Thursday, 30 August 2018

मुंबईत होणा-या व्हील चेअर क्रिकेट आशिया कप स्पर्धेसाठी सर्वतोपरी मदत : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले


                                      

                                                    
नवी दिल्ली, 30 : येत्या नोव्हेंबर महिन्यात मुंबई येथे होत असलेल्या व्हील चेअर क्रिकेट आशिया कप स्पर्धेसाठी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन आज केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले.
                 भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाने नुकतेच श्रीलंका दिव्यांग क्रिकेट संघाचा २-१ असा पराभव करून टी२० मालिका जिंकली आहे. या पार्श्वभूमीवर श्री आठवले यांनी भारतीय दिव्यांग क्रिकेट संघातील खेळाडूंचा आज सत्कार केला. यावेळी श्री. आठवले बोलत होते.
            डिसेबल स्पोर्टिंग सोसायटी अंतर्गत कार्यरत भारतीय दिव्यांग क्रिकेट संघ आणि व्हील चेअर क्रिकेट संघाच्या विविध अडचणींबाबत यावेळी खेळाडूंनी श्री. आठवले यांच्या समोर विषय ठेवले. या सर्व विषयांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन श्री. आठवले यांनी दिले. तसेच, ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०१८ दरम्यान मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘व्हील चेअर क्रिकेट आशिया कप स्पर्धेसाठी’ केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन श्री .आठवले यांनी  दिले.      
    श्री आठवले म्हणाले, भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाने श्रीलंका संघासोबतची  टी२० मालिका जिंकून मोठी उपलब्धी मिळविली आहे. या संघातील प्रत्येक खेळाडू  मेहनती असून देशासाठी त्यांनी हा बहुमान मिळवून दिला. संघातील सर्व गुणी खेळाडूंना शासकीय नोकरी देण्यासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयासोबत चर्चा करण्याचे आश्वासनही त्यांनी  यावेळी दिले.    
                                                        ०००००    
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 326  दिनांक  30.08.2018   
            

No comments:

Post a Comment