Monday, 9 July 2018

आयआयटी मुंबई देशातील ६ प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्ये











नवी दिल्ली, ९ :  केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने  सार्वजनिक क्षेत्रातील ३ व खाजगी क्षेत्रातील ३ अशा भारतातील एकूण ६ शैक्षणिक प्रतिष्ठित संस्थांची नावे जाहीर केली असून यात आयआयटी मुंबईचा समावेश आहे.
            केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज ट्विट करून देशातील ६ प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांच्या नावांची घोषणा केली.  मंत्रालयाच्यावतीने  नेमण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या समितीने देशातील सर्वोच्च गुणवत्ता असलेल्या ६ शैक्षणिक संस्थांची निवड केली आहे. जागतिक गुणवत्ता क्रमावारीत स्थान मिळविण्यासाठी  या  संस्थांना केंद्र शासनाकडून पुढील ५ वर्षांसाठी १ हजार कोटींचा निधी प्रदान करण्यात येणार असल्याची माहितीही श्री. जावडेकर यांनी दिली आहे.
                     देशातील सर्वोच्च ३ शासकीय शैक्षणिक संस्थेत आयआयटी मुंबई
            देशातील सर्वोच्च गुणवत्ता प्राप्त तीन शासकीय शैक्षणिक संस्थाची निवड करण्यात आली आहे. यात आयआयटी  मुंबई (महाराष्ट्र), आयआयटी दिल्ली(दिल्ली) आणि आयआयएससी बंग्लोर (कर्नाटक) चा समावेश आहे.
            यासह खाजगी क्षेत्रातील मनीपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशन (कर्नाटक), बिट्स पिलानी(राजस्थान) आणि जीओ इन्सिटीटयूट  या तीन शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.

                                       या प्रतिष्ठित संस्थां होणार विविध सुविधांनी सज्ज 
        जगातील पहिल्या १०० किंवा २०० शैक्षणिक संस्थांमध्ये भारतातील एकाही संस्थेचा समावेश नसल्याने केंद्र शासनाने आता या क्रमवारीत भारतातील शैक्षणिक संस्थांना स्थान मिळवून देण्यच्या दिशेने पाऊले टाकत यासाठी ६ शैक्षणिक संस्थांची निवड केली आहे. सद्या देशात एकूण ८०० विद्यापीठ असून यातील ६ अभिमत विद्यापीठ दर्जा प्राप्त शैक्षणिक संस्थांची प्रतिष्ठीत शैक्षणिक संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे.
            या संस्थाना जागतिक क्रमावारीत येण्याच्या दिशेने सज्ज करण्यासाठी येत्या ५ वर्षाच्या काळात १ हजार कोटींचा निधी प्रदान करण्यात येणार आहे. आजच्या निवडीमुळे या संस्थांना पूर्णपणे स्वायत्तता प्राप्त झाली असून या संस्थांना निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र असणार आहे. या संस्थांमधील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा पूर्ण अधिकार, शिष्यवृत्ती, शैक्षणिक खर्चात सुट आदी सुविधा प्रदान करण्यात येतील. तसेच जागतिक दर्जाच्या सर्व सुविधाही येथे पुरविण्यात येणार असल्याचे श्री. जावडेकर यांनी सांगितले आहे.
                                                                ०००० 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.२५३/ दिनांक ०९.०७.२०१८
  




No comments:

Post a Comment