारामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास जावून चाळीसगावसह,भडगाव आणि पाचोरा तालुक्यातील शेतक-यांनाही याचा फायदा होणार असल्याचे श्री. पाटील म्हणाले. यासह शेळगाव बॅरजसाठीही ६२० कोटी ५८ लाखांच्या निधीस केंद्राने आज मंजुरी दिली आहे. या दोन्ही जलसिंचन प्रकल्पांमुळे जिल्हयातील शेतक-यांना मोठा फायदा होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. श्री. पाटील यांनी उभय प्रकल्पांसाठी केंद्राकडे पाठपुरावा केला होता. नुकतेच मसुरी येथे झालेल्या केंद्रशासनाच्या जल संशोधन समितीच्या बैठकीत उभय प्रकल्पांना केंद्राकडून आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे आश्वासन केंद्रीय जलसपंदा राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी दिले होते व आज यावर शिक्का मोर्तब झाल्याचे  श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
                  महाराष्ट्र परिचय केंदा्रच्या कामाविषयी यावेळी उभय खासदारांनी माहिती जाणून घेतली व कार्यालयाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic
                                               
                                     0000   
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.२६८/ दिनांक १८.०७.२०१८  


No comments:

Post a Comment