नवी दिल्ली, १६ : नव भारताच्या निर्मितीसाठी प्रत्येकाने एकजुटीने व सकारात्मक ऊर्जेने कार्य करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
येथील विज्ञान भवनात ‘वाय फोर डी’ या संस्थेच्यावतीने आयोजित ‘नव भारत’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत श्री. फडणवीस बोलत होते. दिवसभर चाललेल्या या परिषदेत सायंकाळच्या विशेष सत्रात मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोंधित केले व त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.
श्री. फडणवीस म्हणाले, सकारात्मक ऊर्जा एकत्रित आल्यास समाजामध्ये मोठे परिवर्तन होऊ शकते हे ‘वाय फोर डी’ या संस्थेच्या माध्यमातून देशात घडून आलेल्या कार्याद्वारे आपल्या समोर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला ‘स्वच्छ भारता’चे आवाहन दिले. बघता-बघता सकारात्मक ऊर्जा कामाला लागली आणि देशात स्वच्छतेच्या क्षेत्रात खूप मोठे कार्य घडून आले.
महाराष्ट्रात ६० लाख स्वच्छतागृहांचे निर्माण आणि १६ हजार गावे दुष्काळ मुक्त
सकारात्मक ऊर्जा व लोकसहभागातून मोठे परिवर्तन घडू शकते याची प्रचिती महाराष्ट्रात शौचालय निर्माण व जलसंधारण क्षेत्रात झालेल्या कामांमुळे आल्याचे श्री. फडणवीस म्हणाले. गेल्या ३ वर्षात महाराष्ट्रात ६० लाख शौचालये बांधण्यात आली. यामुळे ग्रामीण भागाचा कायापालट झाला . लोकांना स्वच्छतेच्या सवयी लागल्या व ग्रामीण महाराष्ट्र हगणदारी मुक्त झाला.
राज्य शासन व लोक सहभागातून महाराष्ट्रात जलसंधारणाचे मोठे कार्य घडून आले. सकारात्मक ऊर्जेचे हे मोठे उदाहरण असून जलसंधारण क्षेत्रातील उत्तम कार्यामुळे आज राज्यातील १६ हजार गावे दुष्काळमुक्त झाल्याचे श्री. फडणवीस म्हणाले.
‘मॉडेल गाव’ योजनेत लोकसहभाग
राज्यशासन, विविध सामाजिक संस्था आणि उद्योग क्षेत्राच्या सहकार्यातून राज्यात १ हजार गावे मॉडेल गावे करण्याचे कार्य सुरु असल्याचे श्री .फडणवीस यांनी सांगितले. सकारात्मक ऊर्जा व जनसहभाग याचे हे उत्तम उदारहरण असून देशातही असे परिवर्तन घडत आहे त्यासाठी प्रत्येक भारतीयाने आपले योगदान दयावे असे आवाहन श्री. फडणवीस यांनी यावेळी केले.
******
No comments:
Post a Comment