Wednesday 29 August 2018

डॉ. ज्ञानेश्वर मुळेंचा प्रवास भारतीयांसाठी प्रेरणादायी : मंत्री पियुष गोयल


                                                    




नवी दिल्ली 29: डॉ.ज्ञानेश्वर मुळेंचा प्रवास भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. पासपोर्टसारखी जटल वाटणारी सेवा सामान्यांपर्यंत पोहचविण्यात मुळें यांचे योगदान मोठे आहे, असे गौरवोदगार केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आज येथे काढले. भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन आज (२८.८.२०१८) येथील संसद प्रांगणात झाले. त्या प्रसंगी मंत्री श्री. गोयल बोलत होते.
ते म्हणाले, डॉ. मुळे हे कोल्हापूर सारख्या ग्रामीण भागातून येऊन परराष्ट्र सेवेत रूजू झाले, त्यांचा जीवनाचा संघर्ष हा आजच्या तरूणांसाठी प्रेरणादायी आहे. अवघ्या एक वर्षात पावणे तीनशेपेक्षा जास्त पासपोर्ट सेवा केंद्र देशात उभे करून त्यांनी भारतीय प्रशासनासमोर नवा आदर्श घालून दिला आहे. या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर मंत्री श्री. गोयल यांच्यासह केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, विचारवंत आणि संसद सदस्य कुमार केतकर, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य श्री. अजित भोसले, श्री. भास्कर प्रकाश हे होते.
डॉ. मुळे यांनी लिहिलेल्या पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया व अँन्ड द जिप्सी लर्नड टू फ्लाय या दोन पुस्तकांचे प्रकाशन श्री. गोयल व श्री. केतकर यांचे हस्ते झाले. पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया हे पुस्तक पासपोर्ट सेवा कश्या पध्दतीने भारतात विस्तारण्यात यश आले आहे याची यशोगाथा सांगते तर अँन्ड द जिप्सी लर्नड टू फ्लाय हे पुस्तक डॉ. मुळे यांचे आत्मचरित्रावर प्रकाश टाकणारे आहे. हे पुस्तक माती, पंख आणि आकाश या मराठी पुस्तकाची सुधारित पहिली इंग्रजी आवृत्ती आहे.
या प्रसंगी मनोगत व्यकत करताना डॉ. मुळे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लाट सारख्या खेडे गावातून मी जेव्हा प्रथमच दिल्लीत आलो तेव्हा टाय व बुट कश्या पध्दतीने वापरावेत, हे सुध्दा मला माहिती नव्हते परंतु देश सेवा करायची आहे या प्रेरणेने जगभर नोकरीच्या निमित्ताने फिरलो. टोयाटोची पहिली फॅक्टरी जपानपूर्वी भारतात सुरू केली. दिल्लीच्या मेट्रोला जागतिक जाचक अटीतून मुक्त करून दिली. रशियात इंडियनन बिझनेस असोसिएशन सुरू केली. ही असोसिएशन आजही अविरतपणे सुरू आहे. मालदिवमध्ये माझ्या नावे स्पर्धांचे आयोजन केले जाते. देशाच्यासेवेसाठी एक शेतकरी वर्गातील मुलगा परराष्ट्र सेवेत प्रचंड कार्य करू शकतो, याचा अभिमान मला आहे

डॉ. सुभाष भामरे यांनी शुभेच्छापर भाषणात म्हणाले, डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचा परिचय गेल्या दोन वर्षात झाला. मी त्यांना पासपोर्ट कार्यालय माझ्या मतदार संघात उघडण्याची विनंती केली व अवघ्या कांही दिवसात धुळे सारख्या निमशहरी भागात पासोपोर्ट कार्यालय सुरू झाले. जलदगतीने प्रशासन चालविण्याची किमया डॉ. मुळे यांच्या जवळ आहे आणि ते महाराष्ट्रीयन असल्याचा मला अभिमान आहे.


श्री. केतकर म्हणाले, माझा व मुळे यांचा परिचय वीस वर्षांपासून आहे. मी रशियात वृत्तपत्र प्रतिनिधी होतो तेव्हा मुळे हे रशियात भारताचे राजदूत प्रतिनिधी होते. त्यांचे कार्य मी जवळून अनुभवले आहे. साधाना सारख्या प्रतिष्ठीत मासिकातून त्यांनी केलेले लेखन वाचनीय व संग्रही ठेवण्यासारखे आहे. त्यांच्या आजच्या पुस्तकांचे प्रकाशनास माझ्या शुभेच्छा.


श्री. भोसले यांचे शुभेच्छापर भाषण झाले. या प्रसंगी कार्यक्रमाच्या सुरवातीस दिप प्रज्वलन व माजी पंत प्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण करून झाली. सौ. क्षमा पाठक यांच्या सरस्वती वंदनेने कार्यक्रमाची सुरूवात झाली. धनंजय बावळेकर यांनी श्री. मुळे यांच्या जीवनावर आधारित जिप्सी या मराठी लघुपटाची निर्मिती केली आहे. या लघुपटातील कांही क्षणचित्रे समारंभ प्रसंगी दाखविण्यात आली. समारंभाचे सुत्रसंचालन निवेदिता खांडेकर यांनी केले तर पुढचे पाऊलचे अध्यक्ष प्रफूल्ल पाठक यांनी आभार मानले.

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा
**********
दयानंद कांबळे/वृत्त वि. क्र. 323  दिनांक 29.08.2018 



No comments:

Post a Comment